गोवा विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांची एन्ट्री कोणाची डोकेदुखी ठरणार?
गोवा विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्यासह आम आदमी पक्षाने मोठा जोर लावला आहे. मात्र, या दोनही पक्षाच्या एन्ट्रीने भाजपचं चांगभलं होणार की कॉंग्रेसचं? ममता बॅनर्जी गोव्यासारख्या छोट्या राज्यात पक्ष विस्तार करण्याचा का विचार करत आहे वाचा...
किनारपट्टीवरील राज्य असलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणूकीत यावेळी मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. गोव्यात सध्या भाजपच सरकरा आहे. तर कॉंग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात थेट सामना होणार असल्याचं चित्र असताना आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीने देखील निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रोमांचक होण्याची चिन्हं आहेत. गोव्याचं राजकारण उत्तर आणि दक्षिण गोव्यात विभागलं आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये गोव्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. गोवा विधानसभेचं पक्षीय बलाबल... 40 जागा असलेल्या गोवा विधानसभेत भाजपचे सध्या 27 आमदार आहेत. तर एका अपक्ष आमदाराचा भाजपला पाठींबा आहे. तर काँग्रेसकडे केवळ चार आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाकडे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक आमदार आहे.
दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेस 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तरी देखील, भाजपने जोडून - तोडून सरकार स्थापन केले आहे.
शहा यांचा दौरा...
भाजपच्या वतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आत्तापासूनच कंबर कसली आहे. बाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच राज्याचा दौरा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, भाजप प्रादेशिक पक्ष एमजीपीसोबत युती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या युतीमध्ये मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची उणीव भाजपला भासणार असल्याचं दिसून येत आहे.
तृणमुल कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाचं लहान राज्यांवर लक्ष केंद्रित...
तृणमुल कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष त्यांच्या राजकीय विस्तारासाठी लहान राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. कारण, हे पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, म्हणून ते त्यांच्या मूळ राज्यांच्या बाहेर पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचं लक्ष 2024 ची लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळं 2024 ला पंतप्रधान होण्यासाठी पश्चिम बंगाल बाहेर पक्षाचा विस्तार करणं गरजेचं आहे. त्यामुळं या रणनीतिचा भाग म्हणून ममता बॅनर्जी गोव्या सारख्या लहान राज्यात पक्ष विस्तार करत आहेत.
गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल सातत्याने राज्याचे दौरे करत आहेत. हे दोन्ही पक्ष रिंगणात आल्याने गोवा विधानसभा निवडणूक अधिकच रंजक होणार आहे.
कॉंग्रेसचे फलेरो टीएमसी सोबत...
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फलेरो यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गोव्यातील जनता यावेळीही काँग्रेसलाच मतदान करेल, असे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे. गेल्या वेळी जनादेशाचा अपमान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र, काँग्रेसला टीएमसी आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांची अडचण होणार आहे. त्यातच, माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फलेरो यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला फटका बसू शकतो.
एवढंच नाही तर ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसलाही पक्षात प्रवेश दिला आहे. ममता बॅनर्जी या छोट्या राज्यात तीन दिवस राहिल्याने त्यांना इथे सरकार बनवायचं आहे हे स्पष्ट दिसून येतं आहे. तसेच, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची टीमही ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहे.
केजरीवाल यांचा दौरा...
याशिवाय अरविंद केजरीवाल हे देखील सातत्याने गोव्याला भेट देत आहेत. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. केजरीवाल म्हणतात की, गोव्यात काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले होते आणि मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही असंच घडलं. मात्र, त्यांचा पक्ष गोव्यातील निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. मार्च 2017 मध्ये झालेल्या गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने चांगली टक्कर दिली होती. मात्र, एकही जागा जिंकू शकला नव्हता. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार माजी अधिकारी एल्विस गोम्स चौथ्या क्रमांकावर होते. मात्र, यावेळी पक्षाकडून चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.
गोव्यामध्ये, प्रत्येक जागेवर 20 ते 25 हजार मतदार आहेत. अशा परिस्थितीत विजयासाठी पूर्ण ताकद लावावी लागेल. कारण सहसा पराभव आणि विजय यातील फरक मोठा नसतो. तर, राज्यात हिंदू आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान, तृणमूल कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष रिंगणात आल्याने भाजपला नक्कीच फायदा होईल. पण कोरोनाच्या काळात गैरव्यवस्थापन, वाढती महागाई हा भाजपसाठी मुद्दा राहिला आहे. त्याची प्रचितीही पोटनिवडणुकीच्या निकालात आली. मात्र, विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाचाही काही जागांवर चांगला जनाधार आहे. तर, गोव्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं गोव्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.