गोडसेंची गोष्ट मांजरेकरांच्या हृदयाजवळची आहे म्हणजे नक्की काय?
नथुराम गोडसे ने महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न किती वेळा केला माहिती आहे का? नथुराम चं दैवतीकरण करणाऱ्यांबरोबरच नथुराम बाबत सोशल मीडियावर आलेल्या मेसेजची सत्यता न तपासता गांधींबाबत मनामध्ये संभ्रम निर्माण केलेल्या प्रत्येकाने वाचावा असा सुनिल सांगळे यांचा हा लेख नक्की वाचा...;
सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नथुराम गोडसे यांच्या जीवनावर एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत हे त्यांनी महात्मा गांधींच्या जयंतीचा मुहूर्त खास साधून जाहीर केले. मांजरेकरांनी गोडसे यांच्या जीवनावर एखादा चित्रपट काढावा यात काहीच गैर नाही. गोडसे गांधीजींचा खून करण्यात अपयशी झाले असते आणि आज महात्मा गांधी आणि गोडसे दोघेही जिवंत असते तरी गांधीजींनी मांजरेकरांच्या या उपक्रमाचे स्वागतच केले असते. मांजरेकर ही घोषणा करतांना गोडसेंची कथा ही त्यांच्या हृदयाजवळची आहे असे म्हणतात.
तसेच मांजरेकर 'महात्मा गांधी' किंवा 'गांधीजी' असा शब्द वापराने कटाक्षाने टाळतात आणि केवळ 'गांधी' हा शब्द त्यांच्या ट्विटमध्ये वापरतात हे लक्षात घेण्याजोगे आहे. गोडसेंची गोष्ट मांजरेकरांच्या हृदयाजवळची आहे म्हणजे नक्की काय? ते गोडसेला पूज्य मानतात, की त्यांना त्याच्याबद्दल प्रेम आहे? हृदयाजवळ असलेली व्यक्ती सर्वसाधारणपणे आपली आवडती असते हे गृहीत आहे. तरीही मांजरेकर गोडसेचे उदात्तीकरण करणार नाहीत यावर आपण विश्वास ठेवू आणि ते निरपेक्ष बुद्धीने आणि तटस्थपणे चित्रपट काढतील यावर आपण विश्वास ठेवू.
वास्तविक कोणाही सामान्य माणसाला जर विचारले की, गोडसेने गांधीजींचा खून का केला? तर साधारणपणे हे उत्तर मिळते की गांधीजींनी भारताची फाळणी केली व पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले! ते कसे असत्य आहे ते बघू.
गांधीजींच्या खुनाचे एकंदर सहा प्रयत्न झाले. स्वतः गांधीजींनी ३० जून १९४६ ला पुण्यातील प्रार्थना सभेत असे नमूद केले की ईश्वरकृपेने ते सातव्यांदा वाचले आहेत.
गांधीजींच्या हत्येचा पहिला प्रयत्न २५ जून १९३४ रोजी पुण्यातच झाला. त्याआधी गांधीजी जवळजवळ वर्षभर राजकीय चळवळ स्थगित करून केवळ अस्पृश्यतानिवारणाच्या कामात गुंतले होते आणि त्यांनी त्यासाठी हजारो किलोमीटर फिरून भारतभर दौरे काढले. या मोहिमेत अत्यंत ज्वालाग्राही असा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा विषयही होता. गांधीजी दक्षिण भारतात ही मोहीम चालवीत असतांना थेट बनारसहून लालनाथ नावाच्या सनातनी स्वामींच्या नेतृत्वाखाली एक गट तिथे जाऊन मोटारींसमोर झोपत असे, काळे झेंडे दाखवत असे, गांधीजींचे पुतळे जाळत असे व सभांमध्ये गोंधळ घालत असे.
अस्पृश्यता निवारणाच्या या कार्याबद्दल पुणे नगर परिषदेने गांधीजींचा मानपत्र देण्यासाठी सत्कार आयोजित केला होता. परंतु गांधीजी पुण्यात येण्यापूर्वीच काळे कपडे घातलेल्या आणि काळ्या घोड्यावर स्वार झालेल्या एका इसमाच्या नेतृत्वाखाली शेकडो लोकांनी या सत्काराला विरोध करण्यासाठी मंदिर प्रवेशाविरुद्ध फलक घेऊन पुण्याच्या रस्त्यावर निदर्शने केली. प्रत्यक्ष सत्काराच्या दिवशी गांधीजींच्या मोटारीवर बॉम्ब फेकण्यात आला, पण तो रस्त्यावर पडल्याने गांधीजी त्या हल्ल्यातून बचावले.
मांजरेकर हा हल्ला कोणी केला यावर संशोधन करतील अशी आशा आहे, कारण १९३४ साली फाळणी, पाकिस्तान, ५५ कोटी हे विषयच अस्तित्वात नव्हते.
.त्यानंतर जुलै १९४४ साली पाचगणीला नथूरामच्याच नेतृत्वाखाली एक गट गांधीजींच्या निवासस्थानाबाहेर दिवसभर घोषणा देत होता. गांधीजींनी नथुरामला चर्चेसाठी बोलाविले, पण नथुराम अर्थातच चर्चेला गेला नाही. सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी नथुराम सुरा घेऊन गांधीजींना मारायला धावला, पण त्याला पकडण्यात आले. प्रत्यक्ष गांधी हत्या झाल्यावर जे लोक दोषी आढळले, तेच या जुलै १९४४ च्या कटात सामील होते.
त्यानंतर ९ सप्टेंबर १९४४ ला सेवाग्राम इथे नथुराम परत एकदा गांधीजींच्या दिशेने जात असतांना त्याला पकडून त्याच्याकडून जंबिया जप्त करण्यात आला.
२९ जून, १९४६ रोजी गांधीजी ज्या स्पेशल ट्रेन ने मुंबईहून पुण्याला निघाले होते, तिच्या मार्गावर नेरळ आणि कर्जतच्या दरम्यान रुळावर मोठ्या मोठ्या दरडी टाकून अपघात करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून ट्रेनचे नुकसान झाले, पण गांधीजी वाचले. २० जानेवारी १९४८ ला गांधीजींच्या सभेत दिल्लीला बॉम्ब टाकण्यात आला आणि तो गांधीजींपासून थोड्या अंतरावर फुटला. शेवटचा खुनाचा प्रयत्न ३० जानेवारी १९४८ रोजी यशस्वी झाला.
महेश मांजरेकर हे म्हणतात त्याप्रमाणे जर ते वस्तुस्थिती तटस्थपणे मांडणार असतील तर त्यांनी चित्रपटाचा किमान ३० टक्के भाग गांधीजींच्या खुनाचे पहिले तीन प्रयत्न का झाले यावर खर्च करावा हीच अपेक्षा, कारण त्यावेळेस फाळणीद्वारे पाकिस्तानची निर्मिती, ५५ कोटी हे विषय दूर दूर क्षितिजावर नव्हते.
या पहिल्या तीन खुनांच्या प्रयत्नांचा थेट संबंध अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी गांधीजी जे आंदोलन चालवीत होते त्याच्याशी आणि त्यांनी जातिव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी जे आंदोलन चालविले होते त्याच्याशी दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या वेळी जो प्रखर विरोध झाला तो पाहता हाच निष्कर्ष काढावा लागतो.
. हा चित्रपट काढण्यासाठी मांजरेकर "गांधीहत्या आणि मी" तसेच "५५ कोटींचे बळी" ही पुस्तके वाचतीलच. मांजरेकर यांनी त्याच्या प्रयत्नात तटस्थता येण्यासाठी सुप्रसिद्ध विचारवंत य.दि.फडके यांचे "नथुरामायण", जगन फडणीस यांचे "महात्म्याची अखेर", लॅरी कॉलिन्स आणि डोमिनिक लॅपीए यांचे "Freedom At Midnight" ही पुस्तके देखील संदर्भासाठी किमान जरूर वाचावी. कारण शेवटी प्रश्न हा जगभर कोट्यवधी लोकांना आणि नेल्सन मंडेला, आईन्स्टाईन, मार्टिन ल्युथर किंग, बाराक ओबामा सारख्या नेत्यांना व विचारवंतांना वंदनीय असलेल्या व्यक्तीच्या बदनामीचा आहे.
वरील गांधीहत्येचे सर्व प्रयत्न जर पाहिले तर ते महाराष्ट्रातच आणि त्यातही पुण्याजवळ आणि पुण्यातील एका गटाकडून केले गेले हे स्पष्ट आहे. गांधीहत्येचे पाप महाराष्ट्राच्या डोक्यावर आहेच. त्यात आणखी मागील अनेक दशके त्याचे एकतर्फी समर्थन करण्याचे प्रयत्न रंगभूमीवर सुरु आहेतच. त्यात आता परत एकदा एका प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने तेच पाप देशपातळीवर करण्याची भर नको, एव्हढेच!
सुनिल सांगळे
(फेसबुक साभार)