महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस

महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती आताच होऊन गेली.! त्या निमित्ताने नेताजींची ढाल करून महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य करण्याचे उद्योग सोशल मिडियावर दिवसभर चालले. हे उद्योग अर्थातच ज्या लोकांचा नेताजींशी काहीही संबंध नव्हता, किंबहुना स्वातंत्र्यलढ्याशीही ज्यांचा दुरूनही संबंध नव्हता, त्यांनी केल्याचे विश्लेषन केलं आहे सुनिल सांगळे यांनी...

Update: 2022-01-26 07:42 GMT

महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती आताच होऊन गेली.! त्या निमित्ताने नेताजींची ढाल करून महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य करण्याचे उद्योग सोशल मिडियावर दिवसभर चालले. हे उद्योग अर्थातच ज्या लोकांचा नेताजींशी काहीही संबंध नव्हता, किंबहुना स्वातंत्र्यलढ्याशीही ज्यांचा दुरूनही संबंध नव्हता, त्यांनी केले. ज्यांना स्वातंत्र्यलढ्यात दाखवता येतील असे स्वतःचे कोणीही आदर्श नाहीत, त्यांनी नेताजी, सरदार पटेल, भगत सिंग, आझाद आदी नेते जणू काही रोज शाखेत येणारे स्वयंसेवकच होते असे चित्र गेल्या काही वर्षात उभे केले आहे. ती गोष्ट अर्थातच त्यांची मजबुरी आहे. पण प्रत्यक्षात स्थिती काय होती?

सुभाषबाबू हे परदेशातून उच्च शिक्षण घेऊन वयाच्या २४ व्या वर्षी १६ जुलै १९२१ साली परत भारतात आले व ते मुंबईत उतरले. त्यावेळेस गांधीजी मुंबईतच असल्याने त्यांनी तिथेच महात्मा गांधी यांची पहिली भेट घेतली. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की सुभाषबाबू आणि गांधीजी यांच्यात वयाचे अंतर तब्बल २६ वर्षे होते, म्हणजे जवळपास वडील आणि मुलाचे असावे इतके होते. बोस हे नुकतेच शिक्षण पूर्ण झालेले तरुण होते व सार्वजनिक जीवनात उतरण्याचा त्यांचा मानस होता. या उलट गांधीजी या वेळेस पन्नास वर्षांचे मुरब्बी राजकारणी होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात लाखो लोक सहभागी असलेले असहकार चळवळीचे प्रचंड आंदोलन सुरु होते . या पहिल्या भेटीतच गांधीजी व बोस यांच्यातील मतभेदाचे मुद्दे समोर आले होते असे बोस यांनीच लिहून ठेवले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अहिंसक मार्गानेच जावे हे गांधीजींचे म्हणणे बोस यांना मान्य नव्हते. या उलट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन दशके तरी हुकूमशाही राजवटीची गरज आहे हे बोस यांचे म्हणणे लोकशाहीवादी गांधीजींना पटणे शक्यच नव्हते.

वास्तविक पाहता महात्मा गांधी-सुभाषचंद्र बोस यांचे एवढे टोकाचे मतभेद असतांना देखील ते नंतर जवळपास वीस वर्षे सोबत काम करीत होते हेच आश्चर्यजनक आहे. पण त्या काळात गांधीजी हे करोडो भारतीयांचे सर्वमान्य नेते होते आणि काँग्रेसमध्ये त्या काळात सर्व प्रकारच्या विचारसरणीचे लोक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते. या भेटीनंतर गांधीजींनी बोस यांना बंगालमध्ये चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पाठवले. दास हे गांधीजींच्या तुलनेत अधिक जहाल नेते असल्याने बोस यांचे त्यांच्याशी चांगले जमले. बोस १९२७ साली काँग्रेसचे सरचिटणीस झाले. बोस व नेहरू हे दोघेही समाजवादी विचारसरणी मानणारे अत्यंत लोकप्रिय पुढारी असल्याने त्यांचा गट हा काँग्रेसमधील प्रभावशाली गट होता, व सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत, राजेंद्रप्रसाद इत्यादी उजव्या विचारसरणीच्या गटाला तो काँग्रेस अंतर्गत राजकारणात मात देत असे. असे असले तरी या दोन्ही गटांना गांधीजींचे नेतृत्व विनातक्रार मान्य होते. मग गांधी-बोस मतभेद विकोपाला का गेले?

सुभाषबाबूंना ध्येय गाठण्यासाठी हिंसेचा अवलंब करणे मान्य होते व त्यांचा कल हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीकडे (निदान दोन दशके तरी) होता हे गांधीजींना त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच माहित होते. सुभाषबाबुंचा हा कल नंतरच्या आयुष्यात त्यांनी मुसोलिनी, हिटलर आदी हुकूमशहांच्या भेटी घेऊन त्यांची मदत घेतली त्यात पुढे अधिक स्पष्ट झालाच. १९२८ साली सुभाषबाबूंनी कलकत्त्याला काँग्रेसचे अधिवेशन भरवण्यात पुढाकार घेतला होता. त्यावेळेस त्यांनी स्वतःसाठी जनरल ऑफिसर इन कमांड या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश शिवून घेतला होता. काँग्रेसच्या २००० स्वयंसेवकांना देखील लष्करी गणवेश देऊन त्यांची लष्करी बुटांच्या तालासुरात बोस यांनी मानवंदना स्वीकारली. त्यांच्या हातात तेंव्हा फिल्ड मार्शल या सर्वोच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची बॅटन होती. अर्थात हे सर्व महात्मा गांधींना पसंत पडणे शक्यच नव्हते आणि त्यांनी सर्व प्रकाराची सर्कस म्हणून संभावना केली. या नंतर १९३० च्या दशकात सुभाषबाबूंनी युरोपात जाऊन इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याची भेट घेतली आणि फॅसिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष संघटनांच्या कार्यपद्धतीचा अभ्यासही केला. या गोष्टीनंतर गांधीजींशी त्यांचा संघर्ष अटळ होता.

१९३८ साली सुभाषबाबूंनी इंग्रजांविरुद्ध पूर्ण स्वराज्य मिळविण्यासाठी बळाचा वापर करण्याचाही पुरस्कार केला व १९३९ साली त्यांनी गांधीजींच्या इच्छेविरुद्ध पट्टाभी सीतारामैय्या यांच्या विरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक लढवून ते निवडूनही आले. परंतु गांधीजींना मानणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी (सरदार पटेल, राजगोपालाचारी, गोविंद वल्लभ पंत इत्यादी ) त्यांचे राजीनामे देऊन त्यांची कोंडी केल्याने, बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कार्यकारिणीतील फक्त सरत बोस आणि पंडित नेहरू यांनी या सामूहिक राजीनामा पत्रावर सह्या केल्या नाहीत. नंतर मात्र नेहरूंनी या गटबाजीत न पडता स्वतःचा एकट्याचा राजीनामा पाठवून दिला. त्रिपुरी अधिवेशनात गोविंद वल्लभ पंत यांनी ठराव मांडला की काँग्रेस अध्यक्षांनी (बोस यांनी) गांधीजींच्या इच्छेनुसार कार्यकारिणीचे सदस्य नेमावेत. या ठरावाच्या मतदानाच्या वेळी काँग्रेसमधील डाव्या गटानेही बोस यांना पाठिंबा न दिल्याने पंत यांचा ठराव मंजूर झाला व बोस यांना राजीनामा देण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नाही.

या सर्व प्रकारात गांधीजींना मानणाऱ्या गटाने बोस यांची कोंडी केली व त्यांना राजीनामा देण्यास भाग पडले व त्या गोष्टीस गांधीजींचा आशीर्वाद असावा. याच गोष्टीवरून मागील ७ वर्षे गांधीजींवर टीका करण्यात येते. हे खरे असले, तरी गांधीजींना दुसरा काय पर्याय होता?

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की गांधीजी त्यांच्या तत्वांच्या बाबत कोणाशीही आणि कोणतीही तडजोड करत नसत. साधे घरगुती उदाहरण घ्यायचे झाले तरी, दक्षिण आफ्रिकेत कस्तुरबांनी आश्रमातील शौचालये स्वतः साफ करण्यास नकार दिल्यावर गांधीजींनी त्यांना आश्रमाबाहेर काढायची तयारी केली होती. चौरी चौरा येथील हिंसक घटनेनंतर असहकार चळवळ मागे घेण्याबाबत तर संपूर्ण काँग्रेस पक्षाचा विरोध त्यांनी पत्करला होता. इतका की मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी त्याच्या निषेधार्थ वेगळा पक्षच स्थापन केला तरी गांधीजी मागे हटले नाहीत. अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांच्या आधारावर गांधीजींनी काँग्रेसची उभारणी करून अनेक आंदोलने उभारली होती आणि त्यात लाखो लोक सहभागी झाले होते. असे असतांना स्वातंत्र्याचे ध्येय गाठण्यासाठी का असेना पण हिंसक आंदोलनाचा मार्ग त्याच काँग्रेसला स्वीकारू देण्यास गांधीजी तयार होणे शक्यच नव्हते. त्यामुळे गांधी-बोस हा संघर्ष हा शेवटी काँग्रेस संघटनेवर ताबा कोणाचा या मुद्द्यापर्यंत येऊन ठेपला होता. या संघर्षात सरदार पटेल, नेहरू, राजेंद्र प्रसाद, पंत, मौलाना आझाद इत्यादी सगळेच पुढारी गांधीजींच्या मागेच गेले आणि सुभाष बाबूंना आपला वेगळा मार्ग निवडणे भाग पडले. त्यानंतर बोस यांनी काँग्रेस पक्षांतर्गतच फॉरवर्ड ब्लॉक या गटाची स्थापना केली, परंतु त्यांची ताकद बंगालपुरती, व मुथू रामलिंगम थेवर या समर्थकांमुळे काही अंशी मदुराई भागांत मर्यादित राहिली.

सुभाषबाबू हे गांधीजींच्या विरोधात उभे राहून अध्यक्षपदी निवडून आले तरीही गांधीजींनी त्यांना एकटे पडले असा आरोप हल्ली काही लोक करतात.

वरील संघर्षानंतर सुभाषबाबू यांनी वेगळा गट स्थापन केला तरी त्यांचा गट अत्यंत दुबळा राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि नंतरच्या काळात सुभाषबाबूंनी आपल्या विचारसरणीनुसार आधी रशिया, नंतर जर्मनी आणि जपान इथे जाऊन, त्या देशांनी बंदी बनविलेल्या भारतीय युद्धकैद्यांमधून आझाद हिंद फौजेची स्थापना करून अत्यंत शौर्याने ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकण्यासाठी जे प्रयत्न केले तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक दैदिप्यमान अध्याय आहे. तो प्रयत्न जरी असफल झाला तरी त्याचा परिणाम ब्रिटिशांचे मनोबल खच्ची करण्यात झाला.

गांधी-बोस असा जो संघर्ष १९२८-१९२९ साली झाला त्यानंतर त्यांचे संबंध कसे होते? सुभाषबाबूंनी जरी भारताबाहेर जाऊन सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला होता, तरी ते गांधीजींनाच भारताचा नेता मानत होते याचे अनेक पुरावे आहेत. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी रंगून रेडिओवरून भाषण करतांना नेताजींनी गांधीजींना "राष्ट्रपिता" या उपाधीने प्रथमच संबोधिले आणि त्यांच्या सशस्त्र लढाईसाठी त्यांचे आशीर्वाद मागितले. आणि बोस यांना "नेताजी" ही पदवी देखील गांधीजींनीच ते काँग्रेसमध्ये असतांना दिली होती. नेताजींनी आझाद हिंद फौज स्थापन करतांना ज्या ब्रिगेड तयार केल्या होत्या, त्यांची नावे होती गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, आणि आझाद ब्रिगेड! नेहरू-बोस संबंध तर इतके विश्वासाचे होते की नेहरू तुरुंगात असतांना जेंव्हा कमला नेहरू गंभीर आजारी पडल्या, तेंव्हा त्यांना युरोपात उपचारासाठी घेऊन जायला नेहरू यांनी इतर कोणालाही नाही, तर बोस यांना विनंती केली आणि त्यांनी ते कार्य पार पाडले. दुसऱ्या महायुद्धानंतर आझाद हिंद फौज मधील अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल झाले ते लाल किल्ला खटला म्हणून प्रसिद्ध आहे. त्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी स्वतः पंडित नेहरू यांनी जवळपास ३० वर्षानंतर बॅरिस्टरकीचा कोट अंगात चढवला आणि कोर्टात उभे राहिले. तेंव्हा हिंदुत्ववादी असलेले सावरकर इत्यादी बॅरिस्टर पुढे आले नव्हते आणि कोणत्याही हिंदुत्ववाद्यांनी तेंव्हा साधे निषेधाचे पत्रकही काढले नव्हते.

या उलट पाहिले तर सुभाषबाबू यांचे हिंदुत्ववाद्यांबद्दलचे विचार अत्यंत कडवे विरोधी होते. त्यांनी सावरकर आणि जीना यांना ब्रिटिशांना पाठिंबा देण्याबद्दल सारखाच दोष दिला होता आणि भविष्यात इंग्रज राजवट गेल्यावर त्यांना कोणतेही स्थान राहणार नाही असा इशारा दिला होता. बंगालमध्ये तर हिंदू महासभेच्या सभा सुभाषबाबूंचे अनुयायी त्यांच्या हिंसक पद्धतीनुसार दगडफेक करून उधळून लावत. जेंव्हा नेताजी आझाद हिंद फौज उभारून ब्रिटिशांशी झुंज देत होते, त्याच वेळी सावरकर भारत ब्रिटिशांची सैन्यभरती करत होते हे जगजाहीर आहे. नथुराम गोडसे संपादक असलेल्या 'अग्रणी' या मासिकात सावरकर आणि शामाप्रसाद मुखर्जी हे ज्या रावणाचा वध करतांना दाखविले आहेत त्यात दोन शीरे बोस आणि पटेल यांचीही आहेत. त्यामुळे त्यांचे अनुयायी असणारे लोक आज जेंव्हा नेताजींची बाजू घेऊन नक्राश्रू ढाळतात तेंव्हा ते हास्यास्पद दिसते.

२०१६ साली नेताजींच्याबद्दल ज्या फाईली उघड केल्या गेल्या, त्यात तर असे दिसले की नेहरूंनी नेताजींची ऑस्ट्रियन पत्नी व कन्या यांच्यासाठी दरमहा ठराविक रक्कम पाठविण्याची व्यवस्था एक ट्रस्ट स्थापन करून केली होती. या खेरीज १९४७ नंतर नेहरूंनी आझाद हिंद फौजेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांचे मोठमोठ्या पदांवर पुनर्वसन केले होते. उदा. अबिद हसन (इजिप्त), एसीएन नाम्बियार (जर्मनी), मेहबूब हसन (कॅनडा), सायरील स्त्रासें, (नेदरलँड), एन.राघवन (स्वित्झर्लंड), यांना विविध देशात राजदूत म्हणून नेमले, मोहन सिंग यांना राज्यसभा सदस्य करण्यात आले, इत्यादी. हे सगळे लक्षात घेता सध्या नेहरू-गांधी विरुद्ध नेताजी बोस असा सामना लावण्याचा जो उद्योग या सगळ्या नेत्यांशी काडीचाही संबंध नसलेले लोक करतात तो हास्यास्पद आहे.

Tags:    

Similar News