महाजनादेश

Update: 2019-08-01 05:14 GMT

सड़क ख़ामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी..! सड़क पर उतरो. रस्ता चांगला आहे. योग्य ठिकाणी पोहचवेल!! संसदेत नीट काम केलं नाही म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या पक्षांना ‘सड़क’ चं मँडेट मिळालंय. हे मँडेट, महाजनादेश म्हणून स्वीकारलं पाहिजे.

आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले. हा दौरा महाजनादेश यात्रा म्हणून नामकरण करून काढण्यात आला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्याने यश मिळत आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला थोडं यश मिळालं, पण सातत्याने भाजपाचा ग्राफ वाढताना दिसत आहे. यामध्ये मतदारांचा कल किती आणि राजकीय मॅनेजमेंट किती हा काही लपून राहिलेला विषय नाही. उदाहरणार्थ, काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपा आणि शिवसेनेला गेली पाच वर्षे निवडणुकांमध्ये छुपी मदत करत आलेयत हे लपून राहिलेले नाही. तनाने विरोधी पक्षात असलेले नेते मनाने मात्र सत्ताधारी पक्षासोबत होते. निवडणुका जवळ येताच त्यांच्या तनाने ही विरोधी पक्षांची साथ सोडली.

2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि त्यांच्या हातातली सत्ता गेली. त्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते भंजाळून गेले आहेत. काही तर मानसिक रोगी असल्यासारखे वागतायत. काहींना काय चाललंय तेच कळत नाहीय. काहींना मतदार फितूर झालेयत वाटतंय, तर काहींना ईव्हीएम हॅक झाल्यासारखं वाटतंय. अरे बाबांनो तुमचे पक्षच हॅक झाले होते, हे तुम्हाला कसं कळलं नाही. तुम्ही स्वतः किती प्रामाणिकपणे लोकांमध्ये गेलात, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे. आंदोलनं ही तुम्ही फक्त मिडीया आणि सेल्फीपुरतं केलीत. अनेकांनी तर आपापल्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलनं केली. विरोधी पक्षात प्रामाणिकपणाचा अभाव होता हे मान्य करायला कुणी तयार नाही. केंद्रातली-राज्यातली सत्ता गेली असली तरी या नेत्यांची गावातली सत्ता गेली नव्हती. गावातल्या संस्था-बँका-कारखाने अजूनही ताब्यात होते. त्यामुळे सत्ताकेंद्र जिवंत होती. रसद कायम होती. नंतर आपली सद्दी, आपली रसद, गावातली सत्ता, जिल्ह्याचं अर्थकारण अबाधित राहावं म्हणून सत्ताधारी पक्षासमोर केलेलं सरेंडर आपल्याला सतत पाहायला मिळत होतं.

सत्तेत असताना अमर्याद सत्ता उपभोगणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी कधी नवीन कार्यकर्त्याला वर येऊ दिलं नाही. कधी पक्ष कार्यालयांना निधी दिला नाही. अनेक मंत्री तर पक्षांच्या बैठकीलाही जात नव्हते. पक्ष तुम्ही सत्तेत असताना संपवला, तो काही भाजपाने संपवलेला नाही.

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आज प्रश्न पडला आहे की, चुकलं कुठे? आघाडी सरकारला अलि’बाबा’ चाळीस चोर असं नाव पडलं होतं. तेच चाळीस मंत्री सतत सत्तेत. महामंडळं वाटायची नाहीत. कार्यकर्त्यांची कामं ही पैसे घेऊन करायची, पार्टनरशीप ने कामं करायची.. सत्ता गेली की विचारधारा आठवते. सत्ता आली की पैसे... थोडं बसायला हवं विरोधी पक्षात. लोकांसाठी काम करायला सत्ता कशाला लागते, हा विचारच विरोधी पक्षातील नेत्यांना कधी जाणवला नाही, माणवला नाही.

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेसाठी निघालेयत. त्यांच्या यात्रेचं इंधन विरोधी पक्षांनी पुरवलंय. त्यामुळे त्यांची गाडी सुसाट सुरू आहे. राज्याचे भाग्यविधाते-चाणक्य वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या विरोधी पक्षातील लोकांच्या राजकारणातली पॉवरच निघून गेलीय. जी घराणी तुमच्या सोबत होती ती आता त्यांच्या सोबत आहे. चुकलं काहीच नाही. पॉवर करेक्शनची फेज आहे ही.

विरोधकांची स्पेस

राज्यात आणि देशात विरोधी पक्षाची स्पेस आहे. ती भरायला कोणी तयार नाही. सगळ्यांचे लागेबांधे सत्तेशी. प्रकाश आंबेडकर-असद्दुन ओवैसी यांची वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजू शेट्टी यांचा स्वाभीमानी पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार अशा छोट्या छोट्या राजकीय आघाड्यांना त्यांच्या आक्रमकपणामुळे विरोधी पक्षाची स्पेस लोकांनी देऊ केलेली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्याने या पक्षांचं नुकसानच होणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार न पाडल्यामुळे पर्यायाच्या शोधात असलेल्या मतदारांना शिवसेनेने नेहमीच सत्तेत राहूनही तो पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. शिवसेना सतत सरकार विरोधी बोलत आलेली आहे. ही रणनिती होती. ती यशस्वी झाली, हे सर्वांनी पाहिलंय.

2014 च्या निवडणुकांमध्ये राज्यात भाजपा अल्पमतात होतं. विरोधी पक्षांना भाजपापेक्षा जास्त जागा आहेत हे विसरता कामा नये. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं मंत्रिमंडळ सर्वशक्तिमान असल्याच्या अविर्भावात आहेत, मात्र त्यांच्या सरकारकडे आकडा नव्हता आणि आजही नाहीय हे ही विसरता कामा नये. इथला विरोधी पक्ष असलेली शिवसेनाच सत्ताधारी पक्षाला सामिल झाली आणि नंतर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ही सामील झाले. विरोधी पक्षातले आमदार ही सत्ताधारी पक्षात जाऊ लागले. हा जनादेशाचा अपमानच होता.

महाराष्ट्राचा जनादेश स्पष्ट होता. विरोधी पक्षांना तो समजला नाही, इतकंच.

Similar News