भारत नावाची संकल्पना नेमकी आहे तरी काय?- महुओ मोईत्रा
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीमध्ये सुरू आहे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अनेक खासदार यांचे भाषणं व्हायरल होत असून त्यामध्ये लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरलेलं तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला अनुवाद..
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीमध्ये सुरू आहे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अनेक खासदार यांचे भाषणं व्हायरल होत असून त्यामध्ये लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरलेलं तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला अनुवाद..
सन्माननीय सभापतीजी आणि आदरणीय सहकारीगण,
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या माझ्या पक्षाच्या वतीने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी आज येथे उभी आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे संघराज्यातील वर्तमान परिस्थितीचे सरकारच्या दृष्टिकोनातून केलेले मूल्यमापन असते. या मूल्यमापनाशी असलेला माझा प्रखर मतभेद नोंदवण्यासाठी आणि आज आपणासमोर उभा ठाकलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न येथे उपस्थित करण्यासाठी मी आपणासमोर उभी आहे. कोणत्या प्रकारचे प्रजासत्ताक आपल्याला हवे आहे? कोणत्या प्रकारचा भारत आज आपल्याला हवा आहे? जिच्या पाठीशी आपण उभे राहू, जिच्यासाठी आम्ही लढू, शिव्याशाप खाऊ आणि तुरुंगातही जाऊ ती भारत नावाची संकल्पना नेमकी आहे तरी काय?
आपले संविधान हे एक जितेजागते संविधान आहे. त्यात सतत प्राण फुंकत राहण्याची आपली तयारी असेल तोवरच त्याचा श्वास चालू राहील. अन्यथा तो निव्वळ एक कागदाचा तुकडा ठरेल. काळा आणि पांढरा. कागदाचा एक तुकडा. एखादे बहुसंख्यांकवादी सरकार कोणत्याही क्षणी रंगाचा बेरंग करणाऱ्या छटांचे फटकारे त्यात बेमालूम मिसळू शकेल असा तुकडा.
आपण निवडून दिलेले सरकार राज्यघटनेची वाच्यार्थाने आणि तत्वार्थानेही पाठराखण करेल असा भरवसा लोकांनी बाळगलेला असतो. सरकार याबाबतीत अपयशी ठरले की आपणा साऱ्यांच्याच वाट्याला अपयश येते. आणि म्हणून आम्ही भारतीयांनी आराम बसून घटनांचे निव्वळ साक्षीदार होत एकमेकाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत राहणे मुळीच पर्याप्त ठरत नाही.
हे सरकार इतिहासच बदलू इच्छिते. त्यांना भविष्याची धास्ती वाटते आणि वर्तमानाबद्दल ते साशंक आहेत. 1960 च्या दशकात रॉबर्ट केनेडी यांनी अशा द्वेषाक्त शक्तींविरुद्ध इशारा दिलेला होता.
( यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रमादेवी स्थानापन्न होतात.)
माननीय राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच भारतीयांना आपले हक्क मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. गुरु तेगबहाद्दूर, व्ही. ओ. चिदंबरम पिल्लाई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल ते बोलले. पण ही केवळ तोंडपूजा होती. प्रत्यक्षतः भारताच्या भूतकाळाची, मर्यादशील भूतकाळाची, बहुलतावादी भूतकाळाची, सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या भूतकाळाची नुसती आठवण काढली तरी हे सरकार पार धास्तावून जाते. म्हणून तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळचे चित्ररथ या सरकारने नाकारले. कारण त्या चित्ररथात जय हिंद चा नारा आम्हा सर्वांना शिकवणारे नेताजी होते; भारतीय लोक वेगवेगळे असले तरी ती सारी एकाच मातेची लेकरें आहेत असे म्हणणारे सुब्रह्मण्यम भारतीयार होते; राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवासाचे भय दाखवले जाऊनही आपली राजकीय चळवळ चालूच ठेवणारे व्ही.ओ. चिदंबरम पिल्लाई होते, एक दगड उचलून त्याची ईरव शिवा म्हणून पूजा मांडणारे नारायण गुरु होते. काल्पनिक भूतकाळाच्या गौरवात मात्र त्यांच्याकडून कधी खळ पडत नाही. या सरकारने स्वातंत्र्यसैनिक म्हणून सावरकरांचे पुनरुत्थान घडवून आणलंय. सुटकेसाठी त्यांनी ब्रिटिशांना उद्देशून लिहिलेले क्षमायाचनेचे पत्र म्हणजे युद्धनीतीकौशल्याचा बहारदार नमुना ठरवला जात आहे. अतिशय कट्टर फॅसिझम विरोधक असणाऱ्या भगतसिंगांचा अपहार कसा काय करताय किंवा गृहमंत्री झाल्यावर आर.एस.एस. वर सरळ बंदीच घालणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांची उचलेगिरी कशी काय करताय?
राष्ट्रपतींच्या भाषणात नेताजींचा पुनःपुन्हा उल्लेख केला गेलाय. या प्रजासत्ताकाला मी स्मरण देऊ इच्छिते की सर्व धर्मांच्या बाबतीत भारत सरकारने पूर्णतः निःपक्षपाती आणि भेदरहित दृष्टिकोन बाळगला पाहिजे असे म्हणणारे नेताजी हेच होते. मुस्लिमांच्या वंशच्छेदाच्या रक्त गोठवणाऱ्या आरोळ्या ठोकणाऱ्या हरिद्वारच्या धर्मसंसदेला नेताजींनी मान्यता दिली असती काय? 14 जून, 1938 रोजी आता बांगला देशात असलेल्या कुमीला नावाच्या गावात नेताजी म्हणाले होते, " जातीयवादाने आपला घाणेरडा चेहरा ठार नंग्या स्वरूपात पुन्हा वर काढला आहे." टिपू सुलतानचा झेप घेणारा वाघ हे नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्या बिल्ल्यावरचे पदचिन्ह होते. पाठ्यपुस्तकातून तुम्ही हद्दपार केला तोच हा टिपू सुलतान. त्याच्या नावचे एखादा रस्ता किंवा मैदान असणेही तुम्हाला सहन होत नाही. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य तीन उर्दू शब्दांनी बनले होते: इत्तेहाद, इतमद आणि कुर्बानी. एकता, विश्वास आणि त्याग!
आणि याच उर्दू भाषेला जम्मू- काश्मीरची प्रथम आणि अधिकृत भाषा या पदावरून हटवून तिथे हिंदीची प्रतिष्ठापना करताना तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
बापूंच्या नेतृत्वाखाली खादी ही कशी सद्भावाचे प्रतीक बनली होती याचा उल्लेख राष्ट्रपतींच्या भाषणात आहे. परंतु त्या अधर्मी धर्मसंसदेने तर बापूंची पुन्हा एकदा हत्या करण्यासाठी हाकारा उठवला आहे. गांधीजींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करण्यात तुम्ही यापूर्वीच यशस्वी झाला आहात. आता आपल्या मुलांना " Beating the Retreat हे प्रजासत्ताक सोहळ्याच्या समारोपातील संचलन गांधीजींच्या आवडत्या गीताशिवायच पहावे लागणार आहे. त्यांच्यासाठी त्या गीताच्या काही ओळींची आठवण मला करून द्यावीशी वाटते.
Come not in terrors, as the King of kings;
But kind and good, with healing in Thy wings:
Tears for all woes, a heart for every plea;
Come, Friend of sinners, thus abide with me.
" नको येऊस भय दावीत, राजांच्या अधिराजासारखा
ये दयार्द्र आणि कल्याणप्रद , पंखात व्याधिहारी स्पर्श घेऊन
प्रत्येकाच्या वेदनांसाठी तुजकडे आसवे असोत,
प्रत्येकाचा पुकारा हृदयाला भिडो तुझ्या
ये पापी जनांच्या सुहृदा, असा मजसमीप वास कर."
आमच्या हक्कांसाठी या महान विभूतींनी जो लढा दिला त्याबद्दल राष्ट्रपतींच्या भाषणात त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले आहेत. पण आपल्या राज्यघटनेने ग्वाही दिलेले सर्व हक्क आणि सर्व प्रकारची स्वातंत्र्ये खरोखरच भावी भारताला आणि सर्व भारतवासीयांना प्रत्यक्षात उपभोगता आली तर आपणच अप्रस्तुत ठरू अशी भीती आपल्या प्रजासत्ताकाच्या सद्यकालीन अधिपतींना वाटत आहे.
फ्रीडम हाऊस च्या 2021 च्या अहवालात भारताचा दर्जा पूर्वी "स्वतंत्र" असा ठरवला गेला होता तो आता "अंशतः स्वतंत्र" असा घसरलेला आहे. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकानुसार भारताला 180 देशांच्या यादीत 142 वे स्थान प्राप्त झाले आहे. आजमितीला पत्रकारांच्या दृष्टीने सर्वाधिक धोकादायक असलेल्या प्रदेशात आपली गणना होत आहे. व्यक्तिगत, नागरी आणि आर्थिक स्वातंत्र्याचे मोजमाप करणाऱ्या मानवी स्वातंत्र्य निर्देशांकात एकूण 160 देशात भारताचे स्थान 111वे नोंदले गेले आहे.
आपण जसे आहोत तसेच छान आहोत अशा समाधानात राहू पाहणाऱ्या उद्याच्या भारताचे तुम्हाला भय वाटते. भय वाटते तुम्हाला अशा भारताचे…
माननीय सभापती (श्रीमती रमादेवी) : महुआजी, थोडं प्रेमपूर्वक बोला. एव्हढे रागावू नका. चांगल्या पद्धतीने बोला.
महुआ: राग तर येतोच. काय करायचं? ठीक आहे. आपण प्रेमपूर्वक बोलायला सांगताय. मी रामधारी सिंह दिनकरजींची एक कविताच उद्धृत करू इच्छिते.
सहनशीलता, क्षमा, दया को तभी पूजता जग है,
बल का दर्प चमकता उस के पीछे जब जगमग है !
सभापती: थोडा असू द्या, जास्त नको.
महुआ: ठीक आहे. ऐकते तुमचं. पण सामर्थ्याचे अधिष्ठान असेलच मागे आणि जग हेच विचारते.
सभापती: सहनशीलता सर्वात प्रथम.
महुआ: ( मूळ मुद्द्याकडे जात) आहोत तसेच छान आहोत असे मानणाऱ्या भारताचे भय वाटते तुम्हाला. परस्परांहून भिन्न भिन्न असण्याचे वास्तव समाधानाने स्वीकारणाऱ्या भारताचे तुम्हाला भय वाटते. म्हणून एखादा जैन मुलगा घरच्यांना न सांगता अहमदाबादच्या खाऊ गल्लीतील गाड्यावर चवीने काठी कबाब खाऊ लागला की तुमचा थरकाप उडतो. मग तुम्ही कोणती उपाययोजना करता? गुजरातच्या नगरपालिका क्षेत्रातील खाऊगल्ल्यात मांसाहारी अन्नपदार्थावरच तुम्ही बंदी घालून टाकता.
निवडणूक तोंडावर असताना सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधी नेत्यांच्या घरावर छापा टाकता येणार नाही असाही काळ उद्या येईल अशी भीती वाटत असते तुम्हाला. मग तुमच्या कोणत्याही म्हणण्यापुढे नीट मान तुकवतील याची खात्री असलेल्या सी. बी. आय. च्या गरजू प्रमुखांना तुम्ही आणखी मुदतवाढ देता.
उद्या राज्यातील अधिकारी केंद्राच्या धाकदपटशाहीला जुमानणार नाहीत अशा तुम्हाला भीती वाटते. म्हणून मग भारतीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या काडरचे नियमच तुम्ही बदलून टाकता. आपण उद्या अप्रस्तुत ठरू, निःसंदर्भ ठरू ही भीतीच तुमच्या या असल्या वर्तनाला कारणीभूत आहे.
नुसती आमची मते मिळवून तुमचे पोट भरलेले नाही. तुम्ही आमच्या मेंदूत शिरू इच्छिता. आमच्या घरात शिरून आम्ही काय खावं, काय ल्यावं, कोणावर प्रेम करावं याचे धडे आम्हाला देऊ इच्छिता. अहो, पण तुमच्या हृदयातील ही भीती काही भविष्यकाळाच्या आगमनाच्या आड येऊ शकणार नाही.
जिस सुबह के खातिर जुग जुग से हम सब मर मर कर जीते हैं,
वह सुबह कभी तो आयेगी।
इन भूखी प्यासी रुहों पर इक दिन तो करम फरमाएगी l
वह सुबह कभी तो आयेगी l
केनेडींनी आपल्याला सांगून ठेवलंय. जे लोक इतिहासाचे चक्र थांबवू इच्छितात त्यांचा वर्तमानावरच विश्वास नसतो. आधार कार्ड मतदानाच्या अधिकाराशी जोडण्याचा कायदा हे सरकार आणते तेव्हा खऱ्या मतदारांचा मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला जाण्याची पुरेपूर शक्यता ते निर्माण करत असते. आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ गाभ्यावरच या सरकारचा विश्वास नसल्याचे त्यातून स्पष्ट होते.
तुमचा आमच्या अन्नदात्यांवरही विश्वास नाही. ते तीन शेतीविषयक कायदे आणू नका असे ते तुम्हाला पुनःपुन्हा सांगत होते. मला वाटते ते कायदे तुम्ही मागे घेतलेत तेही पश्चिम उत्तर प्रदेशातील सत्तर जागा गमावण्याच्या भीतीपोटी. 700 हून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेल्याचा तुम्हाला काही पश्चात्ताप झाला म्हणून मुळीच नव्हे. आजही शेतकऱ्यांची एक प्रमुख मागणी असलेल्या पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याच्या मागणीवर तुम्ही कोणतीच लेखी हमी दिलेली नाही.
तुमचा जाटांवर विश्वास नाही, शिखांवर विश्वास नाही. जो कोणी ठामपणे तुमच्यापुढे उभा ठाकतो त्या कुणावरच तुमचा विश्वास नाही. तरी निवडणूक जवळ आली की मात्र निलाजरेपणाने पगडी डोक्यावर चढवून तुम्ही आघाडीसाठी हात पुढे करता. पण या वेळी चौधरी मंडळी मागचे सारे विसरणार नाहीत. या सरकारच्या विद्यमान मंत्र्याच्या मुलाने पाच शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना ठार मारलं आणि त्याला अटक करायला या सरकारने तब्बल तीन दिवस घेतले. शेवटी अटक केली तीही या क्रौर्यामुळे हादरून गेलेल्या सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला म्हणून. ही गोष्ट चौधरी विसरणार नाहीत.
खेरी मधून लोकसभेवर निवडून आलेल्या त्या राज्यमंत्र्याची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी मी या व्यासपीठावरून करत आहे. ते या पदाला चिकटून असलेले प्रत्येक मिनिट म्हणजे केवळ लोकशाहीचाच नव्हे तर आपल्या राजकीय जीवनातील सुसंस्कृततेचा, नैतिकतेचा आणि आत्मसन्मानाचाच घोर उपमर्द आहे. खरं तर इथं उभी राहून मला हे सांगावं लागू नये. तुमच्या विवेकबुद्धीनेच तुम्हाला हे सांगायला हवं होतं. पण म्हणतात ना. जब नाश मनुज पर छाता है तो पहले विवेक मर जाता है l
आपल्या प्रजासत्ताकाचे अधिपती वर्तमानाबद्दल किती अविश्वास बाळगतात याच ज्वलंत उदाहरण म्हणजे पेगॅससचा राडा. (व्यत्यय) होय. बोलणार मी या विषयावर. आज जे सत्तारूढ बाकांवर बसले आहेत त्यांनीच तर एक अख्खं सरकारच्या सरकार 2 जी प्रश्नावरून खाली खेचलं. आणि हा 2 जी प्रश्न त्यावेळी न्यायासनासमोर होता. तेव्हा हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवू नका. बोलणार मी या विषयावर.
करदात्यांचा पैसा आपल्याच नागरिकांवर हेरगिरी करण्याच्या हेतूने विशिष्ट तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी वापरल्याचा आरोप या सरकारवर करण्यात आला आहे. एका आघाडीच्या पत्रकाराच्या शब्दात सांगायचे तर न्यू यॉर्क टाईम्स खोटे बोलत आहे, द वायर खोटे बोलत आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल खोटे बोलत आहे, फ्रेंच सरकार खोटे बोलत आहे, जर्मन सरकार खोटे बोलत आहे, अमेरिकन सरकार खोटे बोलत आहे, NSO वर खटला भरणारे व्हाटसॲप आणि ॲपल खोटे बोलत आहे. एक आपले हे सरकार तेव्हढेच काय ते पेगॅससच्या बाबतीत सत्यनिष्ठेचा मनोरम परंतु एकाकी प्रत्यय देत आहे. एक मंत्री या लोकांची संभावना सुपारी मीडिया अशी करत आहे आणि दुसरा इथे उभा राहून … ( काही शब्द रेकॉर्ड मध्ये ठेवलेले नाहीत) निर्लज्जपणे आम्हाला सांगत आहे. कायद्यातील खासगीपणाचे उल्लंघन न करण्याच्या प्रत्येक तरतुदीतून राज्यव्यवस्थेला स्वतःला मात्र सूट देणाऱ्या डेटा संरक्षण विधेयकाचे हे सरकार कसे काय समर्थन करू शकते?
भारत हे घटकराज्यांनी मिळून बनलेले संघराज्य आहे. भारताच्या अस्तित्वातील संघराज्यात्मक संरचना या मूलभूत बाबीबद्दल तुमच्या मनात मुळीच आदर नाही. एरवी राज्याच्या भूमीत देशाच्या सीमेपासून 50 किमी आतपर्यंत सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र विस्तारण्याच्या तद्दन बेकायदेशीर निर्णयाचे तुम्ही कसे काय समर्थन करू शकला असता? सिद्दीकी कप्पन या पत्रकारावरचा तुमचा अविश्वास तर या टोकाचा आहे की तो हाथरसला अद्याप पोहोचलेलाही नसताना आणि आपले वार्तापत्र त्याने अजून लिहिलेलेही नसताना तुम्ही त्याला सरळ अटक करून टाकता. मुन्वर फारुकी या विनोदवीराने अजून केलेलाच नाही अशा विनोदाबद्दलही तुम्ही असाच अविश्वास दाखवता.
राष्ट्रपतींच्या भाषणात म्हटलंय की तिहेरी तलाक पद्धती रद्द करून, हज यात्रेवरील बंधने हटवून मुस्लिम स्त्रियांच्या बंधमुक्तीची सुरुवात या सरकारने केली आहे. आणि तरी देशातील मुस्लिम महिलांना 2022 च्या नववर्षदिनीं बुलीबाई ॲपवर आपला लिलाव होत असल्याचे वास्तव पहावे लागले. 2021 च्या सुली डील्स या ॲपचीच ही दुसरी आवृत्ती होती. तीव्र प्रतिक्रियांचे तडाखे बसल्यावर मग कुठे सरकारला जाग आली आणि काही लोकांना अटक केली गेली. आज मुसलमानांना घर भाड्याने दिले जात नाही, भारतात कोविड त्यांनीच पसरवला असले आरोप त्यांच्यावर केले जातात, त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकला जातो आणि प्रशासनानेच आखून दिलेल्या जागी नमाज पढायला त्यांना मनाई केली जाते. या सरकारने सुरु केलेल्या या 80 टक्के विरुद्ध वीस टक्क्यांच्या लढाईमुळे आपल्या पवित्र प्रजासत्ताकाचाच 100 टक्के नाश होऊ शकण्याचा धोका आज निर्माण झाला आहे.
सभापती: आता आपण थांबवा.
महुआ मोईत्रा : मॅडम मला तेरा मिनिटे दिली आहेत. दोन मिनिटात मी संपवते.
युनायटेड ख्रिश्चन फोरम या संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे केवळ 2021 या एका वर्षात देशात ख्रिश्चनांवर 460 हल्ले झाले आहेत. हिंसक जमावांनी 16 छोट्या मोठ्या गावात चर्चेसवर, ख्रिश्चन समुदायांवर आणि समारंभांवर हल्ले केले आहेत. करीमपूर नादिया या गावातील माझ्या घरात मोनीरूल शेख नावाच्या वृद्धाने गेल्या वर्षी मला जे सांगितलं ते इथं सांगताना शरमेने आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे.
तो म्हणाला होता, "मा, एता तोमदेर नीतीर लोडाई आमदेर बचेर लोडाई."
" मा , तुमच्या दृष्टीने ही एक वैचारिक लढाई आहे, आमच्या दृष्टीने मात्र हे जीवनमरणाचे युद्ध आहे."
सभापती दुसऱ्याचे नाव पुकारतात.
व्यत्यय
महुआ: मॅडम माझे भाषण मला पुरे करू द्या. कृपया एक मिनिट द्या. धन्यवाद.
पण आज भारतीय म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला हे प्रजासत्ताक टिकवायचे असेल तर जबाबदारी आपलीच आहे. जे जे वकील, अभिनेते , व्यावसायिक , व्यापार उदीम करणारे देशात बदल झाला पाहिजे असे म्हणतात त्या साऱ्यांना, आपणा सर्वांना मी सांगू इच्छिते. लढाईची वेळ आपण निवडू शकत नाही. रणशिंग फुंकले गेले आहे. आज या क्षणी आपल्या प्रजासत्ताकाच्या सर्व नागरिकांनी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. यह सुबह हमीं से आयेगी। माझा सांसदीय विशेषाधिकार वापरून मी न्यायव्यवस्थेला सांगते. तुम्हीच या देशाचा शेवटचा तरणोपाय आहात. तुम्हीच यातून मार्ग काढू शकता. आमची निराशा करू नका. कृतीशील हस्तक्षेप करा. यह सुबह हमीं से आयेगी l (व्यत्यय)
महुआ मोईत्रा: मॅडम कृपया मला माझ्या भाषणाचा समारोप हे एक वाक्य बोलून करू द्या.
( भाषण करू दिले जात नाही.)
समाप्त
अनुवाद: अनंत घोटगाळकर