गावाकडील हरवलेले खेळ

लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि पूर्वापार चालत आलेले ग्रामीण खेळ हळूहळू नष्ट झाले. हरवलेल्या या खेळांच्या समृद्ध आठवणी जागविण्यासाठी वाचा सागर गोतपागर यांचा वाचनीय लेख…;

Update: 2023-06-17 14:38 GMT

एक छोटा गोल करुन, एकमेकांच्या हातावर हात ठेवायचा आणि म्हणायचं “अटकु मटकु सुटकु”’ जे सुटतील ते बाजुला आणि राहीलेल्या एकावर डाव. केवळ भाषा बदलली की लहान मुलांच्या खेळात पहिला डाव घेणाऱ्याला निवडण्याची ही सारखीच पध्दत दिसुन येते. लहान असताना क्रिकेट खेळताना बॅटींग ठरवण्यासाठी आम्ही “ओली-सुकी” करायचो. ओली-सुकी म्हणजे एका चपट्या लहान दगडावर एका बाजुला थुंकी लावायची व तो दगड हवेत भिरकावायचा आणि एकाने ओली किंवा सुकी मागायची. ज्याचं बरोबर येईल त्यानं बॅटींग करायची. या खेळाच्या प्रकारांची नोंद कुठल्या पुस्तकात आढळत नाही. ती पिढ्यानपिढ्या मुलांकडून जतन केलेली आहे. ग्रामीण भागातील खेळ आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोबाईलवरच्या गेम्सने मुलांचा प्रत्यक्षहा आनंद हिरावून घेतला आहे.

पुर्वी ग्रामीण भागात मुलं गट्टयानं खेळायची. गट्टी म्हणजे दोन बोटांच्या चिमटीत बसेल एवढी गोटी. जमीनीवर एक लहान खड्डा पाडलेला असायचा. त्याला “गद” असे म्हटले जायचे. या गदीपासुन काही अंतरावर एक कच्च्या असायचा. कच्चा म्हणजे मातीत बोटाने आडवी मारलेली एक रेष.तिथून गदीपर्यत गट्टी टाकायची. ज्याची गट्टी गदीपर्यंत जाईल, त्याचा गट्टी मारण्याचा पहीला डाव. मग त्याने स्वत:ची गट्टी मधल्या बोटाच्या शेवटच्या टोकावर धरायची, त्याच्या हाताचा अंगठा जमीनीवर टेकवायचा अंगठ्याचा आधार घेत मधल्या बोटाला मागे बाणाच्या रश्शीप्रमाणे तान द्यायचा, आणि अलगद दुस-या गट्टीवर जोरदार ठोका द्यायचा. अशाप्रकारे दूरची गट्टी टिपण्याचं कौशल्य मुलांनी आत्मसात केलेलं असायचं. असे बारा ठोके पहील्यांदा पुर्ण करणारा जिंकायचा. मग हरलेला मुलगा कावड घ्यायचा. कावड ही हरल्याबद्दल असलेली शिक्षा. त्या मुलाने उजव्या हाताच्या ढोपराने गट्टी ढकलत गदीमध्ये टाकायची आणि बाकीच्यांनी पुन्हा तिला मागे ठोके द्यायचे असे अनेक मजेदार खेळ ग्रामीण भागात खेळले जायचे. या सग़ळ्या खेळांचा शोध कोणी कधी लावला याचा फारसा उल्लेख कुठे सापडत नाही. परंतु पिढ्यानपिढ्या हे खेळ खेळले जात आहेत. मुलांनी हे खेळ जतन केले आहेत.

सुरकाठी नावाचा एक दुसरा मजेदार खेळ. या खेळात सर्वांच्या हातात एक छ्डी असायची. ज्याच्यावर डाव आहे त्याची छ्डी खाली पडलेली असणार. बाकीची मुले हातातल्या काठीने ती छ्डी दुर ढकलायचे. हे ढकलताना डाव असणारा मुलगा शिवायला यायच्या यात एक गंमत होती, ती म्हणजे ज्या मुलाची काठी दगडावर आहे, त्याला तो शिवत नसायचा. दग़डावरुन काठी काढली की, तो शिवण्यासाठी पळत असे. हा सूर काठीसारखा आणखी एक मजेदार खेळ ग्रामीण भागात खेळला जायचा.

ग्रामीण भागातील हे खेळ केवळ बुध्दीवर आधारीत नव्ह्ते तर यातून मुलांचा व्यायाम व्हायचा. हे खेळ मोकळ्या मैदानात, मोकळ्या हवेत खेळले जायचे. त्यावेळी मुले मुक्त होती. मुले गावातील विहीरीवर पोहायला जायची. पोहण्याची कला गावातल्या सर्व मुलांना अवगत असायची.

मुले समाजात उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत असतात. समाजव्यवस्था, रुढी, परंपरा, स्त्री-पुरुष भेद या सर्व गोष्टी ते पाहतात. यातून लहानपणापासून त्यांच्या मनावर या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत असतो. त्यानुसार मुलांच्या आणि मुलींच्या खेळातसुध्दा भिन्नता आढळुन येते. एकत्र भांड्याचा खेळ खेळणारी मुले-मुली त्यांच्यात मुलगा हा घराबाहेर काम करावयास जातो, आणि मुलगी पानांच्या चपात्या बनवते. स्वयंपाक बनवते. लिंगभेदाचं हे वैशिष्ट्य अशाप्रकारे अलगदपणे त्या चिमुकल्यांच्या मनावरती कोरले जाते.

घरातील आईवडील, आपण राहतो तो समाज ज्याप्रकारचे काम करतो, मुलेही तशाच प्रकारचे खेळ खेळताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रात उसतोडणी मजुर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतो. तो गावाच्या बाहेर आपले खोपटे बांधुन राहतो. अशा गावाच्या बाहेर असणा-या उसतोडनी कामगारांच्या मुलांचे निरीक्षण केले असता असे आढळुन येते की, ही मुले काड्यांच्या बैलगाड्या, काडीपेटीपासून ट्रॅक्टर व ट्राली बनवून त्याचे खेळ खेळताना दिसतात.

या सगळ्या ख़ेळांवर समाजातील अनेक गोष्टींचा प्रभाव दिसतो. मुली हस्त नक्षत्रात हादगा नावाचा खेळ खेळतात. यात हत्तीचं चित्र काढून त्यासमोर झिम्मा, गाणी, वेगवेगळे खेळ खेळले जातात. शेवटी डब्यात आणलेली एकमेकांची खिरापत ओळखणे हा देखील अतिशय मजेदार खेळ. हादगा या खेळात एक सुंदर गाणं आहे.

आड बाई आडवणी

आडाच पाणी कडवनी

आडात होती दिवळी

दिवळीत होता खराटा

आमचा हादगा मराठा

यानंतर दिवळीत अनेक वस्तुंची नाव घेत आमचा हादगा बामण, आमचा हादगा माळी, कुंभार अशी नावे घेतली जातात. हा हादगा सर्वांचा आहे. सर्व जातीचा आहे. हे या गाण्यातलं सार महत्वाचं आहे.

आज या डिजीटल युगात असे खेळ लोप पावत आहेत. नव्या आलेल्या खेळांमधुन स्त्री-पुरुष भेद दिसत नाही ही एक जमेची बाब असली तरी, मोकळ्या हवेत खेळणे, मित्र समुदायात बागडणे हे संपत चाललेले दिसते. दोन पाय जुळवून त्यावर दुस-याने दोन हात जोडून पुढच्याचा मार चुकवण्याची जी मजा आहे, ती मजा किपॅड वर बोटे फिरवण्यात कदापी येवू शकत नाही.

Tags:    

Similar News