अन्सारी के मीट में जितना फायदा हैं, उतना पूरे अस्पताल की दवाई में नहीं
आज लालू प्रसाद यादव यांचा जन्मदिवस, त्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी 'गोपालगंज टू रायसीना - माय पॉलिटिकल जर्नी' या पुस्तकातील एक स्टोरी या ठिकाणी सांगितली आहे. ही स्टोरी माणसाचं ह्रदय हेलावून तर सोडतेच त्याचबरोबर लालूंच्या 'जब तक रहेगा समोसे में आलू तबतक रहेगा Bihar में Lalu' या त्यांच्या प्रसिद्ध घोषणेची प्रचिती देखील देते नक्की वाचा;
(लालूप्रसाद यादव यांच्या 'गोपालगंज टू रायसीना - माय पॉलिटिकल जर्नी' या आत्मचरित्राचे सहलेखक नलिन वर्मा यांची ही स्टोरी, दोन वर्षांपूर्वी द टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध झालेली. त्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. लालूप्रसाद यादव नावाचा माणूस समजून घेण्यासाठी ती निश्चित उपयुक्त ठरेल.)
त्या दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट २०१८ ला मी मुंबई विमानतळावर उतरलो, तो बकरी ईदचा दिवस होता. लालूप्रसाद यादव यांच्यावर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. लालूप्रसादांचे 'गोपालगंज टू रायसीना – माय पॉलिटिकल जर्नी' हे आत्मचरित्र लिहून प्रकाशनासाठी पुढे दिले होते. (हे आत्मचरित्र सहा एप्रिल २०१९ला प्रसिद्ध झाले आहे) मात्र, त्यातील काही मजकुराविषयी मला लालूप्रसादांबरोबर चर्चा करायची होती. या आत्मचरित्रातून काही चुकीची माहिती जाऊ द्यायची नाही, याची काळजी घ्यायची होती.
विमानतळावर पोहोचल्यानंतर मी रिक्षा केली आणि रिक्षावाल्याला एशियन हार्ट इन्स्टिट्यूटकडे न्यायला सांगितले. मी पत्ता सांगितल्यानंतर रिक्षावाल्यानंच विषय काढला, 'तुम्हाला लालूप्रसादजी माहितयंत का? सध्या ते याच हॉस्पिटलमध्ये आहेत.'
मी म्हणालो, 'होय, मी त्यांनाच भेटायला चाललोय.' मी लालूप्रसादांना भेटायला जातो, असं म्हणताच त्या रिक्षावाल्यानं लगेच रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेत थांबवली आणि मागे वळून तो हिंदीत म्हणाला, 'तुम्ही माझी आणि लालूजींची भेट घालून देऊ शकता का? तुम्ही माझी भेट घातली, तर देवाकडे मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन.' तो रिक्षावाला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात राहणारा गरीब मुसलमान होता आणि रोजगारासाठी मुंबईत आला होता.
मी त्या रिक्षावाल्याची लालूप्रसादांबरोबर भेट घालून देऊ शकत होतो, की नाही, मला खरंच माहीत नव्हते. किंबहुना, त्याची आणि लालूंची भेट घालून देणे, हे काही माझ्या निकडीचे काम नव्हते. पण, परिस्थितीतून मार्ग काढायचा होता आणि मी त्या रिक्षावाल्याला म्हणालो, 'तू तुझं नाव आणि मोबाइल नंबर दे, मी माझ्या परिनं प्रयत्न करीन.'
लालूंना भेटण्याची त्या रिक्षावाल्याची खूपच इच्छा होती आणि त्याची भावना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो म्हणाला, 'मला जर लालूजी आणि अमिताभ बच्चन यांना एकाच वेळी भेटायची संधी मिळत असेल ना, तर मी लालूजींनाच भेटेन.' त्याने एका कागदावर नाव आणि मोबाइल नंबर लिहून मला दिला. अन्सारी असं त्याचं नाव होतं. तो कागद मी काळजीपूर्वक पाकिटात ठेवला.
रिक्षा हॉस्पिटलच्या दरवाजापर्यंत आली आणि मी उतरताना अन्सारी मला म्हणाला, 'लालूजी से मिलवा देना बाबूजी. अल्लाह मेहेरबान होगा.' हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून आत जाईपर्यंत मी त्याची ही विनंती विसरूनही गेलो होतो. लॉबीमध्ये पोहोचेपर्यंत लालूजींची माणसं माझ्याकडे आली आणि चौथ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीपर्यंत मला घेऊन गेली. 'रुपा' प्रकाशनाचे संपादक रुद्र शर्माही काही वेळानंतर तेथे पोहोचले.
लालूजींची तब्येत फारशी चांगली नव्हती. हृदयावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती आणि रक्तदाब व रक्तातील साखर सारखी कमी जास्त होत होती. त्यांच्या आजूबाजूला डॉक्टर आणि नर्सेस सारख्या होत्या. काही जण त्यांना काय खायचे, काय खायचे नाही, हे सांगत होते. त्याही अवस्थेत लालूजींनी आपल्या खास शैलीत आणि मोठ्या आवाजात आमचे स्वागत केले. त्यानंतर मी आणि रुद्र शर्मा जवळपास दोन तास त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो.
आत्मचरित्रातील अनेक मुद्द्यांवर आम्ही बोलत होतो. या काळामध्ये डॉक्टर आणि नर्स त्यांचा रक्तदाब, साखर तपासत होते. काही डॉक्टरांनी जवळ येऊन त्यांच्याबरोबर सेल्फीही काढली. दरम्यानच्या काळात हरियाणातील त्यांच्या नातवाचा फोनही येऊन गेला आणि लालूजी त्याच्याशी दोन-तीन मिनिटे बोलले. एक आजोबा नातवाशी छोट्या मुलाच्या भाषेत बोलतो ना, अगदी तसंच लालूजीही बोलत होते.
घरातल्या एखाद्या आजोबाची काळजी घेतल्याप्रमाणे हॉस्पिटलमधले नर्स आणि डॉक्टर लालूजींची काळजी घेत होते. ते आजारी होते, पण त्यांच्या शब्दांनी आणि चुटकुल्यांनी त्यांच्या भोवतीचा प्रत्येक जण हसतखेळत होता. तिथेच उभ्या असलेल्या एका छोट्या वयाच्या नर्सला ते म्हणाले, 'तू लवकरच लग्न करायला पाहिजेस. लग्नाला उशीर करून चालत नाही. तू आता तुझ्या घरातल्या, कुटुंबातल्या वयस्करांची काळजी घ्यायला पाहिजे.' लालूजींच्या या सल्ल्यानंतर ती नर्स लाजून हसली.
तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजत आले होते आणि मला निघायचे होते. तेवढ्यात मला रिक्षावाल्या अन्सारीची आठवण झाली आणि सहज विषय काढला. आम्ही बराच वेळ आत बसल्यामुळे, बिहार आणि महाराष्ट्रातील काही वरिष्ठ राजकीय नेते लालूजींना भेटण्यासाठी बाहेर बसले होते. पण, मी रिक्षाचालकाचा विषय काढताच, लालूजी एकदम अस्वस्थ झाले आणि मला विचारले, 'त्याचा नंबर तुमच्याकडे आहे ना? मला द्या बर पटकन.'
मी पाकिटातून कागद काढून त्यांच्या हातामध्ये दिला. तर, त्यांनी तो कागद लगेचच शेजारी असणाऱ्या आमदार भोला यादव यांच्याकडे दिला. रिक्षावाल्याला फोन करायला लगेच सांगितले. भोला यादवांनी फोन लावला आणि लालूंकडे दिला.
फोन सुरू झाल्यानंतर लालूजी त्यावर बोलू लागले... 'आप का नाम क्या हैं? आप जल्दी हम से मिलने आ जाओ. ढाई सौ ग्राम कच्चा कलेजी भी लेते आना. आज बकरी ईद का दिन है, कुर्बानी वाला कलेजी लाना...'
फोनवरचं बोलणं झाल्यानंतर लालूजींनी तो भोला यादव यांच्याकडे परत केला आणि बाहेरच्या नेत्यांना परत कधी तर भेटायला या, असा निरोप दिला. अन्सारीला घेण्यासाठी त्यांनी भोला यादवला खाली पाठवले. जवळपास अर्ध्या तासानंतर अन्सारी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्याच्या हातातील पांढऱ्या रुमालामध्ये त्याने कलेजी बांधून आणली होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबतच नव्हती.
त्या अवस्थेत तो लालूंच्या समोर आला, तर लालूजी गरजले, 'आता फक्त रडत बसू नको, या लक्ष्मणबरोबर जा आणि मस्त कलेजी शिजव. त्यासाठी मोहरीचं तेल, आलं, हिरवी मिरची वापर. मग आपण दोघं मस्त एका ताटात बसून खाऊ.'
त्या खोलीच्या समोर असणाऱ्या खास किचनमध्ये लक्ष्मण अन्सारीला घेऊन गेला. हॉस्पिटलच्या प्रशासनानं खास लालूजींसाठी या किचनची सोय केली होती. थोड्या वेळाने लक्ष्मण आणि अन्सारी आले. एका ताटातून लालूजींसाठी कलेजी शिजवून आणली होती. लालूजी तिथेच पलंगावर बसले आणि अन्सारीलाही बसायला सांगितले.
लालूजींच्या आग्रहावर काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. 'हुजूर! आप के प्लेट में कैसें खाऊँ! मैं गरीब आदमी हूँ, ऑटोरिक्षा चलाता हूँ, आप से मिल लिया. मुझे सब कुछ मिल गया,' एवढंच तो कसंबसं बोलू शकला.
त्यावर लालूजी लडीवाळ रागात आले आणि म्हणाले, 'चूपचाप आकर साथमें खाओं, नही तो दो थप्पड मारूंगा.'
अन्सारीही नम्रपणे पुढे सरकला आणि ते दोघे एका ताटात जेऊ लागले. आम्ही हे सर्व पाहात होतो. हे सर्व सुरू असताना, एक नर्स आत आली आणि त्यांच्या ताटाकडे पाहताच ओरडली, 'तुम्ही मटण का खात आहात? मटण खायचं नाही, म्हणून डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय ना.'
त्यावर लालूजी मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, 'डॉक्टर साहीब भोले हैं. उनको पता नहीं हैं के, अन्सारी के मीट में जितना फायदा हैं, उतना फायदा पूरे अस्पताल की दवाई में नहीं. ये कुर्बानी का मीट हैं.'
त्यानंतर ते आमच्याकडे वळले आणि बोलू लागले, 'मला गरीब लोकांकडून खूप खूप प्रेम मिळालं आहे. आपल्याला आणखी काय पाहिजे? मी मृत्यू, आजारपण यांचा विचार करत नाही. आपलं आयुष्य तर देवाच्या हातामध्ये आहे.' ताटातलं खाण संपल्यानंतर ते अन्सारीला म्हणाले, 'अन्सारी अब जाओ. कोई तकलिफ होगा तो बताना, फिर मिलना.'
या अचानक झालेल्या भेटीमुळे कृतकृत्य झालेल्या अन्सारीच्या डोळ्यातून आता कृतज्ञतेचे अश्रू ओघळत होते. त्याच भावनेतून तो पुटपुटला, 'या अल्लाह, लालूजी को आबाद रख.' अन्सारी निघून गेला आणि लालूजी पुन्हा आमच्याकडे वळले. 'आठ वाजत आले आहेत. आमच्या ताटातली कलेजी चार-पाच जणांना पुरणारी नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला जेवताना आग्रह केला नाही. आता तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकता. मस्त जेवण करा, मद्याचा आनंद घ्या. बिहार में तो शराब बंद हैं.'
लालूजींना जन्मदिवसाच्या शुभेच्छा