केरळचा धडा वेगळाच आहे
ऐन निवडणुकीच्या पूर्वी धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची बेगमी साधणाऱ्या भाजपला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून मोठा धडा मिळाला आहे. केवळ भाजपलाच नाही तर बिगर भाजप पक्षांना हार्ड कि सॉफ्ट हिंदुत्व या संभ्रमातून सोडवणारी देवभूमी केरळची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली. केरळात भोपळा फोडू न शकणाऱ्या भाजपने आता डाव्यांचा महापूर आणि कोरोना नियंत्रणातील काम पाहावं असा, सल्ला विश्लेषक आनंद शितोळे यांनी दिली आहे.
५५ टक्के हिंदू, २६.५६ टक्के मुस्लीम, १८.३६ टक्के ख्रिश्चन.शंभर टक्के साक्षरता असलेल्या या समुदायाने डाव्या आघाडीला निवडून दिलेलं आहे. हिंदू हिंदू म्हणून गळे काढणाऱ्या लोकांना केरळची हिंदू मंदिरांची परंपरा ठाऊक असेलच, लक्षात असू द्या ५५ टक्के जनतेने ज्यांचे तुम्ही तारणहार आहात असा खोटा प्रचार करता त्यांनी तुम्हाला नाकारलेले आहे तेही शून्य जागा देऊन.
मात्र केरळच्या विजयाचा एवढाच अर्थ नाहीये. डावी आघाडी धार्मिक बाबतीत काय मत ठेवून आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे मात्र त्यांनी लोक काय खातात, काय कपडे घालतात, कश्या पूजा करतात, प्रार्थना करतात यामध्ये विनाकारण नाक खुपसले नाही आणि लोकांना फुकट सल्ले आणि अक्कल शिकवायला गेले नाहीत.
मग लोकांनी निवडून दिले ते कशाला ? तर दोन वेळा आलेल्या महापुरात, कोरोनाच्या महामारीच्या काळात सरकारने काय आणि कस काम केल हे लोकांनी पाहिलं आणि त्यांनी डाव्या आघाडीला सलग दुसऱ्यांदा निवडून दिल. हा धडा सगळ्या बिगरभाजप किंवा भाजपविरोधी समजणाऱ्या पक्षांसाठी आहे. हार्ड कि सॉफ्ट हिंदुत्व हा आचरटपणा , कोण किती अस्सल हिंदू ,कुणाची मूळ हिंदू आणि एकूणच धार्मिक बाबीतला अतिरेकी हस्तक्षेप आणि आपण हिंदू आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास आणि आचरटपणा तातडीने बंद करण्याची गरज आहे. तुम्ही भारतीय आहात, भारतीय म्हणूनच जनतेला सामोरे जा आणि सगळ्या जनतेला भारतीय म्हणूनच वागवा.
लोकांनी तुम्हाला भाजपला नको म्हणून निवडून द्याव हि लोकांची अगतिकता आणि भाजपचा नालायकपणा असेल तर त्यात तुमच योगदान आणि कर्तुत्व काय आहे ? लोकांना ठोस लोककल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणून आणि धार्मिक कट्टरपंथीय लोकांना उत्तर म्हणून तुम्ही काय विधायक मांडणी करत आहात आणि लोकांसाठी काय विकासाच्या योजना आखून राबवत आहात हे जास्त महत्वाच ठरणार आहे.
अन्यथा भाजप नको म्हणून तुम्हाला सत्तेत आणून बसवूनही जगण्यात काहीच फरक पडणार नसेल तर लोक नवनवीन पर्याय शोधतील किंवा पुन्हा भाजपच्या वळचणीला जातील. कुणीतरी नको म्हणून आपली निवड होणे हि लाजिरवाणी बाब आहे हे बिगरभाजप पक्षांनी लवकर समजून घ्यावे हा खरा केरळचा धडा.
#सीधी_बात
#केरळ_निवडणूक