कन्हैय्या कुमारच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसचं चांगभलं होणार का?

कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवानी राहुल गांधी यांच्या नव्या टीमचे सदस्य आहेत का? कन्हैय्या कुमारच्या प्रवेशाचा नक्की अर्थ काय? कन्हैय्या कुमार यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये काय बदल होणार? वाचा अजित अनुषशी यांचा लेख

Update: 2021-09-29 13:02 GMT

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी काँग्रेसप्रवेश ही एक ऐतिहासिक घटना आहे. माध्यमांना सिद्धूपाठी नाचावंसं हे ठीकच आहे. बहुतांशी सर्व रंगाच्या सर्व माध्यमांना काँग्रेस संपली आहे, ही हाकाटी उठवण्यात आनंद आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे याबद्दल आश्चर्य वाटायला नको. पण आपण मात्र, या प्रवेशाचे अन्वयार्थ नीट समजून घ्यायला हवे.

सुमारे 70 च्या दशकापासून, खासकरून इंदिरा गांधी यांच्या निर्विवाद विजयानंतर, 'काँग्रेस हा नीतिमूल्ये नसलेला पक्ष आहे' अश्या मध्यमवर्गीय प्रचाराला सुरुवात झाली. हा निव्वळ राजकीय प्रचार नव्हता. कथा, काव्य, चित्रपट अश्या सर्व सांस्कृतिक मार्गांनी भ्रष्टाचार, अरेरावी, जातीयता, इ रोगांनी ग्रासलेल्या काँग्रेस पक्षाला नैतिक अधिष्ठान नाही, हा विचार हळूहळू बिंबवला गेला.

२०१४ चा (आणि काही प्रमाणात २०१९ चाही) मोदी विजय, हे या खुल्या आणि छुप्या प्रचाराचं यश होतं. चलाख हिंदुत्त्ववाद्यांसारखेच भोळे समाजवादी, हिशोबी भांडवलशाही उदारमतवादी, या प्रचारात सामील होते. याचा अर्थ असा नाही की, काँग्रेस नेते या आरोपातून निष्कलंक होते. मुद्दा असा आहे. की, ही सर्वच्या सर्व पापं पुढच्या काळात देशातल्या प्रत्येक पक्षाने केलेली आहेत, किंबहुना मिळालेल्या सत्तेच्या तुलनेत तर काँग्रेसपेक्षा अधिकच!

आणि ही सर्व सामायिक पापं बाजूला काढली, तर इतर अनेक नव्या कुप्रथा-परंपरांना यातले अनेक पक्ष जबाबदारही आहेत. पण नैतिक अधिष्ठान नसलेल्या पक्षाचा शिक्का काँग्रेसवर मारला गेला आणि पुढे भाजप-प्रणित प्रचाराने तो इतरांवरही बसला.

अनेक चुका, अपयश आणि गोंधळासकट राहुल गांधींचं वैशिष्ट्य म्हणजे ते सातत्याने काँग्रेसला हे नैतिक, सैद्धांतिक अधिष्ठान परत मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहेत. या प्रक्रियेत ते बदनाम झालेले आहेत, पक्षातल्या धुरीणांकडून फसवले गेलेले आहेत, निवडणुकीच्या राजकारणात पराभूत झालेले आहेत, इतर मोदींविरोधकांकडून हेटाळणीही केले गेलेले आहेत. पण त्यांचा मार्ग स्पष्ट राहिलेला आहे.

कन्हैया आणि जिग्नेशचा प्रवेश या पार्श्वभूमीवर पाहायला हवा. पक्षात नसतानाही राहुल यांनी जिग्नेशला निवडून आणलेलं होतं. आपल्या दमदार भाषणाने कन्हैय्या युथ आयकॉन बनलेला होता. त्यांचा पक्षप्रवेश हा राहुल प्रणित काँग्रेसी राजकारणाचा विजय आहे.

राहुलच्या सैद्धांतिक मार्गाचा एक मोठा माईलस्टोन आहे. पुढे यांना पक्षात ढुड्ढाचार्यांचा त्रास होईल, कदाचित भ्रमनिरास होईल, निवडणुकीत यश मिळेल किंवा नाही. पण हा प्रवेश काँग्रेससाठी एका नव्या सुरुवातीचा प्रारंभ असेल…!!

Tags:    

Similar News