'जंगोम' म्हणजे क्रांती !

इंग्रजांच्या जुलुमी राजवटी विरोधात, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी लढा देणारे आदिवासी समाजातील महान क्रांतिकारक वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांना कालच्या दिवशी 166 वर्षापुर्वी चंद्रपूरातील कारागृहात इंग्रजांनी फाशी दिली; आणि देशाने एक महान योद्धा गमावला. वाचा क्रांतीकारक वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या कार्यावर अॅड.बोधी रामटेके यांनी टाकलेला प्रकाश...;

Update: 2023-10-22 09:56 GMT

गोंड राजांचे वर्चस्व असलेल्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात इंग्रजांनी सत्ता काबीज केली. जमीनदार-ठेकेदारांकडून अनावश्यक कर वसुली, आदिवासी समाजाचे धर्मांतर, वनसंपत्ती व खनिज संपत्तीसाठी आदिवासी जमिनीवरील इंग्रजांचा कब्जा या गोष्टी बाबुरावांना खटकणाऱ्या होत्या.

आणि म्हणून या विरोधात बंड पुकारण्यासाठी अवघ्या चोवीस वर्षांचे असलेल्या बाबुरावांनी ‘जंगोम‘ सेनेची 1856 साली स्थापना केली. त्यामाध्यमातून जवळपास पाचशे आदिवासी युवकांना अन्यायाची जाणीव करून देत त्यांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. सेना तयार करुन इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 1857 साली पुकारलेल्या पहिल्या युद्धात इंग्रजांच्या हस्तकाला ठार केले. याचे प्रतिउत्तर म्हणून इंग्रजांनी मोठी फौज पाठवली. मात्र वीर बाबुरावांच्या तेज युद्ध नितीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

वीर बाबुराव शेडमाके हे नाव लोकांच्या मनात रुजले. स्वातंत्र्याची बीजे रोवण्याची उर्जाच त्यांनी गोंडवानात पेरली. यांच्या नेतृत्वात अनेक युद्ध झालीत. ज्यात इंग्रजांचा पूर्णवेळ पराभवच झाला. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचा या युद्धात मृत्यू झाला. बाबुरावांच्या या कामगिरीचा इंग्रजांना मोठा हादरा बसला होता. ज्यासाठी खुद्द राणी विक्टोरीयाने त्यांना पडकण्याचे आदेश काढले. त्यासाठी नागपूरचे कॅप्टन सेक्सपिअरला बोलावून विशेष नेमणूक केली. अखेर युद्धात न हरवता येणाऱ्या वीर बाबुरावांना कपटनीती वापरून पकडण्यात आलं. त्यांच्या आपल्याच लोकांनी त्यांना दगा दिला. (संदर्भ: शेडमाके (2018); चंद्रपूर के आदिवासी क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके की जीवन कहाणी, पोईनकर (2023); 1857 च्या लढ्यातील स्वातंत्र्ययोद्धा क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके)

अशा अनेक महामानवांच्या गौरव गाथा आजही आमच्या पर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शोषित-वंचित समाजाच्या क्रांतीकारकांच्या कामाची दखल व्यवस्थेने घेतलेली नाहीत. घेतली असेल तरी त्यांचा प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्यांना सोईस्कर आणि प्रस्थापितांचा गौरव करणाराच इतिहास आपल्यापुढे मांडला गेला. वीर बाबुरावांनी दिलेला लढा हा प्रचंड मोठा आहे; तरीही त्यांचा साधा उल्लेखही पाठ्यपुस्तकात दिसत नाही. मी सात वर्षे शिकत होतो, त्या दुर्गम घोट परिसरातूनच 'जंगोम सेनेची' सुरुवात झाली होती. तेथील स्मारक आजही दुर्लक्षित आहे. त्याकडे लक्ष देण्यास कुणी तयार नाही.

व्यवस्थेने जरी आपला इतिहास नाकारला असला तरीही आता आपल्या उद्धारकर्त्यांना, आपल्या प्रतिकांना ओळखून त्याचा जागर करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्था आपल्या समोर निर्माण करत असलेले सामाजिक, सांस्कृतिक ट्रेंड मोडीत काढत, आपलं काऊंटर कल्चर निर्माण करावंच लागेल. Social Validation करिता शोषित समाज हा बहुसंख्य सामाजिक वर्चस्व असलेल्या समाजाच्या चालीरीती-संस्कृतीचे अनुसरण करतो. यातच शोषित समाजाची ओळख हळू हळूहळू पुसत जाते. आता तर प्रस्थापित व्यवस्था जाणीवपूर्वक, नियोजितपणे हे करत आहे. अनेक हिंदू सण-उत्सव गडचिरोली सारख्या आदिवासीबहूल भागात आधी साजरे होत नव्हते. आता या उत्सवांनी जोर धरलेला आहे; त्यात शोषित समाजाचाच सहभाग जास्त दिसतो. आपला शोषक कोण? हे ओळखणे गरजेचे आहे. ते न ओळखता समाज धर्म-निरपेक्षतेच्या नावाखाली हे असले प्रकार केले जात असतील तर कठीण आहे. कारण हे असले कारण देतांना अनेकांना (प्रामुख्याने समवयस्क युवकांना) ऐकलेले आहे. सोबतच अनेक बहुजन समाजातील पालकसुद्धा आपले मुलं इतरांपासून एकटे पडता कामा नये, असे कारणे देऊन आपल्या मुलांना शाळेत किंवा इतरही ठिकाणी होणाऱ्या अशा उत्सवात भाग घेण्यास लावतात.

लक्षात घ्या; जर आपल्याला आपली खरी ओळख कायम ठेवायची असेल तर सजग राहणे-शहाणे होणे गरजेचे आहे. तो शहाणपणा निर्माण करण्यात शिक्षणाचे मोठे योगदान आहे. वीर बाबूरावांनी सुरु केलेल्या लढ्यामागे शिक्षणाने त्यांच्यात निर्माण केलेली जिज्ञासा आणि सभोवतालच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टीकोन हेच महत्वाचे सूत्र वाटते. वीर बाबुराव तिन वर्षाचे असतांना गोटूल मध्ये जाऊ लागले. त्यात त्यांनी मल्लयुद्ध, तलवार, भाला याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्या काळात रायपूरला जाऊन ब्रिटिश एज्युकेशन सेंट्रल इंग्लीश मीडियम शाळेत चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वाढत्या वयात त्यांच्यातल्या जाणीवा विस्तारत गेल्या. हा असाच दृष्टीकोन ठेवून बहुजनांच्या पोरांनी शिकणे गरजेचे आहे.

डॉ.बाबासाहेब म्हणायचे की 'कुठला समाज जर नष्ट करायचा असेल तर त्याचा इतिहास नष्ट करा, त्या समाजाचे अस्तित्व आपोआप संपुष्ठात येईल'. आज प्रस्थापित व्यवस्था आपला इतिहास नष्ट करण्याच्या किंवा त्याचे विद्रुपीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. मी मागे छत्तीसगढला गेलो होतो, तेव्हा तेथील आदिम आदिवासी समुदायासोबत चर्चा करतांना एक लक्षात आले की, अनेक लोकांनी बिरसा मुंडा हे नावच ऐकलेलं नाही. मी स्तब्ध झालो होतो. यासाठी त्यांना दोष देवून चालणार नाही. हे व्यवस्थेचं नियोजित धोरण आहे. जर त्यांना बिरसा मुंडा माहित झाले असते तर त्यांचा आदर्श पुढे ठेवून, त्यांचा इतिहास लक्षात ठेवून आज त्यांची असलेली दयनीय परिस्थिती बदलवण्यासाठी त्यांनी बंड पुकारले असते.

आपल्या महामानवांना वेगळे रूप देण्याचे सुद्धा प्रयत्न होतात. बिरसा मुंडा यांची पुतळा, पोस्टरांमध्ये एकदम उंच आणि मजबूत शरिरयष्टी दाखवली जाते. खरंतर बिरसा मुंडा हे पाच फूट चार इंचाचेच होते. ते होते तसेच चित्रण केल्यास, ते आपलेसे वाटतात. मग कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपल्याला लढण्यास बळ येते.

असल्या अनेक प्रकारे आपल्या संस्कृतीवर होत असलेला हा कब्जा अदृश्य किंवा थेट लक्षात न येणारा असला तरी त्याचे परिणाम हे कधीच न भरून निघणारे आहे. व्यवस्था त्यांच्या जवळ असलेल्या सगळ्याच संसाधनांचा आणि जातीच्या वर्चस्वाने काबीज केलेल्या शासकीय संस्थांचा सुद्धा वापर करून ही सांस्कृतिक घुसखोरी करत आहे. ही सांस्कृतिक घुसखोरी करून त्यातून अधिकाधिक आर्थिक संसाधने आणि राजकीय सत्ता बळकावून घेऊन आपल्याला अधिक परावलंबी, कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तेव्हा आपल्याला सजग राहून पाऊल टाकणे आणि या घुसखोरी विरोधात जमेल तितके प्रभावी मार्ग वापरून assert, विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे असे वाटते.

क्रांतिकारी वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या स्मृतीस अभिवादन !

Tags:    

Similar News