माध्यमांची वाढणारी धर्मांधता म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर प्रश्नचिन्ह?
फक्त विशिष्ट धर्माच्या सणांना स्पेशल ग्राफिक्स सह, नवी वेशभूषा परिधान केलेल्या निवेदकांसह, विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या वृत्तवाहिन्या धर्मनिरपेक्ष भारतात कोणता आणि कुणाचा अजेंडा राबवू पाहतायत? अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याकांमधील दरी दिवसेंदिवस का वाढवली जातेय याचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम पाटील यांचा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.
सर्वप्रथम आज सगळ्यांना ईद अल अधा म्हणजेच बकरी ईद च्या खूप खूप शुभेच्छा! सोबतच सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या देखील खुप साऱ्या शुभेच्छा! मुद्दाम ईदच्या शुभेच्छा आधी दिल्या. का तेही सांगेन पण आत्ताच ज्यांना माझ्या या कृतीचा राग आला आहे त्यांनी पुढे वाचू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका.
हं कुठे होतो मी तर शुभेच्छा... हा तर ईद अल अधा च्या शुभेच्छा आधी दिल्या त्या अगदी सहजच मला वाटल म्हणून. कारण हल्ली प्रत्येकजण म्हणजे अगदी पत्रकार सुद्धा स्वतःला वाटेल तसच वागतात म्हणजे तो प्रत्येकाचा अधिकार आहे तसा तो मलाही आहेच. आज you tube चाळल. सर्व मराठी वृत्तवाहिन्यांच्या वृत्त निवेदकानी आज आषाढी एकादशी निमित्त नवा सदरा, पायजमा, कपाळावर गंध, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात टाळ अशी वेशभूषा करून दिवसभर बातम्या सादर केल्या. पण हीच माध्यम गृह (Media houses) आज बकरी ईद होती हे हेतू पुरस्सर विसरले. का कोणत्याही निवेदकाने आज पठाणी आणि टोपी घालून बातम्या सादर केल्या नाहीत?
पत्रकार हा शिकतानाच सार्वभौमत्वाचे शिक्षण घेतो कारण तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. भारतीय लोकशाही ही धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करते. मग किमान पत्रकारांनी तरी भेदभाव न करणे हे सर्वसामान्याला अपेक्षित असतं, पण असं होताना आपल्याला कधीच दिसत नाही. गणेश चतुर्थीला आणि अनंत चतुर्दशीला नटून थटून नऊवारी मध्ये बातम्या सांगणाऱ्या महिला निवेदक आणि नवा सदरा आणि पायजमा घालून बातम्या सांगणारे निवेदक आपल्याला दिसतात. दिवाळीला ही तसंच पण मग बुद्ध पौर्णिमा किंवा आंबेडकर जयंतीला हेच वृत्त निवेदक आणि निवेदिका निळ्या साड्या किंवा निळे कपडे या वेशभूषेत का दिसत नाहीत. ईद आणि मोहरमला मुस्लिम वेशभूषा, नाताळला ख्रिश्चन वेशभूषा तर पारसी नववर्षाच्या दिवशी पारसी वेशभूषा हे वृत्त निवेदक का करत नाहीत हा एक गंभीर सवाल आहे?
प्रत्येक वृत्त निवेदकाला त्याचा धर्म मानणे किंवा न मानणे याचं स्वातंत्र्य आहे आणि वैयक्तिक पातळीवर त्याने त्याचं पालन करावे किंवा नाही करावे हा त्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळेस तो न्यूज रूम मध्ये असतो ज्यावेळेस तो स्टुडिओमध्ये असतो त्यावेळी तो एका जबाबदार माध्यमाचा एक जबाबदार प्रतिनिधी असतो आणि त्यावेळेस तो लाखो करोडो लोकांच्या दूरचित्रवाणीवर थेट दिसत असतो. मग त्यात फक्त हिंदूच नसतात सर्व धर्मीय लोक असतात. मग फक्त हिंदू सणांनाच एक विशिष्ट वेशभूषा करून या पत्रकारांना काय सिद्ध करायचं आहे? माफ करा पत्रकार ज्या माध्यमांसाठी काम करतायेत त्या माध्यमांना काय सिद्ध करायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या, महात्मा फुलेंच्या, महात्मा गांधींच्या, सुभाषचंद्र बोस यांच्या, भगतसिंग यांच्या या भारतामध्ये अल्पसंख्याकांना काहीच किंमत नाही का? ग्राउंड झिरोवर समाजामध्ये यांना त्या कारणामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होत असते. या विभागलेल्या धर्मांना, त्या धर्मांना मानणाऱ्या माणसांना एकत्र आणण्याचं काम माध्यमांचं असतं ते आपण कधी करणार आहोत?
आतापर्यंत मी फक्त मराठी माध्यमांवरच बोलत होतो पण आपण जरा हिंदी माध्यमांकडेही वळूयात. हिंदी माध्यमांमधील काही मुस्लिम वृत्त निवेदक हे कधीच मुस्लिम सणांच्या दिवशी एका विशिष्ट वेशभूषेत बातम्या सादर करताना आपल्याला दिसत नाहीत पण हिंदू सणांच्या वेळेस मात्र दिसतात याला काय म्हणावं? एकतर माध्यम प्रतिनिधी आणि माध्यम म्हणून कोणत्याच सणाला अशा प्रकारचं विशिष्ट रूप आपण देता कामा नये. माध्यमांचे काम हे फक्त आणि फक्त त्या त्या देशातील नागरिकांच्या समस्या त्या देशातील सरकारपर्यंत पोहोचवण्याचं असतं. आता आपण म्हणाल की फक्त समस्या सांगणं नकारात्मकता नाही का? मी म्हणेन नाही ती नकारात्मकता वाटत असली तरी ते सकारात्मकतेकडे जाणार एक पाऊल आहे. तीच भविष्यातली सकारात्मकता जिला कारणीभूत आपण माध्यम असणार आहोत हे आनंद देणारं नाही का?
मग पुन्हा प्रश्न उठेल की माध्यमांना या स्पर्धेच्या युगात टिकायचे आहे आणि या टीआरपीच्या स्पर्धेत पहिले यायचं आहे. त्यासाठी लोकांच्या आयुष्याचा एक भाग होणे गरजेचे आहे असे या माध्यमाचं मत आहे जे प्रकारे व्यवसायाच्या दृष्टीने योग्य आहे. पण जर लोकांच्या घरातल्यांपैकी एक व्हायचं असेल आणि म्हणून आपण जर या सणांच्या दिवशी विविध वेशभूषा करणार असाल तर मग त्या प्रत्येक धर्मीय सणांच्या दिवशी देखील केल्याच पाहिजेत याला कारण असता कामा नये तरच आपण माध्यम म्हणून ताठ मानेने उभे राहू शकतो नाही तर सांगकाम्या आणि आपल्यात काहीही फरक राहणार नाही.
सध्याच्या केंद्रात बसलेल्या सरकारच्या काळात गेल्या आठ वर्षांमध्ये माध्यमांची जी अवस्था झाली आहे ती पाहता हे शक्य होईल की नाही याबाबतीत भली मोठी साशंकता आहे. ज्या पद्धतीने सध्याची माध्यमं पक्षपातीपणे काम करताना दिसतात ते पाहता या माध्यमांना देखील धर्मांधता हेच आपलं भविष्य वाटत असेल आणि म्हणून अप्रत्यक्षपणे का होईना अल्पसंख्याकांना ते सतत हे दाखवून देत आहेत की 'आपण या देशात अल्पसंख्यांक आहात. आपल्याला असंच घाबरत, दबून जगायचं आहे. आता सगळीकडे हिंदुत्वाचा भगवाच दिसणार आहे.'
ज्या पद्धतीने माध्यमं हिंदू सणांचा उदो उदो करताना दिसतात ते पाहता वरील शक्यताच जास्त वाटते. उगाच कोणतीही वृत्तवाहिनी आपल्या थेट कार्यक्रमात मंत्र पठण करणार नाही. मी कोणत्या वाहिनीबद्दल बोललोय हे जाणकारांना कळालंच असेल. असो तूर्तास इतकंच... कारण स्वार्थासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करायला मी कोणती युती नाही आणि त्याच स्वार्थासाठी महापुरुषांचा वापर करायला मी कोणती आघाडी देखील नाही. सरते शेवटी सगळे सारखेच! फक्त स्वतःची, युती आणि आघाडीच्या दोन ब्रेडमध्ये असणारी बटाट्याची भाजी होऊ देऊ नका म्हणजे झालं.