भारतीयांत निर्मितीक्षमतेचा अभाव!
आपल्या इथल्या तरुणांमध्ये नवीन करण्याची धडपड का दिसत नाही? धर्मसत्ता आणि नवनिर्मिती यांचा नक्की काय संबंध आहे. आपण ज्ञानार्थी विद्यार्थी घडवताना सृजनशीलतेला विसरलो का? वाचा लेखक इतिहासकार संजय सोनवणी यांचा लेख
भारतीय मानसिकतेत निर्मितीक्षमतेचा एकुणातच अभाव असावा असे वाटावे असे चित्र दिसते. शिक्षण निर्मितीक्षम, कल्पक आणि धोरणी नागरिक बनवण्यासाठी असते. हा सिद्धांत पुढे आला तेंव्हा युरोपातील शिक्षणपद्धती या आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीपेक्षा फारशी अद्वितीय वगैरे नव्हती. बव्हंशी लोक लिहा-वाचायलाच शिकलेले असतं. धर्म-तत्वज्ञानादी शाखांचे शिक्षण लॅटीनमध्येच दिले जात असे. अशी परिस्थिती असतांनाही निर्मितीक्षम प्रतिभाशाली निर्माण झालेच. त्यांनी धर्मसत्ता पुरती नाकारली. तेथेच त्यांच्या वैचारिकतेला मोकळे रान मिळाले आणि ज्ञान-विज्ञानाची क्रांती सुरू झाली.
धर्मसत्ता नाकारण्यासाठी एक डोळस तर्कबुद्धीचे गरज असते. ती केवळ शालेय वा उच्च शिक्षणाने येत नाही. वास्तवाचे भान आणि आकलन व त्यावर प्रतिक्रियास्वरुप विचारांच्या सुस्पष्ट मांडणीची गरज असते. ज्ञान हे अनावर कुतुहल आणि जिज्ञासेतून निर्माण होते. धर्मसत्ता हे नेहमीच मानवी समाजाला पुराणपंथी गारुडात ठेवण्यातच समाधान मानत असते व तसे अविरत प्रयत्न करत असते.हा जगभरचा संघर्ष आहे. त्यात युरोपाने धर्मसत्तेला यशस्वी आव्हान देत ज्ञानसत्तेला सर्वोपरी बनवले. अर्थात हाही प्रवास सोपा नव्हता. ब्रुनोसारख्या शास्त्रज्ञाला जीवंत जाळले गेले तर गॅलिलिओला आजन्म कैद मिळाली. अगणित प्रागतिकांचा छळ झाला.
भारतात असे स्वतंत्रपणे का घडले नाही? येथे काही वाचकांना आर्यभट, भास्कराचार्य ते वराहमिहिर यांचे उदाहरण देण्याचा मोह होईल...पण त्याचा काहीएक उपयोग नाही. कारण त्यांचीही परंपरा अर्धवट मध्येच सोडुन देण्यात आली होती. काही मंडळीला मुस्लिम राजवट हे सोपेकरणं सुचेल. परंतू तेही खरे नाही. कारण आक्रमणकाळ वगळला तर नंतर त्यांनीही शिक्षणव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचे दिसून येत नाही.
शिक्षण या देशात कधीच सार्वत्रिक नव्हते हे खरे आहे पण शिकू इच्छिणा-यासाठी (काही समाजघटक वगळता) शिक्षण उपलब्ध होते. मुस्लिमांनी मदरसे/मकतब्यांमार्फत त्यांची शिक्षणपद्धती जशी अंमलात आणली तशीच एतद्देशियांची शिक्षण पद्धतीही सुरुच राहिली. असे असतांनाही स्वतंत्र विचारक प्रदीर्घ काळात आणि संपुर्ण देशातुन मुळात निर्माणच होवू नयेत असे का घडले असावे?
धर्माचा पगडा हे कारण द्यावे. तर मग तो जगात कोणत्या राष्ट्रात कोणत्या समाजात नव्हता? प्रश्न पडु नयेत, कुतुहल वाटु नये. व त्याचा पाठपुरावा करण्याचे इच्छाच असू नये. असे असल्याखेरीज ज्ञाननिर्मितीबाबत निरिच्छा निर्माण होणे शक्य नाही.
सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीबाबत जाणीवा मृतवत असाव्यात तरच सामाजिक विचार जन्माला येणार नाहीत. ज्ञान योगाबाबत आध्यात्मिक चर्चा बरीच असतांनाही ज्ञानाला अध्यात्म समजल्याने ज्ञान हा शब्द फक्त पारिभाषिक राहिला असेच म्हणणं क्रमप्राप्त आहे. संतांची मांदियाळी बरीच असली तरी त्यांनीही सामाजिक जाणीवांचे भौतिक उन्नयन करण्याऐवजी आध्यात्मिक उन्नयनालाच महत्व दिले हेही उघडच आहे.
तत्कालीन शिक्षणपद्धतीत शिक्षण घेणारे आपापले जातिसापेक्ष व्यावसायिक शिक्षण घरीच मिळवत असत. प्रचलित व्यवसायांत, व्यवसाय पद्धतीच्या अंगाने म्हणा की उत्पादन पद्धतीच्या अंगाने, परंपरागत पद्धतींपेक्षा अधिकाधिक कार्यक्षम बनवाव्यात हा विचार व्यावसायिकांनाही सुचलेला दिसत नाही. तसे प्रयत्नही कोणी केलेले आढळुन येत नाहीत. ही स्थितीस्थापकता समाजमनावर असलेल्या अद्भुत आध्यात्मिक व धार्मिक गारुडामुळे आली होती असे म्हणावे तर राजरोसपणे राज्यकर्ते ते सरंजामदारशहा असामाजिक कृत्ये (जी अधार्मिक या संज्ञेत सहज मोडतात) देशभर सरसकटपणे आणि सातत्याने करत आलेली दिसतात.
त्यामुळे आमच्या जिज्ञासा धार्मिक जाणीवांमुळे मेल्या होत्या असे म्हणून चालणार नाही. आपला इतिहास म्हणून आपल्याला तत्कालीन राजे-सरंजामदारांच्या कृत्यांचे उदात्तीकरण करण्याचा मोह होणे स्वाभाविक असले तरी तसे करणे आपल्याला आपल्या प्रश्नाचे वास्तवदर्शी उत्तर देणार नाही.
आज आपण वर्तमानाकडे पाहिले तरी आपल्या लक्षात येईल कि भारतीय मानसिकतेत मध्ययुगीन मानसिकतेपेक्षा गुणात्मक वाढ झालेली दिसून येत नाही. पाश्चात्य शिक्षणपद्धतीमुळे व वर्तमानातील जागतिकीकरणामुळे जे आमच्यात बदल झालेले दिसतात ते बाह्यात्कारी आहेत व ते अपरिहार्यतेमुळे स्वीकारले गेले आहेत. त्यात आमचे स्वत:चे असे स्वतंत्र योगदान आढळून येणार नाही. जे आहे ते अनुकरणात्मक योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
नवनिर्मितीच्या मानसिक जाणीवांचा अभाव हे एकमेव कारण या मानसिक कुंठांना असले पाहिजे असे मला वाटते. नवनिर्मितीच्या छंदाखेरीज ज्ञानाची निर्मिती होत नसते. ज्ञानाच्या निर्मितीखेरीज अर्थनिर्मिती असंभाव्य आहे. इंग्रजांची शिक्षणपद्धती सुरु झाल्यानंतर दादाभाई नवरोजी, नवरोजी बैयरामजी, जमशेदजी टाटा या तशा मध्यमवर्गीय अवस्थेतुनच येत शिकलेल्या तरुणांनी जागतीक बाजारात/उद्योगात तरुण वयात पाय ठेवला. तसे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या हिंदू विद्यार्थ्यांबाबत घडलेले दिसत नाही. उलट ते सुरक्षीत नोक-यांतच घुसतांना आणि काही अपवादात्मक तरुण पत्रकारिता/प्रकाशन/समाजकार्य अशा कार्याला लागलेले दिसतात. मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स सुरु झाली तेंव्हा चार इंग्रज आणि तीन पारशी एवढेच चेंबरचे सदस्य होते.
"आम्हाला तशी उद्योगव्यवसायाची परंपराच नव्हती..." हे विधान येथे कुचकामी आहे. कारण आधुनिक अर्थशास्त्रीय जगताच्या परिप्रेक्षात त्यात एकार्थाने सारेच नवे भागीदार होते व ते तेथेही प्रशिक्षणार्थीच होते. हे येथे लक्षात घ्यायला हवे. यथोचित साहसाचा अभाव हे आमच्या निर्मितीक्षमतेचे मारेकरी तर ठरले नसेल? स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्वत:ला सक्षम करण्याऐवजी आम्ही आजही जसे जागतीक बाजारपेठेत बव्हंशी सेवकभावनाप्रेरीत अथवा भिकारीच असतो. तशीच मानसिकता तेंव्हाही नव्हती असे कसे म्हणता येईल?
याचाच दुसरा अर्थ असा होतो की नवनिर्मितीची प्रेरणा भारतीयांमध्ये नव्हती म्हणुन शिक्षणपद्धतीत बदल करण्याची इच्छा हजारो वर्ष झाली नाही. नवशिक्षितांनी त्या कामचलावू शिक्षणाचा उपयोग प्राप्त परिस्थितीत फक्त उदरभरणापुरता केला व बाह्य वास्तवांकडे डोळे मिटून घेतले. कारण नवनिर्मितीची संभावनाच त्यांच्यात नव्हती.
नवनिर्मितीच्या प्रेरणांच्या अभावात आम्ही समाजोपयोगी असे कसलेही नवसिद्धांतन करु शकलो नाही आणि तसे करू शकलो नाही म्हणुन समाज मानसशास्त्राचीही कसलीही उत्क्रांती झाली नाही. आम्ही इंग्रजांनी शिक्षणपद्धती दिली, ती नोकरीच्या गरजांपोटी उचलली आणि आजही त्याच प्रेरणांनी शिक्षणार्थी आहोत.
आम्ही ज्ञानार्थी बनायची जी प्रक्रिया असते ती पासून वंचित राहिलो ते राहिलोच!