छोट्या शहरातील पत्रकारांवर झालेल्या हल्ला माध्यमांवरील हल्ला नाही का?
मोठ्या शहरातील, मोठ्या चॅनलच्या पत्रकार झालेल्या हल्ला पत्रकारीतेवर झालेला हल्ला होतो... गाव खेड्यात फिरुन समस्या मांडणाऱ्या पत्रकारांवर झालेले हल्ला माध्यमांवरील हल्ले का नाही होतं. पत्रकार किरण नाईक यांचा सवाल....
"रिपब्लिक भारत" च्या एका पत्रकारास परवा पोलिसांनी ताब्यात घेतले.. त्यांचे मोबाईल देखील जप्त केले.. यावरून अर्णब गोस्वामी यांनी आकाशपाताळ एक केले.. हा चौथ्या स्तंभावरचा हल्ला असल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला.. या लढ्यात देशातील १२५ कोटी जनता आपल्या सोबत असल्याचे सांगत सुटलेल्या गोस्वामी यांना एकही पत्रकार किंवा पत्रकार संघटना आपल्या बाजुने उभी राहत नाही. याची जेव्हा जाणीव झाली. तेव्हा पत्रकार संघटना कश्या गटातटात विभागल्या गेल्या आहेत, त्या कसं राजकारण करतात हे सांगत नेहमी प्रमाणे आरडा ओरड सुरू केला..
मोठ्या चॅनल्सची ही नेहमीची पध्दत आहे. त्यांच्या रिपोर्टरवर जेव्हा हल्ला होतो किंवा पोलीस काही कारवाई करतात तेव्हा तो चौथ्या स्तंभावरचा हल्ला असतो. जेव्हा गावातल्या एखाद्या पत्रकारांवर हल्ला होतो किंवा पोलीस बेकायदेशीररित्या अटक करतात. तेव्हा तो माध्यमांवरचा हल्ला नसतो. अशा वेळेस बहुसंख्य चॅनल्स स्क्रोलमध्ये देखील बातमी द्यायला तयार नसतात.
कोरोना काळात राज्यात ३५ पत्रकारांवर हल्ले झाले, २२ पत्रकारांच्या विरोधात कारण नसताना पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.. मात्र, अपवाद वगळता बहुसंख्य चॅनल्सना असं चुकूनही वाटलं नाही की, हा माध्यमांवरचा हल्ला आहे, किंवा माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. म्हणून.. फक्त बड्या पत्रकारांवर झालेले हल्ले माध्यमांवरचे हल्ले असतात.
छोट्या शहरातील पत्रकारांवरचे हल्ले त्यांची व्यक्तीगत बाब असते असं होऊ शकत नाही.. कोणत्याही पत्रकारावर झालेला हल्ला हा माध्यमांवरचा हल्ला असतो हे बडे संपादक का समजत नाहीत? केवळ आपणच पत्रकार आहोत.. इतर कोणी पत्रकारच नाहीत अशा दर्प त्यामागे असावा..
बडी मंडळी जेव्हा अडचणीत येते. तेव्हा त्यांना पत्रकार संघटना देखील आठवतात.. आम्ही काहीही केले तरी संघटनांनी आमची पाठराखण केली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते.. संघटनांचे पाच रूपयांचे सदस्य होणे देखील ज्यांना कमीपणाचे वाटते अशा मंडळींना अडचणीत येताच संघटनांचा धावा करताना कोणतीही लाज वाटत नाही. प्रश्न असा आहे की, का यावं पत्रकार संघटनांनी तुमच्यासाठी धावून? पत्रकारांचं संघटन मजबूत व्हावं यासाठी तुम्ही काय योगदान देता? काहीच योगदान देणार नसाल आणि संघटना म्हणजे रिकामटेकड्या लोकांचा उद्योग अशी आपली धारणा असेल तर मग गरज पडेल तेव्हा मदतीची अपेक्षा तरी का ठेवता? यापुढे हे होणार नाही...
जो संघटनांबरोबर असेल त्याच्या बरोबरच संघटना असतील अशी भूमिका संघटनांना घ्यावी लागेल.. बरं त्यातही तुम्ही सत्याची लढाई लढत असाल, सामान्यांच्या हक्कासाठी, हितासाठी आवाज उठवत असताना तुमच्यावर अन्याय होत असेल तर अशा वेळेस संघटनांनी रस्त्यावर उतरायलाही आमची हरकत नाही.. मात्र तुमचे राजकीय अजेंडे पूर्ण करण्यासाठी तुम्ही संघटनांचा धावा करणार असाल तर आम्हीच काय कोणीच तुमच्याबरोबर येणार नाही.
मराठी पत्रकार परिषदेने नेहमीच माध्यमांच्या हक्कासाठी, माध्यम स्वातंत्र्यासाठी आवाज उठवलेला आहे. मात्र, स्वतःच्या राजकीय लाभासाठी कोणी कारवाई ओढवून घेणार असेल. आम्ही फरफटत अशा लोकांच्या मागे जाणार नाहीत. अशा लोकांनी स्वतःची लढाई स्वतः लढावी संघटनांचा धावा करण्याच्या किंवा संघटनांच्या नावानं बोंब मारण्याच्या भानगडीत पडू नये.ॉ