पत्रकारितेसाठी हा सुकाळ आहे का?: किरण सोनावणे

जेव्हा सर्व क्षेत्रात निराशेचं वातावरण असतं तेव्हा पत्रकारांना समाजामध्ये बदल घडवण्य़ासाठी खूप काही करण्याची संधी असते. मात्र, सध्याच्या काळात असं घडतंय का? वाचा वरिष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांचं विश्लेषण;

Update: 2021-01-06 09:14 GMT

आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी-इंग्रजी पाक्षिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा शुभारंभ केला. बाळशास्त्री जांभेकर हे त्या काळातील पुरोगामी आणि आधुनिक युगाचे पुरस्कर्ते होते. अशी एकूण त्यांचे शिक्षण, त्यांना अवगत असलेल्या अनेक भाषा आणि अनेक ज्ञान शाखांचे त्यांना असणारे ज्ञान यातून दिसून येते.

मराठी जनतेस सरकारी निर्णय आणि कायद्याची माहिती व्हावी तसेच आधुनिक ज्ञान विज्ञान याबद्दल माहिती मिळावी. म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे पाक्षिक सुरू केले, पुढे अनेकांनी मराठी पत्रकारितेत आपला ठसा उमटवला, मग त्यात टिळक-आगरकर, भा ल भोपटकर, प्रबोधनकार, भास्कर जाधव, महात्मा फुले, मूकनायक ते प्रबुद्ध भारत अशी एकूण 5 वृत्तपत्र चालवणारे बाबासाहेब आंबेडकर अशी मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील काही नावे ठळकपणे सांगता येतील

पूर्वी पत्रकार दिन येण्यापूर्वी, त्याच्या समारोहाची चर्चा डिसेंबर महिन्यात होत असे, आजकाल पाणीदार पत्रकार शिल्लक नाहीत. पत्रकारीतेचा बिल्ला लाऊन फिरणारी भामटी-लाचार जमात मात्र, गल्ली बोळात दिसते. त्यामुळे 5 जानेवारीला ठरवून पत्रकारितेचे वर्षश्राद्ध उरकावे तसे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला हार घातला जातो. हा हार घालण्याचा मान गावातल्या अश्या व्यक्तीला दिला जातो जो संध्याकाळी तिर्थ-प्रसादाची सोय करेल.

ती व्यक्ती ठेकेदार, भावी नगरसेवक, आमदार, खासदार किंवा महापौर,नगरसेवक कुणीही असू शकते. रात्री तीर्थ प्रसाद झाला तरी काही भक्तांचे मन भरत नाही ते मुला बाळांना पत्रकारितेचा आशीर्वाद मिळावा म्हणून तीर्थ प्रसादाच्या पुड्या बांधून घेऊन जातात. पूर्वी कधीतरी पत्रकारांच्या डोळ्यात चमक दिसे, आज काल महापालिका आणि पत्रकार कक्षात ग्राहकाची वाट पहाणाऱ्या वारांगना सारखे भाव पत्रकारांच्या चेहऱ्यावर असतात.

जेव्हा पासून भांडवलदार, राजकारणी, पेपरचे वितरक, गुटका किंग, भीसी, बिल्डर वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याचे मालक-संपादक झाले. तेंव्हा पासून पत्रकारिता हळू हळू मरत जाऊन संपादक हा मॅनेजर आणि शहरातील पत्रकार हे खबरी कम जाहिरात प्रतिनिधी झाले.

पुढे बातमीदारी दुय्यम होत जाऊन जाहिरातीचे टार्गेट मुख्य झाले. टार्गेट पूर्ण करून वर विशेषांक काढून देणारा प्रतिनिधी संपादक आणि मालकाच्या गळ्यातील ताईत असतो. निवडणुकीत हा धंदा फार तेजीत असतो, उमेदवारकड़ूंन किंवा पक्षाच्या कडून लाखोंचे पाकिट घेवून, त्यावर हुकुम बातम्या, मुलाखती आणि रॅलीचे फोट, जोर कमी अधिक दाखवला जातो. एरवी उठसुठ रामशास्त्री प्रभुणेचा अवतार म्हणणारे...

निवडणुकीत मात्र, घाशीराम कोतवालच्या भूमिकेत असतात. कोब्रा पोस्ट ने निवडणुकीपूर्वी केलेल्या स्टिंग ऑपेशन मध्ये झी न्यूज, स्टार न्युज, आज तक पासून सर्वच वृत्त वाहिन्या कशा भ्रष्ट आणि धंदेवाईक आहेत. याचा विकृत चेहरा लोकांच्या समोर आणला, सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील महत्त्वाच्या एकाही न्युज चॅनेल ने कोब्रा पोस्ट वर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला नाही. त्याचे स्पष्टीकरण देण्याची हिम्मत केली.

अश्या सर्व प्रकारामूळे पत्रकारिता ही संपली असून पत्रकारितेचा मुखवटा धारण करून भांडवलदार धंदा आणि जनतेला भटकविण्याचे काम करीत आहेत आजकालची पत्रकारिता ही निखळ सत्य, प्रामाणिकपणा आणि ध्येयवाद यावर टिकून नसून जाहिरातदारांवर टिकून आहे. सर्वात मोठा जाहिरातदार हे सरकार आणि बडे उद्योगपती आहेत, त्यामुळे आताची पत्रकारिता ही त्यांच्या हातातील बाहुले आहे.

मात्र, काळ सर्वांच्या वर उपाय शोधतो, तसे विज्ञानाच्या प्रगतीमूळे सोशल मीडिया हा नवा अवतार पत्रकारितेत अवतरला असून अजून तो बाल्यावस्थेत असला तरी त्याने आपला चमत्कार दाखविण्यास सुरुवात केली आहे. जे माध्यमं आता पर्यंत केवळ भांडवलदार वर्गाच्या हातात होते. ते आता सर्व सामान्य लोकांच्या आवाक्यात आले आहे. त्यामुळे डिजिटल मीडिया हा नव्या आणि आगामी भविष्यातील मीडिया म्हणून आकार घेत आहे. सुरुवातीला याचाही गैरवापर करण्यात आला, खोटे व्हिडिओ, बातम्या पसरवून जनमत भटकविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यावर कडी करत फॅक्ट चेक करणाऱ्या अनेक वेब साईट आणि वेब पोर्टल तयार होत आहेत.

संख्या कमी आहे. मात्र, येणाऱ्या काळात फॅक्ट चेक, डाटा एनेलिसिस (विश्लेषण) आणि भविष्याचा वेध घेणारी पत्रकारिता आणि पत्रकार याक्षेत्रात उदयाला येतील. स्ट्रिंजर, खबरी हा प्रकार आताच कमी होत चालला असून विविध क्षेत्रातील तज्ञ हे येणाऱ्या काळात पत्रकारितेमधील प्रमुख भाष्यकार असतील, त्याची सुरुवात झाली आहे. द वायर, मिंट, मॅक्स महाराष्ट्र, बीबीसी (मराठी) इत्यादी सारख्या नव्या डिजिटल वृत्तवाहिन्या महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आहेत. आजच त्यांचे प्रेक्षक कोट्यावधीच्या घरात आहेत. हे सर्व पाहून धंदेवाईक वृत्तवाहिन्यांना देखील सोशल मीडिया वर उतरणे भाग पडले आहे. हा त्यांच्या माध्यमांची होत असलेल्या पीछेहाटचे ठळक लक्षण आहे.

आंदोलनाचं बोलाल तर NRC, CAA चे आंदोलन असो की, आता दिल्लीत सुरू असलेले किसान आंदोलन असो. धंदेवाईक मीडियाने त्याला भटकवण्याचा, टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या हजारो बातम्या, तिथल्या प्रत्येक हालचालीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे आता कुठलेही लोक आंदोलन जे सरकार आणि येथील शोषण व्यवस्थेच्या विरोधात असेल ते आता धंदेवाईक मीडियाचे मोहताज नाही. कारण आहे आता सोशल मीडिया हा लोक मीडिया म्हणून पुढे आणि सर्वात फास्ट मीडिया म्हणून उदयाला येत आहे. ही मीडिया मध्ये येणाऱ्या भावी सुवर्ण युगाची पहाट आहे. असेच म्हणावे लागेल

आजही आपल्या देशात पत्रकारिता ही गंभीरपणे करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे सामाजिक, राजकीय, मनोरंजन यांच्या परिघावरच पत्रकारिता वावरताना दिसते. अजूनही मेडिकल जर्नालिझम, अग्रीकलचर जर्नालिझम, इकॉनॉमिकल जर्नालिझम सारखे क्षेत्र क्वचित भारतीय पत्रकारितेत दृष्टिपथात येतात. आजही राजकीय लोकांची चिखलफेक, नट नाट्याचे खाजगी आयुष्य यांच्या भोवती पत्रकारिता पिंगा घालताना दिसते. पत्रकारिता ही कालानुरूप बदलते आहे. भ्रष्टाचार, लाचारी आणि चमचेंगिरीची कात टाकत आहे असे दिसते. त्यामुळे हे एक श्याम बहादूर नम्र यांच्या कवितेच्या चार ओळी आठवतात तेवढया नमूद करतो, आणि आजही पाणीदार पत्रकारिता करणाऱ्या मित्रांना शुभेच्छा आणि आगे बढो चा नारा देतो.

कलम कलम होती है,
कलम कभी बिकती नही,
बिकी हुई कलम टिकती नही...

किरण सोनावणे लेखक मॅक्समहाराष्ट्र मध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.

Tags:    

Similar News