२ हजार हत्ती आणि १८४ माणसांना क्रूरपणे मारणारा वीरप्पन कुणाच्याही गुरुस्थानी असणारच नाही, मात्र खमके IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी वीरप्पनकडूनही एक गोष्ट शिकले... ती कोणती वाचा गोविंद अ. वाकडे यांच्या लेखातून
IPS कृष्ण प्रकाश.....
सध्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत सदा "प्रकाश" झोतात असलेले महाराष्ट्र पोलिस दलातील अत्यन्त खमके आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. सतत आपल्या मिशांना पीळ देत गुन्हेगारांच्या उरात धडकी भरविणाऱ्या प्रकाश यांचं शरीरही तेव्हढचं पिळदार, दणकट आहे ,एव्हढं दणकट की त्याकडे बघितल्यावर ते लोखंडाचं असावं असं वाटतं..
अर्थात याचं शरीरयष्टीच्या जोरावर प्रकाश यांनी "आयर्नमॅन" खिताबावर आपलं नाव कोरलं आणि आयर्नमॅन बनलेले ते देशातील पहिले पोलीस अधिकारीही ठरले. मात्र, त्यांच्या पोलीस अधिकारी ते आयर्नमॅन या प्रवासाची सुरवात झाली ते फक्त वीरप्पनमुळे.
कुज मुनिस्वामी वीरप्पन...
हस्तिदंताच्या तस्करीसाठी हत्तीच्या कपाळाच्या मधोमध गोळी मारून सुमारे २,००० हत्तींचा बळी घेणारा, जवळपास १० हजार टन चंदनाची तस्करी करणारा आणि क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडून वन अधिका-यांसह तब्बल १८४ माणसांना जीवे मारणारा वीरप्पन...२० वर्ष तीन राज्यातील पोलिसांना गुंगारा देत राहिला, मात्र STF (स्पेशल टास्क फोर्स) नेमून '"ऑपरेशन कुकुन" राबवलं गेलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडताच केवळ २० मिनिटात त्याचा खेळ खल्लास झाला.
आपल्या एका डोळ्याला होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी वीरप्पन जंगला बाहेर पडला होता, मात्र तो ज्या ऍम्ब्युलन्स मध्ये बसला त्याचे चालक आणि हेल्पर STF चे कर्मचारी होते हे त्याला माहित नव्हतं.
अर्थात २००४ च्या आधी वीरप्पन जे व्हिडिओ जारी केले होते. त्याचा अभ्यास करून त्याच्या एका डोळ्याचा त्रास वाढला आणि तो इलाज करण्यासाठी जंगला बाहेर पडणार हे STF चे प्रमुख के.विजय कुमार यांनी आधीच हेरलं होतं. मग त्यानुसार सापळा रचून बरेच महिने ते वीरप्पन राहत असलेल्या जंगलाच्या आजूबाजूला एम्ब्युलन्स फिरवत राहिले, मग त्याच ऍम्ब्युलन्स मध्ये वीरप्पन बसला आणि संपला..
ही कहाणी फार रोचक आहे आणि सगळीकडे उपलब्धही. मात्र, इथे मांडण्याचा मोह आवरला नाही म्हणून लिहलं
असो.
तर आता तुम्ही म्हणाल वीरप्पनचा आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आयर्न मॅन बनण्याचा काय संबध तर तसा तो अर्थाअर्थी नाहीचयं,
मात्र "काही महिन्यांपूर्वी जेव्हा कृष्ण प्रकाश यांचं नावाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली त्यावेळी त्यांचा एकूणच प्रवासा बद्दल जाणून घेतांना त्यांनी सहज वीरप्पनचा उल्लेख केला होता.
मात्र, त्यांनी सहज म्हणून केलेल्या उल्लेखा मागे आयर्न मॅन होण्याचं गुपित दडलं होतं जे मी नंतर ऑन कॅमेराही त्यांच्याकडून वदवून घेतलं..
वीरप्पनची एन्काऊंटर केस आजही पोलीस दलात अभ्यासली जाते. मात्र, वीरप्पनच्या मृत्यू नंतर २००४ मध्ये ती त्या काळातील IPS अधिकाऱ्यांनी अधिक सखोल अभ्यासली, त्या अधिकाऱ्यामध्ये आणि खासकरून के.विजय कुमार यांना आपले आयडॉल मानणारे कृष्ण प्रकाशही होते.
वीरप्पनच्या मृत्यू नंतर के.विजय यांनी त्यांचे अनुभव पुस्तकरूपात मांडले आणि ते पुस्तक प्रकाश यांनी वाचलं मात्र, त्या पुस्तकातील वीरप्पनच्या शविच्छेदनाबाबत के.विजय यांनी लिहिलेल्या ओळीवरून
कृष्ण प्रकाश यांची नजर हटत नव्हती. त्या ओळी पुढील प्रमाणे होत्या.
"वीरप्पनच्या डोळ्यातून एक गोळी आरपार गेली होती, तर दुसरी गोळीही वर्मावर बसल्याने तो शेवटच्या घटका मोजत होता, अशा वेळी मी त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवलं, मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला.
त्या नंतर त्याचं शवविच्छेदन केल्या गेलं आणि शवविच्छेदनचा अहवाल घेऊन आलेलं "डॉक्टर वल्लीनायगम" आवक होऊन मला सांगू लागले,
भारदार मिशा ठेवणा-या वीरप्पनचा छोट्या मिशातील निपचित पडलेला मृतदेह अगदीच सामान्य माणसा सारखा दिसत होता, मात्र "५२ वर्ष वय असलेल्या वीरप्पनच्या शरीरातील सगळे अवयव २५ वर्षाच्या युवकांप्रमाणे होते"
हे वाक्य बऱ्याच वेळा वाचून झाल्यावर कृष्ण प्रकाश उठले आणि त्यांनी स्वतःशीच संवाद साधत एक प्रश्न विचारला
वीरप्पन सारखा एक डाकू स्वतःला एव्हढं फिट ठेवतो,२० वर्ष जंगलात जगतो, तर आपण मग आपण तेव्हढे फिट का नाही? आणि तिथेच त्यांनी प्रण करत आयर्न मॅन बनण्याचा निश्चय केला. अर्थातच "आयर्न- मॅन" बनणं सोप्पी गोष्ट नव्हती. मात्र केवळ तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हा वाघ स्पर्धेसाठी तयार झाला आणि ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२.२ किलोमीटर धावण्याची स्पर्धा जिंकून कृष्ण प्रकाश आयर्न मॅन बनले...
सांगायचं एव्हढंच की...
शिकवणारा तर गुरू असतोच मात्र, अप्रत्यक्षरीत्या का असेना आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव करून देणारा देखील गुरुच असतो, त्यामुळे गुरू कुणाला करायचं किंवा मानायचं हा प्रश्नच गौण आहे....
वीरप्पन कधीच कोणत्या चांगल्या व्यक्तीचा गुरू होऊ शकला नसता. मात्र, त्याच्या मृत शरीराने दिलेल्या प्रेरणेतून एक आयर्न मॅन तर घडलाच ना पण म्हणून आपल्या पैकी कुणाला आयर्न मॅन बनावं वाटलं तर आता वीरप्पन किंवा त्याचं मृत शरीर शोधायची गरज मुळीच नाही हं ...
कारण एक जिवंत आणि सच्चे आयर्न मॅन /गुरू कृष्ण प्रकाश आपल्यात आहेत.
-गोविंद अ. वाकडे