एक चुकलेला टप्पा!
अलिकडे तरुण वर्गात महिलांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. अशा चर्चा सुरु असतात. मात्र, प्रत्यक्षात कृतीचं काय? महिला सन्मानाची वागणूक आपल्या घरापासून का होत नाही? वाचा प्रविण डोणगावे यांचा लेख
महिला दिन म्हटलं, की महिलांच्या अनेक अडचणींबद्दल मुली व महिला लिहितात, अनेक प्रश्न मांडतात. पुरुषप्रधान समाज, पितृसत्ताक मानसिकता याविषयी अनेक स्त्रियांकडून लिहिलं आणि बोललं जातं. परंतु, एरवी वैचारिक पुढारलेपणा मिरवणारे तरुण मुलं इथे मात्र, अशा स्त्रियांवर 'फेमिनिस्ट' असा कुत्सित शिक्का मारतात.
स्वतःला तथाकथित पुरोगामी विचारांचे समजणाऱ्या, 'आम्ही कुठल्याच विचारधारेचे नाही', असं म्हणणाऱ्या विचारधारेचे, स्वत:चा वैचारिक प्रवास सुरू झाला आहे, असं समजणाऱ्या, अनेक पुस्तकं वाचून त्यावर तासनतास चर्चा करणाऱ्या, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांची समज असणाऱ्या किंवा यावर काम करणाऱ्या अशा माझ्याच आजूबाजूला असलेल्या काही पुरुषांचा (मुलग्यांचा) आणि माझा प्रवास नेमका कुठे वळण घेतो, त्याबद्दल एक तरूण म्हणून बोलणं मला खूप महत्त्वाचं वाटतं.
या संदर्भातच मला काही निरीक्षणं नोंदवावी वाटतात – -"घरात काम करणाऱ्या मोलकरणीच (बायकाच) का असायला हव्यात, इथे जोपर्यंत समानता येत नाही आणि मी जितकं कमावतो तितके पैसे, मी माझ्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला देऊ शकत नाही, तोपर्यंत मी घरात मोलकरीण ठेवणार नाही, असा मी निर्णय घेतला आहे", पिढ्यानपिढ्या महिलांवर कसा अन्याय झाला, हे निशांत एका चर्चेत बोलत होता. त्यातून त्याचा अभ्यास, त्याच्या वाचनातली विविधता, तो इतरांपेक्षा किती वेगळा आणि सुधारणावादी आहे, हे कळत होतं. पण स्वतःच्या घरी गेल्यावर मात्र, याच निशांतला खायला ताट आणि प्यायला पाणी देखील बसल्याजागी आईकडूनच हवं असतं.
- ग्रुपमधल्या इतर मित्र-मैत्रिणींच्या घरी गेल्यावर स्वतःचं ताट स्वत: उचलणारा, ते धुवून ठेवणारा, वेळप्रसंगी स्वयंपाकात मदत करणारा तनुज, घरी आई-बहिण-बायको दिवसभर स्वयंपाकघरात राबत असतांना मात्र, रात्रंदिवस नेटफ्लिक्स आणि प्राईमवर वेगवेगळ्या स्त्रीवादी सिरीज पाहण्यात दंग असतो.
- दुर्गम भागात महिलांच्या प्रश्नांवर काम केलेला, पेशाने डॉक्टर असलेला, सामाजिक प्रश्नांवर तळमळीने बोलणारा सुनील आपल्या होणाऱ्या बायकोला मात्र "लग्नानंतर तुला नातेवाईकांसमोर, माझ्या आईबाबांसमोर सुरुवातीचे सहा-आठ महीने डोक्यावरून पदर घ्यावा लागेल" असं म्हणतो.
असे अनुभव व प्रसंग पाहून मला, सोईप्रमाणे आपली मूल्ये बदलणाऱ्या या माझ्याच मित्रांचा राग आणि त्यांच्या घरातील स्त्रियांची दया येण्याऐवजी आता मित्रांची दया आणि त्यांच्या घरातील स्त्रियांचाही कधीकधी राग यायला लागतो.
स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या आणि ठाम भूमिका असणाऱ्या मुली, मैत्रीण म्हणून असणं आम्हा तरुणांना खूप भारी वाटतं, पण जेव्हा याच मुलींचा एक जोडीदार म्हणून आम्ही विचार करतो, तेव्हा मात्र, आमच्या सोईप्रमाणे या मुलींनी त्यांची स्वत:ची मूल्ये, मते बदलणं आम्हाला अपेक्षित असतं.
विशेषत: लग्नानंतर सून म्हणून घरी आल्यावर मुलींनी सासू-सासऱ्यांच्या मनाप्रमाणे वागायला हवं अशी अपेक्षा ठेवणारी मुलं एरवी घरात काडीचीही जबाबदारी घेत नसले, तरी अचानक, 'स्वतःच्या आई बाबांना काय वाटेल, ते दुखवणार तर नाही' या चिंतेने ग्रस्त होऊन मुलींना त्यांच्या मूल्यांचा बळी द्यायला भाग पाडतात.
वर दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. तुम्ही किंवा मी देखील असेच असण्याची दाट शक्यता आहे. असे अनेक तरुण माझ्या आणि तुमच्याही आसपास असतील. आपल्या सर्वांच्याच वागण्याची उकल करण्याचा मी प्रयत्न करतोय. ज्यांना स्त्री-पुरुष समता, पितृसत्ता या विषयांची पोहोचच नाही, त्यांच्यासाठी आजच्या लिखाणाचा विषय नाहीच. पण, मी आज अशा मुलांबद्दल लिहिणार आहे, ज्यांना समता, बंधुता व स्वातंत्र्य या मुल्यांची ओळख आहे, त्यावर थोडाफार अभ्यास व वाचन असल्याचा त्यांचा दावा आहे.
असे तरुण सतत दोन आयुष्य जगत आहेत. एक घरातलं आणि दुसरं घराच्या चौकटीबाहेरचं आभासी पुरोगामी जग! असं करून आपण स्वत:चीच फसवणूक तर करत नाहीये ना, हे आपण खरंतर तपासून पाहायला हवं.
आपण बदलाचे काही टप्पे बघून समजून घेऊया की नक्की काय चुकत असावं.
टप्पा १
- वैचारिक अवकाश नसणारी मुले
टप्पा २
-वेगवेगळे प्रगतीशील विचार बाहेरून समजतात
टप्पा ३
-विचारप्रक्रिया सुरू होते आणि वैचारिक स्वीकृती येते
टप्पा ४
-आसपासच्या इतर लोकांबद्दलची, जे वेगळे विचार करतात. त्यांच्याबद्दलची स्वीकृती वाढते.
टप्पा ५
-वैयक्तिक आयुष्यात बदल करणे / त्या विचारानुसार कृती करणे आणि घरच्यांशी त्या विषयावर संवाद साधणे, मी असा का विचार करतो, मला काय वाटतं याबद्दल बोलणे.
टप्पा ६
-इतर लोकांपर्यंत तो विचार घेऊन जाणे / प्रबोधन करणे
हे टप्पे पाहून साधारण अंदाज आला असला, तरी आपण उदाहरण घेऊन पाहूया.
टप्पा १
-पाळीच्या दिवसात आई, बहिणीने किंवा बायकोने घरात वेगळे बसणे हे अनिलला चुकीचे वाटत नव्हते. हा घरातील बायकांचा प्रश्न आहे, असेच त्याचे मत होते.
टप्पा २
-त्याचे काही मैत्रिणी-मित्र पाळी या विषयाबद्दल खुलेपणाने बोलत असतात. त्याच्यासाठी ते नवीन असतं. पहिल्यांदा थोडा संकोचही होतो. पोरी भलत्याच धाडसी दिसतायत असंही वाटून जातं, पण जसं तो वाचायला लागतो, मित्र-मैत्रिणींकडून अधिक माहिती मिळावायला लागतो, तसं त्याची समजही वाढत जाते.
टप्पा ३
-यावर त्याची विचारप्रक्रिया सुरू होते, पाळी येणं हे नैसर्गिक असून त्यात काहीही अपवित्र वगैरे नाही आहे, हे त्याला पटतं आणि पाळीमध्ये वेगळं बसवणं त्याला चुकीचं वाटू लागतं.
टप्पा ४
-आता पाळीत वेगळं न बसणाऱ्या त्याच्या इतर मैत्रिणींबद्दल आणि या चार दिवसात आपल्या मैत्रिणींची, बायकोची, आईची किंवा आजूबाजूला असणाऱ्या महिलांची काळजी घेणाऱ्या मित्रांबद्दलची त्याची स्वीकृती वाढते.
टप्पा ५
-वैयक्तिक आयुष्यात अनिलला बदल करावासा वाटतो आणि घरच्यांशी या विषयावर तो संवाद साधतो. मी असा का विचार करतो, मला काय वाटतं? याबद्दल घरातील सगळ्यांना समजावून सांगतो. सगळे नाही पण एक-एक बदल आपण करूया अशी तो भूमिका मांडतो. पाळी या विषयावर एक चर्चासत्र आपल्या घरी आयोजित करतो, ज्यात त्याच्या एका डॉक्टर मैत्रिणीला तो बोलायला सांगतो.
टप्पा ६
-इतर लोकांपर्यंत हा विचार न्यावा, असे अनिलला वाटते आणि स्वत:च्या घरी आपण या विषयावर संवाद साधला असल्याने अधिक आत्मविश्वासाने तो पाळी या विषयावर काम करणाऱ्या एका संस्थेसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सत्र घ्यायला लागतो. आपल्या कामाच्या ठिकाणी इतर मित्रांना या विषयावर बोलतं करतो, ठाम भूमिका घेतो.
आता वैचारिक प्रवास करणाऱ्या, स्वतःला प्रगतीशील समजणाऱ्या मित्रांची गोची कुठे होते ते पाहूया. आम्ही तरुण पुरुष लोक वरील टप्प्यांपैकी पाचवा टप्पाच गाळून टाकतो व थेट सहाव्या टप्प्यावर प्रवेश करतो. बाहेर समाजात प्रबोधन करणारे हे 'अनिल' घरात स्टॅन्ड घेण्याचा टप्पा सोडून पुढे गेलेले असतात. म्हणजे यांच्या मैत्रिणी यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, ते स्वतः चर्चासत्रात बोलू शकतात, अनेक पुस्तकं वाचू शकतात. पण यांच्या घरी जेव्हा बोलायची, संवाद साधण्याची, भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा मात्र ते बिथरतात, 'आईवडिलांना दुखवायचं नाही' या नावाखाली पळपुटेपणा करतात.
माझ्या आसपास मला असे अनेक अनिल सापडतात ज्यांना स्वत:च्या घरात सोडून जगात बदल घडवायचा असतो, जे जोडीदाराला 'काही दिवस इतकं अॅडजस्ट करशील का?' असं विचारून त्यांच्या मूल्यांचा, भूमिकांचा बळी मागतात. माझ्या अनेक मैत्रिणी या 'अनिलला' हसत-हसत आपल्या मूल्यांचा आणि भूमिकांचा बळी देऊन आयुष्यभराची साथ देऊन टाकतात.
ज्या पद्धतीने आपली कुटूंब व्यवस्था चालत आलीये, ते पाहता घरात नवतरुणांचा फारसा संबंध येत नाही. आमचं कॉलेज, जॉब, मित्रमंडळी, मुलींवर गॉसिप करणे, इ.साठी आम्ही कायम बाहेरच वावरत असतो. त्यामुळे आम्ही अनेकदा दोन आयुष्य जगत असतो. म्हणजे घरातलं वेगळं आणि घराबाहेरचं वेगळं. घरच्यांना जसं हवंय तसं घरात, आणि बाहेर आपण भारी आहोत, हे दाखवण्यासाठी जसं वागावं लागतं, तसं बाहेर जगलं जातं आणि पुरुष म्हणून ते आम्हाला सहज शक्यही होतं. त्यामुळे आपण जे बाहेर वागतोय, तेच घरातही वागायला हवं, असा विचार आमच्या मनातही येत नाही.
आपण नक्की काय वागतोय, हे एकदा नीट बघूया!
आपलं बोलणं आणि कृती एक आहेत का?, याचं आत्मपरीक्षण करुया. नाहीतर, एवढी सगळी वैचारिक समज असताना, लिंगभाव संवेदनशीलता असताना आपल्या आयुष्यातील स्त्रियांच्या आयुष्यात आपलं योगदान काय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
एखादा पुरुष जेव्हा घरात भूमिका घेतो, तेव्हा त्याला पुरुष म्हणून मिळालेले विशेषाधिकार सोडावे लागतात आणि अनेक पुरुषांची त्या गोष्टीची तयारी नसते. नवीन बदलांमुळे नव्या जबाबदाऱ्या येतात. मग घरकाम करण्यापासून ते अगदी चारचौघात महिलांवर विनोद न करण्यापर्यंतच्या नैतिक आणि व्यावहारिक जबाबदाऱ्या पुरुषांना घ्याव्या लागतात. हेच करायची अनेक जणांची तयारी नसते. म्हणून मग बाहेरचं प्रबोधन घरी वागण्यात नको वाटतं.
प्रत्येक मुलीला, स्त्रीला तिची लढाई स्वतःच आणि अनेक पातळ्यांवर लढावी लागते. आधी स्वतःच्या घरात लढा, मग हव्या त्या जोडीदारासाठी घरी लढा, मग आपल्या तत्त्वांसाठी त्याच्या (जोडीदाराच्या) घरात पुन्हा लढा! आणि कामाच्या ठिकाणी लढाव्या लागणाऱ्या लढाया वेगळ्याच. यात तिचा भाऊ, नवरा, मित्र या नात्याने आपल्या स्वतःच्या वागण्यात बदल घडवणं हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे.
मैत्रीण म्हणून सगळं चालेल, अभिमानच आहे; पण, बायको म्हणून नको. स्वतंत्र विचारांची मैत्रीण चालेल पण बायको नको. मी जिच्यापुढे कमी दिसेन, अगदी उंचीनेसुद्धा.. अशी जोडीदार नको. असा दुतोंडीपणा व्हायला नको. निदान आपण स्वतःला विचार करणारे, पुढारलेले म्हणवतो, म्हणून तरी जबाबदारीने वागायला हवं.
जर एखाद्या तरुणाला या सगळ्या विचारांबद्दल काही कल्पनाच नाहीये, तर त्याच्या वागण्यात तसं काही येणार नाहीये, हे गृहीत आहेच. त्याचं प्रबोधन वेगळ्या पद्धतीने होईल. पण जेव्हा सगळं, कळून सवरून, तरुण पुरुष असं वागतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं?
वेगवेगळ्या परिस्थितीशी माणूस जुळवून घेतो, हे मान्य आहेच. पण स्वतःच्या सोयीनुसार हवं तसं, हवं त्या ठिकाणी, हवं त्या वेळी मूल्यं जुळवून घेणारी लोकं, ही एक नवी प्रजाती यानिमित्ताने समोर येत आहे.
बऱ्याचदा एखाद्या गटात स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी, आदर मिळवण्यासाठी, कूल दिसण्यासाठी, प्रतिष्ठेचं प्रतिक म्हणून मिरवण्यासाठी, महिलांसोबतच्या संवेदनशीलतेचा दिखावा केला जातो. हे असंच सुरू राहिलं, तर बाहेर पुरुषसत्ताक संस्कृती दिसणारही नाही, बोलण्यातही येणार नाही. पण प्रत्येकाच्या घरात मात्र ती वेगवेगळ्या प्रकारे चालू असणार.
अर्थात या सगळ्याला अपवादही आहेत. अनेक पुरुष/ मुलगे स्वतःमध्ये अनेक स्तरांवर बदल करत आहेत. त्यामुळेच महिलांची अजूनही पुरुषांबाबतची सकारात्मकता टिकून आहे. आतून बाहेरून सारखं वागणारा एखादा मित्र, भाऊ मुलींना मिळून जातो. पण, अजूनही ती संख्या पुरेशी नाही. बहुतांश तरुणींच्या आयुष्यात असे पुरुष नाही आहेत.
आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने आपण स्वतःला प्रामाणिकपणे एवढंच विचारूया की 'मी नक्की कोणत्या टप्प्यावर आहे?' 'मी मुद्दाम किंवा माझ्याही नकळत एखादा टप्पा गाळत तर नाहीये ना?' आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवून आपल्या आयुष्यातील महिलांचं जगणं अधिक सुकर व सुंदर करण्याचा प्रयत्न करूया. फक्त समाजात नाही, तर वैयक्तिक आयुष्यात भूमिका घेऊया. मी स्वतःलाही हे प्रश्न विचारतोय, स्वतःवर काम करतोय. तुम्हीही वाचा, विचार करा... मुख्य म्हणजे विचार अमलात आणा.
मग, या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही कुठल्या बाबींवर आपल्या घरी भूमिका घेणार आहात?
- प्रवीण डोणगावे
(शिक्षणक्षेत्रात काम करत आहे.)