महिलांनो पाण्याचा सत्याग्रह कराच
वृत्तपत्रातील पाणी टंचाईच्या हेडलाईनमधील फोटो नेहमी महिलांचा का असतो? राज्याच्या विधीमंडळात असो अथवा केंद्रातील संसदभवनात पुरुषांची संख्या अधिक आहे. त्यामुळं पुरुषी मानसिकतेने भरलेल्या सभागृहांमधील सदस्यांना 75 वर्षात महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवता आला नाही का? आज चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवशी समाजाच्या 50 टक्के महिलांनो पुरुषांच्या डोक्यावर हंडा देऊन एक सत्याग्रह कराच…;
राज्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये राज्यातील पाणीटंचाईच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. या हेडलाईन खाली महिलेच्या डोक्यावर हंडा असलेला फोटो आपलं लक्ष वेधून घेतो. पाण्याची भीषण टंचाईची जाणीव या फोटोमधून आपल्याला होते. मात्र, वर्तमानपत्रातील पाणी टंचाईच्या हेडलाईनमधील फोटो नेहमी महिलांचा का असतो? पुरुषांचा का नाही? पुरूषांना पाणी लागत नाही का? खरं तर या पाणी टंचाईच्या समस्येचं मूळच इथं आहे. कारण कायदेमंडळात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी बसलेल्या सदस्यांमध्ये किती महिला आहेत?
राज्याचं विधीमंडळ असो अथवा केंद्रातील संसद असो या दोनही सभागृहात पुरुषांची मक्तेदारी असल्याचं पाहायला मिळतं. हे सर्व सभागृह फक्त पुरुषांनी नाही तर पुरुषी मानसिकतेने देखील भरलेली आहेत. अन्यथा गेल्या ७५ वर्षात महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं धाडसी कृत्य या सभागृहांनी केलं असतं. मात्र, समाजाचा ५० टक्के भाग असलेल्या महिलांच्या समस्या या सभागृहातील सदस्यांना आत्तापर्यंत आपल्या वाटल्या नाहीत की, त्या त्यांना समजून घ्यायच्या नव्हत्या. त्यामुळे आज महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ९४ वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने घरातील महिलांनी आपल्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा पुरुषांच्या डोक्यावर द्यावा. पुरुषांच्या डोक्यावरील हंडाचे फोटो वर्तमानपत्राच्या हेडलाईनवर झळकावे. त्यानंतरचं पुरुषी मानसिकतेतील समाज शहाणा होईल.
२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून दिला. अडीच हजार अनुयायांसोबत मिरवणूक काढत डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी पिऊन सत्याग्रह केला. खरतरं हा संघर्ष पाण्यासाठीचा त्याचबरोबर समतेसाठीचा... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह करत सामाजिक क्रांती घडवून आणली. मात्र, कोणतीही क्रांती महिलांच्या सहभागाशिवाय पूर्ण होत नाही. चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. कारण याच महिलांना पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यांनाच पाण्यासाठी गावाबाहेरील पाणवठ्यावरून पाणी भरावं लागत होतं. बाबासाहेबांनी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. हे एक क्रांतीकारक पाऊल होतं. मात्र, त्यानंतर बाबासाहेबांच्या विचाराने कोणीही पुढं जाताना दिसलं नाही. तसं जर असतं तर पाण्यासाठीची महिलांची भटकती थांबली नसती का? आजही ग्रामीण भागातील दृश्य आपण पाहिलं तर दुष्काळग्रस्त परिसरात महिलांची परिस्थिती जैसे थे आहे.
त्यामुळं महिलांनी ज्याप्रमाणे चवदार तळ्यावर दलितांच्या हक्कांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला त्याचपद्धतीने महिलांनी एक सत्याग्रह करण्याची वेळ आली आहे. महिलाच्या डोक्यावरचा हंडा जेव्हा पुरुषाच्या डोक्यावर येईल तेव्हा पुरुष प्रधान राज्यकर्ते यावर तात्काळ निर्णय घेतील. इथल्या पुरुष आमदार खासदारांच्या डोक्यावर पाण्यासाठी भटकंती चे फोटो जेव्हा वृत्तपत्राच्या हेडलाईनवर झळकतील तेव्हाच महिलांच्या समस्यावर संसदेत विधीमंडळात आवाज उठवला जाईल. त्यामुळं महिलांनी त्यांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा पुरुषांच्या डोक्यावर द्यायलाच हवा. महिलांच्या समस्या संदर्भात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांनी पुरुषी समस्या संपवण्यावरच भर दिला का? या संदर्भात पाणी प्रश्नांवर काम करणारे संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे यांच्याशी बातचीत केली
घोळवे सांगतात की… ग्रामीण भागातील महिलांनीच पाणी का भरायचे ? हा प्रश्न महिलांना पडायला हवा ? त्यातून त्यांच्या सुटका व्हायला हवी. दुष्काळी, पाणी टंचाईग्रस्त भागात महिला या अगदी फेब्रुवारी महिन्यापासून घरातील पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी डोक्यावर हंडा घेवून वणवण पाण्याच्या शोधात असतात. किंवा जेथे कोठे पाणी असेल येथे जाऊन डोक्यावर, सायकलवर पाणी वाहताना आपण पाहतो. ही परंपरागत व्यवस्था झालेली आहे. तेव्हा महिलांच्या डोक्यावरून हंडा उतरायला हवा. पण कसा उतरेल हा प्रश्न आहे.
खरं तर महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील ( कुटुंबासाठी लागणारे पाणी) भरण्यास नकार द्यायला हवा. पाणी भरण्याससाठी अगदी घरामध्ये (कुटुंबाममध्ये) महिलांनी बंडखोर होऊन पुरुष प्रधान संस्कृतीने लादलेल्या कामांना (पाणी भरणे, स्वयंपाक करणे,झाडलोट करणे व इतर) विरोध करायला हवा. पण ग्रामीण भागातील महिलांचा घरातील कामे करणे हा त्यांच्या कामांचा भाग आहे. असे समजून घेतले आहे. घरातील कामाविषयी महिलांचा मृदू दृष्टिकोन असतो. घरातील पाणी भरण्याचे काम त्यांचेच (महिलांचे) काम आहे. असे त्यांना वाटते. एक प्रकारे पुरुष प्रधान संस्कृतीने कामाची ( श्रमाचे विभाजन ) विभागणी केलेली आहे. त्यानुसार घरातील सर्व कामांना कमी दर्जाचे ठरवून महिलांच्या वाट्याला देऊन टाकले.
पुरुषांच्या नजरेतून हलक्या दर्जाची कामे, शारीरिक श्रम जास्त लागणार नाही. असे कामे ही महिलांनी करावयाची असतात असे बिंबवले आहे. ते बिंबवणे महिलांनी स्वीकारले. त्यामध्ये पाणी भरणे. हे काम कमी दर्जाचे ठरवून महिलांकडे देऊन टाकले. अर्थात पाणी भरणे ही जबाबदारी कमी दर्जाची ठरवून महिलांकडे टाकण्यात पुरुषांनी केलेली चालाखी आहे. आता महिलांनी या जबाबदारीकडे विवेकवादी भूमिकेतून पाहायला हवे, पाणी भरणे हे कमी प्रतीचे नसून घरातील कामाचा भाग आहे, उपजीविकेसाठी लागणाऱ्या घटकांपैकी एक आहे. असे पकडून त्याकडे पाहायला हवे. घरातील कामासंदर्भात पुरुषांनी मनामध्ये जी मानसिकता, दर्जा आणि विभागणी केली आहे, ती बदलायला हवी. त्यासाठी महिलांनी पाणी भरणे हे समानतेचे काम आहे. हे पुरुषांच्या मनामध्ये बिंबवणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्याग्रह करायला हवा. पण या सत्याग्रहाची सुरुवात ही घरातून ( कुटुंबातून) करणे आवश्यक आहे. जर हा सत्याग्रह महिलांनी कुटुंबापासून केला तरच पाणी भरण्यासाठी महिलांच्या डोक्यावर आलेला हंडा खाली उतरेल.... असं डॉ. सोमनाथ घोळवे यानी म्हटलं आहे.
या प्रश्नावर महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या रेणुका कड यांच्याशी बातचीत केली ते सांगतात… पाणी आणि महिला, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महिलांचा सहभाग काल, आज आणि उद्यासाठी म्हणून पाहत असतांना महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी, पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी पाण्याचे नियोजन, जल साठ्यांची देखभाल, पाणी धोरण आखताना महिलांचा सहभाग सर्वस्तरावर करणे गरजेचं आहे. पाणी महिलांनी किंवा मुलींनीच का भरायचे? यासाठी लिंग समभाव रुजवण्याची आवश्यकता आहे. असं मत रेणूका कड यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते जयवंत हिरे यावर असं म्हणतात की, "माणसा माणसात भेदाभेद करणाऱ्या व्यवस्थेने माणसांना जनावरापेक्षाही हीन लेखले होते. अस्पृश्यांना नाकारलेल्या पाण्याची तल्खली-तडफडाट स्त्रियांचाच जास्त छळ करीत होती. त्यामुळे तर चवदार तळ्याच्या सत्याग्रहात अस्पृश्य स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरल्या होत्या. साहजीकच चवदार तळ्याचा लढा माणसामाणसात सवर्ण आणि अस्पृश्य हा भेद नाकारणारा होता. तेव्हढाच स्त्री-पुरुष असमानतेलाही आव्हान देणाराही होता. पण, चवदार तळे सत्याग्रहाला ९४वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटली असतांना चवदार तळे सत्याग्रहात उतरलेल्या स्त्रीची घोटभर पाण्यासाठीची वणवण संपलीय काय? खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांपर्यंत, आदिवास्यांच्या झोपडीपर्यंत पाणी पोहचलेय काय? त्यांचा चवदार तळे सत्याग्रह थांबलाय काय? नाही ना? मग चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी जागवतांना चवदार तळे सत्याग्रहात उतरलेल्या मायमाऊलीच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी काय करता येईल बरं?" असा प्रश्न हिरे यांनी समाजाला विचारला आहे.
ग्रामीण भागात काम करणारे द्रारिद्र्याची शोधयात्रा या पुस्तकाचे लेखक प्रा. हेरंब कुलकर्णी सांगतात की,यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात गेलो तर विहिरीवर पाणी भरायला प्रचंड गर्दी, २ महिला आतापर्यंत विहिरीत पडून मृत्युमुखी.. दिवसभर महिला फक्त पाणी वाहताना दिसतात. ऊसतोड महिला ऊस तोडून आल्यावर रात्री जिथे पाणी आहे. तिथे जाऊन धुणी भांडी करते. खरे तर यातील कष्ट बघता. हे पुरुषांनी करायचे काम आहे. अनेक गावांत नळ योजना बंद आहेत व असल्या तरी कधी लाईट नसते तर कधी नादुरुस्ती... असं विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. असं हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलं.
शेतमजूर महिला तर दिवसभर काम करून मग पाणी भरत राहतात. हे अत्यंत वेदनादायक चित्र आहे. एकंदरित सामाजिक क्षेत्रात काम करणारे अभ्यासकांची मत जाणून घेतल्यानंतर महिलांच्या समस्या त्यांच्या प्रश्नांची मांडणी प्रसार माध्यमं नेमके कसे करतात? उन्हाळा लागला की पत्रकार महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरवणार? अशा बातम्यांना हेडलाईन देतो. तो हंडा पुरुषाच्या डोक्यावर नसतो? वृत्तपत्राच्या हेडलाईन मध्ये पुरुषांच्या डोक्यावर हंडा असलेल्या फोटो कधी पाहायला मिळतो का? यासंदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे पालघर येथील प्रतिनिधी रवींद्र साळवे यांच्याशी बातचीत केली. रवींद्र साळवे हे ग्राऊंड झिरोवरून शोषित, वंचिताचे प्रश्न, मूलभूत सोईसुविधा गावपातळीवर पोहोचतायेत का? तसेच पाणी समस्या, महिलांचे प्रश्न अशा स्टोरीचे कव्हरेज करतात. या बातम्या करताना त्यांना काय जाणवलं याबाबत त्यांच्याशी बातचीत केली ते सांगतात,
पालघर-डहाणू सारख्या दुर्बल परिसरात अत्यंत वाईट परिस्थिती वंचित, शोषितांची पाहायला मिळतेय. पाण्यासाठी तर महिला पायपीट करताना पाहायला मिळतात. सोईसुविधापासून नेहमीच वंचित राहिलेल्या भागात पत्रकारिता करताना रोज वेगवेगळ अनुभव येतात. यांना आपल्या बातमीतून न्याय कसा देता येईल असा प्रयास माझा सातत्याने सुरुच असतो. मात्र, जो पर्यंत व्यवस्था या बाबत स्वत: विचार करत नाही तोपर्यंत काही होत नाही. पत्रकारांनी या समस्येकडे महिलांच्या समस्या म्हणून पाहायला हवं.त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो. याचा विचार करायला हवा. दुर्दैवाने माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव दिसून येत नाही. अशी खंत रवींद्र साळवे यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरित तज्ज्ञांची मत जाणून घेतल्यानंतर एक बाब प्रकर्षाने समोर आली. ती म्हणजे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी, सरकारने या समस्येकडे पुरुषी मानसिकतेचा चष्मा बाजूला ठेवून पाहायला हवे.तरच महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार नाही. अन्थथा महिलांना त्यांच्या डोक्यावरचा हंडा पुरुषाच्या डोक्यावर देण्याशिवाय पर्याय नाही.