ब्राह्मणी साहित्यात बुद्धाच्या कार्याचे विकृत आणि विपर्यस्त स्वरूप:डॉ. सुरज एंगडे

ब्राह्मणी साहित्यात आज आपल्याला बुद्धाच्या कार्याचे केवळ विकृत आणि विपर्यस्त स्वरूपच दिसते. बौद्धकाळाचा शोध घेण्यासाठी आपल्याला हिंदू (अर्थात ब्राह्मणी ) आणि इस्लामी इतिहासाला बाजूला सारावे लागते कारण समृद्ध बौद्ध विचाराची नामोनिशाणी या भूमीत राहू नये असाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे, सांगताहेत डॉ. सुरज एंगडे

Update: 2021-07-21 14:30 GMT

डॉ. सुरज एंगडे

ब्राह्मणी सत्ताधाऱ्यांनी भारताच्या इस्लामपूर्व इतिहासाची अशीच दुर्गती केली. बौद्ध साम्राज्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या स्मृती नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या योजल्या.

बिहारमध्ये नुकत्याच केल्या गेलेल्या उत्खननात क्रिमिला नावाच्या एका धार्मिक आणि प्रशासनिक केंद्राचा शोध लागला. या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या विस्तृत वार्तापत्रात या प्रदेशाची आणि त्यांच्या जगभर पडलेल्या प्रभावाची माहिती बौद्धकालीन नोंदींच्या आधारे दिली आहे.

2020 साली आलेल्या अयोध्या खटल्याच्या निकालपत्रावर टोकाच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. हिंदू आणि मुस्लिम अशा दोहोंच्या कथनात इतिहासाच्या दुसऱ्या एका महत्वाच्या पैलूकडे - सहिष्णू बौद्ध भूतकाळाकडे सरळसरळ दुर्लक्ष केले गेले आहे. या बौद्धकाळाचा शोध घेण्यासाठी आपल्याला हिंदू अर्थात ब्राह्मणी आणि इस्लामी इतिहासाला बाजूला सारावे लागते कारण समृद्ध बौद्ध विचाराची नावनिशाणी या भूमीत राहू नये असाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे.

बुद्धाचा दूत बनलेल्या अशोकाने आपल्या धम्मासाठी अतिशय मोलाचे कार्य केले होते. मूर्तिपूजकतेचा नायनाट करण्यासाठी आक्रमकांनी बहुमोल बौद्धिक स्थानें उद्ध्वस्त केली. याउलट या उपखंडात तऱ्हेतऱ्हेच्या श्रद्धांना आदराचे स्थान देणारा बौद्ध हा बहुदा एकमेव धर्म होता. आक्रमकांनी मात्र ब्राह्मणी आणि बौद्ध धर्मस्थानांत डावेउजवे केले नाही. एकेश्वरवाद हाच त्यांच्या दृष्टीने एकमेव मुद्दा होता.

परिणामतः कुतुबुद्दीन ऐबकच्या पदरी असलेल्या बख्तियार खिलजी या तुर्की सेनापतीने इतर अनेक ठिकाणांबरोबर नालंदा विद्यापीठाचाही पुरता विद्ध्वंस केला. या कुतुबुद्दीन ऐबकला जहाँ-सोज म्हणत असत. जहाँ-सोज म्हणजे विश्व जाळणारा! सुलतानाने बौद्ध विश्वउत्पत्तिशास्त्राचा विशाल पट पूर्णपणे नष्ट केला. असे म्हणतात की बख्तियारने आपल्या सैनिकांना नालंदामध्ये कुठे पवित्र कुराणाची प्रत आहे का याची चौकशी करायला सांगितले. अशी प्रत विद्यापीठात कुठेही नाही असे लक्षात येताच त्याने या महान भिक्षुविहाराचा नायनाट करण्याची आज्ञा दिली.

1193 ते 1234 या कालावधीत उच्च विद्या आणि वैज्ञानिक पांडित्याचे केंद्र असलेले हे विद्यापीठ आणि त्याचा परिसर अशा रीतीने बेचिराख करण्यात आला. विद्यापीठाची तीन मजली इमारत आणि त्याभोवतालचा परिसर अनेक महिने धूर ओकत जळतच होता अशी नोंद आहे. याच बख्तियारने सोमपूर, जगद्दल, विक्रमशीला आणि उदंतपुरी येथील बुद्धविहारही आगीच्या भक्ष्यस्थानी पाडले.

पुढे 14व्या शतकात फिरोझशाहने हिंदू स्तंभ मात्र त्यांच्या भव्यतेची व सौंदर्याची मोहिनी पडल्यामुळे सुरक्षित राखले. लथ म्हणून ओळखले जाणारे हे स्तंभ वस्तुतः अशोकाने उभारले होते आणि हिंदू लोक त्याला पूजत होते इतकेच!

भारताच्या इस्लामपूर्व इतिहासाची ब्राह्मणी राज्यकर्त्यांनीही अशीच वाट लावलेली आहे. बौद्ध सत्तेकडे दुर्लक्ष करत अखेरीस तिची स्मृतीही उरू द्यायची नाही अशीच नीती त्यांनी आखली होती. म्हणून सम्राट अशोकाचा वारसाही आज आपल्याला पूर्णपणे ज्ञात नाही हा काही योगायोगाचा भाग नाही. प्रत्यक्षात, सारा भारत एक करणारा अशोक हा पहिला महान सम्राट होता. तब्बल 40 वर्षे त्याने राज्य केले. त्याने प्रसृत केलेल्या संदेशांमुळे बुद्धाचा धम्म सर्वत्र पसरला. या संदेशांमध्ये संसाधनांचे संरक्षण आणि वितरण यासाठीचे कायदेकानून आणि नियमावल्या होत्या. आज ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो तशी शासनव्यवस्था निर्माण करणारे हे नियम होते.

"सर्वांचे कल्याण" ही कल्पना ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र याने छुपेपणाने उधळून लावली. आपल्या बौद्धविरोधी वृत्तीने राजवध करून त्याने शुंग राजवंशाची स्थापना केली. त्यातून बौद्ध तीर्थस्थळे, बुद्धविहार, बुद्धधर्मीय प्रतिमा आणि बौद्धांचा इतिहास यांच्या नाशाचा पाया रचला गेला.

नवव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी बौद्ध धर्माचे हे ब्राह्मणी वासाहतीकरण पुढे नेले. त्यांनी हिंदू धर्म हा दीक्षा घेतलेल्या आणि असामान्य जीवन आचरणाऱ्या लोकांपुरताच मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुला केला. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा विरक्तताकेंद्रित बुद्ध धर्माच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेतच. अशी विरक्तताकेंद्रितता ही व्यक्तिगत आचरणाच्या पलिकडे जाऊन अखिल समाजाची सेवा करण्याच्या बुद्धाच्या शिकवणुकीच्या विरोधी आहे. इतिहास कसा विकृत केला जातो आणि सामर्थ्यशाली सवर्ण जातींच्या हितासाठी त्याचे कसे पुनर्गठन केले जाते हे पाहण्याचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे पवित्र तीर्थस्थळांमधील वास्तुरचनांची त्यांच्या पायापासून नीट तपासणी करणे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांतील सर्वाधिक प्रसिद्ध मंदिरे मुळात बौद्ध पूजास्थाने किंवा विद्यालयेच होती.

मंदिरातील गर्भगृहात कोणालाही प्रवेश नसतो या नियमातून बुद्धाच्या वारशाचे वासाहतीकरण झाल्याचा पुरावा आपल्याला मिळतो. डॉ. के जमनादास यांनी तिरुमला बालाजी मंदिर हे मूळ बौद्ध असल्याबाबत अत्यंत उत्कट आणि प्रभावी युक्तिवाद केला आहे. भाराभर सुवर्ण आणि अन्य अलंकारांनी बालाजीचा चेहरा आणि अंग पूर्णतः झाकलेले आहे. एखाद्या देवाच्या दगडी मूर्तीला इतक्या सजावटीची काय आवश्यकता आहे? मूर्तींना तर बुद्धमूर्तीप्रमाणेच बहुधा कपडे घातलेले असतात.

आक्रमकांनी मंदिरांवर हल्ला केला त्याचे एक कारण ही संपत्ती आणि भांडवल हेच होय. यातील विरोधाभास स्पष्ट करताना ज्योतिबा फुले शेतकऱ्याचा आसूड या आपल्या पुस्तकात एखाद्या अज्ञानी शेतकऱ्याची लूट करताना ब्राह्मण कसा आनंदलेला असतो याचा दाखला देतात.

ब्राह्मणी साहित्यात आज आपल्याला बुद्धाच्या कार्याचे केवळ विकृत आणि विपर्यस्त स्वरूपच दिसते. अगदी बुद्ध गया या पवित्र स्थळाचे नावसुद्धा असेच बदलले गेलेले आहे. वस्तुतः अशोकाने या स्थळाची नोंद 'संबोधी' अशी केलेली दिसते.

बुद्धकालीन इतिहासाचे तार्किक दृष्ट्या पुनर्विलोकन करणे हीच धम्म मनापासून आणि पूर्णतः आचरणात आणणाऱ्या आपल्या पूर्वजांना खरी आदरांजली होय.

(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, 'कास्ट मॅटर्स' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. व्याख्याने, सेमिनारच्या निमित्ताने जग अनुभवतात. 'जी क्यु' या मॅगझीनने भारताच्या २५ प्रभावशाली तरुणामध्ये त्यांची निवड केली आहे. लेखकाच्या सहमतीने हे लेख मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहेत)

लेखक : सूरज येंगडे : suraj.yengde@gmail.com

भाषांतर : अनंत घोटगाळकर

मूळ प्रकाशन: इंडियन एक्सप्रेस 7/2/2021

Tags:    

Similar News