काळ्या टोपीखालचे काळे विचार !- डॉ. विनय काटे
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात देशाचा तिरंगा फडकला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा ध्वजारोहण केले. पण या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला डॉ. विनय काटे यांनी काही परखड सवाल विचारले आहेत.;
घरघर तिरंगा या नावाने देशभक्तीचे प्रचंड वादळ भारतात उठले आहे. तिरंगा फडकवणे म्हणजेच देशभक्ती जर म्हणायचं असेल तर मग हे म्हणण्याचा अधिकार कोणाला हा प्रश्न भारतीय जनता पार्टी व त्यांची मातृ संघटना RSS ला विचारावा लागेल. 1925 साली हेगडेवार यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला आणि खूप मोठी कामगिरी केली असे त्यांचे नेते, प्रवक्ते बोलू लागले आहेत. इतिहासामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या असतात आणि त्या पुराव्यासह असतात. हेडगेवार, गोळवलकर यांच्या पत्रव्यवहारातून हे सिद्ध होते, कि 1942 च्या आंदोलनाला RSS ने विरोध केला, एवढचं नव्हे तर किंबहुना ब्रिटीश ह्या देशात रहावेत अशी मानसिकता त्यांनी त्यांच्या समर्थकांमध्ये तयार केली होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी भारतीय तिरंग्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेली मतं आजही "Organizer" ह्या त्यांच्या मुखपत्रात दिसतात. तिरंगा अशुभ आहे. तीन रंगाचा आहे. त्यामुळे ह्या देशाला तो कधीच पवित्र ठरणार नाही. अशा प्रकारची भविष्यवाणी अनेकवेळा RSS च्या वतीने करण्यात आली. किंबहुना RSS चे विचारवंत गोळवलकर यांनी आपल्या 'विचारधन' या पुस्तकात नमूद करुन ठेवलं आहे. कि हा तिरंगा कधीच भारताचे भविष्य उज्वल करणारा ठरणार नाही. स्वातंत्र्यानंतर जवळ-जवळ गेली 45 वर्षे RSS च्या रेशीम बागेत असलेल्या मुख्य कार्यालयावरती कधीही तिरंगा फडकवला गेला नाही. तिथे पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी RSS चा निषेध करत. त्या कार्यकर्त्यांवर आजही ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल आहे.
ज्यांनी आपल्या आयुष्यात तिरंग्याला किंमतच दिली नाही, तिरंगा हा अशुभ मानला, आम्ही हा तिरंगा स्विकारत नाही अशी जाहीर भूमिका घेतली. ते आज अशी छाती करुन पुढे येत आहेत, कि जणूकाही तिरंग्याची निर्मितीच त्यांनी केली. हा तिरंगा नुसता तिरंगा नाही. तर हा तिरंगा हातात घेऊन अनेक जणांनी बलिदान दिले आहे. अनेक जणांनी ब्रिटीशांची काळ कोठडी सहन केली आहे. आणि हा तिरंगा ह्रदयाशी घट्ट धरुन अनेक लढाया लढल्या आहेत. त्या तिरंग्याला अशुभ मानणारे आज घर घर तिरंगा ह्या घोषणा देत नवीन पिढीला जणूकाही इतिहास माहितीच नसेल अशा अविर्भावात वावरत आहेत.
हेगडेवार आणि गोळवलकरांच्या पुस्तकातून एक झेंडा, एक राष्ट्र, एक विचार, एक नेता ही विचारसरणी पुढे आलेली आहे. ही विचारसरणी हिटलर आणि मुसलोनीची होती. किंबहुना अगदीच सूक्ष्मपणाने म्हणायचे झाले तर भोंसला मिलीटरी स्कूलचे निर्माते डॉ. बी. एस. मुंजे हे मुसलोनींना जाऊन भेटले आणि त्यांचाच पोशाख खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि काळी टोपी हा मुसलोनीच्या इटली कडूनच भारतात आला. त्यामुळे त्यांचे विचार हे हिटलर, मुसलोनीच्या विचारांपेक्षा वेगळे कसे असतील ?
आजच्या काही वर्तमान पत्रामध्ये केंद्रातील भाजपा सरकार तसेच राज्य सरकारच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त देण्यात आलेल्या जाहीराती पाहिल्या तर काही ठिकाणांहून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे फोटो गायब झालेले दिसतात. महात्मा गांधी, नेहरु यांना बाजूला ठेवून देशाला स्वातंत्र्याचा इतिहासच लिहीता येणार नाही. फोटोतून बाजूला काढून त्यांचे स्वातंत्र्याचे योगदान भाजपाला पुसता येईल हे अशक्य आहे. हे केविलवाणे प्रयत्न इतिहास पुसू शकतील असे जर त्यांना वाटत असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात आहेत.
मी एका ठिकाणी वाचले होते की विस्मृती ही देवाने मनुष्य जातीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं म्हणतात. पण, माझ्या मते देशाच्या दृष्टीने विस्मृती हा आता शाप आहे. RSS ची काळी टोपी आणि त्या खाली त्यांचा असलेला काळा इतिहास हा विस्मरणात जाऊन जणूकाही स्वातंत्र्य यांनीच मिळवून दिले अशा आवेशाने देशामध्ये घडामोडी घडत आहेत.
हा तिरंगा झेंडा फक्त झेंडा नाही तर देशाचा गौरवशाली इतिहास आहे ज्याच्यासोबत आज सर्वार्थाने छेडछाड सुरू आहे!
कालाय तस्मै नम:
- डॉ. विनय काटे