सर्व काही शास्त्रीय संगीतासाठी…
एखादी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादा कलाकार कशी धडपड करतो. आणि त्याला ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय अडचणी येतात? शास्रीय संगीताची आवड असलेल्या प्रत्येकाने वाचावा असा प्रसाद पाठक यांचा लेख;
त्याची धडपड मला नेहमीच खुणावते. एकटाच धडपडत असतो... आणि धडपड तरी कशाची...? अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवण्याची !
वय २२ वर्षे. अजून शिक्षण पूर्ण करायचे बाकी आहे, पण शिक्षणासोबतच शास्त्रीय संगीत डोक्यामध्ये एव्हढे गुंजन करत असते की 'आधी लगीन कोंढाण्याचे... ' या ध्यासानुसार शास्त्रीय संगीत कार्यक्रम करायचेच या ध्येयाने त्याने एक संस्थाही स्थापन केली. जोखीम मोठीच पण एकदा ठरवले आहे ना मग 'हाचि नेम आता, न फिरे माघारी'.
सुरवातीची जुळवाजुळव पैशाची असो वा कलावंताची, उत्साहाने पार पडली. पण तेवढ्यात कोरोना संकटाने लॉकडाऊन लागले. जाहीर कार्यक्रमांवर बंदी लागली. पण 'घेतला वसा टाकू नये' या प्रमाणे एक नाही तर दोन कार्यक्रम घरगूती बैठकीच्या माध्यमातून मर्यादित रसिक श्रोत्यांसमोर सादर केले.
कलाकारही नावाजलेले. सुमेध बागाईतकर ( इलेक्ट्रिक पियानो ) रोहित देव (तबला) चिंतामणी वारानकर (तबला - सोलो) मंदार वारानकर ( संवादिनी) मेहताब अली (सितार ) ईशान घोष (तबला ). लोकांनीही कौतुक केले. त्यामुळे पुन्हा काही नवे करण्याची उमेद कायम राहीली.
लॉकडाऊन संपला आणि बंधने उठली तसे प्रत्यक्ष जाहीर कार्यक्रम करण्याचे ठरवले. ते ही ठाण्यातील मोठ्या सभागृहातील रंगमंचावर . धडपड चालूच. याला भेट, त्याला भेट. सुदैवाने प्रायोजक मिळाले. एकाच वेळी कलाकारांशी, प्रयोजकांशी, सभागृह व्यवस्थापनाशी, प्रसिद्धी माध्यमांशी अश्या अनेक लोकांबरोबर बोलत राहणे व काम तडीस नेणे जमवले.
पहिला वहिला जाहीर कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्यच करायचा ठरवला.पुन्हा नावाजलेले कलाकार. यज्ञेश रायकर (व्हायोलिन ) आणि आदित्य खांडवे ( गायन) यांची जुगलबंदी. ऋग्वेद देशपांडे (तबला साथ ) तर अभिनय रवांदे (संवादिनी साथ) तसेच एस आकाश (बासरी) आणि भाग्येश मराठे (गायन ) यांची जुगलबंदी. यशवंत वैष्णव (तबला साथ ) तर अभिनय रवांदे (संवादिनी साथ). शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहचावे यासाठी ही सारी गुंतवणूक. परतफेडी मध्ये रसिकांच्या भरभरून प्रतिसादाशिवाय कशाचीही अपेक्षा न ठेवता केलेली. सर्व प्रकारचे शिक्षण चालूच. नव्याने काही अनुभव मिळाले. पण शास्त्रीय संगीत रसिकांना अनुभवायास मिळावे ही जिद्द कायम. हाही कार्यक्रम अतिशय उत्तम प्रतिसादाने पार पडला.
आता उत्साह, हुरूप आणखी वाढला. त्या प्रमाणात धडपड ही... आता एकदा पाण्यात सूर मारलाच आहे तर या संगीत सागरात तरून जाणे हेच लक्ष्य. दर महिन्याला एक कार्यक्रम करायचाच असे उद्दिष्ट्य ठरवले. म्हणजे दर महिन्याला धावपळ, जुळवाजुळव , गाठीभेटी, संवाद-चर्चा, अविश्रांत मेहनत, कायक्रमाचे नियोजन करण्यात करावी लागणारी धडपड चालूच. मी पुन्हा पुन्हा ' धडपड ' हा शब्द जाणीवपूर्वक वापरात आहे. कारण या सगळ्या घडामोडीत वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. केवळ शास्त्रीय संगीत संबंधीत संस्था उभी करून त्याद्वारे लोकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवणे.
पुढचा मार्ग अधिक जाणीवपूर्वक करावाच लागणार. त्यामुळे संगीत रसिकांना आणि आपल्या समवयस्क पिढीला सहज माहिती मिळावी या साठी फेसबूक , इन्स्टा, यूट्यूब या नव्या माध्यमांचा वापर करणे साहजिकच होते. त्या सोबत संस्थेचे संकेत स्थळ ही बनवण्याचे ठरवले. त्याचे काम सुरु केले. सोबतच नवीन महिन्याचा आणखी एक जाहीर कार्यक्रम करायचा होताच. मग महाराष्ट्रा बाहेरील काही युवा कलाकारांना आमंत्रित कण्याचे ठरवले. एव्हाना कार्यक्रम करता येईल हा आत्मविश्वास आलेलाच होता . प्रश्न नेहमीच राहतो तो आर्थिक बाबींचा. काहीही झाले तरी पैश्याचे सोंग काही आणता येत नाही. पण म्हणतात ना ' इच्छा तेथे मार्ग... ' मग धडपड पुन्हा सुरूच. जमवाजमव केलीच. हाही कार्यक्रम छानपैकी पार पडला. कलाकार महाराष्ट्रा बाहेरील पण नावाजलेले. किशोर हेगडे - कुमटा, कर्नाटक (बासरी) साथीला यज्ञेश कदम (तबला), ज्योतीप्रकाश ओझा - कटक, ओरिसा (गायन) साथीला अनुराग झा (तबला) व मिहीर टाकसाळे (संवादिनी), यशवंत वैष्णव - विलासपूर, छत्तीसगड (तबला सोलो) लेहरा साथ सिद्धेश बिचोलकर (संवादिनी)
हे सगळे थोडेसे स्वप्नवत, अशक्य असे वाटत आहे ना...? पण नाही हे सारे प्रत्यक्षात घडलेलेच नमूद करत आहे. आता तुम्हाला वाटतंय का की कोण असावी ही व्यक्ती ? एव्हढी धडपड कशासाठी व कशी काय ? तर आणखी एक महत्वाचे सांगतो की स्वतः ही उत्तम युवा व्हायोलिन वादक असून आपल्या सारख्या युवा कलाकारांना शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या कलेच्या सादरीकरणाची संधी मिळावी, आपली कला संगीत रसिकांपर्यंत पोहचावी यासाठी ही सारी धडपड करण्याची इच्छा ठेवणारा हा युवक आहे मेहुल नायक आणि संस्थेचे नाव आहे ' रिवाज ' !
मेहुल हा ठाणे जिल्ह्यातील कळवा उपनगरचा रहिवासी असून प्रख्यात व्हायोलिन वादक पंडित मिलिंद रायकर यांचा शिष्य आहे. मेहुलची आई श्रीमती तनुजा व बाबा श्री. एम. आर. अंजारिया हे दोघेही शासनाच्या पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी असून मेहुलच्या प्रत्येक निर्णयाला आई बाबांचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळेच तसेच या दोघांच्या प्रोहत्सानामुळेच मेहुल त्याची स्वप्ने पाहू शकत आहे आणि ती पूर्ण करण्याची धडपड करत आहे. मेहुल वाशी येथील फादर अग्नेल या महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीयरिंग ह्या अभियांत्रिकी शाखेच्या तृतीय वर्षाचे शिक्षण तो पूर्ण करत आहे. अतिशय उत्साही आणि सदैव कार्यरत. बोलणे इतके विनम्रपणे की समोर ऐकणारा स्तिमित होईल. आजकालची नवीन पिढी शास्त्रीय संगीत, मृदुता-मार्दवता, संस्कार विसरत चालली आहे असे म्हणणाऱ्या लोकांना मेहूलची प्रत्यक्ष भेट करून द्यावी असे मला सारखे वाटत राहते. हाती स्वीकारलेले काम पूर्णत्वास नेणे ह्याकडे त्याचे प्रथम लक्ष असते. त्याबाबत कलावंत जसा एकही सूर चुकू नये याचा कटाक्ष ठेवत असतो अगदी त्याच प्रमाणे. कदाचित तो स्वतः कलाकार असण्याचाच हा गूण आहे.
या वयात आपल्या सारख्या इतर युवा कलाकारांना कलेच्या सादरीकरणासाठी एक नवीन संधी, व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची त्याची धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. एव्हडे करूनही तो स्वस्थ बसलेला नाही. शास्त्रीय संगीताचा प्रसार, आवड जास्तीत जास्त वाढावी यासाठी तो त्याच्या संस्थेच्या संकेतस्थळावरून रसिकांना संवादात्मक माहिती देण्याच्या प्रयत्नात आहे. नवीन कायक्रमांची माहिती, त्यांची तिकिटे, आरक्षण रसिकांना सहज उपलब्ध व्हावे करता यावे यासाठी तो सध्या संकेतस्थळावर ती सोय-सुविधा देण्याच्या धडपडीत आहे. याव्यतिरिक्त काही हौशी रसिक कार्यक्रमाला संगीत विषयक विशिष्ट सुलेखन (कॅलिग्राफी) केलेले टी शर्ट्स किंवा कुर्ते घालू इच्छितात त्यांना ते संकेतस्थळावरून मिळावेत अशी त्याची मनीषा आहे. थोडक्यात शास्त्रीय संगीत आवड वाढावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची त्याची धडपड आहे. दर महिन्याला शास्त्रीय संगीताचा एक कार्यक्रम आणि इतर अनेक गोष्टी करण्याचा मानस मेहूलचा आहे. त्याला गरज आहे ती रसिकांच्या, प्रयोजकांच्या, संगीत प्रेमींच्या भरभरून पाठिंब्याची.
केवळ २२ वर्षांचा एक युवक आपले अभियांत्रिकी शिक्षण, आपले संगीत शिक्षण सांभाळून शास्त्रीय संगीत कलेच्या प्रसारासाठी मेहनत घेतो आहे, आपल्या वयाच्याच, इतर अनेक गुणीजन कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे , रंगमंचीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, संगीत रसिक आणि गुणी कलाकार यांच्या मधील दुवा बनू पाहत आहे, संगीत रसिकांना सहजगत्या माहिती मिळावी, त्यांची सोय व्हावी, त्यांच्या आवडीचे वस्त्रे-प्रवारणे घालता यावी याची काळजी घेत आहे हे सारे औत्सुक्यपूर्ण आहे. त्याच्या या साऱ्या धडपडीला, साऱ्या प्रयत्नांना सुयश चिंततानाच त्याला त्याच्या कामात अनेक हातांचे, सहकाऱ्यांचे पाठबळ प्राप्त व्हावे हीच इच्छा.
- प्रसाद पाठक