Linkedin पैशापाण्याची खरी गोष्ट

लिंक्डइन नक्की काय आहे? लिंक्डइनवर स्वत:चं खातं उघडताना कोणती काळजी घ्यावी? लिंक्डइनचे तुम्हाला कोणकोणते फायदे होऊ शकतात? सोशल मीडियावर आपला वेळ घालवणाऱ्या लोकांसाठी सुशील सोनार यांची पैशापाण्याची गोष्ट नक्की वाचा;

Update: 2022-04-12 13:41 GMT

असं म्हणलं जातं की कष्ट मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर माणसाला यशस्वी होता येतं, पण माहिती युगात या मुल्यांच्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणची तुमची उपस्थिती आणि योग्य ओळखी.

तर या ओळखी म्हणजे फक्त कौटुंबिक सामाजिक ओळखी नाहीत, तर तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, यशस्वी व्यक्ती यांच्या ओळखी. तुमचं ऑनलाईन अस्तित्व योग्य लोकांना दिसावं आणि त्याचा तुम्हाला प्रोफेशनली फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लिंक्डइन वर असायलाच हवं.

जरी आजकाल रिक्रुटर्स सर्व उमेदवारांचे प्रोफाइल आणि ऑनलाईन अस्तित्व तपासून पाहत असले तरीही लिंक्डइन फक्त दुसरा जॉब मिळवणे हे लिंक्डइन वापरण्याचं एकमेव कारण असू नये. तुमच्या बद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल, कौशल्यांबद्दल जगाला माहिती मिळावी यासाठी खरं म्हणजे लिंक्डइन वापरावं.

ऑनलाईन रिझ्युम अशी एका शब्दातील ओळख या टूल साठी खूपच तोकडी आहे. साधारणपणे ८१ करोड लोक जगभरातून या संकेतस्थळावर आपला संपर्क वाढवण्यासाठी येत असतात, आपल्यासारख्या किंवा समविचारी लोकांची गाठभेट घडणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यास लिंक्डइनची शक्ती तुम्ही अनुभवू शकाल.

लिंक्डइन प्रोफाइल कसं असावं ?

प्रोफाइल समरी : तुमची एका वाक्यात ओळख करून देणारा भाग म्हणजे समरी. यात तुमचे नाव यायला हवे आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत ते इथे लिहायला हवे. सध्या कार्यरत असलेल्या प्रोजेक्ट किंवा कामाचा उल्लेख असणे उत्तम. हा भाग तुमच्या नावासह गुगल सर्च मध्ये येतो. त्यामुळे लिंक्डइन न वापरणाऱ्यांना सुद्धा तुम्ही सापडू शकता.

एक्सपिरियन्स Experience: एक्सपिरियन्स लिहिताना प्रत्येक रोल समोर त्या कंपनीसोबत असताना तुम्ही पार पाडलेली महत्त्वाची कामे, प्रोजेक्ट्स याची लिस्ट लिहावी. परिच्छेद लिहिणे टाळावे.

रेकमेंडेशन : हा भाग अत्यंत महत्वाचा असतो, ज्यांनी तुमच्यासोबत काम केलेले आहे किंवा तुमच्या कंपनी/संस्थेतर्फे तुमची त्यांच्याशी व्यवहार केलेले आहेत अशांनी तुमच्याविषयी लिहिलेले कौतुकाचे शब्द म्हणजे रेकमेंडेशन. तर या रेकमेंडेशन ची गम्मत अशी आहे की ज्यांनी ते लिहिलेलं आहे त्यांचं सध्याचे डेसिग्नेशन(पद) त्या रेकमेंडेशनखाली दिसतात. उदा. असोसिएट असताना तुमच्या एखाद्या मित्राने तुमच्यासाठी रेकमेंडेशन लिहिलं आणि आजच्या घडीला तो मित्र डायरेक्टर पदावर पोचलेला असेल तर त्याने लिहिलेल्या रेकमेंडेशनखाली त्या मित्राचं आजचं पद 'डायरेक्टर' लिहिलेलं असेल ज्यामुळे त्या रेकमेंडेशन ची विश्वासार्हता वाढते आणि तुमचीही.

स्किल्स : तुमची कौशल्ये लिहा, जी कौशल्ये तुम्ही इथे लिहाल ती तुमच्या सर्व लिंक्डईन कनेक्शन ला दिसतील आणि त्यांना तुमच्यातील कौशल्यांना एन्डॉर्स (पाठिंबा)करता येईल

व्हॉलेंटिअर एक्स्पिरिअन्स आणि कॉज : तुम्ही तुमच्या प्रोफेशनल जीवनाव्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टींमध्ये रस घेता किंवा स्वयंसेवक आहात किंवा कुठले उपक्रम चालवता हे इथे लिहा. जरी खूप जास्त महत्व दिलं जात नसलं तरीही यातून तुम्हाला समविचारी मंडळींशी पटकन जुळवून घेता येतं. लिंक्डइन पल्स या ठिकाणी तुम्ही लेख लिहू शकता आणि ते तुमच्या प्रोफाईलवर सदैव दिसतात. त्याने तुमचा अनुभव आणि अभ्यास तुम्ही प्रदर्शित करू शकता.

स्लाईड शेअर हे लिंक्डइन च एक वैशिष्ट्य आहे. जिथे तुम्ही तुमची प्रेझेंटेशन साठवू शकता आणि सर्वाना उपलब्ध करून देऊ शकता. हल्ली प्रोफाइल फोटो मध्येच तुम्ही नक्की कशासाठी लिंक्डइन वापरत आहात हे सांगता येतं. म्हणजे नोकरीच्या शोधात आहात की एखाद्या पदासाठी उमेदवार शोधत आहात किंवा काही सेवा देत आहात. हे अत्यंत उपयोगी वैशिष्ट्य आहे.

आठवड्यातून १५ ते २० मिनिटे लिंक्डइन साठी ठेवलीत तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील चालू घडामोडी आणि अपेक्षित बदल नक्कीच कळतील. इथे स्वतःला अपडेट ठेवणारी मंडळी यशस्वी होण्याचे प्रमाण आणि शक्यता नेहेमीच जास्त असते.

मधल्या काळात लिंक्डइन ची मालकी मायक्रोसॉफ्ट कडे गेली. त्यामुळे अनेक चांगले बदल होत आहेत. Outlook सारख्या ई-मेल क्लायंटला भविष्यात लिंक्डइन जोडलं जाऊ शकेल.

याचबरोबरीने लिंक्डइन न्यूज मध्ये आपल्याला हव्या त्या क्षेत्राच्या बातम्या मिळतात. ज्याच्या बातम्या तयार होतात ते सर्व लोक लिंक्डइन वर असल्याने त्यांची मतं आपल्याला रोजच्या रोज वाचता येतात. लवकरच लिंक्डइन पॉडकास्ट सुरू होत आहे. त्यावर अनेक बिझनेस शोज असणार आहेत. सध्यातरी ओटिटी प्लॅटफॉर्म हे फक्त मनोरंजनावर फोकस करत आहेत. लिंक लिंक पॉडकास्ट एक नवा प्रयोग, संपूर्ण नवीन इंडस्ट्री तयार करू शकतो.

त्याच सोबत क्लबहाऊस सारखा एक ऑडिओ इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म चाचणी च्या टप्प्यात आहे. नुस्ता वेळ घालवणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गर्दीत खरी पैशापाण्याची गोष्ट म्हणजे लिंक्डइन आहे. चला तर मग भेटूयात लिंक्डइनवर.

सुशील सोनार

ट्विटर @hpsonar

मेल : hpsonar@gmail.com


Tags:    

Similar News