क्षमा बिंदूचे स्वतः शी लग्न आणि आपण...

क्षमा बिंदू या तरुणीने स्वत:शीच लग्न केले आहे. देशातील अशाप्रकारचे हे पहिलेच लग्न ठरले आहे. अनेकांनी तिची थट्टा केली आहे. पण तिच्या या निर्णयाचा अर्थ काय आहे, विवाहातील नात्यामध्येही लोक स्वत:चा स्वार्थच पाहतात का, या घटनेचा सामाजिक अर्थ काय, याचे विश्लेषण केले आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी...

Update: 2022-06-10 10:23 GMT

क्षमा बिंदूने स्वतःच स्वतःशी केलेले लग्न हा काहीसा थट्टेचा विषय सोशल मीडियात झाला आहे. मला मात्र तिची कृती हास्यास्पद असली तरी त्याच्या मागची भावना ही स्वतःशी अत्यंत प्रामाणिकता वाटते किंबहुना तिने मानवी स्वभावाच्या एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले आहे..

आपण जरी समोरच्याला तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगत असलो तरी आपले आपल्यावरच प्रेम असते किंबहुना आपल्या स्वतःमधील ज्या आवडीच्या गोष्टी इतरांमध्ये आपल्याला आढळतील अशा गोष्टींवर आपण प्रेम करत असतो म्हणजे स्वतःच स्वतःवरच प्रेम असतो म्हणूनच आपल्याला समविचारी मित्र असतात....

सारख्या विचाराचे सहकारी असतात व लग्न करतानासुद्धा आपण जास्तीत जास्त आवडीनिवडी जुळतील असा प्रयत्न आपण करतो म्हणजे आपण आपल्याच स्वभावातील गुणांची पूजा बांधत असतो आणि दुसऱ्याला मात्र तुझ्यावर माझे प्रेम आहे असे भासवत असतो..

खरेतर आपल्या पूर्ण विरोधी आवडत्या व्यक्तीवर विरोधी विचारांच्या गुणांच्या व्यक्तीवर आपण प्रेम करत नाही... तुझा एकही गुण मला आवडत नाही परंतु तू मला सर्वात जास्त आवडतो असे कधीच घडत नाही.. हे लक्षात घ्यायला हवे .

आपण आत्ममग्नच असतो, सामाजिक कामाबद्दल शरद जोशी असे म्हणायचे की मी शेतकऱ्यांवर कोणतेही उपकार करत नाही तर ती गोष्ट केल्याशिवाय मला राहवत नाही किंवा मी माझ्या आनंदासाठी ते करतो आहे म्हणजे मी त्या अर्थाने स्वार्थी आहे स्वतःला आनंद मिळावा म्हणून ते करतो आहे... त्यातून काही शेतकर्‍यांचे हित होत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे परंतु मी इतरांसाठी त्याग करतो आहे हे मला अजिबात मान्य नाही..

शरद जोशींनी एकप्रकारे आपण इतरांसाठी काम करतो म्हणजे स्वतःवर प्रेम करतो असे प्रांजळपणे सांगितले ..हे एकदा मान्य केले की आपल्याला त्रास होत नाही. आणि म्हणून जगातील सार्‍या महापुरुषानी केलेले काम हे त्यांनी त्यांच्यावर केलेले प्रेम असते.. त्यांनी त्यांच्या आनंदासाठी ती गोष्ट केलेली असते त्यांना होणाऱ्या वेदनेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी केलेले काम असते त्या अर्थाने त्यांचे कार्य त्यांनी त्यांच्या स्वतःशीच केलेले लग्न असते..त्यामुळे इतरांसाठी घालवलेले आयुष्य हे ही स्वतःवरच प्रेम असते

विवाह नात्यात तर हे अधिक फसवे असते.एकमेकाला मी तुझ्यासाठीच जगतो असे भासवताना स्वतः च्याच प्रेमात आपण असतो. आणि म्हणून कोणत्याही प्रेमात नंतर उतरती कळा लागते याचे कारण ज्या क्षणी ही जाणीव व्हायला लागते की आपण आपल्याच प्रेमात आहोत आणि केवळ काही भावनेने आपण एकमेकांशी जोडले गेलो होतो व या व्यतिरिक्तही आणखीही काही गोष्टी आहेत तिचे समोरच्याशी नाते नाही त्यामुळे त्या गोष्टींवर आपण आपले प्रेम करायला लागतो आणि त्याला लोक दोघांमध्ये अंतर निर्माण झाले असे म्हणतात वास्तविक उत्कट प्रेमात असतानाही ते स्वतःच्या प्रेमात असतात आणि घटस्फोट घेताना सुद्धा ते स्वतःच्या प्रेमात असतात आपण फक्त आपल्याच प्रेमात असतो आणि समविचारी व्यक्तींना त्यांच्या वर प्रेम करतो आहोत असे भासवत असतो ..वास्तविक तसे नसते.

हे वास्तव एकदा स्वीकारले की समोरच्याकडून अपेक्षा करणे थांबते आणि आपण स्वतःचे अधिक योग्य मूल्यमापन करू लागतो...उपकाराची भावना मनात उरत नाही व उगाच कोणाला दोष देत नाही. आपणच प्रश्न आहोत व आपणच उत्तर आहोत हे स्वतःला कळते ,आपण आपल्यावरच काम करतो. बिंदू च्या या छोट्या कृतीने आपल्यातील दुभंगलेपण आपल्याला दाखवून दिले आहे

Tags:    

Similar News