अक्षयच्या खुनाला मराठा जबाबदार कसे ?

नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेरावच्या खुनानंतर मराठा समाजावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. एकाने खून केला तर संपूर्ण मराठा समाज याला दोषी कसा ? वाचा सागर गोतपागर यांचे सखोल विश्लेषण.....

Update: 2023-06-11 02:42 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावात साजरी केल्याच्या रागातून नांदेड जिल्ह्यात खून झाल्याचा प्रकार समोर आला. या खुनातील आरोपी मराठा समाजातील असल्याने मराठा समुहाच्या जातीयवादी कृतीबाबत विविध स्तरातून समाज माध्यमांवर चर्चा होऊ लागल्या. या चर्चेनंतर साहजिकच मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या देखील प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी तर मृत अक्षयच्या (akshay Bhalerao nanded)खुन्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गावात जमावे असे आवाहन देखील केले. अक्षयच्या गुन्हेगारांची ही कृती वैयक्तिक असल्याचे सांगत मराठा समाजाला लक्ष करू नये अशी सुस्पष्ट भूमिका काहींनी घेतली. या घटनेचे तठस्थपणे विश्लेषण करायचे झाल्यास ही कृती वैयक्तिक होती का ? खुन्यांच्या तथाकथित उच्च जातीय भावनेला खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतून आलेल्या अक्षयच्या अथवा त्याच्या समाजाच्या कृतीने ठेच पोहचली होती का ? यातून खुन्यांच्या मनात या समाजाविषयी अथवा अक्षय विषयी चीड उत्पन्न झालेली होती का ? हे तपासणे महत्वाचे आहे. या गावातील या दोन समाजामध्ये या अगोदर काही जातीय तणाव होता का ? याबाबत माहिती घेत असताना ११ एप्रिल २०१७ रोजी या गावातील बौद्ध वस्तीवर दगफेक तसेच बुद्ध विहाराच्या तोडफोडीसंदर्भात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा एफ आय आर मिळाला. याबरोबरच आपल्या गावात आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी बौद्ध समाजातील युवक प्रशासनाकडे सातत्याने हेलपाटे घालत असल्याची माहिती मिळाली. जयंती समारंभाची परवानगी स्थानिक प्रशासनाकडे असताना या तरुणांना थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागली होती. ही परवानगी मिळू नये म्हणून गावातून राजकीय दबाव टाकला जात असल्याचे येथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. संघर्ष करून आंबेडकरी नेते राहुल प्रधान (Rahul Pradhan) यांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी जयंतीची परवानगी मिळवत पहिल्यांदाच गावात जयंती साजरी केली. या घटनांचा संदर्भ तपासताना गावातील या दोन समूहांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची बाब उघड होते. गावातील जयंतीच्या कार्यक्रमात अक्षयचा पुढाकार होता.



अक्षयच्या खुन्यांची कृती ही वैयक्तिक होती की त्याला समाज देखील जबाबदार आहे ? याचा विचार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विरोध एकट्या अक्षयच्या खुन्यांचा होता की त्याच्या समाजाच्या गावातील गटाचा होता? याचा विचार करणे महत्वाचे आहे. विशिष्ठ समाजाच्या विरोधात तयार झालेल्या विद्वेषाला एकटे खुनी जबाबदार होते की त्या समाजातील काही लोकांच्या तयार झालेल्या सामुहिक विद्वेषपूर्ण मतामुळे सदर खुन्यांच्या मनात असा विद्वेष तयार झाला का? समाजातील या गटाच्या दबावातून मानसिक संतुलन बिघडून या आरोपी तरुणांनी खुनाचे कृत्य केले का याचा विचार करणे महत्वाचे आहे. जर अशी वस्तुस्थिती असेल तर अक्षयच्या खुनाला केवळ प्रत्यक्ष खुनी जबाबदार नाहीत तर असे गढूळ वातावरण निर्माण करणारे तसेच अशा तरुणांना हिंसा करण्यासाठी चेतवणारा समूह जबाबदार आहे.

एका आरोपीमुळे संपूर्ण समाजाला बदनाम करणे चूक आहे. हे समीकरण अगदी बरोबर असले तरी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवनुकीवर दगडफेक करणारा, जयंतीची मिरवणूक गावात येण्यास विरोध करणारा समाज बहुतेकदा मराठाच का असतो ? सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंधूर असो वा कोल्हापूर जिल्ह्यातील देवाळे असो येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करणारा समाज मराठाच का असतो ? याचे आत्मपरीक्षण देखील या घटनेच्या निमिताने मराठा समाजाने करायला हवे. मराठा सेवा संघामुळे महाराष्ट्रातील या विद्वेषाची धार कमी झाली असली तरीही ती संपलेली नाही. या तथाकथित उच्च जातीय धारदार जातीय भावनेतून बहुतांश वेळा दलितांनाच रक्तबंबाळ व्हावे लागते. ज्यावेळी वस्त्या जळतात असे खून होतात त्यावेळी साहजिकच मराठा समाजावर टीका टिप्पणी होते. त्यावेळी अशी टिका करणारे शोषितच जातीयवादी आहेत असा उलट कांगावा केला जातो. दलित समूहांच्या घरावर डौलाने फडकणारा भगवा, भिंतीवर सन्मानाने आदर्श म्हणून लावलेली शिवरायांची प्रतिमा, गावागाड्यातील एकमेकांवर अवलंबून असलेले अर्थकारण ही या दोन समुहाला जोडणारी नाळ आहे. ही नाळ अधिक घट्ट करायची असेल तर मराठा समाजाने देखील जातीयवादाच्या सनातनी संस्कृतीचे वाहक न वर्षानुवर्षाच्या जातीय अंधकारातून स्वयंप्रकाशात पाउल टाकायलाच हवे.

Tags:    

Similar News