60 च्या दशकात कोणाचा बोलबाला होता आणि आता...

लेखक भालचंद्र नेमाडे, चित्रकला ज्ञानेश्वर नाडकर्णी, नाटकात माधव मनोहर, चित्रपट समीक्षक वा परिक्षक भाऊ पाध्ये या नावांनी आपलं क्षेत्र गाजवलं मात्र, माहिती तंत्रज्ञान आल्यानंतर काय झालं, जे सलमान खान, अभिताभ बच्चन बॉक्स ऑफिसवर हिरो होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचं काय झालं. फक्त चित्रपटच नाही तर कला, क्रीडा या सारखे प्रत्येक क्षेत्र कसे बदलत गेले जाणून घ्या... सुनील तांबे यांच्या लेखातून;

Update: 2021-07-03 03:09 GMT

कलावंत-समीक्षक-वाचक वा रसिक उत्पादक-पत्रकार वा प्रसिद्धी माध्यमं-ग्राहक साठच्या दशकात सत्यकथेचा बोलबाला होता. कवी असो की, कथाकार वा कादंबरीकार वा नाटककार वा लेखक, यांना मान्यता देण्याची जबाबदारीच सत्यकथेने घेतली होती. ही मिरासदारी मोडून काढली लिटल मॅगेझिन चळवळीने. लेखक आणि वाचक यांच्यामधले अनेक दुवे-- प्राध्यापक, विद्यापीठं, मराठी विभाग प्रमुख, अभ्यासक्रम, साहित्य अकादमी, पारितोषिक वा पुरस्कार, लायब्र्या, वर्तमानपत्रातील समीक्षणं, इत्यादी याची जाण होती भालचंद्र नेमाडे यांना. ते सर्जनशील लेखक व कवी होते आणि या चळवळीचे नेतेही होते.

चित्रकलेबाबत हेच काम ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यासारखे लोक करायचे. आपल्या चित्रांबद्दल नाडकर्णी यांनी चार ओळी टाइम्स ऑफ इंडियात लिहाव्यात यासाठी उगवते चित्रकार त्यांना साकडं घालायचे. नाटकात माधव मनोहर यांचा दबदबा होता.

भाऊ पाध्ये चित्रपट समीक्षक वा परिक्षक. त्याने एका लेखात लिहीलं आहे की, चित्रपट परिचय वा परिक्षणासाठी तो काय मेहनत घ्यायचा. साहित्य, दृश्यकला वा चित्रपट वा नाटक प्रेक्षक, रसिक वा वाचकांपर्यंत पोचायचं तर समीक्षकांना टाळताच येणार नाही अशी परिस्थिती होती. ही तंत्रज्ञानाची मर्यादा होती. म्हणजे उत्पादन तंत्राची मर्यादा होती.

१९९० नंतर तंत्रज्ञानाची घोडदौड सुरू झाली. माहितीचा प्रस्फोट झाल्यानंतर सर्व कलांच्या स्वरुपातच आमूलाग्र बदल झाला. कारण सर्व कला सर्वार्थाने ग्लोबल वा वैश्विक बनल्या. सर्वार्थाने म्हणजे देश (राष्ट्र-राज्य), भाषा हे अडसर कोलमडून पडू लागले. एकविसाव्या शतकात नेटफ्लिक्स वा अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलाकृती पाहाताना मला भाषेचा पर्यायही मिळू लागला. या फलाटांवर प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि माळकांची संख्या केवळ मोठी नाही तर त्यांचा प्रेक्षकवर्गही ही जागतिक बनला आहे. सलमान खान लोकप्रिय अभिनेता आहेच पण त्याचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हीट होणारा, ओटीटी वर आपटतो. ओटीटीवर कोणीही स्टार होऊ शकत नाही. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन असे सुपरस्टार ओटीटी च्या जमान्यात निर्माणच होऊ शकत नाहीत.

ओटीटीवर प्रदर्शित होणारे चित्रपट वा अन्य कार्यक्रम यांची समीक्षा होते. परंतु ही समीक्षा प्रेक्षकांवर फारसा परिणाम करू शकत नाही. भांडवलशाही म्हणा की तंत्रज्ञान म्हणा, यांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यातले सर्व मध्यस्थ उखडून टाकले. त्यामुळे सौंदर्यशास्त्रात मूलभूत बदल झाले असावेत.

क्रीडा पत्रकारिता विसाव्या शतकाच्या अखेरीस संपुष्टातच आली. कारण मैदानावर काय चाललंय हे कॅमेरे टिपू लागले. कॅमेरे कुठेही लावता येतात. ते प्रत्येक खेळाडू, पंच आणि प्रेक्षक यांचं विविध कोनांतून चित्रण करतात. क्रिकेट असो वा फुटबॉल, क्रिडा पत्रकारितेला रिपोझिशनिंग करावं लागलं. अर्थात पाश्चात्य देशांत. मराठीमध्ये अजूनही शब्दबंबाळ, विशेषणांचा डायरिया झालेले वा भाषाप्रभुत्वावर क्रिडासमीक्षक तगून आहेत. क्रिडांगणावर जे घडतं ते कोणताही प्रेक्षक पाहू लागला. क्रिडांगणावर जे दिसत नाही. त्याचं रिपोर्टिंग क्रीडा पत्रकारांनी करणं अपेक्षित आहे. असं रिपोर्टिंग करण्यासाठी सोर्सिंग नेटवर्क हवं, बातमीमूल्याची जाण हवी.

संरक्षण क्षेत्राबाबतही हेच घडलं. अजय शुक्ला यांनी चिनी आक्रमणाबाबत केलेलं रिपोर्टिंग डिफेन्स करस्पॉन्डन्सचा कोर्स केलेला एकही पत्रकार करू शकला नाही. सुचेता दलाल च्या एका ट्विटने अदानी उद्योग समूहाच्या शेअरची किंमती गडगडल्या. मुद्दा काय तर समीक्षक वा विश्लेषण करणारे पत्रकार एकविसाव्या शतकात अप्रासंगिक झाले आहेत म्हणजे इर्लेव्हंट झाले आहेत. तुमच्या उत्पादनाला-- कविता, कथा, कादंबरी, लेख, चित्र, चित्रपट, माळका, वा शिल्प वा अन्य काहीही, याला बाजारपेठ मिळायला हवी. बाजरपेठ मिळणं म्हणजेच ग्राहक, वाचक, प्रेक्षक, रसिक मिळणं.

तालिबानलाही बाजारपेठ मिळते वा बोको हरामला वा मोदी-शहा-भागवत यांना. असा एकविसाव्या शतकातला पेंच आहे. तो जाणून पुढच्या चाली कराव्या लागतील. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर वा गांधी-ेनेहरू-लोहिया वा अन्य कोणत्याही वैचारिक परंपरा तुम्ही कशा उपयोगात आणता ह्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाने एका शतकाची वाटचाल पूर्ण केली आहे. त्यांच्यावर टीका करणं सोपं आहे. परंतू तशी वाटचाल एकाही युरोपियन (रशिया वा पूर्व युरोपातील कम्युनिस्ट देश वा क्यूबा) यांना करता आलेली नाही.हे सर्व ध्यानी घेऊन साहित्य व कलांची समीक्षा करा. मार्क्सवादी वा फुले-आंबेडकरवादी वा गांधीवादी.

(सदर पोस्ट सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Similar News