आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी गांधी तत्त्वज्ञान..........

भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना महात्मा गांधींच्या आर्थिक विचारातून विकास कसा करता येईल? सर्वसामान्य ते जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था कशी बळकटीला आणता येईल? जाणून घेण्यासाठी वाचा प्रा.निलेश रविंद्र कोळी यांचा आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी  गांधी तत्त्वज्ञान सांगणारा लेख

Update: 2021-10-02 03:00 GMT

२०१९ हे वर्ष देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महात्मा गांधी यांची  १५० वी जयंती निमित्ताने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष उत्सवाने साजरे केले गेले. महात्मा गांधी यांचा जन्म ०२ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. आपल्या या संपूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीत महात्मा गांधीनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या विचारांना व ते विचार प्रत्यक्षात कृतीत आणून आपल्या विचारांचे महत्व जगापुढे अधिक प्रभावीपणे मांडलेले आहेत.

गांधीजींनी आपल्या या विचारांमध्ये मानवाचे अधिकाधिक कल्याण कसे होईल आणि मानवी जीवनात सतत होणारे बदल या विषयी आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडलेले आहेत. तसेच राजकीय विचारवंत आणि राजकीय नेते या दोन्ही दृष्टीने महात्मा गांधींचे स्थान भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ते अग्रस्थानी आहेत. भारतीय जन सामान्यांशी साधलेले तादात्म्य, संघर्षाचे त्यांनी शोधलेले नवे प्रकार आणि परंपरेचा आधुनिकतेशी घातलेला बेमालूम समन्वय या चार गोष्टींच्या संदर्भात गांधीजींनी जे चिंतन आणि केलले कार्य कोणालाच नाकारता येणार नाही.

जगात जे काही नवीन विकासात्मक बदल होत आहेत आणि येऊ घातलेले आहेत यासाठी महात्मा गांधींच्या विचारांची आवश्यकता आज कुठेतरी जगाला आहे. प्रामुख्याने महात्मा गांधीजीच्या आर्थिक विचारातून विकास साधत असतांना जग जन कल्याण कसे होईल यासाठी भारताला तसेच जागतिक अर्थव्यवस्थेला महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांची गरज आहे, गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये आपल्याला जन समूहाचे कल्याण दिसून येते यासाठी त्यांनी वेगवेगळे आपले विचार,नविन उपक्रम, आर्थिक नियोजन,योजना यांची मांडणी केलेली दिसते. जसे विकेंद्रित पद्धतीने चालविता येईल असा प्रत्येक व्यवसाय विकेंद्रित करावा,राष्ट्रीय संरक्षण व समृद्धी यासाठी जे उद्योगधंदे आवश्यक आहेत व ज्यांचे विकेंद्रीकरण करता येत नाही ते सामाजिक मालकीचे व्हावेत त्यांचे राष्ट्रीयकरण व्हावे, कामगारांची पिळवणूक थांबवणे व विकेंद्रीकरण या दोन मुद्यांवर उद्योधंद्यांची उभारणी व्हावी तसेच कामगार क्षेत्रात राजकारण न आणता किमान वेतन कायदे करावेत, तसेच गांधीजींच्या स्वराज्य या संकल्पनेची एक बाजू म्हणजे व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य मिळावे.

वसाहतीबाबत महात्मा गांधी म्हणतात वसाहतीमुळे जनतेचे शोषण होऊन दारिद्र्याचे प्रमाण वाढेल, गांधीजीच्या भारताचे आर्थिक भवितव्य चरखा आणि आणि खादी यात दिसते, जर भारतीय खेडी जिवंत राहवीत आणि त्यांची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर चरखा सर्वव्यापी व्हायला पाहिजे,  असा दावा महात्मा गांधी करतात कि,ग्रामीण संस्कृतीचा विकास चरख्या शिवाय अशक्य आहे, म्हणजेच ग्रामीण कला-कौशल्यांचे पुनर्जीवन त्यांना अभिप्रेत होते. महात्मा गांधींच्या आदर्श राज्याचा प्रमुख आधार खेडे हा आहे.अहिंसक समाजात विकेंद्रीकरण करणे शक्य व्हावे यासाठी स्वयंपूर्ण-स्वायत्त खेडे हा मुलभूत घटक असेल, आणि देशाच्या विकासासाठी खेड्यांचा विकास आधी होणे गरजेचे आहे.

विकासाबाबत महात्मा गांधी म्हणतात कि, विकास खालच्या स्तरापासून वर गेला पाहिजे. पण आज देशात विकास हा विशिष्ट शहरांपुरता मर्यादित झालेला दिसतो, भारतात रोजगारापेक्षा बेरोजगारांची संख्या जास्त आहे. येथे यांत्रिकीकरण हि एक आपत्तीच असल्याचे गांधीजींनी सुचविले की काम खेडोपाडी पोहचविण्याचा मार्ग यांत्रिकीकरण नसून तो पर्यंत वापरात असलेले हस्तव्यवसाय,लघुउद्योग,कुटिरउद्योग आणि उद्योगधंद्याचे पुनर्जीवन हाच आहे.

आज भारतात बेरोजगारी वाढताना आपल्याला दिसत आहे, कारण ग्रामीण भागात पूर्वी जे व्यवसाय अस्तित्वात होते त्याचं अस्तित्व आजच्या यांत्रिकीकरणाने नष्ट केलेलं आपल्याला दिसून येत आहे, पाश्चात्य देशात झालेले औद्योगीकरण भारतासाठी केवळ विध्वंसक ठरेल याबाबत गांधीजींचे पूर्ण मत होते,त्याचा पर्याय सर्व सक्षम व्यक्तींना लाभदायक रोजगार उपलब्ध करण्याभोवती फिरतो औद्योगिकीकरण जर भारतात मोठ्या प्रमाणात वाढले तर भारताच्या ग्रामीण आर्थिक पायाला सुरुंग लागेल व स्पर्धा आणि विक्रीच्या प्रश्नांमुळे खेड्यांचे खूप शोषण होईल.

गांधीजींनी हे स्पष्ट केले आहे कि यंत्रे नष्ट करावीत या मताचे ते नाहीत तर त्यांना आवर घालावा, त्यांना माणसाच्या मानगुटीवर स्वार होवू देवू नये या मताचे ते पुरस्कर्ते होते. संपत्तीतील असलेली विषमता जर कमी करायची असेल तर संपत्तीचे समान वाटप होण्यासाठी विश्वस्त कल्पना अत्यंत उपयुक्त आहे. श्रीमंत तसेच भांडवलदारवर्गाने खाजगी मालमत्तेचा त्याग करून विश्वस्ताचे कार्य  केले तर अहिंसेच्या मार्गाने आर्थिक समता निर्माण करण्यास मदत होईल, गांधीजींच्या विचारात सामाजिक समतेबरोबर आर्थिक समतेला महत्त्वाचे स्थान आहे आणि आर्थिक समता प्रस्तापित करून दारिद्र्य, बेकारी,हिंसाचार कमी होऊन देशाची भरभराट होईल. गांधीजींनी मांडलेले आर्थिक विचार आपल्याला आज मानवी कल्याण तसेच अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी खूप मोलाचे ठरतील यात काही शंका नाही.

 

प्रा.निलेश रविंद्र कोळी

अर्थशास्त्र विभाग

डॉ. अण्णासाहेब जी .डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव.

मो.नं.८००७७६०६८१

Id-nkoli6702@gmail.com

Tags:    

Similar News