चवदार तळ्याचा खिजगणतीतला इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr.B.R.Ambedkar) सभेचे नेतृत्व करुन चवदार तळ्याकडे पायी चालण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ तीन हजार अस्पृश्य लोकांचा जमाव चालु लागला ज्यात काही मुस्लीम लोकांचाही समावेश होता. लवकरच हा जमाव चवदार तळ्यावर पोहचला. चवदार तळ्याच्या पायर्‍या उतरत आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेउन ते पाणी सावकाश प्यायले.. आज या घटनेला 96 वर्ष पूर्ण झाले आहेत.. लेखक राहुल बनसोडे यांनी लिहिलेलं आणि अंगावर शहारे आणणारा चौदार तळ्याचा खिजगणतीतला इतिहास नक्की वाचा...;

Update: 2023-03-20 08:11 GMT

समाजातल्या वरच्या वर्गाने खालच्या वर्गाला वर्चस्वात ठेवण्यासाठी त्यांच्या अन्न आणि पाणी ह्या दोन जीवनावश्यक घटकांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उदाहरणांनी अवघा मानव इतिहास बरबटलेला आहे. ह्या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास खालच्या वर्गाच्या जगण्यासाठीच्या हतबलतेचा वापर करुन मोठमोठी साम्राज्ये निर्माण करता आली. कधीकाळच्या ह्या उत्तुंग साम्राज्यांच्या खाणाखुणा मागे राहिलेल्या त्यांच्या बांधकामात दिसुन येतात, त्या बांधकामाच्या तळाशी असलेले शोषितांचे अश्रु वा त्यांचा हिशेब कुणाच्या खिजगणतीतही नसतो. खिज गणती म्हणजे अशी गणती जी सार्वजनिक केली जात नाही कारण मग तिच्यावर टॅक्स बसतो, इतरांना आपल्याकडे असलेल्या वास्तव मालमत्तेबद्दल कळते. खिजगणती म्हणजे खोटे नव्हे तर लपवुन ठेवलेले सत्य, एक असे सत्य जे माहित असणारा माणुसही स्वतःच स्वतः आठवु इच्छीत नाही कारण स्वतःपुरते आठवले तरी तो कुठेतरी ते बोलुन बसेल आणि त्यातुन मग पुढे त्याला समस्या निर्माण होईल.

महाड गावाजवळून सावित्री नदी वहाते. पुराणातल्या एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येते. भारतात ज्या ज्या म्हणुन नद्यांची नावे अशी पुराणातल्या पवित्र स्त्रीयांच्या नावाने ठेवली गेली आहेत त्या त्या नद्यांच्या गावाजवळचा इतिहास तपासुन पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात. अस्पृश्यता शब्द काढुन तिथे 'मुलभूत मानवी अधिकारांची पायमल्ली' अशी शब्दयोजना केल्यास जास्त योग्य होईल. तर ह्या तथाकथीत सावित्री नदीच्या नैसर्गिक स्वभावाचा विचार केला तर तो अतिशय गुंतागुंतीचा आहे.

महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावल्यानंतर ती आपल्या साठेक मैलाच्या प्रवासात असंख्य वळणे घेते, काही ठिकाणी तिचे पात्र नेहमीपेक्षा जास्त विस्तीर्ण होते तर काही ठिकाणी अरुंद, काही ठिकाणी तिला उगीचच फाटे फुटतात जे पुढे जाउन परत नदीलाच मिळतात. पावसाळ्यात सावित्रीला प्रचंड मोठे पुर येतात इतके की त्यात बरेच काही वाहुन जाते. हीच सावित्री कधीकधी उन्हाळ्यात कोरडी पडते. इतकी कोरडी की पावसाळ्यात दुथडी भरुन वहात होती ही तीच सावित्री का? असा प्रश्न पडावा. पावसाळ्यात सावित्रीचे वहाते पाणी पावसाचे असते, एकदा पाउस संपला म्हणजे मग डोंगरदर्‍यातले जिवंत झरे आणि इतर काही स्त्रोतांवर सावित्री वहाती रहाते. हिवाळ्याच्या शेवटी तिचे पाणी थेट तळ दिसेल इतके स्वच्छ असते.




 


झरे जसे नदीला येउन मिळतात तसे नदीतले पाणी झिरपुन एखाद्या ठिकाणी नवा झराही तयार होउ शकतो. सावित्रीच्या प्रवाहापासुन मैल दिड मैलावर असलेल्या चौदार तळ्यात असा एक झरा जमिनीखालुन पोहचायचा. निसर्गाने भेदभाव न करता उपलब्ध करुन दिलेले पाणी. ह्या झर्‍याच्या पाण्याचे मग जलाशय झाले. त्या जलाशयाचे पाणी पित पित प्राचीन भारतातली नदीकाठची संस्कृती तिथे आकार घेत राहिली. पंथ,संप्रदाय आले आणि गेले, जातीयता कधी अंश दोन अंश कमी झाली आणि अधुनमधुन वाढतही राहिली. धातुयुगाच्या परमोच्च काळाची व्यवस्था अनेकवेळा अनेक ठिकाणी इथेतिथे आकारात येत होती.

शोषणाची व्यवस्था जिथे म्हणुन शंभरेक वर्षांपेक्षा जास्त काळ तग धरुन रहाते त्या त्या भागाचा 'विकास' होतो. हे विकसित भाग धर्माच्या अधिपत्याखाली वर्णव्यवस्थेची उतरंड तयार करतात, त्याच्या अदृष्य उच्चस्थानी परमेश्वराची, आणी दृष्य उच्चस्थानी पुरोहितांची स्थापना केली जाते. अशी स्थापना झाल्यानंतर ह्या व्यवस्थेचा पहिला रोख असतो तो नैसर्गिक साधनसंपत्ती आणि अन्नव्यवस्थेवर आपले नियंत्रण मिळविण्याचा. महाडच्या तळ्याचेही तेच झाले. त्याच्या चहुबाजुंनी तटबंदी बांधण्यात आली, चारी बाजुंनी त्याला दारे बांधण्यात आली. निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेले पाणी चौकटीत बंद झाले, त्याचे 'चौदार' तळे झाले.

चहुबाजुंनी दारे बंद असलेले हे तळे अर्थात ते 'राखणार्‍यांच्या' दॄष्टीने अभिमानाची गोष्ट होते. महाडमध्ये कधीही पाण्याची ददात नसते, पाण्यावर अस्पृश्यांची सावलीही पडत नाही म्हणुन ते स्वच्छ आणि गोड असते, हे पाणी देवकार्यासाठी वापरणे कसे चांगले आहे अशा अनेक कथा कोकणात सांगितल्या जात. ह्या तळ्याचे पाणी पिण्याची परवानगी तर अस्पृश्यांना नव्हतीच पण त्या तळ्याकडे जाणार्‍या रस्त्यांवरही ते कधी चालत नसत. एरव्ही हा प्रश्न फार गंभीर होता असे नाही. त्या काळच्या गावरचनेप्रमाणे पश्चिमेकडे थोडे अंतर चालत गेल्यास सावित्रीचा प्रवाह लागत असे.

त्याच्या कडेने आणखी थोडे पुढे गेल्यास अस्पृश्यांची पिण्याचे पाणी भरण्याची आणि आणखी पुढे गेल्यास खालच्या बाजुला आंघोळीचीही सोय होती. प्रश्न तेंव्हा सुरु व्हायचा जेंव्हा सावित्रीचे पाणी आटायला लागायचे. उन्हाळ्यात सावित्री आटुन जायची आणि तिच्या मागच्या पश्चिमेकडच्या भागातल्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी रहायचे. पुर्वेकडे उतार जरा तीव्र असल्याने इथे नदी दुभंगायची आणि तिथे पाणीच शिल्लक रहायचे नाही. चैत्राच्या सुरुवातीपासुन वरच्या भागात बनलेले डोह मग जातीच्या उतरंडीनुसार वापरात यायचे. हेही महिनाभर चालायचे आणि मग उरलेसुरले डोहही आटायला लागायचे. पश्चिमेकडे मग आणखी वर जिथे सावित्री तुटते त्या 'तुटकी'च्या भागापर्यंत माणसांना पायपीट करावी लागायची. तिथुन पाणी आणतांना खालच्या वर्गातल्या लोकांना आपल्याजवळ असलेली एकमेव तांब्याची वा पितळेची कळशी वापरावी लागे, कित्येकांकडे तीही नसायची. संस्कृतीसाठी धातुयुग सुरु होउन हजारो वर्षे झालेली असली तरी ह्या धातुसंस्कृतीतला किमान वाटाही ह्या लोकांना मिळालेला नव्हता.

गावच्या अत्यंसंस्कारात वापरली गेलेली धातुची लहानसहान भांडी, कपडे वा गाडगीमडकी ही अस्पृश्य लोकं आपल्या वापरासाठी घेउन जात. त्यातल्याच एखाद्या छोट्याश्या भांड्यात वा गाडग्यात हे डोहातले पाणी भरुन चीर्‍याच्या झोपडीपर्यंत आणले जाई. काहींकडे पिढीजात वापरात असलेला एखादा रांजण असे. वापरुन वापरुन जुन्या झालेल्या त्या रांजणाची पाणी थंड करण्याची क्षमता कधीच संपलेली असे. ह्या रांजणात पिण्याचे पाणी साठवुन ठेवले जाई. छोट्या गाडग्याचा वा धातुच्या कळशीचा फायदा असा की लहानसहान मुलांना त्यातुन पाणी आणने शक्य असे.

कुटुंबातली दोनतीन लहान मुले आणि स्त्रीया लांब डोहावरुन पाणी आणण्याच्या कामातच गर्क असत. हे पाणी आणायला जात असतांना पलिकडच्या रस्त्यावर एक तळे आहे, ज्यात बारमाही पाणी असते आणि ते विशेष कष्ट न करता गावातल्या इतर लोकांना उपलब्ध असते ही माहिती लोकांना होती, पण ते पाणी आपल्या नशिबातच नाही, त्यावर आपला कुठलाही हक्क नाही हा अजाणतेपणाने माहित असलेला नियमही त्यांच्या अंगवळणी पडलेला होता. तिथुन पाणी घेण्याचे प्रयत्न व्हायचेच नाही असे नाही पण नाईलाजातुन झालेल्या ह्या कृत्याचे गंभीर परिणाम पाणी घेणार्‍याला भोगावे लागत, त्यांना ह्या कृत्यासाठी शिक्षा केली जाई. ह्या शिक्षा इतक्या अमानुष असत की त्या तळ्याच्या पाण्याचा मोह पडण्यापेक्षा अस्पृश्यांना त्याची भीतीच जास्त वाटत असावी.

वैशाखात परिस्थीती गंभीर व्हायची. नदी जवळजवळ पुर्ण आटायची आणि डोहही आटायचे किंवा नासुन जायचे. आगोदर गावाच्या वापरासाठी असलेला डोह नासुन गेल्यानंतर अस्पृश्याना उपलब्ध असायचा पण हे नेहमीच व्हायचे असेही नाही. काही डोह हे गावातल्या उच्चभ्रुंच्या कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी वापरले जात असत. 'तुटकी' पासुन आणखी पुढे चालत गेल्यावर 'डबकी' लागायची. ह्या डबक्यातले पाणी गढुळ आणि बरेचसे प्रदुषित असायचे. त्याच्या आसपास मुस्लिमांची वस्ती असल्याने ते पाणी घ्यायला निर्बंध नव्हते पण अतिवापरामुळे पाणी खुपच दुषित होउन जाई. वैशाखाच्या शेवटी शेवटी मग आटुन गेलेल्या नदीचा तळ उकरुन तिथे 'झिरे' उपसले जात आणि त्यात जमा होणारे थेंब थेंब पाणी वाटी अथवा खापराने सोबतच्या भांड्यात जमा करुन मग ते घरी नेले जाई.

झिरा झिरपुन त्याला पाणी लागेपर्यंत लोक इतके तहानलेले असत की ते पाणी निवळुन स्वच्छ व्हायची वाट पहाण्यापर्यंत त्यांच्याकडे वेळ नसायचा. पाण्याचा प्रचंड तुटवडा कधीकधी सगळ्या कुटुंबालाच ह्या झिर्‍यापर्यंत घेउन यायचा. तहान किती प्रखर असु शकते हे ह्या लोकांना हजारो वर्षांपासुन माहिती होते पण ती तहान सहन केली जायची कारण जेष्ठात लवकरच पाउस येणार असायचा. हा पाउस कधीकधी लांबायचा आणि मग घोटभर पाण्यासाठी लोक विहीरीच्या मालकांकडे गयावया करु लागायचे. पाण्यासाठी एखादा जीव इतका लाचार करणे ही इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी.

एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या पंधरा वर्षांत आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा ब्रिटीशांच्या अतिंमतः फायद्यासाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पुढे युद्धात भाग घेणार्‍या ब्रिटनला आवश्यक उत्पादने वेगाने निर्मीत करण्यासाठी एका सुत्रबद्ध समाजाची गरज होती, भारतातला जातीवाद आणि मागास प्रथा अंतिमतः ब्रिटींशाच्या उत्पादनावर थेट परिणाम करीत असल्याने जिल्हापातळीवर आणि किमान घोडागाडीने जोडल्या गेलेल्या विकसित खेड्यांवर ब्रिटीशांनी आपले कायदे शक्य तितक्या प्रभाविपणे लावण्यास सुरुवात केली. इथल्या रुढी परंपरांमधुन भारतीयांना मुक्ती देण्याचा उद्देश मात्र ब्रिटीशांचा नव्हता, आपले साम्राज्य आणि उत्पादन वाढविण्यासाठी रुढीपरंपरांचा उपयोग होत असल्यास ब्रिटीश तो अवश्य करुन घेत होते, कित्येकदा समाजातल्या उच्चवर्णियांकडुन आपल्याला त्रास होउ नये म्हणुन उच्चवर्णियांच्या रुढींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तेजनही देत होते. तरीही प्रशासनावरचा तणाव कमी व्हावा आणि आर्थिक व्यवहार सर्वसंमत होण्यासाठी मुलभुत परस्परव्यवहारही सर्वसंमत होणे गरजेचे असल्याने १९२३ साली तत्कालीन बॉम्बे लेजीस्लेटीव्ह काउंसीलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करु देण्याची कायद्याने परवानगी दिली.

ह्या काळात महाड हे एका अर्थाने महत्वाची नगरपरिषद म्हणुन विकसित होउ लागले होते. तिथुन दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या दासगाव बंदरात मालाची वहातुकही चालायची आणि सैन्याची ये जा असायची. ह्यात कधीकाळी सैन्यात असलेल्या अस्पृश्यांचाही समावेश होता. ह्यातल्या काही सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांच्या कम्युनिटीसाठी लहान मुलांची शाळा आणि प्रथमोपचारासाठी जागाही बांधली होती. मुख्य म्हणजे इथे ब्रिटीश इंडीया सबमरीन टेलीग्राफ कंपनीमार्फत तारेची सोय उपलब्ध होती. इतके सामाजिक परिवर्तन घडत असुनही ह्या लोकांना महाडच्या बाजारात मात्र पिण्याचे पाणी मात्र मिळत नसे, त्यांना तळ्यावरही प्रवेश नव्हता. १९२३ साली पारीत केलेल्या कायद्याचा आधार घेउन महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस ह्यांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी आदेश देउन खुले करविले होते परंतु ह्या निर्णयाला उच्चवर्णियांचा तिव्र विरोध होता. ह्याशिवाय तळ्याच्या आसपास अनेक उच्चवर्णियांचा पहारा व लक्ष असल्याने अस्पृश्यांना ठरवुनही पाणी पिणे शक्य नव्हते.

सुरबानाना टिपणीस ह्यांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे हे ह्या परिस्थीतीवर काहीतरी तोडगा काढुन चवदार तळे सर्व जातीधर्मियांना खुले करता येईल ह्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेउन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे ह्यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणार असला आणि त्यात अनेक परिवर्तनवादी उच्चवर्णियांचा पाठिंबा आणि थेट सहभाग असला तरी पाणी पिण्याचे मुलभुत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होते.

दासगाव बंदरातल्या सुस्थीतील्या अस्पृश्यांखेरीज इतर फाटक्या, दारिद्र्याने ग्रस्त आणि लिखीत भाषेतला कुठलाही जनसंपर्क नसणार्‍या दलित लोकांना सत्याग्रहासाठी एकत्र करणे अवघड काम होते. सत्याग्रहाची रुपरेषा आणि तिचे उद्देश ठरविणेही आवश्यक होते. पाण्याचा सत्याग्रह मुलभूत स्वरुपाचा असणार आहे ह्याची कल्पना स्पष्ट होती. सत्याग्रहानंतर उद्भवणार्‍या संभाव्य हिंसक प्रतिक्रीयेवर नेमकी काय पुनःप्रतिक्रीया असावी ह्याचाही विचार करणे आवश्यक होते. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या ह्या संभाव्य सत्याग्रहासाठी एकुण चार वर्षे विचारमंथन आणि पुर्वतयारी चालु होती. १९२७ साली आपण पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह करणार असल्याबद्दल आंबेडकरांनी अधिकृत घोषणा केली. ह्या सत्याग्रहासाठी महाड हे ठिकाण निश्चित करण्यात आले.

सत्याग्रहात जी.एन, सहस्त्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण समाजाचे सुधारक, ए.व्ही चित्रे हे चांद्रसेनिय कायस्थ प्रभुंचे समाजसुधारक, आणि ह्याच समाजाचे दुसरे सुरबानाना टिपणीस हे महाड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष थेट सहभागी असणार होते. २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. एक सार्वजनिक सभा घेउन सुरबानाना टिपणीस ह्यांनी सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि तळी अस्पृश्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि बाबासाहेब आंबेडकरांना ह्याबाबत नेतृत्व करण्याचे आवाहन केले, आंबेडकरांनी सभेचे नेतृत्व करुन चवदार तळ्याकडे पायी चालण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ तीन हजार अस्पृश्य लोकांचा जमाव चालु लागला ज्यात काही मुस्लीम लोकांचाही समावेश होता. लवकरच हा जमाव चवदार तळ्यावर पोहचला. चवदार तळ्याच्या पायर्‍या उतरत आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेउन ते पाणी सावकाश प्यायले.




 


चवदार तळ्यांच्या उजव्या बाजुच्या पायर्‍यांचे सद्य बांधकाम आता थोडे बदलेले असले तरी त्या पायर्‍या उतरुन खाली तळ्याकडे जातांना सद्भावना असलेला कुठलाही माणुस शहारतो. महाड गावची स्थानिक हवा चवदार तळ्याच्या पायर्‍यांच्या आडोश्याच्या भागात एक विशिष्ट वातावरण तयार करते. ह्या जागेला इतिहास नसता तरी तळ्याचा पायर्‍या उतरुन पाण्याला पहिला स्पर्श करण्याची अनुभूती मानवी भावनांचा अभ्यास करणार्‍या लोकांसाठी विशेषच राहिली असती. त्या पायर्‍यांना जगातल्या अत्यंत मुलभुत संघर्षाची जोड मिळाल्याने त्यांच्यावरुन उतरुन खाली जातांना येणारा अनुभव हा अनेकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अनुभव आहे. ह्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या वर्गातल्या पुर्वास्पृश्य लोकांना ह्या पायर्‍या उतरतांना आजही अंगावर शहारा येतो. ह्या शहार्‍याचे दुसरे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. आंबेडकरांनी फक्त नवा इतिहासच नाही तर नवा भुगोलही घडविला आणि हा इतिहास-भुगोल इत्यंभुत माहिती करुन घेणार्‍यांसाठी त्या शहार्‍यातुन नव्या युगाच्या माणसाच्या स्वतंत्र मानसिकताही घडवली.

आंबेडकरांनी सुरु केलेला पाण्याचा संघर्ष आज एका नव्या टप्प्यात असुन फक्त श्रीमंतांना परवडणारे बाटलीबंद पाणी हे नवे चवदार तळे आहे. सावित्रीसह भारतातल्या इतर सर्व नद्यांचे पाणी हे प्रचंड प्रदुषित झाले असुन त्यांतल्या कोणत्याही नदीचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. भारतातले अनेक झरे कायमस्वरुपी आटत चालले असुन तळ्यांची संख्या कमी होत आहे, तळी दुषित होत आहेत, काही ठिकाणी ती पुर्णतः कोरडी पडली आहे. केमीकल्स आणि सांडपाण्याने दुषित झालेले पाणी आजही कोट्यावधी लोकांना प्यावे लागत आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक लोकांना चवदार तळ्याच्या सत्याग्रहापुर्वीच्या परिस्थीत जीवन जगावे लागते आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचा मुलभुत संघर्ष पुन्हा करण्याची नितांत गरज असुनही आता आपल्याकडे कॉ.रामचंद्र मोरे, सुरबानाना टिपणीस, जी.एन सहस्त्रबुद्धे किंवा भाई चित्रे नाहीत. 'पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी' जगातला पहिला संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे नाहीत.

- राहुल बनसोडे (नाशिक)

Tags:    

Similar News