मृत्यूसंग !

हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना काय शिकवते? विज्ञान आणि अध्यात्मातील फरक काय? ‘सत्संग’ शब्दाचा अर्थ काय? हे बाबालोक जनतेला कशी भुरळ घालतात? भक्त कसे तयार होतात? लोकांना अंधारात ठेवण्याचं काम कोण करतंय? वाचा डाॅ. प्रदीप पाटील यांचे तर्कशील विश्लेषण…

Update: 2024-07-05 09:24 GMT

सतसंग म्हणजे भली संगत.

सत म्हणजे सत्य.

संग म्हणजे संगतीला लागलेल्यांचा संघ.

साधू, महात्मा, गुरू, महाराज यांची संगत.

सत्य हे शोधून काढण्याचे काम आजअखेर विज्ञानाने केले आहे. अध्यात्माने नाही. जे अध्यात्म "सुपर नॅचरल पाॅवर" किंवा 'देवाला' मानते ती पॉवर किंवा देव अध्यात्म सिद्ध करू शकलेले नाही. ती एक थाप आहे.

एवढेच नव्हे तर विश्वातील प्रत्येक गोष्टी मागील सत्य शोधून काढण्याचे काम हे अध्यात्माने नव्हे तर विज्ञानाने केले आहे.

विज्ञान असा दावा मुळीच करत नाही की विश्वातले सर्व ज्ञान मी शोधून काढले आहे. पण सत्संगवाले मात्र बेधडक ठोकून देतात की, विश्वातले सर्व ज्ञान हे आम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी तुम्ही आमची संगत धरा. गुरू म्हणजे सर्वज्ञानी! वास्तवात संपूर्ण ज्ञान एकाकडे असते हा मोठ्ठा जोक आहे.

विज्ञानाने मात्र आज अखेर बहुसंख्य सत्त्ये उघडकीस आणली आहेत! जेव्हा सत्य म्हणजे नेमके काय असे विचारले जाते तेव्हा हे सत्संग वाले नेहमी...

सत्य म्हणजे ब्रह्मा आणि त्या पलीकडे काही नाही एवढीच वैचारिक उडी मारतात!! सत्संग करणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करणाऱ्याला 'सतगुरु' असे म्हणतात आणि हा गुरु मार्गदर्शन करण्यासाठी 'भक्ती' हवी असे म्हणतो. कुठलेही सत्य शोधायला भक्ती हवी असे म्हणणे अवैज्ञानिक आहे. खरंतर उलटे आहे. कुठलेही सत्य शोधण्यासाठी भक्ती नव्हे तर चिकित्सेची गरज असते. त्या ठिकाणी तपासण्याची गरज असते. प्रश्न विचारण्याची गरज असते. तेव्हा कुठे सत्य हाती लागते. पण सतगुरु यांनाही प्रश्न विचारायचे नसतात.. त्यांच्या अध्यात्मालाही प्रश्न विचारायचे नसतात.. आणि चिकित्सा तर अजिबात करायची नसते. आणि जर चिकित्सा करणारे कोणी असतील तर त्यांना विचारजंत म्हणून हिणवायचे असते!

म्हणजे थोडक्यात सत्याचा शोध घेण्याची कुवत ना सतगुरु मध्ये आहे ना सत्संगामध्ये आहे. सत्संग म्हणजे नुसते भक्तांना घेऊन जोडलेले प्रवचन असते. या प्रवचनामध्ये सत-चित्त-आनंद अशी शब्दांची उधळण असते. सत् याची फोड करताना प्रत्येक सद्गुरु वेगवेगळा अर्थ सांगत असतो..

जसे की,

सत म्हणजे ब्रह्मा.

सत म्हणजे काळ आणि अवकाश आणि आपण याच्या पलीकडे असलेले ते.

सत म्हणजे विश्वाला व्यापून राहते ते.

विश्वाचा आत्मा म्हणजे सत्य.

सत म्हणजे जे कधीच बदलत नाही. सनातन.

सत म्हणजे शाश्वत.

सत म्हणजे ज्याच्यात विकृती नाही ते.

यातील प्रत्येक म्हणण्याला प्रश्न विचारले तर त्यातील फोलपणा सहज लक्षात येतो.

उदाहरणार्थ,

ब्रम्हा म्हणजे काय? त्याचे उत्तर वेद, उपनिषदे आणि धर्मगुरू यांच्यात वेगवेगळे आहे. एकाचा अर्थ दुसर्याला मान्य नाही असेही आहे. हे विज्ञान नव्हे. या आहेत निव्वळ कल्पना! मतामतांची बजबजपुरी.

बृहदारण्यक उपनिषदामध्ये सत्याविषयी म्हटले आहे की, 'असतो मा सद्गमया...', म्हणजे भ्रमा कडून मला सत्याकडे घेऊन चल, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमर्त्यपणाकडे. एवढा मंत्र म्हंटले म्हणून काही सत्य सापडत नाही.

हे सत्य, सत्संगवाल्यांना सापडले आहे ते एक ठिकाण आहे. ते म्हणजे "सत्यलोकात". किंवा "ब्रह्मलोकांमध्ये". हे एक असे ठिकाण आहे की जे मानवलोक म्हणजे आपणापासून ६०००००० हजार मैल उंचीवर आहे आणि त्या ठिकाणी ब्रम्ह्याचे घर आहे. आणि जे स्वर्गाच्या ही वर आहे. जिथे ब्रह्मा राहतो. ब्रह्मचारी राहतात, योगी आणि योगिनी राहतात आणि जिथे मृत्यू कोणालाच कधी येत नाही!! यासारख्या "सवंग व असिद्ध कल्पना" म्हणजे सत्य, असे वर्षानुवर्षे सांगण्यात आले आहे. वास्तवात जर सत्य म्हणून हे सिद्ध करायचे असेल तर वर अवकाशात जाऊन सत्संग वाल्यांनी ते सिद्ध करायला हवे किंवा त्यांनी अशी साधने निर्माण करायला हवी की जे पुरावे म्हणून हे त्यांनी सांगितलेले तथाकथित सत्य सिद्ध होईल. त्याचे आधार कार्ड ही बनेल.

विज्ञानाने मात्र सत्याचा शोध घेताना अवकाशात भरारी घेतली आहे आणि अनेक ग्रहमाला एवढेच नव्हे तर विश्वातील तारक मंडळे देखील शोधून काढली आहेत. आणि याच सत्संग वाल्यांच्या धर्माने सांगितलेल्या ज्योतिष शास्त्रातील कल्पना कशा खोट्या होत्या हे दाखवून दिले आहे.

विज्ञान जे सत्य सांगते ते व्यवस्थित वैज्ञानिक प्रयोग करून, त्याचे अचूक निष्कर्ष काढून. अनेक पुरावे गोळा करून. आणि ते सत्य सहजगत्या कोणालाही तपासून पाहता येते व सिद्धही करता येते असे असते. म्हणजे या ठिकाणी सत्य उघडे आहे आणि विज्ञान म्हणते की सत्यामध्ये वास्तवता आहे, भ्रम नाही, कल्पना नाही, किंवा हवेतल्या भराऱ्या नाहीत.

सत्संग वाले जेव्हा हवेतल्या भराऱ्या सांगत सुटतात तेव्हा विज्ञान माहीत नसलेल्या जनतेला आणि चिकित्सा करावी कशी हे न शिकलेल्या जनतेला भक्त बनण्याची पाळी येते. आणि मग सद्गुरु जे सांगेल तेच सत्य असे म्हणण्याची आफत ओढवते.

जनतेचा अशा पद्धतीचा असलेला दृष्टिकोन सद्गुरु बेमालूमपणे वापरतात आणि सत्संगाचे मेळाव्याच्या मेळावे घेतात. यातून प्रचंड पैसा कमावतात. स्वतःचे प्रचंड मोठे मठ उभारतात. आणि ऐश्वर्याचे जीवन जगतात. थोडक्यात "सत्" याचा वापर करून स्वतःचेच चित्त व आनंद आयुष्यभर भोगत राहतात. आणि भक्त मात्र आयुष्यभर मेळाव्यात चिरडून मरत राहतो. किंवा आयुष्यात निर्माण झालेल्या संकटांना तोंड देण्याची क्षमता गमावून बसतो.

सत्संग वाले भक्तीचा वापर करून भक्तांचे मानसिक खच्चीकरण करत असतात हे उघड सत्य आहे. सत्संग केल्याने मानसिक बळ मिळते ही उठवलेली अफवा आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सा हेच आपल्याला मानसिक बळ देतात आणि आपल्याला पुराव्यासहित सत्य शोधून देतात.

कोणतेही वैज्ञानिक सत्संग किंवा मेळावे घेत नाहीत. कारण लोकांना अंधारात ठेवण्याचे काम वैज्ञानिक करत नसतात. उजेड देण्याचे काम करतात. पण वैज्ञानिकांनी दिलेला उजेड घेऊन लोक मात्र पुन्हा अंधारात जातात! आणि सत्संग म्हणत भजनात लीन होतात हे विदारक वास्तव आज भारतामध्ये आहे. आणि या वास्तवाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम इथल्या राजकारण्यांनी आणि राजकारणाने केले आहे. लोकांचे जीव जात राहतील पण सद्गुरु आणि राजकारणी यांना त्याचे काहीच देणे घेणे नाही हे मात्र खरे!

Tags:    

Similar News