हरीभाऊ तुमची आज गरज होती - सुभाष वारे

म. फुले यांच्या सत्यशोधक विचारांसाठी अभ्यासक, संशोधक आणि प्रचारक म्हणून तिहेरी भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या हरीभाऊंची उणीव आता फार तीव्रतेने जाणवणार आहे.

Update: 2023-08-11 14:05 GMT


हरी नरके यांचं अकाली जाणं चटका लावणारं आहे. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे अशा आध्यात्मिक समजूतीनं हलकं होईल असं हे दुःख नाही. विचारांचा अंत झालाय, विचारसरणी कालबाह्य झाल्यात असा हितसंबंधियांचा पुकारा सतत सुरु आहे. तो खराच वाटावा अशा राजकीय आणि वैचारिक कोलांटउड्या आजूबाजूला दररोज अनुभवायला मिळत असतानाच्या काळात, विचार महत्वाचे असतातच आणि विचारांच्या पुरस्कारासाठी अभ्यास करून, संदर्भ देत रोखठोक भूमिका घेणेही महत्वाचे असते असे स्वतःच्या लिखाणातून, बोलण्यातून दाखवून देणाऱ्या हरीभाऊंच मोल फार फार होतं. एका बाजूला धार्मिक कट्टरतावाद रस्त्यावर उन्मादी धुमाकूळ घालत असताना आणि दुसऱ्या बाजूला पूरोहितशाहीच्या पोटापाण्याची सोय म्हणून मोठ्या हुशारीने रुजवलेल्या धार्मिक कर्मकांडाला सर्रास बळी पडणारा बहुजन समाज जागोजागी दिसत असताना म. फुले यांच्या सत्यशोधक विचारांसाठी अभ्यासक, संशोधक आणि प्रचारक म्हणून तिहेरी भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या हरीभाऊंची उणीव आता फार तीव्रतेने जाणवणार आहे.

हरीभाऊंचं बालपण खडतर होतं. घरात शिक्षणाची परंपरा नव्हती, बहुजन कष्टकऱ्यांच्या घरात आजही दारिद्र्याचीच चलती असते तर हरीभाऊंच्या लहानपणी ती दारिद्र्याची छाया अधिक गडद होती. त्यांच्या घराजवळ रहाणाऱ्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका,.संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीनं प्रेरित झालेल्या शांतामावशींनी हरीभाऊंच्या शिक्षणाचा आग्रह त्यांच्या आईकडे धरला आणि हरीभाऊ शिकले. अंगभूत अशा हुशारीने व सोबतच्या धडपड्या स्वभावाने सर्व प्रतिकुलतेवर मात करत हरीभाऊ शिकत राहिले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा गाजवल्या. पण अशा स्पर्धांमधे चमकणाऱ्या अनेकांना वैचारिक बांधिलकी ही काय चीज आहे हे माहितीही नसतं. हरीभाऊ मात्र वक्तृत्व स्पर्धांकडेही फुले आंबेडकरी विचारांच्या प्रसाराचं साधन म्हणून पहात होते. वादविवाद स्पर्धांमधील प्रतिवादाचं कौशल्य सत्यशोधकी विचारांच्या प्रसारासाठी वापरत होते. तर्कशुध्द पध्दतीने आणि अभ्यासाच्या आधारे विरोधकांचा आक्रमक प्रतिवाद करण्याकडे त्यांचा कल असायचा. वैचारिक भूमिका घेताना वादांची वादळे अंगावर घ्यायला ते कधी बिचकले नाहीत. जे पटत नाही ते ठामपणे सांगताना कुणालाही शिंगावर घ्यायला घाबरले नाहीत. आपल्या कौटुंबिक गरीबीच्या पार्श्वभूमीचा आपल्या आत्मविश्वासावर त्यांनी कधी परिणाम होऊ दिला नाही.

म. फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांचे विचार आणि कार्याचा चालताबोलता शब्दकोष म्हणून हरीभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यासाठी त्यांनी अफाट वाचन केले, अनेक संदर्भ तपासले व जगासमोर आणले. म. फुले समग्र वाड़मय प्रकाशित व्हावं, त्यासाठी संशोधन व्हावं, सत्यशोधक चळवळीचा इतिहास शब्दबध्द व्हावा यासाठी सत्यशोधक डाॕ बाबा आढाव सतत प्रयत्न करत राहिले आणि आजही करत आहेत. बाबांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणता येईल अशा हरीभाऊंनी हे काम आणखी ताकदीने पुढे नेले. एखाद्या विचारांसाठी चळवळींनी भूमिका घेणे महत्वाचेच आणि त्या विचारांना राजसत्तेची मान्यता मिळणे हे त्याहून महत्वाचे हे हरीभाऊंनी जाणले होते. म्हणून सत्यशोधक विचारांचा अभ्यास व प्रसारासाठी शासनामार्फतच अनेक गोष्टी व्हाव्यात यासाठी ते न थकता पाठपूरावा करत आणि त्यातील कितीतरी गोष्टी घडवून आणतं. हे करताना स्वतः अखंडपणे लिहीत राहिले.

विचारांच्या प्रसारासाठी लेख, पुस्तके, भाषणे, शिबीरे, परिषदांचे आपले एक महत्व आहे. पण विचार प्रसाचाचा परीघ जर अमर्याद विस्तारायचा असेल तर नाटक, चित्रपट, दैनंदिन मालिका या माध्यमांचं महत्व कितीतरी पट जास्त आहे आणि पूरोगामी चळवळ त्याकडे दुर्लक्ष करते अशी त्यांची सतत तक्रार असायची. पण ते नुसती तक्रार करून थांबले नाहीत तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, जोतिबा फुले यांच्या विचारांना जगासमोर आणणाऱ्या दूरदर्शन मालिकांसाठी संशोधक म्हणून सहकार्य केले, त्यासाठी मेहनत घेतली. अशा मालिका आशयाच्या दृष्टीने निर्दोष आणि नेमक्या असतील हे पाहिले. पण आपल्यासहित अशा मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक एवढी मेहनत घेत असताना, धाडस करत असताना प्रेक्षकवर्गाच्या प्रतिसादाअभावी अशा मालिका पुढे जात नाहीत याबद्दल ते जाहीरपणे त्रागा करायचे. बहुजन समाज, पूरोगामी चळवळ यांनी या बाबी गांभीर्याने घ्याव्यात यासाठी प्रसंगी कडवटपणे व्यक्त व्हायचे. त्यांची मुलगी प्रमिती हिचा त्यांना खूप अभिमान होता. विचार प्रसार करणाऱ्या मालिकांमधील तिचा अभिनय, तिची भूमिका याबद्दल ते सतत लिहायचे, बोलायचे. त्यांना स्वतःबद्दल बोलायला, लिहायलाही आवडायचे. बहुजन कष्टकरी वर्गातून आलेल्यांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी केवळ अभ्यास, संशोधन, लिखाणंं आणि भाषणं एवढं पूरत नाही तर स्वतःबद्दल सतत बोलत रहाव लागत हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही.

हरीभाऊंच्या तब्येतीच्या काही गंभीर तक्रारी आहेत हे जाणवत होतं. बोलताना त्यांना त्रास व्हायचा. चेहरा आजारपण दाखवत होता. अलीकडील त्यांच्या लिखाणातही एक प्रकारचा चिडचिडेपणा जाणवत होता. तो आजारामूळे होणाऱ्या त्रासाचाच परिणाम असणार. पण अलीकडेच एका डाॕक्टरांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून योग्य उपचार सुरू केले होते व त्या उपचारांचा सकारात्मक परिणामही जाणवायला लागला होता हे त्यांनी स्वतःच समाजमाध्यमांवरती लिहीले होते. भेटायचे तेव्हा उत्साहात बोलायचे. आजारावर मी मात करणार असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. पण शेवटी आजाराने हरीभाऊंच्या निर्धारावर मात केली. इथलं उरलेलं काम आपल्यावर सोपवून हरीभाऊ निर्मिकाच्या ओढीनं आपल्यातून निघून गेले.

कष्टकऱ्यांचा सन्मान राखला जाईल आणि कष्टकऱ्यांच्या घामाची योग्य किंमत त्यांना मिळावी यासाठी सतत कार्यरत रहाणं, सर्जक समुहांनी आपली शक्ती ओळखावी, आपल्यातील नवनिर्माणकारी कौशल्ये ओळखावीत, आपल्या जगण्याचे निर्णय स्वतःच घ्यावेत, पूरोहितशाहीनं लादलेली मानसिक गुलामगिरी झुगारून द्यावी यासाठी आपण सतत काम करत राहू. हरीभाऊंना तेच आवडेल.

Tags:    

Similar News