माय डियर बाळासाहेब…
उद्धव ठाकरेंनी मंदिर उघडण्यास नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्र... नक्की वाचा...;
ओळखलं की नाही... मी भगतसिंग... तुम्ही हिंदू मी हिंदू... तुम्ही हिंदुत्ववादी मी ही हिंदुत्ववादी... आपण... अं... काय म्हणालात? मी नास्तिक होतो... नाही नाही बाळासाहेब, तो भगतसिंग नास्तिक होता... मी नाही... मी कट्टर हिंदुत्ववादी... काळी टोपी घालतो... सतत... पायखान्यात ही काढत नाही आणि शपथविधीलाही काढत नाही... काय म्हणालात? झोपताना? अहो मी झोपतही नाही. फडणवीस आणि अजितदादा केव्हाही येतील आणि सत्तास्थापनेचा दावा करतील. असं मला सतत वाटत असतं. तर असो... आज मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा. तुमच्या मुलाचं काही करा हो. मला उलटून बोलतोय. काय झालं म्हणून काय विचारताय... मी त्याला मंदिरं उघड म्हणून सांगितलं तर म्हणतो कसा लबाड... मला नका शिकवू हिंदुत्व. मला नको म्हणे तुमचं सर्टिफिकेट... आता बोला...
आपण मांडीला मांडी लावून सत्तेत आलो... बसलो... प्रॉपर्टी बनवली आणि... आणि हे कालचं पोर त्या म्हाताऱ्याच्या मागं लागून आपल्याला अक्कल शिकवतंय. मी म्हणतो त्याला सेक्युलर होताना लाज कशी वाटली नाही? काय म्हणालात? घटना... आयला हाथरस ची घटना म्हणताय का? काय भारतीय घटना? अच्छा अच्छा... घटनेत सेक्युलर शब्द आहे, मान्य आहे. पण आम्हीच खरे सेक्युलर हे मोहनजींनी सांगितलं आहे आणि ती काळ्या टोपीवरची... मेरा मतलब है... काळ्या दगडावरची रेघ आहे.
भारतात हिंदू खुश असो की नसो, मुसलमान खूप खुश आहेत... मोहनजींनी सांगितलं आहे. म्हणजे खरंच असणार. बाकी ती तनिष्कची जाहिरात काही हिंदुत्ववादी लांडग्यांच्या धमक्यांनी घाबरून मागे घ्यायला नको होती. असं माझं प्रांजळ मत आहे... काय म्हणालात? हे काय बोलताय? असली वाक्यं फेकायची असतात हो...
आता मला सांगा... कंगना माझ्याकडे आली, यांच्याकडे गेली नाही. म्हणून इतकं जळणं योग्य आहे का? फिल्म इंडस्ट्री काय त्याच्या बापाची... मेरा मतलब है... समझा करो बाळासाहेब... माझा तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. बोलण्याच्या ओघात आलं ते... असो सॉरी फॉर दॅट...
तुम्ही त्याला मैद्याचं पोतं म्हणून हिणवायचात आणि त्याच पोत्यात हा किडा आता वळवळतोय. हिंदुत्वाची शप्पथ... तुमच्या या किड्याकडून... मेरा मतलब है... उद्धवकडून ही अपेक्षा नव्हती. त्याला शपथ देताना अस्सा राग येत होता म्हणून सांगू... पण सत्तेशी जुळवून घेण्याची आमच्या काळ्या टोपीची परंपरा आठवली आणि गप्प राहिलो... आणि शपथ दिली. असो.
आता तुम्हाला काय झालं ते सांगतो. मी उद्धवला तू ही फेक्युलर झालाय का? असं लिहिलं होतं. ते पत्र मोदींच्या हातात पडलं आणि त्यांनी फेक्युलर चं सेक्युलर केलं. ध चा मा करायची आमची जुनी परंपरा तुम्हास माहिती आहेच. जीनांना सेक्युलर म्हणणाऱ्या आमच्या ज्येष्ठ नेत्याचे कसे हाल केले ते तुम्ही बघता आहातच. तेव्हाचपासून मी सेक्युलर शब्द वापरणं टाळतो.
बाळासाहेब... बार उघडले, दारूची दुकानं उघडलीत, सगळं मार्केट उघडलं, बसेस सुरू झाल्या... मग मंदिरं उघडायला याच्या 'बा' चं काय जातंय? सॉरी सॉरी... ह्या सोशल मीडियामुळे आयटी सेलचीच भाषा येते हो तोंडात.
मंदिरात गर्दी झाली आणि कोरोनाचा प्रकोप वाढला तर त्याची जबाबदारी या राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून मी घ्यायला तयार आहे. काय म्हणालात? प्रकोप वाढला तर काय करीन? प्रकोप वाढला तर राष्ट्रपती शासनाची शिफारस करीन आणि मी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाईन. काय म्हणालात? बौद्धिक प्रमुख होऊ... झालो असतो हो. पण सारासार बुद्धी असणाऱ्याला बौद्धिक प्रमुख नेमण्याची आमची परंपरा नाही. पण काही सांगता येत नाही, मोदींनी ठरवलं तर ते ही शक्य आहे. देशातल्या सगळ्या संघटना सध्या मोदी म्हणतील तशा चालतात हे माहीतच आहे तुम्हाला.
शेवटी एकच सांगणं आहे, उद्धवला जरा समजावा. आपले ते जुने दिवस आठवा. सेना-भाजपा हिंदुत्ववादी युतीचे. ती आंदोलनं, ते दंगे, बाबरी मशीद पाडणं, ते राडे, त्या धमक्या, ती जहाल ठाकरी शैलीतली भाषणं... आणि हा काय मिळमिळीत वागतोय, बोलतोय......शोभतं का हे असलं वागणं तुमच्या मुलाला? चराचरात देव असतो त्यामुळे मंदिरांची गरज नाही वैगरे आध्यात्मिक प्रवचने मला देऊ नका, मंदिरांची कोट्यवधी रुपयांची अर्थव्यवस्था असते, ती ठप्प झालीय.
'मंदिर वही बनाएंगे' असे नारे लावणाऱ्या लोकांनी मंदिरं बंद ठेवणं शोभत नाही हो. महाराष्ट्रात इतर अनेक प्रश्न असतील, ते सुटो न सुटो... पण मंदिरांचा प्रश्न सुटणं माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी पत्र लिहिलं त्याला. पण तो उलटून बोलला. म्हणून तुम्हाला लिहायचं ठरवलं. तुमच्याकडून न्याय मिळेल ही अपेक्षा. कारण तुम्ही त्याच्यासारखेच वागलात तर मला प्रबोधनकारांना पत्र लिहिता यायचं नाही. त्यांच्यापुढे मंदिराचा म जरी उच्चारला तरी पेकाटात की काय म्हणतात तिथे लाथ बसण्याची ग्यारंटी आहे म्हणे. मला या वयात तसलं काही व्हायला नको आहे. म्हणून आपणच माझी अपेक्षा पूर्ण करून उद्धवास महाराष्ट्रातली मंदिरं उघडायला सांगा. त्यासाठी तुम्हाला आणि त्यालाही जे काही लागेल ते देण्याची माझी तयारी आहे, हा माझा शब्द आहे.
कळावे लोभ असावा....
आपला
भगतसिंग मंदिरवाले
ता.क. मंदिरांचे दरवाजे उघडण्याच्या दिवशी टोकन म्हणून सिद्धिविनायक मंदिरात एक उद्घाटन समारंभ करण्याचे योजिले आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती विजय माल्या यांनी त्या कार्यक्रमास स्काईपद्वारे उपस्थित राहण्याचे कबूल केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे 'मंदिराचे महत्व' या विषयावर भाषण होईल आणि त्यानंतर अमृता फडणवीस यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल.