अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे पुन्हा हिंदू झाले : रफ़ीक मुल्ला
राज ठाकरे पुन्हा हिंदू झाले..अर्थात ते धार्मिक होतेच, धर्माने हिंदू आहेतच मात्र मुस्लिमांची मदत घेणारे टिपिकल हिंदुत्ववाले हिंदू नव्हते. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बदलत्या भुमिकांविषयी परखड भाष्य केलं आहे पत्रकार रफीक मुल्ला यांनी...
अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे पुन्हा हिंदू झाले..अर्थात ते धार्मिक होतेच, धर्माने हिंदू आहेतच मात्र मुस्लिमांची मदत घेणारे टिपिकल हिंदुत्ववाले हिंदू नव्हते..मधल्या काळात विकासवाले चांगले हिंदू झाले आणि नंतर आपले आजोबा प्रबोधनकार यांचा वरसा सांगणारे विज्ञानवादी हिंदू- ज्यांना अगदी छत्रपती शिवाजीराजेंचे अरबी समुद्रातील स्मारकही नको होते. राजकारणात जात-धर्म काढणे ज्यांना पाप वाटे..नंतर मग ते झाले प्रतिक्रीयावादी हिंदू..
नंतर काहीकाळाने महाराष्ट्रधर्म वाढवणारे मराठी हिंदू, त्यानंतर शांततावादी (स्वत: शांत राहिलेले/झालेले) काहीसे निराशावादी आणि आता पुन्हा हिंदुत्ववादी..आता हे त्यांचे हिंदुत्व शिवसेनेत होते ते की भाजपवाले हिंदुत्व की थेट बजरंग दल, हिंदू रक्षक दलवाले हिंदू ते काळाच्या ओघात स्पष्ट होईलच..पण त्यांच्याकडे पर्यायही नव्हता, राज ठाकरे यांच्या सोबत विविध विषयावर चर्चा करणारे सांगू शकतील की हा निर्णय त्यांनी विलंबाने आणि नाईलाजाने घेतला आहे, अन्यथा शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तेव्हाच तातडीने यांनी हा विषय घेऊन राज्य पिंजून काढले असते.
हिंदुत्वाचा मुद्दा हातातून जातोय की काय या भितीने शिवसेना नेतृत्व कायम धास्तावलेले दिसले असते..भाजपसाठी सरकार पाडण्याचा विषय आणखी सोपा झाला असता..मोठा कालावधी राज यांनी राजकीय वनवासात घालवला आहे- काही केल्या संघटनेत उत्साह भरेल असे दिवस येत नव्हते..त्यांच्यासारखी सर्वसमावेशक भूमिका घेणारे पायलीचे पन्नास पक्ष आहेत, आहे तो उदारमतवादी मतदार त्यांच्यात विभागला जातो..आतापर्यत कडक मराठी भुमिका घ्यावी तर शिवसेना त्यात मोठी वाटेकरी आणि विषय मुंबई पुरता मर्यादीत, त्यातही मराठी मतदार तिथे विस्कळीत झाल्याने पक्ष विस्तारालाही फार जागा नाही...
बदललेल्या स्थितीत कडक हिंदुत्व घ्यावं तर पुन्हा भाजप आणि शिवसेना त्या विचाराच्या मतदारांमध्ये मोठे वाटेकरी..! मागे एकदा बोलताना...'मी वाया चाललोय, मला लोक अक्षरशः वाया घालवत आहेत..' ही खंत त्यांनी बोलून दाखवली..'या देशात मुस्लिमांना आणखी किती दाबणार आहात, कधीतरी भडका उडेल..' ही भावनाही त्यांचीच..पण राजकारण करायचे असेल तर निर्दयी व्हावे लागते..राज यांचा अमिताभ बच्चन हा सर्वाधिक आवडता नायक, इतका की त्याची स्टाईल अक्षरशः त्यांच्या व्यक्तिमत्वात भिनली आहे, त्यांच्या मुलाचे अमित हे नावही त्याच आवडीतून ठेवले गेलेय..पण जेव्हा नवा पक्ष काढला, मराठीचा मुद्दा उचलण्याचे नियोजन केले, तेव्हा हाच महानायक प्रांतवाद करताना आयता सापडला, मग त्यांनीही संधी सोडली नाही.
मराठीच्या मद्द्यावर अमिताभला इतके चापले की ते महानायका ऐवजी सामान्य भैय्या वाटू लागले.. राजकारणा हा संधी साधण्याचा खेळ आहे, संधी निर्माण करण्याची कलाही लागते, अशा संधीचे सोने करणारे नेते लोकप्रिय होतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धार्मिक होते का..? खरंच हिंदुत्व हा मुद्दा शिवसेनेचा आत्मा आहे का..? भाजपला देश आणि राम मंदीराबद्दल खरंच इतरांपेक्षा अधिक आस्था आहे का..? या प्रश्नांची उत्तरं शोधायला एखादी घटना पूरेशी आहे. मुलाच्या आणि मिनाताईंच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांनी रूद्राक्षाच्या माळा अक्षरशः फेकून दिल्या होत्या, तशी स्पष्ट कबुली दिली होती..! कठोर धर्म चिकित्सक प्रबोधनकार ठाकरे यांचे वंशज असणे त्यातच सगळे काही आले. भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा हा अधिक भयंकर आहे, उत्तर भारतातून उभा राहिल्याने अधिक बटबटीत असणे स्वाभाविक आहे, पण स्वातंत्र्यलढ्यात कसलेही योगदान नाही- यापासून ते मंदीराच्या ठिकाणी झालेला जमीन घोटाळा, 90 च्या दशकात जमा मंदीरासाठी जमा केलेला पैसा गेला कुठे..? अशा अनेक पैलूतून मांडणी केली तर राजकारणासाठी वापरलेले मुद्दे यापलीकडे काही शिल्लक राहिलेले दिसत नाही.
याचा आणखी पुरावा असा की, विरोधकांना नेस्तनाबूत करणे हा भाजपचा अनेक पैकी एक अजेंडा असतो. मुस्लिम विरोध हा जरी त्याचा चेहरा असला तरी विरोधक मुख्यतः हिंदूच आहेत..मोदी-शहांचे मुख्य विरोधक कोण..? एमआयएमचे ओवेसी बंधू की राहुल-ममता-पवार-उद्धव..? स्वपक्षीय विरोधक त्यांनी संपवले नाहीत का..? ते मुस्लिम होते का..? ओविसींचा कारभार मोठा आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टैक्स कुणीच तिकडे का फिरकत नाही..! थोडक्यात, राजकारणातले विषय हे सत्ता मिळवण्याच्या हिशोबाने मांडले जातात, त्यानुसार भुमिका बदलत जातात..एकेकाळी अस्पृश्य असलेल्या भाजपाची नंतर सर्व सेक्युलर म्हणवणा-या पक्षांनी सोबत केली आणि मधला अपवाद वगळता भाजप डाव जिंकत राहीला..
तसंच सोय किवा गरज म्हणून बदलत्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आगामी निवडणुकांची आखणी केलीय, भाजपसोबत गाठ बांधण्याची तयारी स्पष्ट दिसतेय, पण ते ही स्थितीनुसार ठरेल- तुर्तास आघाडी आणि मुख्यतः शिवसेना त्यांच्या रडारवर आहेत, पण यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. त्यांच्याकडे पर्यायही नाहीत, शिवसेना कमजोर झाली तरच त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अच्छे दिन येणार आहेत..राज्यात प्रमुख चार पक्ष आहेत, त्यांनी आपापली प्रभाव क्षेत्रे निर्माण केली आहेत, या स्पर्धेत गुणवत्ता, योजना आणि विचार असुनही मनसेला जागा मिळत नाही, यामध्ये राज ठाकरे यांची मोठी चुक आहेच, त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात फक्त शिवसेनेला पराभूत करण्याचं लक्ष्य ठेवलं, त्यामुळे सुरुवातीला कॉंग्रेसला फायदा मिळाला आणि शिवसेना-भाजपनं कॉंग्रेसची बी टिम म्हणून त्यांच्यावर टिका केली, ती जनतेपर्यंत पोहोचली, त्यातून मनसेचा प्रभाव कमी कमी होत गेला.
कदाचित नंतरही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आणि मनसेचा एकमेकांचा फायदा मिळत गेला असता पण 'एक मारा पर सॉलिड मारा..' विधानसभेच्या 13 जागा जिंकल्यावर, शिवसेनाप्रमुख जिवंत असताना राज ठाकरे यांनी शिवसेना द्वेषातून मारलेला हा डायलॉग बराच महाग पडला, कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी तसेच हिंदुत्ववादी तसेच बाळासाहेबांसोबत राज यांना मानणारा मतदारही त्यामुळे दुरावला, त्यात राज्यात गांधी परिवाराच्या ड्रॉइंग रुम मधून येऊन मुख्यमंत्री झालेले पृथ्वीराज चव्हाण यांनी एकुण गणितच फ़िसकटून टाकले, मनसेबाबतची टोकाची नकारात्मक भुमिका, आघाडी आणि मनसेलाही महाग पडली. मतदार विभाजनाचा फायदा हा कुणाला ना कुणाला होतच असतो पण कुणीतरी कुणाची बी टिम म्हणून काम करत आहे हे पटवण्यात यश आले की जाणिवपूर्वक हे विभाजन टाळण्याचा प्रयत्न मतदार करु लगतो. 2004 च्या सुमारास बहुजन समाज पार्टी आणि अलीकडे वंचित आघाडी, एमआयएमबाबतही हेच पाह्यला मिळते, मनसेची सर्व स्पेस त्यांनी खाल्ली आहे. प्रमुख चार पैकी कुणाची मतं ते खाणार आणि कुणाला फटका बसणार यावर सरकार कुणाचे येणार इथपर्यत मते खाण्याचा विषय महत्वाचा झाला आहे.
अलीकडे मनसे कमजोर झाल्यावर याचा फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बसतो आहे. पण ज्याप्रमाणे शिवसेना-भाजप युतीने मनसेविरोधात कॉंग्रेसची बी टिम असल्याच्या प्रचाराची मोहीम राबवली तशी आघाडीचे पक्ष एमआयएम अथवा वंचित आघाडी विरोधात राबवताना दिसत नाहीत. पण हा झाला 2019 पर्यंतचा विषय..! तीन पक्षांचीमहाआघाडी स्थापन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाचं सगळं गणित नव्याने मांडलं गेलंय. नेहमी दोन विरुद्ध दोनचा होणारा सामना आता तीन विरुद्ध एक असा झाला आहे. त्यात 3 विरुद्ध दोन सामना व्हावा अशा इच्छेनं मनसे मैदानात उतरणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना सोबत घेऊन भाजप जोरकसपणे हा सामना खेळतो आहे, आता मुंबई महापालिका निवडणूका आहेत, मुंबईत शिवसेना सत्तेतून उतरली की झाले या निर्धाराने भाजपने रणनिती आखली आहे. शिवसेनेला आणखी बेजार करण्यास आणि हिदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा मात्र भाजपविरोधी बहुजन नाराज मतदार तसेच मराठी मतदार पर्याय देऊन जोडण्याचा प्रयत्न सुरु झालाय, त्यासाठी राज यांना युती करण्याची विनंती भाजपने केली आहे.
मात्र राज ठाकरे सबुरीने निर्णय घेत आहेत, एकतर केंद्र सरकारसारख्या बलाढ्य यंत्रणेची सोबत करुन तत्काळ आपले उखळ पांढरे करण्याचा अधाशीपणा त्यांनी दाखवलेला नाही, त्यामूळे अद्याप तरी भाजपसोबत त्यांची युती झालेली नाही. तसेच मागच्या निवडणुकांमध्ये मनसेने जबरदस्तपणे राबवलेल्या मोदी विरोधी भूमिकेमुळे भाजपने राज ठाकरे यांच्याविरोधात सेटर, झोलर, सुपारीबाज अशी व्यक्तिमत्व गढूळ करणारी प्रचंड मोहीम चालवली, त्याचा मोठा परिणामही झाला. खरं तर सत्तेत नसताना अनेक अंदोलनाचं यश, एखादा मुद्दा सातत्याने उचलून तडीस लावणे, अन्यायग्रस्ताला आधार वाटणारा आणि अनेक धोरणात्मक निर्णय सरकारला दाबून करुन घेणारा देशातला मनसे हा एकमेव पक्ष आहे..पण पहिल्यांदा कॉंग्रेसची बी टिम असा प्रचार झाला आणि नंतर भाजप परिवाराने अक्षरशः त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रचंड हानी केली. विरोधी नेत्यांची चारित्र्यावरुन, व्यक्तित्वावरुन हानी करण्यात संघ परिवार अत्यंत माहीर आहे. छत्रपती शिवाजीराजे, महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुणीही त्यांच्या अपप्रचारापासुन सुटले नाहीत.
तिथे लालूप्रसाद, मुलायम, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे किस झाड की पत्ती..! म्हणूनच राज ठाकरे हे भाजपसोबत तातड़ीने आणि प्रत्यक्ष गेले नाहीत, पण अप्रत्यक्ष जावे लागले आहे, परिस्थितीने त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे, संधी नक्कीच आहे पण त्यासाठी आणखी मेहनत घेण्याची इच्छा राज आणि त्यांच्या संघटनेत नाही, सततचा संघर्ष आणि त्या तुलनेत यश मात्र नाही, ही स्थिती नेता आणि संघटनेला थकवते, म्हणून त्यांच्याकडे सबूरी दिसते आहे आणि ते अलर्टही आहेत..भाजपशी संग करताना अस्तित्व गमवायचे नाही याचे भानही राज ठाकरे यांना आहे.. शिवसेनेसह महाआघाडी निर्माण झाल्याने मनसेला राज्याच्या राजकारणात त्यांची झालेली कोंडी फोडण्याची संधी मिळाली आहे, आणि राजकीय पक्ष म्हणून त्याप्रमाणे भुमिका घेणे अथवा प्रयत्न करणे हे चुक नाही..उद्या शिवसेना आघाडीतून बाहेर पडेल तेव्हा सांगते तशी हिंदुत्ववादीच असेल..उलट अधिक कडक भुमिका घेणे त्यांना क्रमप्राप्त असेल..
मग मनसेबाबत एवढी आरडाओरड का आहे..? खरं तर नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या गावागावात भाजप अथवा संघ परिवाराने पोहचवलेले नाही, सुरुवातीला फक्त गुजरातचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची देशासोबत राज्याला अल्प ओळख होती, त्यांचा राज्याला अधिक परिचय हा राज ठाकरे यांनी करुन दिला. जेव्हा देशाची सत्ता ताब्यात घ्यायची आखणी झाली तेव्हा भाजपने (खरे तर टिम मोदींनी) कळत नकळत अनेकांना कामाला लावले. उदाहरणार्थ- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर अनेक कलाकारांनी तेव्हा 2012/13 साली अनेक ट्वीट केले. त्यातल्या अनेकांनी पैसे घेऊन ते केले असतील पण अनेकजण लोकांसाठी आपण आवाज उठावतोय असं वाटुन भाजपच्या विनंतीला बळी पडले, तसेच देशातले अनेक लोकप्रिय नेते गुजरातला घेऊन जाण्याची आणि मोदी महिमा गाऊन घेण्याचे नियोजन होते. त्या यादीत वरच्या स्थानी राज ठाकरे होते, तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या राज या ट्रपमध्ये फसले आणि परतल्यावर त्यांनी राज्यात मोदींची इमेज विकासपुरुष म्हणून लोकांच्या समोर ठेवली. 2014 ला महाराष्ट्रात भाजपला लोकसभेसाठी मत मिळण्यास अनेक कारणांपैकी हे ही एक कारण पुरेसे ठरले, राज ठाकरेंना प्रभावीत केलेला नेता देशाचा तारणहारच असला पाहीजे..अशी लोकांची भावना झाली, नंतर ती चुक दुरूस्त करण्याचा प्रयत्न राज यांनी केला पण मोदी पर्व एवढ्यात संपणार नव्हतं आणि नाही..यासाठी एकाचवेळी असंख्य गोष्टी साचाव्या लागतील..आणि धर्म से बडी भुक असल्याची जाणिव लोकांना व्हावी लागेल.
प्रचंड अभ्यास, राज्याच्या प्रश्नांची जाण आणि त्याची उत्तरं माहिती असुनही राज ठाकरे यांचे असे का व्हावे..? असा एक सामान्य प्रश्न विचारला जातो, त्यांच्या नव्या भूमिकेनंतर त्यांना असंच कुणाची तरी बी किवा सी टिम म्हणून काम करावे लागणार का हा प्रश्न आता अधिक विचारला जाऊ लागलाय. पण राजकारणात घेतलेल्या भूमिकांचा कुणाला तरी फायदा किवा तोटा होतच असतो, म्हणून त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न करु नये असं नाही..पण जी भुमिका आहे ती प्रामाणिकपणे मांडली गेली पाहीजे, रस्ता बरोबर आहे का याचा तपास त्यांनीच केला पाहिजे, आता त्यांचा अयोध्या भेटीची निर्धार आहे, त्यातून ते अधिक प्रखर हिंदुत्ववादी वाटावेत, असा प्रयत्न आहे, त्यांनी तिकडे जरुर जावे, पण राजकारणाची गरज म्हणून दिल्ली, पंजाब जावे, फार लांब नको असेल तर आता मोदींचा तो गुजरात पुन्हा पाहून यावा.
अरविंदकेजरीवाल सारख्या सामान्य वकुबाच्या माणसाने दिल्ली-पंजाबमध्ये सत्ता कशी मिळवली याचा अभ्यास करावा..आप प्रमाणेच किबहुना अधिक चांगल्या कल्पना आणि अंमलबजावणीची प्रभावी पद्धत आणि करिष्माई नेतृत्व असूनही आपण मागे का या प्रश्नाचे उत्तरही तिथेच शोधावे..आहे त्यात वाटा घेण्याचे कष्ट उपसण्यापेक्षा कदाचीत वेगळी वाट धरण्याचे श्रम कमी पडतील..यशही निर्विवाद असेल..बाकी बचेंगे तो और भी लढेंगे..लढते रहेंगे..हे स्पिरिटही ठेवले पाहीजेच..राज यांना या स्पिरिटसाठी शुभेच्छा...🌹