गडचिरोलीतील आदिवासींची खाद्य संस्कृती
दर रविवारी भाजल्या बकऱ्याच्या मटणाचे पानावर समान वाटे पडायचे. प्रत्येक रविवारी त्यातला एक वाटा घ्यायला आम्ही जवळच्या आदिवासी गावात जात होतो. चमडे सोललेल्या मांसापेक्षा अशा पद्धतीने भाजून मिळवलेले मांस हे अधिक रुचकर असल्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची समॄद्ध खाद्यसंस्कृती जाणून घ्या सागर गोतपागर यांच्या या लेखातून…;
दर रविवारी भाजल्या बकऱ्याच्या मटणाचे पानावर समान वाटे पडायचे. प्रत्येक रविवारी त्यातला एक वाटा घ्यायला आम्ही जवळच्या आदिवासी गावात जात होतो. चमडे सोललेल्या मांसापेक्षा अशा पद्धतीने भाजून मिळवलेले मांस हे अधिक रुचकर असल्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो.
आदिवासी खाद्य संकृती अतिशय समृद्ध आहे. ज्या काळात पालेभाज्या, मांस, मासे मुबलक मिळतात विशिष्ठ पद्धतीने ते अन्न जतन करून ठेवले जाते. मुबलक मासे सापडल्यानंतर ते अर्धे कच्चे पाला पाचोळ्यावर भाजले जातात. ते मासे मडक्यात ठेऊन वर्षभर खाण्यासाठी वापरले जातात. त्याला भुंजी मच्छी असे म्हटले जाते.
आंबील खाण्याने उन्हाळ्यात शरीराची उष्णता संतुलित राखली जाते. उन्हाळ्यात जेवणात आंबट पदार्थ हमखास खाल्ले जातात. गरमागरम भातावर कैरीच्या रश्श्याची भाजी खूपच चटकदार लागते.जंगलात विविध जंगली भाज्या मिळतात. उन्हाळ्यात कुड्याची फुले फुलतात. मोगऱ्याच्या फुलासारखी हुबेहूब दिसणारी कुड्याच्या फुलांची भाजी देखील चवदार लागते. जंगलातील नदी नाल्याच्या काठावर कोयार नावाचे एक झाड असते. त्याची पाने अगदी नाजूक आणि पातळ असतात. पिशवीभर पाने तोडल्यावर अगदी मुठ भरून भाजी होते.
पावसाळा म्हणजे गडचिरोलीत जंगली भाज्या खाण्याची पर्वणीच. बांबूच्या बेटातून फुटलेला कोवळा कोंब. त्याला बांबूचे वास्ते म्हटले जाते. बांबूच्या वास्त्याची भाजी केली जाते. वास्त्याचे वडे देखील अतिशय चविष्ट असतात. पावसाळ्यात आणखी एका भाजीची उत्सुकता असते. जी भाजी शहरात कितीही पैसे देऊन मिळू शकत नाही. त्या भाजीच नाव आहे वरंब्या. वरंब्या म्हणजे जंगली मशरूम. वरंब्या घनदाट जंगलातील विशिष्ट डुंबरावरच उगवतात. ( डुंबर म्हणजे जंगलातील वारूळ ) वरंब्या डुंबरातून वर आल्याची चाहूल पहिल्यांदा जंगलातील आदिवासी व्यक्तीलाच लागते.
भाजी जंगलात फुलल्यावर ती पहिल्यांदा आदिवासी बांधवांच्याच चुलीवर शिजते. त्यानंतर थोड्या फार प्रमाणात तालुक्याच्या ठिकाणी तिची विक्री होते. जंगलात ज्या ज्या हंगामात जे जे उपलब्ध होते ते ते आदिवासी बांधव मनसोक्त खातात. पावसाळ्यात नदीचे पाणी शेत तलावांमध्ये शिरल्यावर त्यातील मासे वर येऊ लागतात. मासे आले कि संपूर्ण गाव छत्रीसारखे गोल जाळे घेऊन पाण्यात उतरतात. वैयक्तिक तसेच सामुहिक मासेमारी केली जाते.
गावातील ग्रामसभेने भाड्याने मत्स्यपालणासाठी दिलेल्या तलावातील मासे ठेकेदार पकडतो. त्याने मासे पकडून झाल्यावर शेवटच्या दिवशी गाव आणि परिसरातील सर्व नागरिकांना मासे पकडण्यासाठी परवानगी असते, त्या दिवशी संपूर्ण गाव तलावात उतरतो. मासेमारी केली जाते. याला गोहडूम असे म्हटले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी गावे पावसाळ्यात संपर्काच्या बाहेर असतात. पावसाळा सुरु होण्याच्या अगोदरच तेल मीठ आणि तिखट आणून ठेवले जाते.
बाहेरून काहीही मिळाले नाही तरीही जंगलाच्या जीवावर आदिवासी बांधव आपले आयुष्य जगतात. भामरागड परिसरात आजही स्थलांतरित शेती केली जाते. तांदळाचे विविध दुर्मिळ वाण येथील शेतकऱ्यांनी जतन करून ठेवलेले आहे. आदिवासींचे जंगलासोबत असलेले नाते हे आई आणि मुलाचे आहे. याच जंगलाच्या जीवावर आदिवासींच्या अनेक पिढ्या स्वयंपूर्ण जीवन जगत आहेत.