मुख्यमंत्रीजी, आपल्या पादुका इथल्या खुर्चीवर ठेवून जा !

Update: 2019-08-06 16:35 GMT

राज्यातल्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांचं स्थलांतर सुरू आहे. अशावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. अशाच पद्धतीचं राजकीय वर्तन आधीच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी केलं होतं. त्यावेळी माध्यमांनी त्यांना फोडून काढलं होतं. आपत्तीच्या वेळी बदललेल्या कपड्यांमुळेही पदं गेलीयत. राज्यकर्त्यांनी संवेदनशीलता दाखवायला हवी अशी अपेक्षा जनतेची असते. या अपेक्षांना हरताळ फासून मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा सुरू ठेवली.

मला माध्यमांचं आश्चर्य वाटतंय. राज्यातल्या ज्या भागांमध्ये पूरस्थिती आहे तिथल्या सर्व मदतकार्यावर-घडामोडींमवर मुख्यमंत्री बारिक लक्ष ठेवून आहेत, यात्रेतल्या प्रवासामध्ये ते राज्याचा कारभार कसा करतात, ते किती संवेदलशील आहेत. याची वर्णनं द्यायचं काम माध्यमांनी चालवलंय. मुख्यमंत्री संवेदनशील असून पूरस्थितीची माहिती मिळताच रात्री मुंबईत परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला, मुंबईत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पुन्हा दौऱ्यावर जाणार आहेत. अशा मुख्यमंत्र्यांना सुपरमॅन बनवणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत.

मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलता, कार्यक्षमता इ.इ. बाबत मला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यासाठी इथे असणं आवश्यक आहे, पूरभागात दौरा करणे आवश्यक आहे. अशी सूट याआधीच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी दिलेली नाही. यंदा अशी गैरहजर राहण्याची विशेष सूट देवेंद्र फडणवीस यांना दिल्यास सर्व माजी राजकारण्यांवर, विशेषतः ज्यांचं राजकीय करिअर अशा बातम्यांमुळे आणि हल्ल्यांमुळे संपुष्टात आलंय. त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल.

एकतर राज्यात काही भागात दुष्काळी स्थिती आहे. तर काही भागांमध्ये पूरस्थिती... अशा परिस्थितीत निवडणुकांच्या मागे लागण्याचा प्लान मुख्यमंत्र्यांना दिला कोणी? हा ही मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यात्रेला, उपमुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे यात्रेला, त्यांचं बघून विरोधी पक्ष ही यात्रेला निघालाय.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांचा सुरूवातीचा बराच काळ सत्कार स्वीकारण्यात फिरण्यात गेला. आता कार्यकाळाच्या शेवटालाही ते मंत्रालयात बसायला तयार नाहीत. पक्षाच्या प्रचारात ही बराच काळ त्यांचा गेलाय. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनीही तत्कालिन मंत्र्यांवर बेजबाबदार वागण्यासाठी ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः आत्मपरिक्षण करायला हवं. विरोधी पक्ष टीका करत राहणारच आहे. विरोधी पक्षाला फार किंमत द्यायची नाही. असं आपण ठरवलेलं असेल तर निदान या राज्यातील जनतेप्रती आपली आपुलकी आपल्या कृतीतून दाखवून द्या. आपल्याला जर यात्रेवर निघायचंच असेल तर आपल्या पादुका इथल्या खुर्चीवर ठेवून जा, निदान त्या बघून तरी इथलं प्रशासन कामाला लागेल.

Similar News