टागोरांच्या कवितेत स्त्री कशी गवसते? सानिया भालेराव

रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांमधून एका स्त्री मधले विखुरलेले अणु रेणू गवसत गेले‌, त्याची प्रभावी मांडणी केली आहे लेखिका सानिया भालेराव यांनी..

Update: 2022-05-09 06:23 GMT

स्त्रीची संपूर्ण उकल आजवर कोण्या कलाकाराला, लेखकाला, चित्रकाराला, कवीला, शायरला झाली आहे का? स्त्रीबद्दल जितकं लिहिल्या गेलं आहे, रेखाटल्या गेलं आहे ते खरंच त्या स्त्रीबद्दल सगळं काही सांगून जातं का? आणि मुळात स्वतः स्त्रीला तरी ती संपूर्ण अशी गवसते का? असे कित्येक प्रश्न रुंजी घालत असतं. मग एम.टेक मध्ये शिकत असतांना एक बंगाली मित्र म्हणला, "तू एकदा रबिन्द्रनाथ वाच".. मग मी टागोरांचं लिखाण वाचायला सुरवात केलं आणि माझ्यातले बिखरलेले कित्येक अणू रेणू मला गवसत गेले... आज त्यांची जयंती आणि मग हे सगळं आठवलं..

"त्याग" मधली सुमन, "संपत्ती" मधली म्रीनमोयी ,"शेषेर कोबिता" मधली लाबन्या, चोखेर बाली मधली बिनोदिनी, नंतर म्रीणाल, चारुलता या सगळ्या रबिन्द्रनाथांच्या नायिका आपल्या परीने जगण्याचा, त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यांना स्वतःचा आवाज आहे, बुद्धी आहे आणि मन आणि शरीर देखील आहे. नीती- अनीती, नैतिकता- अनैतिकता ह्यासगळ्यांच्या पलीकडे जाऊ बघणारी, आईपणाच्या, बायकोच्या भंपक चौकटींना छेद देऊ पाहणारी, स्वतःचं मत असणारी आणि ते मांडण्याची हिम्मत ठेवणारी, आयुष्य आपल्या अटींवर जगणारी आणि त्याची किंमत चुकती करण्याचा दम ठेवणारी स्त्री..अशा स्त्रीला आपण आजही सुखाने जगू देतो का? समाज तिचं स्वतंत्र अस्तित्व, तिचा झगडा मान्य करतो का? हा प्रश्न टागोर त्यांच्या कथांमधून सुरेखरित्या मांडतात आणि इतक्या वर्षांनतरही आजही हा प्रश्न पडतो आहेच याला दुर्दैव म्हणावं का?

ज्या काळी बाईला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तेव्हा टागोरांनी रेखाटलेल्या या नायिका केवळ अद्भुत वाटाव्या अशाच . टागोरांची लेखणी होतीच मुळी काळाच्या पुढची आणि आजही ती रिलेव्हंट वाटते हे नवल.. राष्ट्रगीत, माईंड इज विदाउट फिअर आणि गीतांजली सारखे काव्य संग्रह असो वा कथा असो.. रबिन्द्रनाथ आणि त्यांची लेखणी अवाक करत राहते कायम.. त्यातही कथांमधून गवसलेले आणि अनुभवलेले टागोर केवळ विलक्षण ! एक स्त्री म्हणून मला वाटणाऱ्या भावना, जाणिवा, आनंद, आसुसलेपण, माझ्या गरजा, माझे अश्रू ,माझी घुसमट, माझ्यातला निडरपणा, वैचारिक द्वंद्व , पोरांसाठी तुटणारं माझं काळीज , स्वतःच्या सुखाचा विचार केल्यावर येणारं अपराधीपण, मग चवताळून उठणाऱ्या उर्मी हे सगळं किती नैसर्गिक आणि किती माझं आपलं आहे हे टागोरांच्या लेखणीमुळे उमजत गेलं.. स्वतःच्या धडधडत्या हृदयासोबत राहणं, जगणं मला कोणी शिकवलं असेल तर रबिन्द्रनाथांनी!

कविता मला फार उमजत नाहीत पण गमतीचा भाग हा की काही वर्षांपूर्वी जेव्हा कविता वाचायला घेतल्या तेव्हा सुरवात केली या कवीपासूनच. एक फार आवडती कविता आहे ती म्हणजे "अनएंडिंग लव्ह"!

UNENDING LOVE by Rabindranath Tagore


I seem to have loved you in numberless forms, numberless times…

In life after life, in age after age, forever.

My spellbound heart has made and remade the necklace of songs,

That you take as a gift, wear round your neck in your many forms,

In life after life, in age after age, forever.

शाश्वत प्रेम..

कोणत्याही आकारात, कोणत्याही स्वरूपात मी असलो तरीही मी कायम तुझ्यावरच प्रेम करत आलो आहे

जन्मानुजन्म.. शतकानुशतकं... निरंतर

माझ्या मंत्रमुग्ध झालेल्या हृदयाने एकदा आणि अनेकदा तुझ्यासाठी गीतांची माळ सजवली आहे

ही माळ तू भेट म्हणून स्वीकार आणि तुझ्या गळ्याभोवती ती माळ तू ज्या विविध स्वरूपात असशील त्या रूपांमध्ये परिधान कर..

जन्मानुजन्म.. शतकानुशतकं... निरंतर

कविता अत्यंत सुरेख आणि गहिरी आहे. प्रेम शब्दातून व्यक्त करता येत नाही असं जे आपण म्हणतो ते खोटं वाटावं इतकं तरल रबिन्द्रनाथांनी लिहिलं आहे. तसं बघायला गेलं तर त्यांचं आणि कादंबरी देवी यांचं प्रेम अधुरं राहिलं. याच प्रेमामुळे त्यांची लेखणी बहरली असावी का असं मला वाटत राहतं.. दोघांना झालेल्या यातना, दुःखद शेवट..हे सगळं रबिन्द्रनाथांच्या वाट्याला आलंच. संवदेनशील मनाच्या वाट्याला येणाऱ्या यातना प्रचंड असतात. शब्द थेट हृदयात पोहोचतात ते उगाच नाही.. ज्याच्या आत दुःख कधी झिरपलं नाही त्याला दुःखाचा स्वाद कसा कळणार? वरवरचं आयुष्य जगणाऱ्या माणसांना शब्दांच्या मागे दडलेल्या भावना समजतीलही कदाचित.. पण उमजतील का? हा खरा प्रश्न आहे.

ही कविता वाचल्यावर मला एक प्रश्न पडला मात्र.. Unending Love असं का बरं म्हटलं असावं.. प्रेम हे निरंतर असतं.. आणि जे कायमस्वरूपी राहत नाही ते प्रेम कसं? थोडा अजून विचार केल्यावर मग वाटलं की जे आजन्म जिवंत राहतं, झिरपत राहतं.. काळाच्या, मूर्त- अमूर्ताच्या पलीकडे पोहोचतं ते हे प्रेम. शिद्दतवाला प्यार.. हे अनुभवण्यासाठी नशीब लागतंच.. मग ते प्रेम नशिबात असो वा नसो.. पण ते करता येणं.. अनुभवता येणं याला नशीब लागतंच.. इस्माइल मेरठी यांचा हा अप्रतिम शेर. ही कविता वाचून आठवला.

तू ही ज़ाहिर है तू ही बातिन है

तू ही तू है तो मैं कहाँ तक हूँ

बाहेर देखील तू आहेस आणि माझ्या अंतरंगात सुद्धा तूच सामावला आहेस

सर्वत्र केवळ तूच आहेस मी माझा असा आहे तरी कुठपर्यंत आता...

प्रेम जेंव्हा जग व्यापून टाकतं तेव्हा ते सगळीकडे बहरतं. तू माझ्यामध्ये इतका सामावला आहेस की आता मी माझा उरलोच नाही.. मी पणाची रेषा जिथे पुसट होत जाते.. माझं न होता जेव्हा ते आपलं होतं.. ते प्रेम.. स्वतःच्या, काळाच्या, जगाच्या पलीकडे नेऊन ठेवणारं.. रबिन्द्रनाथांच्या लेखणीसारखं..

Tags:    

Similar News