शेतकरी नवरा नको ग बाई!
कृषी दिनाच्या निमित्ताने शेतीमधील संधी बरोबरच शेतीच्या विदारक अवस्थेवर बोलले जात आहे. शेतीच्या आधुनिक गती बरोबरच सामाजिक प्रश्न देखील निर्माण झाले आहे त्यानिमित्ताने पत्रकार गजानन उमाटे यांनी केलेले विवेचन मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुनः प्रसिध्द करत आहोत.;
परवा माझ्या मित्राचा मला फोन आला, बऱ्याच दिवसांनी त्याचा फोन आला होता. मी फोन घेतला आणि सहज विचारपूस केली, कसा आहे वैगेरे....परंतु यावेळेस त्याचं बोलणं मला काहीसं वेगळं वाटत होतं. आज तो गोंधळलेला वाटत होता. मला वाटलं गावाकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे, हिम्मतीचा हात देत मी त्याला विचारलं. काय झालं? माझ्यासाठी मुंबईत दोन तीन हजारांची नोकरी शोध असं तो मला म्हणाला, मला हे ऐकून धक्काच बसला कारण हिवाळ्याच्या हंगामात दीड ते दोन लाखाचे टमाटे विकणारा माझा मित्र आईवडीलांना एकटाच घरी पंधरा एकर ओलीताची शेती. मी त्याला विचारलं अरे तीन चार हजाराच्या नोकरीपेक्षा कितीतरी जास्त पैसे तू शेतीतून कमावतो, शिवाय टोमॅटोच्या शेतीतून चांगला फायदा होतो असं तू मला काही दिवसांपूर्वीच सांगत होता, मग आता काय झालं ? आणि काय हा मुर्खपणाचा निर्णय... त्यानंतर त्याने जे काही कारण सांगितलं
ते विनोदी आणि तेवढच गंभीरही होतं.काही दिवसांपूर्वी तो लग्नासाठी मुलगी पहायला गेला होता, शहरातल्या मुली या हुशार आणि व्यावहारीक असतात असा विदर्भातील तरुणांचा समज आहे, लग्नासाठी मुलगी शोधताना ती सुंदर, सुसंस्कृत, सुशील, सुशिक्षीत आणि सुस्वभावाची असावी अशी सर्वांचीच इच्छा असते, या 'सु' शब्दाचा मिलाप शोधता शोधता कित्येकांचे एक एक दोन दोन वर्ष तर लग्नच जुळत नाही, तो पहायला गेलेल्या पहिल्याच मुलीत या 'सु' चा मिलाफ त्याला मिळाला आणि तीच आपली भावी पत्नी अशी स्वप्नं रंगवायला त्यानं सुरूवात केली, या स्थळाला त्याच्या आईवडीलांचीही पसंती होती, शेवटी मुलींची पसंती विचारली आणि तिने लग्नाला नकार दिला, तिचं आधी प्रेमप्रकरणं असेल असं त्याला वाटलं, परंतु असं काही नव्हतं तिला शेतकरी नवरा नको होता. आजकालच्या शहरी आणि ग्रामीणही मुलींची लग्नासाठी पहिली पसंती ही नोकरदारच असते. त्यानंतर व्यावसायिक, किंवा गेलाबाजार पानटपरीवाल्याशी मुली लग्न करायला तयार होतात परंतु तिला पंधरा एकराचा शिकलेला शेतकरी नाही चालत. ही बाब मजेशीर वाटत असली तरी गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे.
स्टार माझावर चालणाऱ्या कॉलेज कट्टा या तरुणांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलींसमोर हा विषय घेऊन गेलो. या कार्यक्रमात आम्ही त्यांची मतं जाणून घेतली. त्यांच्या भावी जीवनसाथीविषयी, त्यांना भावी नवरा कसा हवा आहे, शेतकरी नवरा हवा की नको किंवा शेतकरी नवऱ्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत वगैरे.. वगैरे., काही मुलींच्या अपेक्षा गांभीर्याने विचार करण्यासारख्या होत्या तर काहींच्या अगदी मजेशीर, काही मुलींना गावात हवे आहेत शहराला जोडणारे चांगले रस्ते, दवाखान्याची सोय, चांगल्या शाळा आणि पूर्णवेळ वीज. सध्याच्या जगात अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच वीज, रस्ते, शाळा, आरोग्य या गरजाही आवश्यक आहेत. आपली शोकांतिका आहे की स्वातंत्र्याच्या ५६ वर्षानंतरही गावात २४ तास वीज नाही, चांगल्या शाळा नाहीत.
आजही खेड्यांपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर दवाखाने नाहीत, गावांमध्ये डॉक्टर नाही, एवढं अंतर पार करुन रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, वाहनांची सुविधा नाही अशावेळेस त्या रुग्णाची स्थिती गंभीर असेल तर मृत्युला जवळ करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. असल्या परिस्थीतीत कुठली मुलगी लग्न करायला तयार होत नाही. परंतु सगळीच गावं अशी नाहीत.मुंबईच्या काही मुलींना हवी आहे गावात चौपाटी, मल्टीप्लेक्स थिएटर, चांगली हॉटेलं, फिरायला बगीचे आणि जिम्स् वगैरे.... हे सर्व गावागावात कधी पोहचेल, याविषयी कुणीही ज्योतिषी भाकित करण्याचं धाडस करणार नाही. तोपर्यंत शेती हा जाणीवपूर्वक जगण्याचं साधन म्हणून स्वीकारलेल्या पोरांनी काय करायचं.
काही दिवसांपूर्वी विदर्भातील एका मराठी वृत्तपत्राने शेतकऱ्यांच्या मुलांचं सर्वेक्षण केलं आणि त्यात त्यांना विचारण्यात आलं की, त्यांना भविष्यात काय व्हायचयं? शिक्षक, डॉक्टर, इंजिनीयर, कारकून ते तलाठी अशी उत्तर त्यांच्याकडून मिळाली परंतू त्यांच्यातील कुणालाही शेतकरी व्हावसं वाटत नाही, आज डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हायचयं, शिक्षकाच्या मुलाला शिक्षक तर इंजिनीयरच्या मुलाला इंजिनीयर परंतु शेतकऱ्यांच्या मुलाला शेतकरी व्हायचं नाहीय. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात शेतकरी हा संग्रहालयातच शोधावा लागेल.
यासाठी जबाबदार आहोत तुम्ही, आम्ही, राजकारणी आणि ही समाज व्यवस्था. शेतकऱ्यांना कधी मान सन्मानानं वागवण्यात आलं नाही, शेतकरी म्हणजे अडाणी, अशिक्षीत अशीच प्रतिमा आहे, शासकीय कार्यालयात शेतकरी गेला तर चपराशीही त्याला दम देतो. शहरी मुलींनी तरी का म्हणून शिक्षीत शेतकऱ्यांशी लग्न करावं? त्यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन संस्कृतीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे, ही फक्त पोकळीच नाही तर फाळणी आहे, इंडिया आणि भारत यांच्यातली. जोपर्यंत या दोन देशांमध्ये देवाण घेवाण होत नाही तोपर्यंत विकसनशील भारत विकसीत होणार नाही. विकसीत भारत हा तसं आता एक स्वप्न झालंय. दिवसाढवळ्या प्रत्येकजण ते एक दुसऱ्याला दाखवतो. खरं तर हे स्वप्न हेच एक पिळवणुकीचं आणि शोषणाचं हत्यार झालंय. पण शहरातल्या मुली फार हुशार असतात. त्या या स्वप्नाला भुलायला तयार नाहीत.कृषी दिनाच्या निमित्ताने शेतीमधील संधी बरोबरच
शेतीच्या विदारक अवस्थेवर बोलले जात आहे. शेतीच्या आधुनिक गती बरोबरच सामाजिक प्रश्न देखील निर्माण झाले आहे त्यानिमित्ताने विवेचन केले आहे पत्रकार गजानन उमाटे यांनी...
गजानन उमाटे