गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का?
"मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले होते? बाबासाहेबांना गांधीजींचे कोणते विचार मान्य नव्हते? सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेल्या गांधीजींचा बाबासाहेबांमुळे वैचारिक विकास कसा झाला? वाचा प्रा. हरी नरके यांचा लेख;
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात.
आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते, आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते एकमेकांचे स्पर्धक होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा?
एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही? ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा एका कर्तव्यभावनेपोटी हे लिहित आहे.
१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? तर नाही.
२. ते एकमेकांचे शत्रू होते का? तर नाही.
३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का? तर हो. अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट काँग्रेस अॅंड गांधी हॅव डन टू दि अनटचेबल्स" या महाग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. तो त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होता. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नक्कीच नाही.
४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनयक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ] सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात.
बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ] दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत."
[ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]
५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का हे बघितलेच जात नाहीये.
बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे. यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेय.
छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंद केली गेलेली आहे.
२६ आक्टोबर १९३८ ला बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा पागलपणा बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे.
६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य सुत्र होते. त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता.
बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने चले जाव चा नारा दिलेला होता.
७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. पण बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले ब्राह्मण समजत होते.
दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी ना. गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले. त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर तसेच आंबेडकर असा त्यांचा समज झाला. " पहिला भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, गांधीजी, मला मातृभूमी नाही तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. गांधीजी दुटप्पीपणानं वागले. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा. ही मुत्सद्देगिरी गांधीजींना महाग पडली. बाबासाहेब आणखी दुरावले.
गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ] ८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत. घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.
मात्र दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ.जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना पुन्हा बिनविरोध निवडून दिले. ही वस्तुस्थिती निदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे. काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. बाबासाहेब जयकर या काँग्रेस सदस्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना घटना सभेवर बिनविरोध निवडून आणून त्यांना देशाचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.
९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा बामसेफी प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर तुम्ही काय निवडाल?
१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी एप्रिल १९४८ मध्ये लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता असे नमूद केले. नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे झाले. राष्ट्रव्यापी विस्तारले. विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे भक्त विकृत आहेत.
११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले. पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]
गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी. त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.
दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. " बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे." आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते. या दोघा महामानवांना वंदन.
-प्रा.हरी नरके