शैक्षणिक कर्जाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे?
सध्या शैक्षणिक कर्ज घेऊन चांगले शिक्षण घेण्याकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल असतो. पण बँका या कर्जाकडे केवळ वित्तीय दृष्टीने पाहत असल्याने समाजाचे केवढे मोठे नुकसान होते याचे विश्लेषण केले आहे अर्थ विश्लेषक संजीव चांदोरकर यांनी.....;
शैक्षणिक कर्जावर मिळणारे व्याज दुय्यम आहे. आपल्याला हवा तसा तरुण वर्ग घडवणे हा या प्रणालीचा प्राथमिक अजेंडा आहे ! शैक्षणिक कर्ज पुढच्या पिढ्यांची वैचारिक जडणघडण, त्यांची मूल्ये काय असतील यावर निर्णायक प्रभाव पाडणारे ठरू शकते. म्हणून त्याकडे समाजाने खूप गंभीरपणे पाहावयास हवे. पण बँकिंग व्यवस्था शैक्षणिक कर्जांना गृहकर्जे, वाहन कर्जे, शेती कर्जे, गृहपयोगी वस्तूंसाठीची कर्जे यांच्यापैकी एक आहे असे भासवते.
शैक्षणिक कर्जांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फिया भरायला पैसे नाहीत हा ताबडतोबीचा प्रश्न अंशतः सोडवते खरा. पण या मार्गाने प्रश्न सोडवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व वैचारिक जडणघडणीवर मूलभूत परिणाम होऊ शकणार असतो, कसे ते बघूया
१. शिक्षणासाठी कर्ज काढले आहे म्हटल्यावर ते कालबद्ध पद्धतीने फेडणे आले. ते तसे फेडण्यासाठी त्या कुटुंबाची मासिक आमदनी वाढवणे आले. त्यामुळे विद्यार्थी अशाच कोर्सेसना प्रवेश घेणार/ पालक अशाच कोर्सेसना घालणार की जो कोर्स पुरा केल्यावर त्या विद्यार्थ्याला लगेच नोकरी लागू शकते.
२. ती नोकरी देखील अशी हवी की त्यातून मिळणाऱ्या पगारातून कर्जाचे हफ्ते सहजपणे फेडता येतील. त्याला वित्तीय परिभाषेत "पे बॅक पिरियड" असे म्हणतात. ज्या शिक्षण संस्था त्यांच्या कोर्सेसची जाहिरात करतात त्या आमच्या कोर्सचा "पे बॅक पिरियड" कसा कमी आहे हे आवर्जून सांगतात.
३. चांगला पगार देणाऱ्या नोकऱ्या अशाच क्षेत्रात असतात ज्यात नफ्याच्या मार्जिन्स जास्त असतात. दुसऱ्या शब्दात प्रचलित अर्थव्यवस्थेच्या "सन राईज" इंडस्ट्रीज असतात. समाजाचे प्राधान्यक्रम भिन्न असू शकतात.
४. तरुण / तरुणींनी आपल्या आवडीच्या विषयात / क्षेत्रात शाळेनंतरचे शिक्षण घ्यावे ही उपजत इच्छा आपोआप मारली जाणार. तो विचार मनात आला तरी झटकला जाणार
५. सामाजिक विज्ञानाच्या कोर्सेसची मागणी मागे पडणार. कारण त्यांना एम्प्लॉयबेलिटी कमी असते. तीच सामाजिक विज्ञाने पुढे येणार ज्यांना कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी आहे. उदा. पब्लिक पॉलिसी कोर्सेस सध्या जोरात आहेत.
६ शैक्षणिक कर्ज डोक्यावर घेऊन शिकणारे विद्यार्थी कधीच मोकळे, एक प्रौढ नागरिक म्हणून विचार करणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी मते मांडताना आपण प्रस्थापित विरोधी बोलणार नाही याची काळजी घेणार. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाहीत. आपला सीव्ही खराब करणार नाहीत. ते असे कोणतेही कृत्य वा भूमिका घेणार नाहीत ज्यामुळे त्यांची नजीकच्या काळातील मेनस्ट्रीम मधील नोकरी धोक्यात येऊ शकेल.
७. मेंदू, विचार, संवेदना विकसित होण्याच्या वयात त्यांच्या सर्वच क्षमता चहाच्या मळ्यातील प्लांटेशन मधील झुडपा सारख्या राहणार. हे झाड मरत पण नाही फोफावत पण नाही. मालकाला वर्षानुवर्षे सेवा देत राहते.
८. प्रणालीला शैक्षणिक कर्जावर मिळणारे व्याज दुय्यम आहे. आपल्याला हवा तसा तरुण वर्ग घडवणे हा तिचा प्राथमिक अजेंडा आहे
म्हणून शैक्षणिक कर्जाकडे इतर रिटेल कर्जासारखे बघता कामा नये. हा विषय बँकिंग व वित्त क्षेत्राचा नाही तो निखळ सामाजिक व राजकीय विषय आहे.