मंदी - लोक मरतात सरकारच्या विश्वासामुळे..

Update: 2019-08-21 14:56 GMT

सांगली-कोल्हापूरात पूर आला तेव्हा प्रशासनाने पूर येणार असल्याची माहिती दिली नाही, अशा प्रतिक्रिया पूरग्रस्त भागातील लोकांनी दिल्या. यावर लगेच भक्तांनी तुफान हल्ला चढवला आणि घरात पाणी घुसणार आहे हे पण सरकारने सांगायला पाहिजे का? घरात पाणी घुसलेलं समजलं नाही का? अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल केल्या. काही लोकांनी तर एक व्हिडीयो व्हायरल केले ज्यात एक परिवार घर सोडायला तयार नव्हता.

काहीशी अशीच स्थिती सध्या मंदीच्या बाबतीत झालीय. मंदी येणार आहे किंवा ती सुरूच आहे. तिच्या झळा नोटाबंदीनंतर तीव्र होत गेल्या. जीएसटीने त्याला तडका लावला. त्यानंतर सतत टॅक्सवसूलीच्या कार्यक्रमांनी सरकारने आपला महसूल कसा वाढतोय हे सांगीतलं. जे टॅक्स देत नाहीत ते चोर – देशद्रोही असं समिकरण बनवून टाकलं. जे नोटाबंदीच्या विरोधात बोलतील, जीएसटी च्या विरोधात बोलतील ते तर भारताचे शत्रू असंच चित्र बनवलं. जे भाजपाच्या धोरणांवर बोलतील ते भारत विरोधी असं समिकरण झाल्याने, आणि फेक नॅरेटीव्हच्या पोस्ट सतत भाजपाच्या आयटी सेल ने तयार करून व्हायरल केल्याने लोकांना आपण व्यक्त व्हावं की न व्हावं हेच कळेनासे झाले होते. आपण काही म्हटलं की पन्नास लोक अंगावर येतात, म्हणजे आपलंच काहीतरी चुकतंय अशी भावना अनेकांची झाली, आणि अशा वेळी वेगळं मत मांडण्याऐवजी झुंड जे म्हणेल ते हो-हो म्हणायचं अशी काहीशी प्रवृत्ती बळावली. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मी जवळपास सर्वच मतदारसंघात फिरलो. जितक्या लोकांशी बोललो त्या सर्वांनी नोटाबंदीची तक्रार केली. पण निवडणुकांमध्ये त्याचं प्रतिबिंब काही दिसलं नाही.

देशातल्या काही व्यापारी संघटनांनी जाहीराती प्रसिद्ध करून आपले व्यवसाय बुडाले असल्याचं जाहीर केलं आहे. देशात हे बहुधा पहिल्यांदाच घडतंय. दुसरीकडे आपल्याला होणारा त्रास सांगितला तरी देशद्रोही ठरवणारे टोचे वाढले आहेत. या टोच्यांमुळे लोक खरं सांगायला तयार नाहीत. अर्थव्यवस्था ठीक चालत नाहीय, अडखळतेय. बेरोजगारी वाढतेय, उत्पादन घटलंय, डॉलरच्या दरामुळे व्यवसायावर परिणाम झालाय, विविध उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांना सामोरं जावं लागतंय, पण भाषण आणि धोरण यातल्या विसंगती मुळे उद्योग नीट चालत नाही, मेक इन इंडीयाचं गणित नीट बसलेलं नाही हे सांगायचं कुणाला.

बांधकाम क्षेत्रातल्या अनेकांनी तर उघडपणे सरकारची तळी उचलणारी भूमिका घेतलीय, पण त्यांच्या स्वतःच्या धंद्यात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलंय हे आता मान्य केलंय. अनेक मोठ्या उद्योजकांशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली की, सरकार त्यांना उगीचच सामंजस्य करार करायला बोलवून घेतं, त्यांचा रस असो नसो पण सेमिनार मध्ये बोलायला, मिरवायला बोलवलं जातं. सुरूवातीला नेटवर्कींग म्हणून हे उद्योजक आनंदात जायचे, पण त्यातून काहीच लाभ होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अनेकांनी सरकारची निमंत्रणं टाळायला सुरूवात केली.

इतकं सगळं होत असताना मंदी नाहीय असं सांगणारे लोक हे सामान्य जनतेच्या जीवाशी खेळतायत. सामान्य माणसाला या मंदीची झळ पोहोचली आहे. उद्योगांना ही पोहोचलीय. मग हे कोण भडभुंजे आहेत, जे आपल्या ताब्यात असलेल्या माध्यमांचा वापर करून खोटं चित्रं रंगवत आहेत. लोकांना पूर आलेला कळतो, तसं मंदी आलेली ही कळते. ते मरतात सरकारच्या विश्वासामुळे. मायबाप सरकार आपल्याला वाचवेल असा विश्वास ज्यांना असतो तेच मरतात. शासनात बसलेल्यांनी ही भावना समजून घेतली पाहिजे. खोट्या पोस्ट फिरवून खोटं जनमत तयार करणाऱ्यांचा जीवघेणा खेळ थांबवला पाहिजे. मंदीची आग पसरलीय.. वणवा भडकून सगळं खाक होण्याआधी लोकांना वाचवा.

Similar News