ड्रायव्हरलेसच्या जमान्यात जुन्याच कवच कुंडलांचा अट्टहास का?

ओडिसा रेल्वे अपघातानंतर अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची चर्चा सुरू झाली. यामध्ये कवच सिस्टीमचा वापर करायला हवा, असं मत व्यक्त केलं जाऊ लागलं. पण काळ बदलतोय. त्यामुळे बदलत्या काळात जुन्याच कवच कुंडलांचा ध्यास कशासाठी? याचाच वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा लेख....;

Update: 2023-06-10 12:30 GMT

भारत विश्वगुरू बनत असल्याची चर्चा अधून मधून माध्यमांमध्ये, सत्ताधारी नेत्यांच्या भाषणातून सुरु असते. पण भारताची प्रगती सुरू आहे ती लोकसंख्या वाढीत. या लोकसंख्या वाढीमुळे सरकारी यंत्रणांवर ताण निर्माण होत आहे आणि त्यातूनच घडतात ते अपघात. अशाच पद्धतीने गेल्याच आठवड्यात ओडिसातील बालासूरजवळ कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस यांचा अपघात झाला आणि 288 प्रवाशांना जीव गमवावा लागला. या भयावह अपघातानंतर रेल्वे अपघात रोखण्यासाठीच्या उपायांची चर्चा सुरु झाली. यामध्ये सातत्याने जोर दिला तो म्हणजे कवच सिस्टीमवर.

कवच म्हणजे अँटी कोलेजन डिव्हाईस. हे डिव्हाईस रेल्वेत लावलं तर रेल्वे अपघात रोखण्यासाठी मोठी मदत होईल, अशी चर्चा सुरू आहे. हे अँटी कोलेजन डिव्हाईस ही सिस्टीम वॉर्निंग सिस्टीम म्हणून प्रचलित आहे. यामध्ये जेव्हा दोन ट्रेन एकमेकांसमोर येतात. त्यावेळी ट्रेनच्या इंजिनला लावलेला अलार्म वाजायला सुरुवात होते. त्यामुळे ट्रेनचा ब्रेक लावून अपघात टाळता येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

आपल्या देशात हे अँटी कोलेजन डिव्हाईस 65 ट्रेनमध्ये बसवलं आहे. त्यामध्ये वेगवान ट्रेनचा समावेश आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की, कोरोमंडल आणि हावडा एक्सप्रेस या दोन ट्रेनमध्ये ही सिस्टीम नव्हती का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. पण जर या ट्रेनमध्ये कवच सिस्टीम असती तर शेकडो लोकांचा जीव वाचला असता. पण या ट्रेनमध्ये कवच कुंडले नसल्याने शेकडो लोकांचा जीव गेला.

या अँटी कोलेजन डिव्हाईस सिस्टीममध्ये रेल्वे रूळ, रेल्वे रुळावरील सिग्नलिंग सिस्टीम याबरोबरच ट्रेनच्या इंजिनला रेडिओ फ्रिक्वेन्सीने जोडलेले असते. त्यामुळे ट्रेन कोणत्या पटरीवर चाललेली आहे. याची माहिती हे डिव्हाईस देत असतं. त्यामुळे ही यंत्रणा धुक्यातही तुम्हाला पुढील संकेत देत राहते. त्याबरोबरच अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ रे चा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे रेल्वेच्या ड्रायव्हरला याचे संकेत मिळत राहतील आणि अपघात टाळता येईल, असे दावे केले जात आहेत. मात्र आता मुद्दा उरतो तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा.


सध्या जगभरातील वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आढावा घेतला तर त्यामध्ये भारतातील तंत्रज्ञान आणि जगातील प्रगत देशांचे तंत्रज्ञान यात मोठा फरक दिसतो. एवढंच नाही तर आगामी काळ हा Artificial Intelligences च्या वर्चस्वाचा आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानात मानवी हस्तक्षेपाविना गाड्या चालणार आहेत. यामुळे अपघातांची संख्या आणि त्यातून होणारी हानी कमी करता येणार आहे. त्याची सुरूवात म्हणजे गुगलने चालकाविना चालणारी कार विकसीत केली आहे. टेस्लाही अशाच पद्धतीने ड्रायव्हरविना कारची टेस्ट करत आहे. चीननेही अशाच प्रकारची कार विकसीत केली आहे. त्यामुळे आगामी काळात अपघातांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. दुसरीकडे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी 28 डिसेंबर 2020 मध्ये ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे ड्रायव्हरलेस कारनंतर ड्रायव्हरलेस मेट्रोची सेवाही भारतात सुरू आहे.

यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे ड्रायव्हरलेस ट्रेनची चाचणी जगभरातील अनेक देशांनी केली आहे. दिल्लीतही ड्रायव्हरलेस मेट्रो चालवली जाते. मात्र दरवर्षी 2.40 लाख कोटींपेक्षा अधिकचं बजेट रेल्वेसाठी केलं जात असताना रेल्वे अपघात होणे लाजिरवाणे आहे. त्यामुळे भारताने अत्याधुनिक आणि Artificial Intelligences वर आधारित असणाऱ्या गोष्टी आपल्या रेल्वे यंत्रणेत वापरायला हव्यात. या ड्रायव्हरलेस ट्रेनमध्ये जी उपकरणं वापरलेली आहेत. त्यात लिडार (Lidar), रडार (Radar) आणि कॅमेरा ( Camera) यांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यामुळे यात असलेला अँटेना ( Antenna)रेल्वेचे लोकेशन आणि पोजिशन यांची अचूक माहिती GNSS/ GPS यांच्या माध्यमातून अचूक माहिती पुरवतो.

ट्रेनच्या पुढच्या बाजूला जोडलेल्या सेन्सॉर सेटमध्ये लिडार, रडार आणि कॅमेरा यांचा समावेश असतो.

या ट्रेनच्या इंजिनमध्ये माहिती प्रोसेस करण्यासाठी आणि अचूकतेवर लक्ष देण्यासाठी कम्प्युटिंग युनिट असते.

या ट्रेनमध्ये वापरले जाणारे लिडार हे आजूबाजूची स्थिती आणि आजूबाजूला असलेल्या ऑब्जेक्टची पोजिशन आणि त्या वस्तूचं थ्री डीमध्ये मोजमाप केलं जातं. त्याबरोबरच कॅमेरा हा ती वस्तू कोणती आहे. तो व्यक्ती, वस्तू , प्राणी की आणखी काही आहे? याची माहिती पुरवतो. तसंच रडार हे त्या वस्तू आणि ट्रेनमधील अंतर, ट्रेनची गती यांचं विश्लेषण करून माहिती पुरवते. यामुळे धोक्याची जाणीव, त्याचे विश्लेषण आणि त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे. यातून अपघाताची संख्या कमी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून भारताने एक पाऊल पुढे टाकायला हवे.

त्यामुळे या ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर आता चर्चा ही जुन्या तंत्रज्ञानाची नाही तर आगामी काळात हजारो लोकांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक आणि Artificial Intelligences वर आधारित असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित रेल्वेची आवश्यकता आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे विश्वगुरू बनण्याची अपेक्षा असलेल्या भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा आणि वेगाने बदलणाऱ्या जगासोबत तंत्रज्ञानाचा स्वीकारही करायला हवा. नाहीतर जुनी कवच कुंडले आगामी काळात नाकाम ठरतील.



Tags:    

Similar News