डॉ.आंबेडकरांच्या लेखनाचा पुर्नजागर
आंबेडकरांनी इतिहासाला आव्हान दिले, समाजाची छाननी केली आणि पूर्वापार चालत आलेल्या 'वैध' रुढीपरंपरांची मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी केली. आंबेडकरांचे लेखन म्हणजे अस्पृश्य आणि अप्रेक्ष्य मानून बहिष्कृत केल्या गेलेल्या, मानवी हक्कांपासून वंचित ठेवल्या गेलेल्या, इतिहासाला पारख्या झालेल्या समुदायाला योग्य मानवी हक्क मिळवून देण्याचे आदर्श साधन होय सांगतायहेत डॉ. सुरज एंगडे...;
एकाच नव्हे तर अनेकविध भारतीय भाषांमधून ज्याची पुस्तके विजेच्या वेगाने खपतात असा डॉ. आंबेडकर वगळता दुसरा कोणी लेखक आपल्या डोळ्यासमोर येत नाही. परंतु व्यावसायिक कौशल्याचा पूर्ण अभाव असलेले नेतृत्वच आपल्याला लाभत आलेले आहे. 1979 झाली कामाला सुरुवात झाली तेव्हापासूनच डॉ.आंबेडकर यांच्या लेखनाच्या आणि भाषणांच्या संग्रहाची प्रकाशने वादांच्या गदारोळाला कारणीभूत ठरली आहेत.
महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले बाबासाहेबांच्या लेखनाचे आणि भाषणांचे संग्रह हा राज्यातील एकजात सगळ्या विद्वज्जनांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या प्रकाशन घोटाळ्याने त्या सर्वांनाच अतिशय निराश केले आहे. गेले दशकभर या घडामोडींचे मी काळजीपूर्वक निरीक्षण करत आहे. या लोकांच्या बेजाबदारपणामुळे बहुधा नेहमीच माझ्या मनात वैफल्य दाटून येत असते.
माझ्या प्रत्येक भारतभेटीत सरकारी छापखान्यांच्या विविध विक्रीकेंद्रात वेळोवेळी जाऊन हे निळे ग्रंथ घेण्यासाठी मी हजारो रुपये खर्च केलेत. पण एकाही वेळी सगळेच्या सगळे खंड माझ्या पदरात पडले नाहीत. हे ग्रंथ मी परदेशी पाठवले. अनेक भारतीय मित्रांना भेट म्हणूनही मी त्यातले काही दिले. काही खंड हवाई मार्गे रवानगी होण्याची वाट पाहत अद्याप भारतातच ठिकठिकाणी पडून आहेत. परंतु हे संच सुटेसुटे आणि अर्धेमुर्धे असल्यामुळे मी ते आणू शकलेलो नाही.
यावर उपाय म्हणून मी या पुस्तकांचे डिजिटिलायझेशन करण्याच्या कामाला चालना दिली. ऑगस्ट 2015 पासूनच्या माझ्या इमेल्स मी तपासल्या. त्यावेळी संबंधित संपादकीय मंडळात असलेल्या प्रा. हरी नरके यांना एक मेल मी पाठवल्याचे त्यात आढळले. डॉ. आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लेखनाचा सर्वदूर प्रसार व्हावा म्हणून त्याचे डिजिटिलायझेशन करण्याबाबत विचार करण्याची विनंती मी त्यांना त्यात केली होती.
कॅरव्हानच्या वार्ताहर अथिरा कोणिक्कर यांनी दोन वर्षे खपून केलेला अत्यंत महत्त्वाचा तपास हा सध्या चर्चेचा ताजा विषय बनलाय. आंबेडकरांचे लेखन व भाषणे यांचा संग्रह करताना झालेल्या प्रकाशन घोटाळ्याचे दर्शन आपल्याला त्यांच्या वार्तापत्रात घडते. महाराष्ट्रातील एकामागोमाग आलेल्या सर्वच सरकारांची या घोटाळ्याला निगरगट्ट साथही असल्याचे आपल्याला दिसते. यापैकी कुणालाच आंबेडकरांबद्दल मनोमन आदर नाही आणि तरी प्रत्येकाला त्यांच्या जीवनाची नुसती प्रतीकात्मक दाखवेगिरी करायची आहे असेच यातून उघड होते.
उर्वरित समाजाच्या स्वीकृतीचा स्पर्श आजही न झालेल्या समुदायाच्या अलिखित इतिहासाच्या मांडणीबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाला कोण्णीकरांचा हा अहवाल अस्वस्थ करणारा आहे. आंबेडकरांचे लेखन म्हणजे अस्पृश्य आणि अप्रेक्ष्य मानून बहिष्कृत केल्या गेलेल्या, मानवी हक्कांपासून वंचित ठेवल्या गेलेल्या, इतिहासाला पारख्या झालेल्या समुदायाला योग्य मानवी हक्क मिळवून देणारे आदर्श साधन होय.
दलित पँथरांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आंबेडकरांचे संग्रहित लेखन प्रकाशित करायला महाराष्ट्र सरकारने 1979 साली प्रथम सुरुवात केली. त्यांचे लेखन बऱ्याच प्रमाणात नष्ट झाल्याची आणि त्याहून मोठ्या प्रमाणात ते लोकांपासून दडवून ठेवल्याची भीती व्यक्त केली जात होती. आंबेडकरांच्या लेखनापैकी एकूण अठरा पुस्तके वेगवेगळ्या टप्प्यावर आलेली होती.
आंबेडकरांना आवश्यक ते संशोधन साहाय्य लाभले असते तर आपल्या महानिर्वाणापूर्वी यातील निदान निम्मी संपदा तरी त्यांनी पूर्णावस्थेला नेली असती की नाही असा रास्त प्रश्न आपल्याला पडतो. भारतातील सर्वाधिक बहुप्रसवा आणि तेजस्वी लेखकांपैकी एक असलेल्या या प्रज्ञावंताला इतर लेखन तर सोडाच परंतु बुद्ध आणि त्याचा धम्म हा आपला अत्यंत महत्त्वाचा प्रबंध प्रकाशित करायलाही पुरेसे आर्थिक पाठबळ मिळाले नाही हे वास्तव जाणून आपण विषण्ण होतो.
आंबेडकरांची प्रगाढ विद्वत्ता इतिहासाची दालने आपल्यासाठी खुली करते. कितीतरी कच्चे दुवे सांधून त्यांची प्रज्ञा आपल्यासाठी एक सरळ रस्ता तयार करते. या रस्त्यावरून जाताना मग आपल्याला गोंधळल्यासारखे होत नाही, असुरक्षित वाटत नाही. आपल्या सामुदायिक इतिहासाचा आणि अनेकविध 'भारतां'च्या इतिहासाचा ते आपल्यासाठी एकमेव दुवा ठरतात. आंबेडकरांनी इतिहासाला आव्हान दिले, समाजाची छाननी केली आणि पूर्वापार चालत आलेल्या 'वैध' रुढीपरंपरांची मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी केली.
आंबेडकरांचे अभ्यासक असलेल्या विद्वानांच्या मते 175 पुस्तके होतील असे त्यांचे लिखाण अद्याप ग्रंथरूपात प्रकाशित झालेले नाही. याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहता आंबेडकरांच्या अनुयायांपैकी दहा टक्के लोक ही पुस्तके विकत घेतील असे मानले तरी देशभरातील हा आकडा सुमारे चार कोटींवर जातो. व्यावसायिक शहाणपण आणि सामाजिक जबाबदारीचे थोडेही भान असलेले कोणतेही सरकार हा कार्यक्रम साहजिकच अग्रक्रमाने हाती घेईल.
आंबेडकरांचे शब्द गलथानपणे हाताळले जाणार नाहीत किंवा त्यांचा विपर्यास केला जाणार नाही याबाबत दक्ष राहिले पाहिजे. आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांचीही या दृष्टीने काटेकोर फेरतपासणी झाली पाहिजे. अप्रकाशित पुस्तकांच्या हस्तलिखितांची आणि कागदपत्रांची हाताळणी केवळ निष्ठावंत आंबेडकरवाद्यांकडूनच केली गेली पाहिजे. अन्यथा आंबेडकरांच्या लिखाणात अनावश्यक ढवळाढवळ केली जाऊन त्याला डाग लावला जाण्याची दाट शक्यता आहे.
परंतु सरकारने आंबेडकरांच्या पांडित्याची वेळोवेळी प्रतारणा केलेली आहे. आपली जबाबदारी सरकारला नीट पार पाडता येत नसेल तर या साऱ्या साहित्याच्या प्रकाशनासाठी आणि खरेदीसाठी अतिशय सक्षम असलेल्या लोक समूहाकडे त्याने हे काम सोपवावे. गांधींना ज्याप्रकारे शासकीय प्रायोजकत्व लाभले तसेच आंबेडकरांकडेही ध्यान दिले गेले पाहिजे.
परराष्ट्र आणि सांस्कृतिक मंत्रालयांनी आंबेडकरांच्या सगळ्या साहित्याचे देशी भाषांसह परकीय भाषांमध्येही भाषांतर करवून घेऊन आपल्या वकिलातींना हे सगळे साहित्य शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना भेट म्हणून देण्यास सांगितले पाहिजे. आपला वारसा अशा रीतीने जतन केला जाणेच आंबेडकरांना आवडले असते.
(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, 'कास्ट मॅटर्स' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. व्याख्याने, सेमिनारच्या निमित्ताने जग अनुभवतात. 'जी क्यु' या मॅगझीनने भारताच्या २५ प्रभावशाली तरुणामध्ये त्यांची निवड केली आहे. लेखकाच्या सहमतीने हे लेख मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहेत)
लेखक : सूरज येंगडे : suraj.yengde@gmail.com
भाषांतर : अनंत घोटगाळकर
मूळ प्रकाशन: इंडियन एक्सप्रेस 18 एप्रिल, 2021