मिट्टी दी खुशबू: शेतकरी आंदोलनांसाठी अमेरिका सोडलेले डॉ. स्वैमान सिंह

मिट्टी दी खुशबू... या मातीच्या सुगंधासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. डॉ. स्वैमान सिंह... आपली अमेरिकेतील नोकरी सोडून शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची गेल्या 6 महिन्यांपासून सेवा करत आहेत. हा सगळा सेवा भाव कुठून येतो. कोव्हिड काळात हजारो लोकांची सेवा करणारा हा सरदार नक्की कोण आहे? वाचा... नेहा राणे यांचा लेख...;

Update: 2021-05-27 02:51 GMT

डॉ. स्वैमान सिंग अम्रुतसर, पंजाब मध्ये जन्मले, वयाच्या १० व्या वर्षी कुटुंबासोबत अमेरिकेला स्थलांतरित झाले. पुढे अमेरिकेत शिक्षण घेऊन कार्डिओलॉजिस्ट झाले. संपूर्ण कुटुंब शेतीशी जोडलेल, ते त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रतिनिधी आहे. ज्यांचा शेतीशी संबंध केवळ ट्रॅक्टर चालवण्यापूरता आला. मात्र, पंजाबच्या मातीशी, तिथल्या शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायमस्वरूपी जोडली गेली आहे.

साधारण १० वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या मूळ गावी पखोके आणि पंजाब मधील इतर ग्रामीण भागात मेडिकल कॅम्प घ्यायला 5 Rivers Heart Association या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी भारत, अमेरिका, घाना या देशात वैद्यकीय मदत पुरवली. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या Black Lives Matter या आंदोलनात देखील त्यांनी स्वतः मेडिकल रिलीफच काम केलं.

जेव्हा भारतात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि शेतकऱ्यांनी राजधानी कडे कूच केलं, त्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून तसंच ओळखीतून वैद्यकीय सल्ल्यासाठी फोन येऊ लागले. तेव्हाच त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मेडिकल कॅम्प सुरू करु, स्वयंसेवक डॉक्टर ना ट्रेन करून यावं लागेल असा विचार केला. मात्र, एका घटनेने त्यांना आंदोलनात सूरु असलेल्या अटीतटीच्या परिस्थितीची कल्पना आली.



 


एका शेतकरी आंदोलकांचा मृत्यू केवळ चुकीचा CPR दिल्याने झाला होता. ह्या घटनेने ते कमालीचे हादरले आणि त्याक्षणी त्यांनी भारतात यायचा निर्णय घेतला. ३४ वर्षाचे स्वैमान सिंग याकरता आपली अमेरिकेत सुरु असलेली फेलोशिप, ३ वर्षाची मुलगी आणि कुटुंब न्यू जर्सीला सोडून आले.

भारतात येताना त्यांना वाटलेलं आठवडभरात set-up होईल आणि पुन्हा अमेरिकेत जाता येईल. इथे आल्यावर त्यांना परिस्थितिची दाहकता कळली. त्यांनी दिल्लीलगतच्या टिकरी बॉर्डरवर आपला जम बसवला. म्हणजे फार काही नाही तर एका साध्याशा टेबल वर दवाखाना मांडला. Doctors, volunteers, NGOs ना मदतीसाठी आवाहन केल. हळूहळू लोक जोडले गेले, आठवडा-१५ दिवसाचा महिना उलटून गेला तरी डॉक्टर टिकरी बॉर्डरवरच आहेत. हळूहळू पसारा वाढला, साधारण २० डॉक्टर आणि १००० स्वयंसेवक, त्यांनी रुग्णांसाठी म्हणजेच आंदोलकांसाठी टिकरीच्या आसपास तात्पुरत्या खोल्या बांधल्या (सध्या ११००) जिथे त्यांच्यावर उपचार तसेच रुग्णांना आराम करता येईल.


दोन महत्त्वाच्या घटनांनी त्यांच काम आणि आंदोलनातील त्यांच स्थान पूर्णपणे बदललं. २६ जानेवारी ला निघालेल्या मोर्चात ते २०० शेतकऱ्यांच्या जथ्थ्यासोबत कामचलाऊ ambulance मध्ये होते. कारण गोंधळलेले शेतकरी, त्यातून उदभवलेली अनागोंदीची परिस्थिती, अश्रूधुर हे सर्व त्यांनी अनुभवले. अश्रुधूराचा मारा सुरू असताना त्यांनी आणि त्यांच्या टीमने आंदोलकांवर उपचार केले. शेतकऱ्यांची, त्यांच्या हक्कासाठी चाललेल्या आंदोलनाची या घटनेचा फायदा घेऊन चाललेली बदनामी बघून, ते केवळ डॉक्टर नाही उरले तर एक आंदोलकच झाले.

त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत शक्य तेवढ्या सुविधा शेतकऱ्यासाठी वाढवत नेल्या. लायब्ररी, मुलभूत गरजांसाठीच मोफत जनरल स्टोर, तसेच त्यांच कम्युनिटी सेंटर जिथून चालत त्या परिसराची साफसफाई यासारखी काम देखील सुरु केली.

आता त्यांच्यासोबत साधारण १००० स्वयंसेवक या कामासाठी जुंपलेले आहेत. कोविडची दुसरी लाट आल्यावर आंदोलनात असलेल्या स्वयंसेवी डॉक्टरना देखील आपापल्या ड्युटीवर रुजू व्हाव लागल. अशा परिस्थितीत आंदोलनात कायमस्वरूपी उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली, visiting doctors वाढले, संस्थेने जगभरातील १०,००० डॉक्टर्ससोबत telemedicine सुरू केलं. सध्या टिकरी बॉर्डरवर डॉ स्वैमान सिंह हे एकट्यानेच आरोग्य सेवेचा पूर्णवेळ किल्ला लढवत आहेत. तसेच सिंघू आणि गाज़ियाबाद बॉर्डरवर देखील आरोग्य सुविधांची देखरेख करत आहेत. तिन्ही बॉर्डरवर मिळून सध्या साधारण ८०,००० शेतकरी आंदोलक रस्त्यावर राहतायत, त्यापैकी दिवसाला ४,०००-६,००० रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली जाते. दिवसभराची ड्यूटी संपवून डॉक्टर आणि त्यांची टीम रात्री दिल्ली आणि हरयाणच्या बॉर्डरजवळील भागात फिरून कोविडसाठी लागणाऱ्या वैद्यकीय संसाधनांचे गरजू व्यक्तींना वाटप करतात.

त्यांनी दिल्ली आणि पंजाब राज्य सरकारांकडे या शेतकऱ्यांसाठी लसींची मागणी केली होती, लसीकरणाची व्यवस्था आम्ही करु या तत्वावर. पण दोन्ही राज्य सरकारांनी याबाबतीत असमर्थता दर्शवली. आता या संस्थेची मॉडर्ना आणि फायझर या लस उत्पादक कंपन्यांशी बोलणी चालू आहेत, खास आंदोलक शेतकऱ्यांसाठी लसी आयात करण्यासाठी. डॉ. स्वैमान सिंह टिकरीमधील त्यांचं कार्य जोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु ठेवतील तोपर्यंत तिथेच असणार आहेत.

तळ टीप:- शेतकरी आंदोलनासंबंधीची तसेच 5 Hearts River Association या संस्थेच्या आंदोलनातील आरोग्य सेवेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. स्वैमान सिंह यांना Instagram वर फॉलो करा. कारण मिडीया कव्हर करत नसली तरीही ६ महिन्यानंतरही शेतकरी आंदोलन चालूच आहे.

To support 5 Rivers Heart Association https://www.5riversheart.org/

Dr. Swaiman Singh's instagram handle https://instagram.com/dr_swaiman_singh?utm_medium=copy_लिंक
Dr Swaiman Singh's Twitter handle

https://twitter.com/SinghSwaiman?s=09


Tags:    

Similar News