भारताचा 'अणूपुत्र'!

भारताला अणुशास्त्राच्या विश्वात घेऊन जाऊन अणुभौतिक क्षेत्रातील संशोधनाचा पाया रचणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ होमी भाभा यांचा आज जन्मदिन, त्यानिमित्ताने माजी खासदार भारत कुमार राऊत य़ांनी त्यांच्या कार्याचा केलेला गौरव...;

Update: 2020-10-30 03:46 GMT

भारताची अण्विक संशोधनात वाटचाल सुरू करताना 'शांततेसाठी अणू' ही संकल्पनाही त्यांनीच जगाला दिली. तिचा स्वीकार अनेक राष्ट्रांनी त्यापुढील काळात केला. डॉ. भाभा यांची ही कामगिरी अतुलनीय मानावी लागेल. होमी भाभा यांच्या भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.



डॉ. भाभा यांचा जन्म १९०९ मध्ये सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.

त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली. पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली.

वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक पारितोषिकेही मिळाली.

१९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टीट्यूट ॲाफ फन्डामेंटल रिसर्च - टीआयएफआर) स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.



भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणू उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

पण दुर्दैवाने या थोर शास्त्रज्ञाच्या ज्ञानाचा उपयोग भारताला फार काळ होऊ शकला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला जातांना २४ जानेवारी, १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान आल्प्स पर्वतांत कोसळले. या अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र(बीएआरसी) असे ठेवण्यात आले. भारतात नंतर होमी सेठना, विक्रम साराभाई, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अशी अण्विक शास्त्रतज्ज्ञांची फळी तयार झाली. त्या सर्वांचे स्फूर्तिस्थान डॉ. भाभा हेच होते.


Tags:    

Similar News