आहे तयारी मरायची, भीमजयंती जोरात करायची?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी डी.जे. आवश्यकता आहे का? यंदाची भीम जयंती दणक्यात करणार? पॅंथरची डरकाळी भीम जयंती होणारच? अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचा नक्की हेतू काय? वाचा सागर भालेराव यांचा मेंदूला शॉट देणारा लेख

Update: 2021-03-31 14:34 GMT

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललाय. आसपासची अनेक लोक कोरोना संक्रमणामुळे  गमावतो आहोत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी आपण आपल्या सणउत्सवांवर काही मर्यादा आणल्या आणि घरी राहूनच सगळे सणवार साजरे केले. तेही नेहमीच्याच उर्जेने आणि उत्साहात. मागच्या वर्षी जशी संयमित भूमिका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली त्याची उणीव यावर्षी मात्र भासते आहे. समाजमाध्यमांवर 'मेलो तरी चालेल, भीमजयंती साजरी करणारच' अशा आशयाचे लिखाण, व्हिडियो पोस्ट केले जातायेत. कशासाठी हा अट्टहास? याने साध्य काय होणार? यावर चर्चा व्हायला हवी.

भीमजयंतीचे बदलते स्वरूप…

गेल्या काही वर्षापासून युवकवर्ग मोठ्या संख्येने भीमजयंती उत्सवात सहभागी होताना दिसतोय. चळवळीची बदलती रूपे, बदलते आयाम यानिमित्ताने पाहायला मिळतायेत. सलग 18 तास अभ्यास, निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असे सृजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातायेत. सुशिक्षित पिढीमुळे हा सकारात्मक बदल होतो आहे. आत्मभान आणि आत्मसन्मान जागृत झालेली आंबेडकरी पिढी नव्या युगाची नवी वाट धुंडाळू बघतेय. शिक्षणाचं महत्त्व समजलेल्या युवापिढीने आता लोकशिक्षण ही देखील आपलीच जबाबदारी आहे. हे मान्य केलंय. अशा प्रकारच्या प्रकल्पांना समाजमान्यता मिळत असून नवनवीन प्रकल्प राबवले जातायेत.


रस्त्यावर उतरून जयंती साजरी करण्याचा अट्टहास कशासाठी?

भीमजयंती खरे तर वंचित समुहासाठी दिवाळीसारखाच सण. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांची गुलामगिरी आपल्या प्रयत्नांनी धुडकावून लावली. त्या डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखविण्याचे एक निमित्त असते. आपल्या बुद्धिमत्तेला कृतिशीलतेची जोड दिल्याममुळे डॉ.आंबेडकरांना सनातनी व्यवस्थेला टक्कर देणे सोपे गेले. याच चेतेनेतून नवी पिढी बाबासाहेबांचे विचार जनमाणसात रुजवू बघते आहे, त्यांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून धडपडते आहे. परंतु जयंती डीजेच्या आणि बॅंडच्या तालावरच झाली पाहिजे असा अट्टहास काही मंडळी धरतायेत.

कोरोनाच संकट डोक्यावर असताना असे वागणे परवडणारे नाही. गावाखेड्यात अजूनही अनेक ठिकाणी जयंती म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा आखाडा असतो. हा एकच सण प्रस्थापित पक्षांना 'आम्ही किती दलितांच्या भूमिकेशी एकरूप आहोत' याचे प्रदर्शन करण्याची संधी देत असतो. प्रस्थापित पक्षांच्या हातातले बाहुले बनलेले स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांनी दिलेल्या देणगीवर स्वतःची वाहवा करवून घेतात आणि 'लाखो रुपये खर्च करून जयंती साजरी केली' याची वर्षभर शेखी मिरवतात.

कमी अधिक प्रमाणात हे चित्र प्रत्येक ठिकाणी आढळते. जुन्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभी राहून नवी पिढी भविष्य न्याहाळत असते. भीमजयंतीला नव स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी एकीकडे नवी सुशिक्षित पिढी जीवाचा आटापिटा करत असताना जुने कार्यकर्ते मात्र, अविवेकी भूमिका घेतायेत. स्वतःला आंबेडकरी विचारांचे वारस म्हणून घेणारे काही राजकीय पक्ष देखील जेव्हा अशी अविवेकी भूमिका मांडतात तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही.

विचारवंतांची भूमिका काय?

गेल्या काही वर्षांपासून भूमिका घेणारे फार कमी लेखक, कवी, चिंतक समाजात दिसतायेत. खरे तर चुकीच्या दिशेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणे हे चळवळीतल्या बुद्धिवंताची जबाबदारी असते. यात सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत. परंतु जेव्हा समुदायाच रुपांतर 'जमावात' व्हायची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा लिहित्या-जाणत्या व्यक्तींची जबाबदारी अधिक वाढते.



 डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाला अजून अवकाश आहे, तोवर यावर लिहीलं-बोललं गेल पाहिजे आणि समाजाला विधायक स्वरूपात जयंती कशी साजरी करता येईल. याबद्दल मार्गदर्शन केलं पाहिजे. घरी राहूनही जयंती साजरी करता येते. बाबासाहेबांनी लिहिलेलं विपुल लिखाण आपल्या सर्वांसाठी एक मोठा वारसा आहे. त्याचं ऑनलाईन सामुहिक वाचन होऊ शकतं. त्यावर चर्चा घडवून आणली जाऊ शकते. विचारांचा वारसा वाचन संस्कृतीने जपला जाऊ शकतो. त्यासाठी डीजे किंवा बॅंडची आवश्यकता नक्कीच नसते.



कोरोनामुळे लाखो संसार उध्वस्त होताना आपण पाहतो आहोत. समाजाची आर्थिक परिस्थती नाजूक असताना असे उपद्व्याप परवडणारे नाहीत. कोरोना काही जात-पात बघून विषाणू पसरवत नसतो. आपण आपली आणि पर्यायाने समाजाची जबाबदारी स्वतःहून घ्यायला हवी. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे गेलेले रोजगार पुन्हा उपलब्ध होतील की नाही? याबद्दल अजूनही साशंकता आहे. पहिले पाढे पंचावन्न करून आपण जर देशोधडीला लागणार असू तर कुठल्या तोंडाने आंबेडकरी विचारांशी आपलं नात सांगणार आहोत? जयंतीला राजकीय आखाडा बनवू देऊ नका. विचारांची जयंती विवेकाने साजरी करुया. कोरोनापासून स्वतःच आणि कुटुंबाचं रक्षण करूयात. 

Tags:    

Similar News