भारत जोडो यात्रेने आम्हाला काय दिलं? - वैभव छाया
भारत जोडो यात्रेने नेमकं काय दिलं? या यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार का? याबरोबरच राजकारणाची घसरत चाललेली पातळी याबाबतचा वैभव छाया यांचा लेख;
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. काल परवा पर्यंत राहूल गांधींवर शेलक्या वृत्तीने टीका करणारे लोकही या यात्रेत सहभागी झाले. आता हिंदी पट्ट्यात यात्रा दाखल झाल्यानंतर यात्रेचा खरा कस लागणार आहे.
राहूल गांधी हा माणूस तापट आहे. केअरलेस आहे. पक्षाचं कार्यालय एका कॉर्पोरेट पद्धतीने चालवतो. सायंकाळी सहानंतर ऑफिस बंद करून निघून जातो. यापासून अशी अनेक उदाहरणं आणि आरोप करताना लिबरल मंडळी थकत नव्हती. त्याचा फायदा आपोआप एकही दिवस सुट्टी न घेण्याची आणि दिवसाला १८ तास काम करण्याची अफवा पसरवणाऱ्यांना थेट होत होता.
जी माणसं काम वेळेत पूर्ण करतात. जी माणसं नियोजित पद्धतीने कामं करून वेळेची बचत करतात. जी माणसं कामाला शिस्त आणि वर्तनाला नियमबद्ध असतात. त्यांना मूर्ख किंवा हलका समजणाऱ्यांचा देश आहे आपला. या देशात विद्वानांची किंमत कमी आणि सुमारांची इज्जत जास्त होणे क्रमप्राप्त आहे. असो.. तोतया लोकांचा काळ जास्त वेळ टिकत नाही.
राहूल गांधींनी एकच लाईन नीट लावून धरलीये.. डरो मत. लोकांच्या मनात असलेल्या भीतीला मोकळं करण्याची त्यांनी करून दिलेली वाट हेच या यात्रेचं मोठं यश आहे. लोक बोलू लागलेत. सोशल मिडीयावर भक्तांच्या, पेड ट्रोलर्सना आता घाबरणं कमी होऊ लागलं आहे. लोक सडेतोड पणे बोलत आहेत. खरं बोलू लागले आहेत. असत्याचा बुरखा फाडू लागले आहेत. हेच तर पाहिजे होतं.
या यात्रेमुळे काँग्रेसला किती फायदा होईल हे ठाऊक नाही. हे सर्व यश इलेक्टोरल लेवल ला कनवर्ट होण्यासाठी काँग्रेसचे प्रादेशिक नेतृत्व किती इमानदारीने काम करेल यावरही अजून शंकाच आहे. ते कनवर्ट होण्यासाठी काँग्रेसचे सरंजामदार त्यांच्या जातीच्या माजाला सोडून इतर जातींना सोबत घेतील का? हा ही मोठा प्रश्नच आहे. हा प्रश्न केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्वच पक्षांना लागू आहे.
राजकारण बदललं आहे. पोस्ट ट्रूथ च्या कालखंडात आपण जगत आहोत. या कालखंडात असत्य हेच सत्य मानण्याची प्रथा आहे. भक्तीरस हाच जीवन जगण्याचा मुख्य आधार आहे. आपलं नेतृत्व कितीही अनैतिक असलं तरी त्यास नैतिक ठरवून भक्तीचे उमाळे त्या त्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी काढण्याचा हा काळ आहे. खोटं बोलून कुणाचंही चारित्र्यहनन करण्याचा हा काळ आहे.
अरूण जेटलींनी उभ्या केलेल्या कार्यक्रमाला अख्या देशाने पसंती दिली. हा कार्यक्रम होता चारित्र्य हननाचा. भारताच्या धर्मनिरपेक्ष चारित्र्याच्या हननाचा, आयडिया ऑफ इंडिया बर्बाद करण्याचा... पुरूषी दमनाला सर्वमान्य करून संवैधानिक मूल्य नेस्तानाबूत करण्याचा, लोकशाही मानणाऱ्या हुशार लोकांच्या चारित्र्य हननाचा कार्यक्रम.
हे सर्व करताना गांधी, नेहरू, आंबेडकर या त्रयींची निर्भत्सना करणं. भारतीयांची, महिलांची निर्भत्सना करणं हा सर्वमान्य साधारीकरण आणि सुलभीकरण करून टाकलेली प्रॅक्टीस बनवली. राहूलची इमेजही इथेच खराब केली गेली. असो...
लोक किमान तोंड उघडायला लागलेत. बोलायला लागलेत. राजकीय पक्षांना लोक मतपेटीतून उत्तरे देतीलच. यात वादच नाही. मला प्रश्न सतावतोय तो नोकरीत असलेल्या पत्रकारांचा. उद्या जर सत्ताबदल झालाच तर लोक तुम्हाला थेट जाब विचारतील. तेव्हा तुम्ही काय कराल?
राहुल गांधीचा कठोर प्रवास आता सुरू होत आहे. विरोधकांनी आधी हलक्यात घेतलेली यात्रा आता त्यांना सांभाळता येईना झालीये. हे फक्त एकाच सुत्रावर चाललंय. डरो मत... त्यामुळेच महिलांना त्यांच्या मिठीत तटस्थ स्पर्श जाणवतो. पुरूषांना आपलेपणा जाणवतो. हे फार मोजकी लोकं करू शकतात.
तुम्ही हे वाचत असताना एकदा स्वतःच्या मनाला विचारून पहा.. तुम्ही काम करत असलेल्या राजकीय पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने कधी तुमच्याशी शेवटचं हस्तांदोलन केलंय, मिठी मारलीये, सोबतीला बसण्याची परवानगी दिलीये. विचारून पहा स्वतःलाच.
निर्भय बनण्याची वृत्ती आणि विश्वास देणाऱ्या राहुलचं खूप अभिनंदन...