भयंकराच्या दारात नव्हे तर घरात : मुग्धा कर्णिक
जहांगिरपुरा दंगल आणि त्यानंतर सुरु झालेल्या बुलडोजर कारवाईवरून आपण आता भयंकराच्या दारात नव्हे, तर घरात पोहोचल्याची भावना लेखिका मुग्धा कर्णिक यांनी व्यक्त केली आहे...;
एका माझ्या लेखात मी हे लिहिलं होतं-
....अशाच बेडर प्रतिकाराची आणखी एक प्रतिमा होती रॅचेल कोरी, वॉशिंग्टनच्या ऑलिम्पिया कॉलेजची अवघ्या २३ वर्षाची विद्यार्थिनी. तिचा खून झाला तेव्हा तिने गडद केशरी निऑन जॅकेट घातले होते. ह्यूमन शील्ड म्हणून काम करणारे कार्यकर्ते आपण स्पष्टपणे नजरेत यावं म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने असली जॅकेट्स वापरतात. इजिप्तच्या सीमेलगतच्या गाझा पट्टीतल्या राफाह या गावात रोजच घरांना भुईसपाट करण्याची कारवाई होत असे. १६ मार्च २००३ रोजी एका पॅलेस्टिनी डॉक्टरच्या घरावर ही कारवाई होणार होती. ती थांबवण्यासाठी जे आठ अमेरिकन तरुण उभे होते, त्यातच रॅचेल होती. ते समोरून येणाऱ्या शस्त्रसज्ज डी-नाईन बुलडोझरच्या ड्रायवरला मेगाफोनवरून थांबण्याची विनंती करत राहिले. तो थांबला नाही तेव्हा रॅचेल त्याच्या मार्गात गुडघे टेकून बसली... तरीही तो न थांबता तिच्या अंगावरून तिला चिरडून पुढे गेला. या घटनेवर जेव्हा इस्राएली न्यायालयात खटला चालला तेव्हा इस्राएली न्यायालयाने रॅशेलचा खून हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता असा निकाल देऊन इस्राएल सरकारला आणि बुलडोझरच्या चालकाला दोषमुक्त केले.
काल भारतात ही अशीच एक धैर्यशाली विरोधाची घटना घडली. त्यातून आणखी शोकांतिका घडली नाही म्हणजे आपले फॅशिस्टीकरण अजून थोडे बाकी आहे म्हणू.
जहांगिरपुरा या स्थळी बुलडोझर वापरून अनेक घरे भुईसपाट केली गेली. कोर्टाचा आदेश असूनही.
पण या बुलडोझरसमोर बृंदा करात या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या उभ्या ठाकल्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे कागद त्यांनी समोर धरले.
न्यायाच्या कथित सर्वोच्च पीठालाही न जुमानणाऱ्या पक्षाने छू केलेले बुलडोझर होते. पण त्यांच्या समोर येऊन विरोध करण्याचे धैर्य केवळ सीपीएमने किंबहुना बृंदा करात या लढाऊ स्त्रीने दाखवले.
त्यांना कडक सलाम.
धैर्याबाबतचे नेतृत्व करण्यासाठी तत्त्वनिष्ठ स्त्री पुढे आली.
रॅचेल सारखीच.
आपण निदान विरजणापुरतं तरी धैर्य तिच्याकडून आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून घ्यावं.
नाहीतर-
लोकशाही तत्त्व, केवळ मानवी नीतीमूल्य आणि आपले व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिकार लवकरच बुलडोझरखाली जाणार आहेत...
दिवस वैऱ्याचे आहेत.
आणि हो- आपण भयंकराच्या दारात नव्हे तर घरातच आलो आहोत आता.