इंदिरा गांधींचा मृत्यू आणि मुंबईतील शुकशुकाट!

इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर काय होती मुंबईतील परिस्थिती? त्या काळात प्रभावी माध्यमं असलेल्या आकाशवाणीतील वातावरण कसं होतं? याचा वेध घेणारा मेधा कुळकर्णी यांनी शेअर केलेला अनुभव मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुन्हा शेअर करत आहोत.;

Update: 2022-10-31 05:30 GMT

31ऑक्टो1984. त्यावेळी आम्ही दादरला राहायचो. मी टू व्हीलरवरून नरीमन पॉइंटला, माझ्या ऑफिसात - आकाशवाणीत जायचे - यायचे. आकाशवाणीत काम सुरू करून जेमतेम तीन वर्ष झाली होती. इंदिरा गांधींचा खून झाल्याची बातमी आमच्या न्य़ूज रूममध्ये आल्यावर आकाशवाणीत mourning, म्हणजे शोक पाळणं सुरू झालं. या mourning ची काही मार्गदर्शक तत्व, नियम असतात. त्यानुसार कडकपणे ते पाळलं जायचं / जातं. पुढे त्याचा सराव झाला. पण माझ्या आकाशवाणीतल्या कामातलं ते पहिलंवहिलं मोठं शोकपालन.

प्रसारणासाठी दिलेल्या पूर्वनियोजित सर्व कार्यक्रमांच्या टेप्स (त्या काळी आम्ही मॅग्नेटिक टेप्सवर कार्यक्रम रेकॉर्ड करत असू) काढून घ्यायच्या आणि आपली जबाबदारी असलेल्या कार्यक्रमाच्या स्लॉट्समध्ये मोर्निंगच्या सूत्रानुसार नवे कार्यक्रम तयार करून द्यायचे – असं काम.

खुनाची बातमी आल्यावर वरिष्ठांनी आम्हाला तशा सूचना दिल्या. आम्ही कामाला लागलो. माझं काम संपवून मी घरी जायला निघाले. तेव्हा नरिमन पॉइंट ते आगरबाजाराजवळचं माझं घर, या १४-१५ किमी रस्त्यावर सुन्न शुकशुकाट. वरळी नाक्याकडे पोलिसांनी मला थांबवून चौकशी केली होती. आकाशवाणीचं कार्ड दाखवल्यावर त्यांनी पुढे काही विचारलं नाही.

जॉइन होण्यापूर्वी आकाशवाणी म्हणजे सरकारी माध्यम, सरकारचीच ताबेदारी करणं आणि स्वातंत्र्य वगैरेची गळचेपी, सरकारी म्हणजे काहीतरी कमअस्सल असे पूर्वग्रह माझ्या डोक्यात होते. ही समजूत किती चुकीची होती. ते पुढे काम करताना वेळोवेळी जाणवत गेलं. तेच घडलं इंदिरा गांधींबद्दल. कुटुंबातले संघप्रेमी, ज्या चळवळवाल्यांशी संबंध आला ते समाजवादी नेते, कार्यकर्ते वगैरेंनी त्यांना खलनायिका ठरवूनच टाकलेलं होतं.

मीही तिच मतं ग्राह्य धरत होते. पण तेही चूक आहे याची जाणीव मला पहिल्यांदा झाली – मी शिवाजी पार्कवर त्यांचं भाषण ऎकलं तेव्हा. १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेतल्यावर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या. त्याच प्रचारसभेतलं त्यांचं भाषण ऎकताना – थकलेल्या आवाजातला जोष आणि तळमळ जाणवली तेव्हा, हे पाणी काही निराळं आहे, पूर्वग्रह दूर सारून या बाईकडे पाहिलं पाहिजे, असं माझ्या मनाने घेतलं. पुढे आकाशवाणीशी संबंध आल्याने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून इंदिरा गांधींनी केलेल्या कामगिरीविषयी कळलं.

आकाशवाणी केंद्रांमध्ये अद्ययावत उपकरणांनी सुसज्जता आणणं, आकाशवाणीचा प्राण असलेल्या कार्यक्रमनिर्मिती विभागाला झुकतं माप देणं, दिल्लीत दूरचित्रवाणीची सुरवात, बंडखोर आशयाच्या गाईड चित्रपटाला झालेला विरोध मोडून काढणं, 'गांधी' हा आंतरराष्ट्रीय चित्रपट सरकारतर्फे प्रायोजित करणं वगैरे. काही काळ मी फिल्म्स डिव्हिजन संस्थेच्या डॉक्युमेंटरीजच्या मराठी स्क्रिप्टिंगचं काम केलं होतं.

जनता पक्षाचं सरकार जाऊन त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या, तो काळ. त्या दरम्यान डॉक्युमेंटरीजमधली त्यांची भाषणं, त्यांचा सहज सार्वजनिक वावर, साध्यासुध्या लोकांशी होणारा त्यांचा आत्मीय संवाद – हे सारं पाहून त्यांच्या मोहात पडायला व्हायचं. चळवळींशी संबंध आला तेव्हा वेठबिगारमुक्ती, दलित अत्याचारप्रतिबंधक यासारखे क्रांतिकारी कायदे त्यांनी आणल्याचं कळलं. हळूहळू त्यांच्याबद्दलची पूर्वदूषित मतं बदलत गेली.

पुढे त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या नव्यानव्या पैलूंची ओळख होत गेली. अलिकडे वाचलेल्या सोनिया गांधींच्या चरित्रातून त्या सासू-सुनेचं गहिरं नातंही भावलं. खमकी नेता आणि हळुवार मुलगी, आई, सासू, आजी – या त्यांच्या रूपांसकट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा युनिकपणा पुन्हा पुन्हा जाणवत राहातो.

- मेधा कुळकर्णी.

Tags:    

Similar News