गोविंदा -भंडारी - सेना

दहीहंडी काय आहे? तिला काला म्हणतात का ती कधी सुरू झाली? कीर्तनात काठीने हंडी फोडतात पण थर का लावत नाही? या दहीहंडीचं आणि भंडारी समाज आणि शिवसेनेचे राजकारण यांचा काय आहे संबंध? जाणून घेण्यासाठी वाचा अविनाश उषा वसंत यांचा लेख...

Update: 2022-08-19 05:43 GMT

दहिहंडी जुनी असेल खूप , काला म्हणत असतील जुन्या काळी. पण ही मुंबईतली थरांची दहिहंडी ही इथून सुरू झाली आहे.

ही दहिहंडी का सुरू झाली असेल? किर्तनात तर काठीनेच हंडी फोडतात. थर लावत नाही. कोणी सुरवात केली हे थर लावायला, तर मुंबईतल्या भंडारी समाजाने. कसे ते नंतर सांगतो. भंडारी हे भांडार रखवालदार म्हणून नाव पडले असावे असेही म्हणतात. संस्कृतच्या 'मनधारक' वरून भंडारी झाले असे बोलले जाते पण मला काही पटत नाही. माहिम हे भंडारी राज्य होते. बिंब राजे हे भंडारी होते असे बोलले जाते. पहिल्यापासून लढवय्ये. पण ते ताडी कधी बनवायला लागले माहीत नाही. मनधारक हे ताडी बनवणार्याला संस्कृत मध्ये म्हटले जाते. मुंबई गॅजेट मध्ये मारामारी आणि ताडी बनवणे ह्या गोष्टी भंडारी समाजाला येतात असे बोललेय.

तर हे मध्ययुगात ताडी बनवणे व विक्री करणे यात आले. ताडगोळे काढणे व नारळ काढण्याचे काम ह्याच समुदायाकडे आले. म्हणजे झाडांवर चढणे हे नित्याचेच. अंगकाठी नेहमीच बारीक.

तर ह्याच समुदायाने थराच्या दहिहंडीची सुरवात केली. एकमेकांच्या अंगावर खांद्यावर चढून थर लावून हंडी फोडायला सुरवात केली. ताडाच्या नाराळाच्या झाडावर चढणे हे सहज करायचे. अगदी हंडी च्या वेळीही हे अगदी सहज थरावर वा मानवी शिडीने वर चढून जात. दहिहंडी ला जाताना बॅंड वर गाणी म्हणत , एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून नाचत ते हंडीच्या जागेवर येत. आजही माहिम प्रभादेवीच्या भागात पारंपारिक हंडीला असेच नाचत येतात. मोठ्याने गोविंदा गोविंदा ओरडत. त्यातले एक गाणे

भंडारी नखरेदार

बांधिला किल्ला

वैर्याच्या छातीवर

पाय देवूनी आला

दारूचा व्यवसाय करायचा म्हणजे अनेक गोष्टी येतातच. पण सहसा गरीब भंडारी ताडी / दारू बनवण्यात राहिले. बरेचसे शिकले त्यातल्या कित्ते भंडारींना मुलामुंलींना शिकवण्यासाठी वर्ग ही सुरू केले. कोकणात मुंबईत हूंड्याची प्रथा बंद करण्याचे श्रेय ही भंडारी समाजालाच देण्यात येते. ब्रिटिश आमदनीत ४०% हा समाज सरकारी खात्यात काम करत होता बोलतात.

दारूचा ताडीचा व्यवसाय त्यातले काही जण अगदी आतापर्यंत करत होते. त्यामुळे मुंबईत स्थानिक दादा भाई हे भंडारी समाजातलेच दिसून येतात. त्यांच मजबूत नेटवर्क मुंबईत होत. संघटित / असंघटिक गुन्हेगारीतही बरेच जण दिसून येत होती. ऐंशी च्या दशकातील कित्येक भाईंच्या नावावरून आपल्याला ते दिसून येईल. नेमक हेच सेनेने हेरले. सेनेने मुंबईत जम बसवण्यासाठी ह्या नेटवर्क चा वापर करून घेतला. त्यातले कित्येक भाई हे सेनेचे खुले समर्थक होते. दहिहंडी हा सेनेच्या कॅडरचे प्रमुख अंग होते. कब्बडी हंडी मधली पोर सेनेनी हेरली. हंडीचे कोच बहूतेक वेळा हे भंडारी समाजातले दिसून यायचे पूर्वी. एक हंडी म्हणजे दोनशे पोर हे गणित , हे सेनेला सर्वात आधी कळले. मग बाकी हंडी सम्राट आले ते नंतर. दादरच्या कोहिनूर गल्लीतल्या हंड्या सकाळी चालून मग संध्याकाळी लोक ठाण्यात जायचे फोडायला. मोठ मंडळ कोणत तर दत्त कुठले तर ताडवाडीतले जिथे ताडांची झाड होती खूप. मुंबईत सणांचा वापर केला सेनेने मोठ व्हायला. तीच गणिते इतरांनी वापरायला सूरवात केली.

बोलायचे काय होते , तर हंडीचे थर तीस सेकंदात लावून उतरावे लागतात नाहीतर थर थरथरतात. कोसळतात. भंडारी समाजाला हे कळल होत. पण धंद्याने उंचीची स्पर्धा लावली. आणि तीस सेकंदाचे गणित चुकले सेनेचे ते विसरले त्यांचे ओबीसी राजकारण मग थर कोसळले.

Tags:    

Similar News