आवरा आणि सावरा!!
प्रथा, परंपरा योग्य की अयोग्य, गोष्टी की दंतकथा की काव्यकल्पना याची चिकित्सा होत असताना, अनेक लोक भारतीय सणांची खिल्ली उडवताना दिसतात... एकमेकांना शुभेच्छा देऊन, गोडधोड करून आनंद व्यक्त करण्यात गैर काय? वाचा आनंद शितोळे यांचा लेख;
दसरा आणि इतरही अनेक सण येतात. तशाच काही गोष्टी ओघाने येतात. शुभेच्छांची खिल्ली उडवणे आणि त्यावर पाचकळ विनोद हेही येतात. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. एकमेकांना शुभेच्छा देऊन, गोडधोड करून आनंद व्यक्त करण्यात गैर काय असावं?
प्रथा, परंपरा योग्य की अयोग्य, गोष्टी की दंतकथा की काव्यकल्पना की इतिहास याची चिकित्सा खुशाल करावी, ज्यांना समजते त्यांनी वाचावी, ज्यांना कळते त्यांनी योग्य बोध घ्यावा, वाटलं तर बदलावं नाहीतर सोडून द्यावं.
मात्र, आनंद व्यक्त करण्याचे साधन, आप्तेष्ट, मित्रांना भेटण्याचे निमित्त म्हणून सणांकडे पाहणाऱ्या सामान्य माणसाला आनंद मनमोकळा लुटू द्यावा. तथाकथित बुद्धिवादी, तर्कवादी लोक नकळत तर्ककर्कश्श होतात आणि समोर येईल. त्यावर टीका करत सुटतात, बहुसंख्य सामान्यांना गावंढळ, गतानुगतिक, बुरसटलेल्या विचारांचे म्हणून जजमेंटल होऊन मोडीत काढतात.
या तर्कांचा पाया कितीही भक्कम असला तरी आजार बरा करायची गोळी साखरेत घोळवून द्यावी लागते याचा विसर पडू नये.
विजयादशमी धम्मचक्र परिवर्तन दिवस असतोय. बहुसंख्य असलेला समाज अजूनही निधर्मी होण्याला मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि शिक्षणाच्या अंगाने अजूनही तेवढा तयार नाही, परिपक्व नाहीये. याची अचूक जाण असलेल्या बाबासाहेब आंबेडकर नावाच्या थोर माणसाने नेमका हाच विचार केलेला.
जर धर्मच नाकारला तर हजारो वर्षांची कुठलीका होईना उपासना, कर्मकांड यामध्ये अडकलेली जनता अचानक निधर्मी होऊ घातली तर एक मोठी पोकळी निर्माण होईल जी भरून काढायला काही पिढ्यांचा वेळ लागेल. तोवर तर्काच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून घ्या. सांगणारा बुद्ध निदान निधर्मी होण्याची पहिली पायरी आणि पातळी असू शकतो म्हणून परिवर्तन दिवस आला.
गमतीची बाब म्हणजे ही खिल्ली उडवणारी जनता सगळ्याच तीरावर असते, नदीच्या अलीकडे पण आणि पलीकडे पण. यावर्षी कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली जगताना माणसं जास्त हळवी झालीयत, अशावेळी वरवर पाहता शब्दांचे बुडबुडे वाटणाऱ्या शुभेच्छा आणि संदेश थोडीफार का होईना मनाला उभारी देत असतीलच ना?
आवरा आणि सावरा!!
सगळ्यांना शिलंगणाच्या हार्दिक शुभेच्छा !! कटाची आमटी-कुरड्या, पुरणपोळी-भज्याची बोंड दणकून होऊ द्या.
आपल्या माणसात, सुरक्षित आणि आनंदात सण साजरा करा !!
(- आनंद शितोळे यांच्या फेसबुक भिंतीवरून)