शाळा कॉलेज सुरु करण्यापुर्वी शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं आहे का?
कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतबरोबरच शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करणं का गरजेचं आहे. शिक्षकांच्या मानसिकतेवर कोरोनामुळं काय परिणाम झाला? महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण धोरणामुळं शिक्षकांच्या मानसिकतेवर आणि विद्यार्थ्यावर काय परिणाम झाला आहे? हे जाणून घेण्यासाठी वाचा मानसशास्त्राचे शिक्षक सचिन इंगळे यांचा लेख;
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" असे....डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मात्र, याच वाघिनीच्या दुधाची कोरोनाच्या काळात काय वाताहत झाली हे आपण सर्वजण पाहतच आहोत. गेल्या दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्राचं कोरोनाच्या महामारीमुळे कधीही भरून निघाणार नाही असं नुकसान झालं आहे.
4 ऑक्टोंबर पासून काही विहित केलेल्या अटींना डोळ्यासमोर ठेवून व त्याची अंमलबजावणी करून शाळा सुरू होत आहेत. आणखी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी घेतलेला दिसून येत नाही, येणाऱ्या कालावधीमध्ये महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय होईल. परंतु शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या समोरचा मुख्य प्रश्न आहे. तो म्हणजे की, विद्यार्थ्यांची मानसिकता अध्ययन शिलतेकडे कशी एकवटली जाऊ शकेल?
साधारणपणे सध्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आज आपण विचार केला तर पुढील बाबी निदर्शनास येत आहेत.
१) विद्यार्थ्यांमध्ये चंचलता वाढलेली दिसून येते आहे.
२) विद्यार्थी अभ्यासात एकाग्र होताना दिसून येत नाही.
३) सदैव डोळ्यासमोर मोबाईलच्या स्क्रीन मुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्यावर मोठा परिणाम झाल्याचं येणाऱ्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
४) या काळात विद्यार्थ्यांची वाचन व लेखन करण्याची वृत्ती कमी झालेली आपल्यास दिसून येते आहे.
५) विद्यार्थी गणितीय सराव आणि विज्ञान, प्रयोगवस्तू हाताळणे व त्यांचे लेखन यामध्ये थोडे चंचलपणाचं वर्तन शाळा कॉलेज सुरु झाल्यानंतर जाणवण्याची शक्यता आहे.
6) वरील सर्व निरिक्षणातून एक बाब समोर येते ते म्हणजे विद्यार्थ्यांची अध्ययन वृत्ती या काळात कमी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणतंही उपयोजनात्मक निश्चित असे संशोधन झालेले नसले तरीही आपल्याला निरिक्षणामधून या बाबी समोर येतात.
यावर उपाय काय?
मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार करून सुयोग्य अशी उपाययोजना यावर करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील बाबी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे....
१) शाळेत व शाळेच्या वातावरणाशी समरस होण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून द्यावी.
२) मनोरंजनात्मक अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची गोडी निर्माण करावी.
३) विद्यार्थ्याकडून लगेच अध्ययनाची व अपेक्षित वर्तन बदलाची अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा बहुआयामी मूल्यमापन आयोजित करावे .
जसे की.. सादरीकरण, विद्यार्थ्यांचा तोंडी सहभाग आणि शेवटी लेखन कार्याद्वारे मूल्यमापन व मूल्यांकन करावे.
४) मनावर कोणतेही दडपण येणार नाही अशा सूचना शाळेमार्फत विद्यार्थ्यांना द्याव्यात.
५) शाळेचा कालावधी एकूण तीन ते चार तास असावा तोही सलग पद्धतीने राबवावा.
६) कोरोना बाबतच्या सर्व सूचना शाळेच्या व महाविद्यालयाच्या वतीने पालक सभा उदबोधन पर व्याख्याने आयोजित करून द्यावीत, जेणेकरून पालक ही आपल्या पाल्याबाबत व त्यांच्या आरोग्या बाबत जागृत राहतील.
७) येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची मोहीम राबविल्यास सर्व पालक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वतःच्या व समाजाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मित्रहो वरील काही विचार मी विद्यार्थ्यांच्या बाबतीत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेले आहेत. विनाअनुदानीत शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं... या शिक्षण प्रक्रियेचा अविभाज्य घटक म्हणजे शिक्षक.. आज सद्यस्थितीला या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला शासनाच्या काही विशिष्ट धोरणामुळे काही शिक्षकांची आर्थित स्थिती वाईट असल्याचं दिसून येतं.
ज्या शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. विशेषत: जो शिक्षक गुणवत्ताशील आहे, पात्रताधारक आहे, मात्र तो विनाअनुदानित,कायम विनाअनुदानित आणि सीएचबीसारख्या तत्वावर कार्यरत असलेल्या शाळा-महाविद्यालयात या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी तो आपले भविष्य व जीवन वेचतो आहे. त्याच्या मानसिकतेचा देखील कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थिमुळं विचार करणं गरजेचं आहे.
या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनुदानित शिक्षकांना पूर्ण पगार घेणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागला का? मात्र, या उलट विनाअनदानित व कायम विनाअनुदानित, सीएचबी तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राध्यापकांचे गेल्या कित्येक महिन्यापासून वेतन नाही. त्यामुळं त्यांच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं आहे.
आता पुन्हा नव्याने शाळा महाविद्यालय सुरू होत आहे. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून शाळा सुरु करण्य़ापुर्वी या शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करणं गरजेचं आहे. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व सीएचबी सारख्या महाविद्यालयांना अनुदान दिले पाहिजेत.
कायमस्वरूपी प्राध्यापक भरती सुरू करून या शिक्षक व प्राध्यापकांचे आर्थिक सबलीकरण होणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 14 व 15 सर्वांना कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शिक्षणव्यवस्थेमध्ये ज्या काही सर्वश्रूत अशा अलिखित स्वरूपाच्या अनिष्ट रूढी,परंपरा निर्माण होत आहेत. त्या विद्यार्थ्याच्या भवितव्यावर आघात करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर या प्रथांचा शिक्षकांच्या मानसिकतेवर मोठा आघात होत असल्याचं चित्र आहे.
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, वशिलाशाही, जुजबी गुणवत्तापूर्ती या बाबी टाळण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवे. शासकीय संस्थांच्या नियुक्ती संदर्भात राज्य शासनाच्या वतीने अनुदान प्राप्त असलेल्या सर्व संस्थांमध्ये एमपीएससीमार्फत शिक्षक व प्राध्यापक भरती केली पाहिजे. ज्यामुळं भरती प्रक्रिया व्यवस्थित होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.
शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार हा आपल्या देशाचा व राज्याचा पिढी घडवणारा व्यक्ती म्हणून गौरव व स्वीकार केला पाहिजे. जो शिक्षक आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सबल आहे. तोच शिक्षक शैक्षणिक व संशोधन कार्यामध्ये देशाची मान उंचावून भरीव असं कार्य करु शकतो. शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट उत्कृष्ट, मूल्याधिष्ठित, प्रगतिशील समाज व राष्ट्र उपयोगी नेतृत्वशील नागरिक घडवणं हा असला पाहिजे. या कोरोना पार्श्वभूमी मध्ये सुरू होत असलेल्या या नवीन शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शासनाने शिक्षणावर भरीव अशी आर्थिक तरतूद केली पाहिजे.शासनाने शिक्षणाचे व शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण कमी कसं होईल याचा विचार करणं गरजेचं आहे.