भाई एन डी पाटील यांचे योगदान आणि आधुनिक महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा अर्थ
ज्येष्ठ पुरोगामी नेते प्रा एन डी पाटील यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त प्रा सचिन गरुड यांनी त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीतील त्यांच्या योगदानावर लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख...;
भाई एन.डी.पाटील ( १५ जुलै १९२९ -१७ जाने.२०२२ ) यांचे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान अनन्यसाधारण आहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते अखेरीस नव्वदाव्या वर्षापर्यंत ते महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अखंड कार्यरत राहिले. स्वातंत्र्योत्तर भारतातील महाराष्ट्रापासून ते १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य साकारल्यानंतर आणि त्यानंतर उत्तरकाळात जागतिकीकरणोतर सहस्त्रकाच्या दोन दशकाच्या वेगवेगळ्या स्थित्यंतराच्या, परिवर्तनाच्या टप्प्यावर ते साक्षीदार आणि संघर्षरत राहिले. हा संपूर्ण कालखंड जवळपास सत्तर वर्षाचा आहे. थोडक्यात माझ्या मांडणीच्या प्रारंभीच निष्कर्ष वजा सुतोवाच करायचे झाले तर विसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात तब्बल सात दशके भाईंनी पुरोगामी भूमिका घेत त्यांचा ठसा उमटवला आहे. भाईवर फुलेवाद आणि मार्क्सवाद-लेनिनवाद यांचा समन्वित प्रभाव होता.
सत्यशोधक –ब्राह्मणेतर चळवळ १९३० मध्ये गांधी नेतृत्त्वाच्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर भारतात विशेषत: चार प्रकारच्या चळवळीचा प्रभाव होता. त्यातील एक, ब्रिटीश साम्राज्यवादापासून भारताला राजकीय मुक्तता मागणारी राष्ट्रीय कॉंग्रेसची चळवळ ; दुसरी – वर्गवादी प्रारुपात क्रांती करू पाहणारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची चळवळ; तिसरी– जाती मुक्तीच्या क्रांतीचा ध्येयवाद घेऊन संघर्ष करणारी डॉ. आंबेडकरांची दलित चळवळ आणि चौथी- हिंदुत्त्ववादी चळवळ; असे चार प्रवाह होते. त्यापैकी हिंदुत्त्ववादी चळवळीचा जवळपास कुठेही प्रभाव नव्हता. एन. डी. पाटलांवर उमेदीच्या वयात संपुष्टात आलेल्या सत्यशोधक–ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव होता. स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ मध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेसशी वर्गजातीय मतभेद झाल्याने पूर्वाश्रमीच्या ब्राह्मणेतर पक्षातील मराठा नेतृत्त्वाने फुलेवाद आणि मार्क्सवाद-लेनिनवाद यांचा समन्वय करणारा शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला आणि सत्ताधारी कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच हिंदुत्त्ववादी चळवळ यांच्या प्रतिवादाची राजकीय भूमिका स्वीकारली. कम्युनिस्ट पक्षांचे नेतृत्त्व ब्राह्मणादी उच्चजातीयांकडे राहिल्याने पूर्वाश्रमीच्या ब्राह्मणेतर नेत्यांनी मार्क्सवाद-लेनिनवाद स्वीकारून हा नवा स्वतंत्र पक्ष निर्माण केला केला होता. या नेत्याच्या सान्निध्यात एन.डी. पाटील यांची जडणघडण झाली. विद्यार्थीदशेत त्यांनी सहभाग घेतल्याने प्रथमच तुरुंगवास भोगावा लागला होता. १९४८ मध्येच शेकापमध्ये प्रवेश केलेल्या भाईंनी हीच पक्षीय वैचारिक भूमिका पुढे आजन्म अव्यभिचारी निष्ठेने जपली. सत्तरीच्या व ऐंशीच्या दशकापर्यंत शेकापचे पक्षीय बल बऱ्यापैकी असल्याने महाराष्ट्रात या पक्षाने विरोधी पक्षाची प्रभावी भूमिका बजावली. १९६० ते १९८२ या एकूण १८ वर्षाच्या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते १९८२ दरम्यान पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री आणि १९८५ ते १९९० मध्ये कोल्हापूर मतदार संघाचे आमदार होते. १९९५ पासून पुढील वीसेक वर्षे ते शेकापचे सरचिटणीस राहिले. याकाळात शेती, शिक्षण, सहकार आदी मुद्द्यांवर प्रभावी संसदीय राजकारण करण्यात एन. डी. पाटलांसारख्या नेत्याचा मोठा वाटा राहिला आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यचौकटीत संसदीय व संसदबाह्य जनलढे त्यांनी लढवले. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रभावात वाढलेल्या एन. डी. पाटलांनी आयुष्यभर समाज परिवर्तनवादी शैक्षणिक भूमिका घेत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थात्मक पातळीवर सार्वजनिक शिक्षणाचा व्याप वृद्धिंगत केला. भाऊराव पाटलांनंतर रयत शिक्षण संस्थेची शाळा-कॉलेजेस ग्रामीण भागात स्थापन करीत हा विस्तार करण्यात परिश्रम केले.
नव्वदीनंतर भारताने स्वीकृत केलेले मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाने कल्याणकारी राज्य प्रारूपाला मोठा छेद दिला. याकालापासून डाव्या व आंबेडकरी प्रवाहाला उतरती कळा येऊ लागली. त्याबरोबरच शेकापचे राजकारण संकोचले. मोठ्या प्रमाणात समाज परिवर्तनवादी शक्तींचे दुर्बलीकरण होत गेले. याकाळात अनेक सुट्या सुट्या जनचळवळीही सुरु राहिल्या. त्या बहुतेक तात्कालिक आणि विवक्षित प्रश्नकेंद्री होत्या. या काळात एन. डी. पाटलांचे लढाऊ नेतृत्त्व शेकापच्या झेंड्याखाली लढलेल्या लढ्याच्या तुलनेत अश्या काही सुट्या वाटणाऱ्या जनचळवळीकडे झेपावताना दिसते. ह्या चळवळी प्रामुख्याने शेतकरी- श्रमिकांच्या प्रश्नाशी संबंधित होत्या. संसदीय राजकारणात डाव्या चळवळी ह्या विखुरलेल्या आणि मध्यवर्ती प्रभाव पडू शकतील अश्या राहिल्या नाहीत. अश्या वेळेस त्यांनी सर्वच डाव्या पक्षांशी सहमतीची भूमिका ठेवली. आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून बहुतेक सर्वच डाव्या पक्षांशी सलोख्याचे संबध ठेवले. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेतृत्त्व केले. पाश्चत्य विवेकवाद व वैज्ञानिक तत्वसरणीशी सत्यशोधकी विवेकवादाची सांधेजोड करीत वैचारिक व मानसिक समाजपरिवर्तनाला प्राधान्य दिले. सोव्हियत रशियाच्या पतनानंतर ग्राम्शीयन विचारांची प्रस्तुतता वाढत गेली. त्या पार्श्वभूमीवर भारतातील ब्राह्मणी-भांडवली प्रभूत्त्वाला आव्हान देणाऱ्या सत्यशोधकी वैचारिकतेचे प्रयोजन अधिक स्पष्ट झाल्याचे एन. डी. पाटलांचे मत बनले होते. शेकापने पर्यायी धर्म-संस्कृतीचे लढे लढण्यास माघार घेतल्याने तसा कार्यक्रम पक्षीय पातळीवर विकसित करता आला नव्हता. फुले-आंबेडकरी पक्ष-संघटनेच्या धर्म-संस्कृतीच्या कार्यक्रमपत्रिकेतील लढ्यांमध्ये भाई एन.डी.नी प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. पुढे अंनिसच्या माध्यमातून त्यांनी धर्मसंस्कृतीच्या शोषणाला आव्हान देत समतावादी व धर्मनिरपेक्ष मूल्यांचा जोरकस पुरस्कार केला. परंतु हा समग्र धर्म-संस्कृतीचा पर्यायी आकृतिबंध नव्हता. अंनिसचे नेतृत्त्व-संघटन हे मध्यमवर्गीय असल्याने जागतिकीकरणानंतर साकारलेल्या बहुजन-दलित नवमध्यमवर्गाचा एक प्रवाहाचाही त्याला पाठिंबा राहिला आहे. अंनिसची भूमिका विस्थापित व शोषित जातीवर्गाच्या हितविरोधी नसताना संघटनाचा आधार बनलेल्या नवमध्यमवर्गाचे हित विस्थापित जातीवर्गाच्या विरोधात गतिमान राहिले, आणि आपल्या वेगवेगळ्या कृती कार्यक्रमाला पाठींबा मिळवण्यासाठी त्यांनी ज्या तडजोडी केल्या,त्यातून काही अंतर्विरोधात्मक पेच निर्माण झाले. या पेचातच भाई एन.डी.नी फुले-आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन या नवमध्यमवर्गापुढे ठेवण्याचा प्रयास केला. महाराष्ट्रातील जातीसरंजामी मराठा उच्चभ्रू प्रवाहाच्या सत्ताकारणाला मोडीत काढून शेतकरी कष्टकरी विस्थापित मराठ्यांच्या बाजूने सामाजिक राजकीय भूमिका घ्यायला सुरुवात केली. याकाळात मोठ्या प्रमाणात याच शेतकरी जातीवर्गाच्या आत्महत्या महाराष्ट्रात साथीच्या रोगाप्रमाणे वाढत होत्या. शेतकरी वर्गजातीशी जैवरित्या जोडलेल्या एन. डी. पाटलांच्या संवेदनशील मनावर हा मोठा आघात होता. शेतकरी वर्गजातीच्या आत्महत्येचे आणि शेतीच्या अरिष्टाचे मूळ खाजगीकरण,जागतिकीकरण, उदारीकरणाच्या आर्थिक धोरणात असल्याचे अर्थलक्षी निदान त्यांनी स्वीकारले. शेतकरी वर्गजाती ह्या पायाभूत जातीरचनेच्या शोषित अंकित जातीघटक आहेत, अशी मूलगामी चर्चा मध्यवर्ती न आल्याने एकांगी अर्थकेंद्री चर्चा सातत्याने झडत राहिल्या. बदलत्या कालानुरूप जातवर्गीय तसेच लैगिक शोषण-शासनाचे स्वरूपही बदलत गेले आहे. शेतकरी आत्महत्याबरोबरच जातीय अत्याचार आणि स्त्रियांवरील हिंसेचे स्वरूप याकाळात बदलत होते. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार आणि शेतकरी वर्गजाती यांच्यातील जातीय तणाव नामांतराच्या प्रश्नापासून त्यांच्या आकलनात होता. या धर्तीवर दलितहितैषी आणि मराठा जातीयवादाला छेद देणाऱ्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वर्गजातीसमन्वित विचारांचे त्यांना खास आकर्षण वाटत राहिले. याचकाळात त्यांनी जागतिकीकरणविरोधी अभियानाचे नेतृत्त्व केले. जागतिकीकरणाचा प्रारंभ आणि बहुजन-दलित नवमध्यमवर्गाचा उदय हा १९९० नंतर झाला, हे उघड दिसत असले तरी त्याची सुरुवात १९८० च्या नंतर झाली होती, याचा वर्ग जातीय उहापोह त्यांनी केला आहे. जागतिकीकरणाच्या पर्वात साकारलेला नवमध्यमवर्ग सत्तरीच्या दशकाप्रमाणे समाजपरिवर्तक चळवळी चे नेतृत्त्व करण्यास माघार घेत असल्याची त्यांची खरमरीत टीका होती. याच बदलत्या काळात दलित, आदिवासी, भटके आणि शेतकरी, मध्यम जातींचे प्रश्न बिकट स्वरुपात उभे राहिले होते. याची चर्चाही सुरु झाल्याने त्यांनी या बदलाचा आपल्या दृष्टीत अवलंब केला आणि शेतकरी, आदिवासी तसेच श्रमिक जातीवर्गाच्या हिताच्या अनेक लढ्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. या जनविभागाच्या अधिकतर आर्थिक हिताच्या लढाया त्यांनी लढल्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने महाराष्ट्राची भाषिक राज्यरचना समाजवादी प्रारुपात गतिमान व्हावी, असा ध्येयवाद या लढ्यात असलेल्या डाव्या, फुले-आंबेडकरी, समाजवादी पक्ष-संघटनेने बाळगलेला होता. या ध्येयवादाला धरूनच एन.डी. पाटील यांनी तब्बल सत्तर-पंच्याहत्तर वर्षे जे समाजकारण व राजकारण केले, त्याला आपण 'पुरोगामी' या संज्ञेने संबोधित करीत असतो. 'पुरोगामी' ही संज्ञा मराठीत मोघमपणे वापरली गेली आहे. साधारणतः महाराष्ट्रात समाजवादी, डावे आणि कॉंग्रेसमधील काही नेते, गट-प्रवाह यांनाही पुरोगामी म्हटले गेले आहे. मराठीत डाव्या लेखकांनी पुरोगामी या शब्दाचा वापर केला आहे. हिंदीत अश्या प्रकारचा मोघम शब्दप्रयोग वापरण्यात आला नाही. डाव्यांनी त्यासाठी प्रगतीशील असा शब्द वापरात आणला आहे. दलित पन्थरच्या झंझावती चळवळीनंतर काही समाजवाद्यांनी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या कॉंग्रेसमधील काहींनी महाराष्ट्राला " फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र " असे म्हणायला सुरुवात केली. याचा अर्थ, पुरोगामी होण्याची मुख्य अट फुले-शाहू-आंबेडकरांची समतावादी विचारधारा मानणे ही आहे. तथापि विद्रोही दलित विचारवंत-लेखक, आंबेडकरवादी नेते यांना स्वतःला कधीही पुरोगामी म्हणवून घेतलेले नाही. समाजवादी, डाव्या अभ्यासकांनी फुले-आंबेडकरी चळवळीलाही पुरोगामी चळवळीच्या संवर्गात वर्गीकृत केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या ब्राह्मणी बुद्धीजीवी आणि मराठा उच्चभ्रू राज्यकर्त्या वर्गाच्या बहुस्तरसत्ताक प्रारुपातून या तथाकथित नेत्यांना व औपचारिक जातवर्गसुधारणेची भूमिका घेणाऱ्या मराठी साहित्यिक, बुद्धीजीवी वर्गाला पुरोगामी म्हणण्याची प्रथाच पडली. यशवंतराव चव्हाण यांच्या तथाकथित 'बेरजेच्या राजकारणा'च्या प्रारुपाने शेकापच्या व आरपीआयच्या नेत्यांना कॉंग्रेसमध्ये ओढून राज्यातील प्रबल होऊ पाहणाऱ्या प्रागतिक विरोधी पक्षाची ताकद काढून घेण्याचा प्रयास केला. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये गेलेल्या शेकापच्या व आरपीआयच्या नेत्यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे नेतृत्त्व पुरोगामी बनल्याचा निर्वाळा दिला होता. १९७० च्या दरम्यान आरपीआयच्या दादासाहेब गायकवाडांच्या गटाने कॉंग्रेसशी राजकीय युती केल्यानंतर आणि अनेक जुने आरपीआयचे नेते कॉंग्रेसमध्ये गेल्यावर या पुरोगामी शब्दाला एकप्रकारची राजकीय अधिमान्यता प्राप्त होत गेली आहे. त्याकाळात कॉंग्रेस नेतृत्त्वालाही पुरोगामी म्हटले जाऊ लागले. पुढे या तथाकथित पुरोगामी कॉंग्रेस व प्रस्थापित आरपीआयच्या विरोधात दलित पन्थरचा विद्रोह उदयाला आला. पन्थरच्या संदर्भातही अनेकांनी नंतर पुरोगामित्त्वाचे आशय विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ, पुरोगामी या संज्ञेची व्याख्या बदलत्या राजकारण व समाजकारणाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. सामाजिकशास्त्राच्या अकादमिक क्षेत्रात अश्या गतिमान संज्ञा-संकल्पनांचा सापेक्ष अर्थ विशद करणे ह्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.
२००३ च्या सावंतवाडीच्या विद्रोही साहित्य संमेलनात कांचा इल्लय्या यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक द्वैत मांडताना म्हटले होते की, महाराष्ट्र हा फुले-शाहू आंबेडकर यांचा आहे, हे जसे खरे आहे. तसे फसिस्ट ब्राह्मणी हिंदुत्त्ववाद देणारे हेडगेवार गोळवलकर सावरकर व गांधींचा खुनी गोडसे हेदेखील महाराष्ट्राने देशाला दिले आहेत. नंतरच्या काळात कॉ. गोविंदराव पानसरे यांनीही असे मत मांडले की, महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर फसिस्ट हिंदुत्त्ववादी- ब्राह्मणी शक्तींचे देशात व राज्यात वर्चस्व वाढत गेले. १९९५ नंतर तीनवेळा हिंदुत्त्ववादी पक्षांचे राज्यात सरकार स्थापन झाले. गेल्या तीन दशकात हिंदुत्त्ववादाला मुस्लीम व नवबौद्ध हे जनसमूह वगळता शेतकरी, मध्यम जाती तसेच अनु. जातीजमातीत मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत गेली आहे. महाराष्ट्रात अनेक बुवाबाबांचे अनुयायी शेतकरी व मध्यम जातीय शिक्षित व नवमध्यमवर्गात निर्माण झाल्याने भाई एन. डी. पाटील व नरेंद्र दाभोलकर यांना नाणीजच्या नरेंद्र महाराजाने खुलेआम मारण्याची धमकी दिली. या महाराजांच्या अनुयायीवर्गात मराठा-कुणबी जातीयांचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य राहिले आहे. २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात राजकीय परिस्थिती बदलली. केंद्रात बहुमताने संघ-भाजपचे सरकार स्थापन झाले. यादरम्यान नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, एम.एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे एका मागोमाग नियोजनपूर्वक प्रतिगामी फसिस्ट हिंदुत्त्ववादी- ब्राह्मणी शक्तींकडून खून घडवून आणण्यात आहेत. हे चारही व्यक्ती डाव्या, समाजवादी चळवळीचे मोठा जनाधार असलेले नेते –विचारवंत राहिले आहेत. या चौघांच्या खूनसत्राची पाळेमुळे महाराष्ट्रातील फसिस्ट हिंदुत्त्ववादी- ब्राह्मणी शक्तींच्या खुनशी व व्देषाच्या राजकारणात आहेत. याच पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र पुरोगामी' होता काय ? असा चिकित्सक प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात पुरोगामी प्रवाहाचा प्रभाव असला तरी तो नंतरच्या काळात क्षीण होत गेला आहे, म्हणून 'महाराष्ट्र आता पुरोगामी राहिलेला नाही' असेही निष्कर्ष-वजा वक्तव्य केले जात आहे. एकीकडे महाराष्ट्राला भरीव प्रागतिक परंपरा व समाजक्रांतीकारी विचारांचा तसेच लढ्यांचा वारसा आहे. तर दुसरीकडे प्रतिगामी ब्राह्मणी-भांडवली, उजव्या शक्तींचे द्वंद्व याच महाराष्ट्रात उभे आहे . त्यामुळे आज असा प्रश्न विचारणे अधिक प्रस्तुत असेल की, आजचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे का ? किंवा तो तसा पुरोगामी होता का ? आणि जर महाराष्ट्र पुरोगामी होऊ शकला नसेल, तर तो का होऊ शकला नाही? एखादे राज्य व प्रदेश पूर्णत: पुरोगामी असल्याची कल्पना कितपत खरी असते. धर्म,जात,वर्ग,पितृसत्तेचा बहुविध शोषण-शासनव्यवस्था असलेल्या व त्याविरोधात पायाभूत बदलासाठी संघर्ष करणारे प्रवाह आणि ही ब्राह्मणी-भांडवली टिकवून ठेवू पाहणारे प्रतिगामी शक्ती यांच्या व्यामिश्रतेचा हा राज्याचा पट आहे. जागतिकीकरणानंतर सत्तास्थानी आलेल्या हिंदुत्त्ववादी शक्तींनी बहुजन-दलित जातींची अधिमान्यता प्राप्त करण्यासाठी आणि हिंदुत्त्ववादी- ब्राह्मणी वैचारिक प्रभुत्त्व बळकटीकरणासाठी फुले-आंबेडकरांचे ब्राह्मणीकरण सुरु ठेवले आहे. अर्थात पुरोगामी किंवा प्रागतिक असण्याची ही प्रक्रिया सातत्यपूर्ण आहे, गतिमान आहे . ती स्थिर नाही. खरे तर महाराष्ट्र हा पुरोगामी किंवा प्रागतिक नाही, ती घडवण्याची व घडण्याची संघर्षरत कल्पना आहे. अनेक प्रागतिक पक्ष-संघटना, त्यांचे नेते , कार्यकर्ते असा महाराष्ट्र घडवण्यासाठी संघर्ष करीत आले आहेत. आणि अद्यापत: संघर्ष करीत आहेत. भाई एन. डी. पाटील या परिवर्तनशील प्रवाहातील एक महत्त्वाचे नेते -विचारवंत आहेत.
त्यांच्या समग्र समाजकारणाला व राजकारणाला पुरोगामी या संज्ञेअंतर्गत व्याख्यांकित करत असताना वरील मोघम अर्थाने हा शब्द स्वीकारलेला नाही. त्यांना अभिप्रेत असलेल्या जातवर्गीय दुरुस्तीवादाऐवजी जातवर्गीय मूलभूत परिवर्तनाच्या संदर्भात आपण तो पाहिला पाहिजे. मला वाटते, डाव्या अर्थाने एन.डी. पाटलांचे समग्र समाजकारण व राजकारण हे प्रागतिक स्वरूपाचे होते. जातीय लढ्याबाबत त्यांनी पारंपारिक वर्गीय भूमिका घेतली नाही, हे विशेष. तथापि जातीअंताच्या सैद्धांतिक व व्यावहारिक स्तरावर ते अधिक ठोसपणे आणि गहनतम उतरलेले नव्हते. शेकापमधील काही जुन्या नेत्यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेला प्रतिगामी म्हणून संबोधले, तेव्हा शेकापचे संस्थापक नेते शंकरराव मोरे यांनी या भूमिकेचा प्रतिवाद करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे व लढ्याचे समर्थन केले होते. मोरे यांच्या या भूमिकेचा एन. डी. पाटील यांच्यावर कायम प्रभाव राहिला. नामांतराच्या प्रश्नावर शेकापचे नेते आणि कार्यकर्ते नामांतराच्या विरोधात होते. पक्ष पाठींबा देणार नाही, याची जाणीव होताच भाईंनी पक्षाच्या पाठिंब्याचा विचार न करता स्वत: प्रागतिक भूमिका घेत नामांतराला पाठिंबा दिला. पक्षाच्या चुकीच्या धारणा आणि सामुहिक विरोधी मताला न जुमानता त्यांनी स्वयंप्रज्ञेतेने हा पाठिंबा दिला. पक्षांतर्गत विरोधाच्या पीडेला ते मोठ्या कणखरपणे सामोरे गेले. वर्ग आणि जातीअंताच्या बाबतीत कॉ. शरद पाटलांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी आपला पाठींबा दिला होता. स्त्रीप्रश्नावर शेकापने लैंगिक समतेचा कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतलेला नव्हता. त्यानुषंगाने जातीपितृसत्तेविरोधात स्वतंत्रपणे लिंगभाव विश्लेषक दृष्टी विकसित करावी लागते. राजकीय आघाडीवर शेतकरी बहुजन स्त्रीच्या शोषणमुक्तीचे काही मुद्दे स्वतंत्र कार्यक्रम पत्रिका म्हणून शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या १९८६ मधील चांदवडच्या अधिवेशनात सीमित कक्षेत पुढे आणली गेली होती. काही काळ ती प्रभावी राहिली. आणि उत्तरकाळात स्त्रीमुक्तीचा हा कार्यक्रम स्थगित झाला. व्यक्तिश: एन.डी. पाटील फुलेवादी असल्याने ताराबाई शिंदेच्या सत्यशोधकी स्त्रीवादाचे आणि एंगेल्सच्या वर्गीय स्त्रीदास्यमुक्तीच्या भूमिकेचे चिंतन परिशीलन त्यांनी केलेले होते. अंनिसच्या प्लटफॉर्मवर स्त्रीच्या धार्मिक-सांस्कृतिक शोषणाविरुद्ध समाजवादी वळणाने हे जनप्रबोधन उभे राहिले. एन.डी. पाटील यांच्या भाषणातील स्त्रीदास्य विश्लेषणाचे काही मुद्दे यादृष्टीने अभ्यासनीय आहेत.
तब्बल सात दशके समकालीन आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रागतिक चळवळीशी भाई एन.डी. पाटील यांनी स्वत:ला जोडून घेतले. अनेक आंदोलनाचे नेतृत्त्व त्यांनी केले. त्यासाठी लाठीमार, तुरुंगवास, गोळीबारही त्यांना झेलावा लागला. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चारित्र्यसंपन्न व नैतिकतेचा एक वस्तुपाठ निर्माण करणारे राहिले आहे. त्यांनी दहाहून अधिक पुस्तिका लिहिल्या आहेत. त्यातून त्यांची शेतकरी -श्रमिक वर्गजातीच्या जैविक विचारवंताची भूमिकाही आपल्याला प्रत्ययास येते.
(प्रा. सचिन गरुड हे इतिहास अभ्यासक तसेच इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)