छत्री आणि जे कृष्णमूर्ती...!!!

‘छत्री दुरुस्त करून मिळेल’ सध्या यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. तुम्ही देखील या पोस्ट पाहिल्या असतीलच. मात्र, या छोट्या गोष्टीची कोणाला जाहिरात करावीशी का वाटली असेल? माणसाला एखाद्या गोष्टीची जाहिरात का करावीशी वाटते? या मूळ भावनेचा तुम्ही कधी विचार केला आहे का? प्रत्यक्ष कृती आणि जाहीरातबाजी यात काय फरक आहे? यावर प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी जे कृष्णमूर्ती यांचे मांडलेले विचार नक्की वाचा...

Update: 2021-06-21 03:18 GMT

सोशल मीडियावर 'छत्री दुरुस्त करून मिळेल' या इवल्याशा कामाची मोठी जाहिरात करणाऱ्या पोस्टची टिंगल करणाऱ्या अनेक पोस्ट आल्या आहेत. खरंच ते नक्कीच हास्यास्पद आहे. परंतु समाजसेवा नावाची गोष्ट ही किती बटबटीत होते आहे. याचाही तो एक नमुना आहे. कितीही छोटी गोष्ट करताना आपल्याला त्याची जाहिरात का करावीशी वाटते? त्याकडे सर्वांचे लक्ष का वेधून घ्यावेसे वाटते? केवळ आनंदासाठी एखादी गोष्ट का करावीशी वाटत नाही ? असा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने विचारायला हवा...

जे कृष्णमूर्तींना फिरायला जाताना चालताना रस्त्यात एक दगड पडला होता. कृष्णमूर्तींनी तो दगड उचलून बाजूला फेकून दिला. पुढे गेल्यावर कृष्णमूर्तींना सोबतच्या व्यक्तीने विचारले की तो दगड तुम्ही का उचलून टाकला ? कृष्णमूर्तींना ते लक्षातही नीट नव्हते. ते म्हणाले

"कुठला दगड?" आणि पुढे म्हणाले "त्या क्षणी मला वाटले की, हा दगड रस्त्यात नको म्हणून मी तो उचलून फेकून दिला व त्याच्या बरोबर त्याच्या बद्दलचा विचारही फेकून दिला आणि बाजूला झालो" अशा उत्कट भावनेतून जे काही करावेसे वाटते ती खरी कामाची प्रेरणा असते. हा संदर्भ घेऊन मग त्यांनी समाजसेवा या विषयावर भाष्य केले होते.

पूर्वीच्या काळी लोक अशा रितीने सामाजिक काम करत एका क्षणी काम करावेसे वाटले की, त्या कामात स्वतःला झोकून देत. पण आज काम करण्याअगोदर त्याची जाहिरात केली जाते काम करताना तर शूटींग फोटोग्राफी चा तर प्रश्नच नाही !! आणि नंतर पुन्हा त्याचे डॉक्युमेंटेशन आणि प्रत्येक क्षणाचा हिशोब आणि त्या हिशोबातून काय निर्माण होईल? राजकारण हे तर त्याचे बटबटीत उदाहरण झाले आहे आणि त्यातून सामाजिक काम ही कल्पनाच आज पूर्णतः व्यक्तिकेंद्रित आणि सेलिब्रेशनची होते आहे की काय? अशी भीती वाटू लागते..

आम्हाला प्रसिद्ध काय व्हावेसे वाटते. या एका लहान मुलाच्या प्रश्नाला जे कृष्णमूर्ती उत्तर देताना ते म्हणतात की आपल्याला प्रसिद्ध व्हावेसे वाटते कारण टआपण जे काही करत असतो त्यावर आपले प्रेम नसते. म्हणून लेखनावर चित्रकलेवर लेकरावर तुमचे खरोखरच प्रेम असेल तर तुम्ही सुप्रसिद्ध आहात की नाही याची चिंता ते करणार नाही. प्रसिद्ध व्हावेसे वाटणे हे हीनपणाचे क्षुद्र पणाचे लक्षण आहे. आपण जे काम करतो. त्याबद्दल आपल्याला तळमळ नसते म्हणून आपण प्रसिद्धीद्वारे स्वतःचे वैभव वाढवण्याचा प्रयत्न करत असतो..

आपले सध्याची शिक्षण आपल्याला आपण जे करतो त्यावर प्रेम करायला शकत नाही तर कशावर प्रेम करायला शिकवते त्यामुळे आपल्याला कृतीपेक्षा फारच महत्त्वाचे वाटू लागली आहे.

Tags:    

Similar News